गर्भधारणा होताना

ओव्युलेशनसाठी गर्भाशयाच्या श्लेष्माचा मागोवा

गर्भाशयाच्या मुखातून येणाऱ्या चिकट स्त्रावाच्या प्रमाणावर आणि गुणवत्तेवर लक्ष ठेवल्यास ओव्यूलेशन केव्हा होणार आहे हे समजण्यास मदत होईल. ह्या माहितीची मदत तुम्हाला गर्भधारणा होण्यासाठी होईल. ओव्यूलेशनवर लक्ष ठेवण्यासाठी गर्भाशयाच्या मुखातून येणाऱ्या ह्या चिकट स्तरावाविषयी वाचा. गर्भाशयाच्या मुखाचा श्लेष्मा म्हणजे मासिक पाळीच्या विविध टप्प्यावर गर्भाशयाच्या मुखात तयार होणारा द्रवपदार्थ होय. मासिकपाळीच्या दिवसानुसार प्रत्येक निरोगी स्त्रीच्या गर्भाशयाच्या मुखात वेगवेगळ्या प्रकारचा श्लेष्मा तयार होत असतो. ह्या श्लेष्माचे प्रमाण, गुणवत्ता आणि ओव्यूलेशन दरम्यान गर्भाशयातील मुखाच्या श्लेष्माची स्थिती हे सर्व घटक स्त्रीचे आरोग्य, शरीर आणि गर्भधारणेसाठी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी योग्य वेळ आहे की नाही हे निर्देशित करते. जरी ओव्यूलेशनचा काळ माहिती करून घेण्यासाठी आधुनिक आणि अचूक पद्धती असल्या तरी, गर्भाशयाच्या मुखातील स्त्राव ओव्यूलेशनचा निर्देशक म्हणून वापरणे ही सोपी, कमी वेळ घेणारी आणि विनामूल्य पद्धत आहे. गर्भाशयाच्या मुखातून येणाऱ्या स्त्रावाचा फक्त ओव्यूलेशनचा काळ माहित करून घेण्यासाठी उपयोग होत नाही तर तुमच्या शरीराविषयी अधिक जाणून घेण्यासाठीसुद्धा ह्याचा उपयोग होतो. तसेच तुमच्या लैंगिक आयुष्याविषयी, गर्भारपणाविषयी आणि कुटुंब व्यवस्थापनासाठी सुद्धा तुम्हाला ह्याचा उपयोग होऊ शकतो. तथापि गर्भाशयाच्या मुखातून येणारा चिकट स्त्राव आणि ओव्यूलेशन ह्यांच्यातील संबंध जाणून घेण्याआधी आपण ह्या चिकट स्रावांच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी माहिती करून घेऊयात. ओव्यूलेशन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या श्लेष्माविषयी पहिल्यांदा थोडं जाणून घेऊयात.

गर्भाशयाच्या मुखातून येणारा चिकट स्त्राव म्हणजे नक्की काय?

हा स्त्राव म्हणजे चिकट, पाणीदार पदार्थ असतो आणि त्याची निर्मिती गर्भाशयाच्या मुखापाशी असलेल्या ग्रंथी करतात. (गर्भाशयाचा मानेसारखा खालचा भाग जो योनीला जोडला जातो). ह्या स्त्रावाची  विशेष कार्ये खालील प्रमाणे आहेत.

चिकट स्त्राव आणि ओव्यूलेशन

ओव्यूलेशनच्या प्रक्रियेद्वारे अंडाशयातून परिपक्व स्त्रीबीज गर्भाशयात सोडले जाते. ओव्यूलेशन मासिक पाळी चक्राच्या मध्यावर होते. जर स्त्रीने असुरक्षित संभोग केला तर ओव्यूलेशन नंतर ७२ तासांनी गर्भधारणेची खूप जास्त शक्यता असते ओव्यूलेशन आणि चिकट स्त्राव हे एकमेकांशी निगडित आहेत कारण त्यामुळे गर्घधारणेची शकयता वाढते कारण मासिक पाळीच्या संपूर्ण चक्रादरम्यान  ह्या स्त्रावाची  रचना (कॉम्पोसिशन) बदलत असते. त्यामुळे जर त्या स्त्रावाचा नीट अभ्यास केला तर स्त्रीच्या शरीरात ओव्यूलेशनची प्रक्रिया होते आहे किंवा नाही हे ती सांगू शकते. मासिक पाळी  चक्र ४ संप्रेरकांनी संचलित केले जाते - फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (एफ.एस.एच.), ल्युटिनाइसिंग हॉर्मोन (एल.एच.), इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. ह्या संप्रेरकांच्या बदलत्या पातळ्यांना प्रतिसाद देताना स्त्री मासिक पाळीच्या विविध टप्प्यातून जाते.

ओव्यूलेशन दरम्यान गर्भाशयाच्या मुखातील स्रावावर लक्ष ठेवणे

स्त्री गर्भाशयाच्या मुखातील ह्या श्लेष्माचे निरीक्षण करू शकते किंवा अनुभव घेऊ शकते. फक्त त्या स्त्रावाचे निरीक्षण करून म्हणजेच रंग आणि सुसंगतता  बघून तुम्ही ओव्यूलेशनचा काळ सांगू शकता. चिकट स्त्रावामुळे निर्माण होणाऱ्या संवेदनांवरून  तुम्ही ओव्यूलेशनचा काळ काढू शकता. स्त्रिया फिंगर टेस्ट करू शकतात, त्यामध्ये योनीमार्गात बोट घालून बोटावर असलेल्या चिकट स्त्रावाची  नोंद घेतली जाते. ओव्यूलेशन पूर्व काळात तो कोरडा असतो, जेव्हा तुम्ही खूप प्रजनक्षम असता तेव्हा हा स्त्राव ओलसर आणि निसरडा असतो आणि ओव्यूलेशनच्या नंतरच्या काळात तो कोरडा असतो. https://youtu.be/KyDgd0CGBag महत्वाचा मुद्दा: वेगवेगळ्या टप्प्यातील गर्भाशयाचा श्लेष्मा समजण्यासाठी आणि गरोदर राहण्यासाठी त्याची नीट नोंद ठेवा.

ओव्यूलेशन होताना गर्भाशयाच्या मुखातील हा चिकट स्त्राव कसा दिसतो?

ओव्यूलेशन होताना एफ.एस.एच., एल.एच. आणि इस्ट्रोजेन ह्या संप्रेरकांच्या पातळ्या वाढतात आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते. त्यामुळे ह्या चिकट स्रावाची रचना बदलते: हा स्त्राव ओव्यूलेशनच्या वेळेला ९८% पाण्यासारखा असतो. त्यामुळे तो 'पातळ', पाण्यासारखा असतो आणि म्हणून शुक्रजंतूंचे गर्भाशयाकडे वहन सोपे होते. ह्या काळात स्रावाची पी.एच. ही जास्त अल्कली असते त्यामुळे शुक्रजंतू जिवंत राहतात. ओव्यूलेशन च्या काळात स्त्रीच्या शरीरातून निर्मित झालेल्या ह्या स्रावास इंग्रजीमध्ये 'Fertile cervical mucus' असे म्हणतात. ओव्यूलेशन नंतर, प्रोजेस्टेरॉन ची पातळी वाढते आणि एफ. एस. एच तसेच  एल एच. आणि इस्ट्रोजेन ची पातळी कमी होते. त्यामुळे हा स्त्राव कमी पाणीदार (साधरणतः९३%), घट्ट, कमी द्रव्य असलेला आणि खूप आम्लयुक्त असा असतो. त्यामुळे ह्या स्रावास इंग्रजीमध्ये 'Non-fertile cervical mucus' असे म्हणतात.

गर्भाशयातील मुखाच्या स्रावावर लक्ष ठेवणे

ओव्यूलेशनच्या काळातील स्त्रावाच्या  वर्णनावरून हे स्पष्ट होते की: जे जोडपे गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असते त्यांच्यासाठी ह्या स्त्रावाचा नीट अभ्यास केल्याने त्याचा ओव्यूलेशनचा निर्देशक म्हणून उपयोग होऊ शकतो. ओव्यूलेशनचा कालावधी समजण्यासाठी सध्या ओव्यूलेशन प्रेडिक्टर किट सारख्या खूप आधुनिक पद्धती उपलब्ध आहेत. परंतु तुमच्या गर्भाशयाच्या मुखातील स्त्राव तपासून पाहणे ही खूप सोपी पद्धत आहे. तसेच महिलांना त्यांचे प्रजननक्षम दिवस ओळखण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते आणि त्यानुसार जोडप्याना शारीरिक संबंध ठेवण्याची वेळ ठरवता येते जेणेकरून गर्भधारणेची शक्यता जास्तीत जास्त वाढेल. गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असताना तसेच  ओव्यूलेशन आणि गर्भाशयाच्या मुखातील ह्या स्त्रावाचा अभ्यास करताना ह्या स्त्रावाचे खाली काही परिमाण दिले आहेत त्याकडे लक्ष ठेवणे आवशयक आहे. ते खालीलप्रमाणे: मासिकपाळी संपल्यानंतर,गर्भाशयाचे मुख कोरडे पडते. शरीराच्या इतर भागासारखीच ओलाव्याची कमीत कमी पातळी राखली जाते. काही दिवसांनंतर गर्भाशयाचे मुख हळूहळू ओलसर होते. त्यानंतर गर्भाशयाच्या श्लेष्माचे वेगवेगळे टप्पे खालीलप्रमाणे तुम्हाला दिसतील.

१. मलईदार श्लेष्मा

जर तुम्ही चिकट स्त्राव तपासून पाहिलात तर तो मलईदार दिसतो त्याचा अर्थ लवकरच ओव्यूलेशनला सुरुवात होणार आहे.
गर्भाशयाच्या मुखातील स्त्रावाचा हा सर्वात प्रजननक्षम टप्पा आहे. तथापि, शुक्रजंतूंसाठी प्रतिकूल नाही.

२. पाणीदार श्लेष्मा

ह्या प्रकारचा स्त्राव म्हणजे खात्रीपूर्वक ओव्यूलेशनचे चिन्ह आहे. ओव्यूलेशनची सुरुवात म्हणजे पाणीदार, पारदर्शक आणि पाण्यासारखी सुसंगतता असलेला स्त्राव असतो.
ह्या काळात शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणेची खूप जास्त शक्यता असते.

३. अंड्याच्या पांढऱ्या बालकाप्रमाणे दिसणारा श्लेष्मा

अंड्याच्या पांढऱ्या बालकाप्रमाणे दिसणाऱ्या स्त्रावास इंग्रजीत Egg white cervical mucus - or EWCM असे म्हणतात. ह्या काळात हा चिकट स्त्राव पारदर्शक असतो आणि कच्च्या अंड्यातील पांढऱ्या बालकाप्रमाणे दिसतो. ह्या स्त्रावाची सुसंगता, पोत आणि पारदर्शकता कच्च्या अंड्याच्या पारदर्शक बालकासारखी असते. तुम्ही तुमच्या हाताच्या दोन बोटात हा स्त्राव धरून बोटे ताणल्यास हा स्त्राव २ इंचांपर्यंत ताणला जाऊ शकतो.
इ.डब्लू.सी.एम. हा स्त्राव दिसत असल्यास तो खूप प्रजननक्षम  काळ असतो  आणि गर्भधारणा होण्याची खूप जास्त शक्यता असते.

४. चिकट श्लेष्मा

गर्भाशयाच्या मुखातील स्त्राव हा ओव्यूलेशन नंतर २-३ दिवसांनी चिकट झालेला आढळतो. ह्याचा  अर्थ तुमच्या शरीरात बदल होत आहेत आणि तुम्ही ल्युटील फेज मध्ये प्रवेश करत आहात.
गर्भधारणेसाठी पर्यटन करण्यासाठी हा काळ चांगला नाही.

गर्भाशयाच्या मुखातील हा स्त्राव कसा तपासून पहाल?

स्त्राव तपासून पाहण्याचे अनेक मार्ग आहेत ते खालीलप्रमाणे

१. टॉयलेट पेपर तपासून पहा

लघवी केल्यानंतर पुसून घेताना थोडा स्त्राव  टॉयलेट पेपरला लागेल तेव्हा तो कसा आहे ते तपासून पहा. जर पेपरवर पुरेसा स्त्राव नसेल तर योनीमार्गात टिशू पेपर थोडा खोलवर घालून पुन्हा प्रयत्न करू शकता. टीप: तुमचा टॉयलेट पेपर स्वच्छ आहे ना ह्याची खात्री करा. नेहमी टॉयलेट पेपर स्वच्छ आणि कोरड्या जागेत ठेवा आणि संसर्ग होऊ नये म्हणून नेहमी झाकून ठेवा.

२. पॅंटी लायनर तपासून पहा

बऱ्याच स्त्रिया घराबाहेर जास्त काळासाठी जाणार असतील तर पॅंटी लायनर वापरतात. पॅंटी लायनर म्हणजे सॅनिटरी नॅपकिन सारखेच असतात. परंतु ते थोडे पातळ आणि छोटे असतात. पॅंटी लायनर ओलावा आणि लघवी केल्यानंतर राहिलेले लघवीचे थेम्ब शोषून घेते आणि त्यामुळे पॅंटी कोरडी राहते. पॅंटी लायनर वापरल्याने फ्रेश आणि स्वच्छ वाटते. काही वेळा गर्भशयातील मुखाचा स्त्राव सुद्धा पॅंटी लायनर वर आढळतो. त्यामुळे पुढच्या वेळेला लघवीला जाताना तुम्ही नीट बघून स्त्राव तपासू शकता.

३.सर्जिकल स्वाबचा वापर

सर्जिकल स्वाब कॉटन बड सारखेच असते फक्त थोडे जाडसर आणि लांब असते. डॉक्टर्स आणि टेक्निशियन रोगाचे निदान करण्यासाठी नमुने गोळा करण्यासाठी सर्जिकल स्वाब वापरतात. औषधांच्या दुकानात सर्जिकल स्वाब मिळतात. फक्त निर्जंतुक स्वाब विकत घेण्याची काळजी घ्या. वर स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे नमुना तपासून पहा.

४. स्वच्छ बोट घाला

टॉयलेट पेपर योनीमार्गात घातल्यास त्यातील पाणी शोषून घेतले जाते आणि त्यामुळे स्रावाची सुसंगता बदलते. त्यामुळे ही शक्यता टाळण्यासाठी तुम्ही तुमची  एक किंवा दोन बोटे योनीमार्गात घालून  स्त्राव बोटांवर घेऊ शकता. स्त्रावाची सुसंगता, पोत आणि लवचिकता ही टिशू पेपरपेक्षा बोटावर जास्त समजते.

गर्भाशयाच्या मुखातील स्रावामध्ये बदल कशामुळे होतो?

स्रावाची रचना, सुसंगता, रंग तसेच वास हे ४ घटक प्राथमिक संप्रेरकांच्या पातळीवर अवलंबून असतात जे मासिक पाळी चक्र प्रभावित करतात आणि त्यावर नियंत्रण ठेवतात आणि ती संप्रेरके म्हणजे एफ.एस.एच., एल.एच., इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन होय. संप्रेरकांच्या पातळीच्या योग्य संतुलनावर स्रावाचे प्रमाण आणि गुणवत्ता अवलंबून असते. आधी सांगितल्याप्रमाणे, स्रावाची गुणवत्ता आणि प्रकार हे तुम्ही मासिक पाळी चक्राच्या कोणत्या टप्प्यावर आहात ह्यावर अवलंबून असते. ही नैसर्गिक आणि आरोग्यपूर्ण प्रक्रिया आहे आणि त्याची काहीही काळजी करण्याचे कारण नाही. परंतु स्रावाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे खूप घटक आहेत. स्रावामध्ये कुठल्या घटकांमुळे बदल होतात हे समजावून घेऊ.

१. गर्भनिरोधक गोळ्या

वेगवेगळी गर्भनिरोधनाची साधने वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करतात. सर्वात सामान्यपणे वापरले जाणारे गर्भनिरोधक म्हणजे गोळ्या. ह्या गोळ्या ओव्यूलेशन प्रतिबंधित करतात. तथापि बऱ्याच महिलांना माहिती नसेल परंतु गर्भनिरोधक सुद्धा खूप परिणामकारक असतात आणि ते स्त्रावाचे प्रमाण आणि घट्टपणा वाढवतात. ज्या स्त्रिया गर्भनिरोधक वापरतात त्या घट्ट स्त्रावाची  निर्मिती करतात आणि शुक्रजंतू गर्भाशयापर्यंत पोहोचू नयेत म्हणून अडथळा निर्माण करतात.

२. संप्रेरकांचे असंतुलन

बऱ्याच वेळा, काही कारणांमुळे जसे की वजन वाढ, ताण वगैरेंमुळे संप्रेरकांचे असंतुलन होते. शरीरातील संप्रेरकांच्या असंतुलनामुळे बऱ्याच गोष्टी चुकतात आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे स्त्रावामध्ये बदल होतो.

३. रोग किंवा संसर्ग

संसर्गामुळे किंवा रोगामुळे शरीरातील मायक्रोफ्लोरा बदलतो. उदा: जर एखाद्या स्त्रीला मूत्रमार्गाचा संसर्ग झाला असेल तर स्त्रावाची पी.एच. बदलू शकते. स्त्रावाची  सुसंगतता सुद्धा बदलते. बऱ्याच वेळा स्त्रिया मलईदार आणि घट्ट स्त्राव  होत असल्याचे सांगतात. जीवाणूंना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांचा शरीरात प्रवेश होण्यास प्रतिबंध करण्यासाठी शरीराची प्रतिकार यंत्रणा आहे.

४. ताण

ताणाचा परिणाम वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीने होतो, ताणामुळे काही लोकांचे वजन वाढते तर काहींचे शरीराचे एक किंवा अनेक अवयव दुखतात. ताणामुळे संप्रेरकांवर परिणाम होतो तसेच ताणामुळे स्त्रावाचे  प्रमाण आणि गुणवत्ता ह्यावर सुद्धा परिणाम होतो.

५. गर्भारपण

जेव्हा स्त्री गर्भवती असते तेव्हा तिचे शरीर 'म्युकस प्लग' तयार करते आणि ते जिवाणूंचा शरीरामध्ये प्रवेश होऊ नये म्हणून प्रतिबंध करते. नाकामधील चिकट पदार्थासारखाच हा असतो आणि त्यामध्ये इम्म्युनोग्लोब्युलिन्स आणि अँटीबॅक्टरील पेप्टाइड्स (प्रथिनांच्या छोट्या साखळ्या) असतात, ज्या नाकामधील पदार्थामध्ये सुद्धा आढळतात. दिसायला हा श्लेष्मा घट्ट, चिकट आणि मलईदार असतो.

६. स्तनपान

स्तनपानामुळे ओव्यूलेशनची प्रक्रिया दाबली जाते. ओव्यूलेशन झाले नाही की इस्ट्रोजेनची पातळी कमी होते आणि प्रोजेस्टरोनची पातळी वाढते. ही स्थिती तुमच्या मासिक पाळी नंतरच्या काही दिवसांसारखीच असते त्यामुळे तुमच्या गर्भाशयाचे मुख त्या दिवसांमध्ये जसे असते तसेच आताही होते म्हणजेच ते कोरडे पडते आणि खूप कमी किंवा अजिबात स्त्राव निर्मित होत नाही.

७. वजनात बदल

सगळेच नाही, पण काही महिला जेव्हा त्या आहारावर नियंत्रण ठेवत असतात तेव्हा त्यांच्या स्त्रावाचे प्रमाण आणि गुणवत्ता ह्या दोन्हीमध्ये बदल झालेला असल्याचे सांगतात. काही बदल लक्षात येत नाहीत, खूप जास्त वजनवाढ किंवा खूप जास्त वजन कमी होणे आणि तुमच्या आहारात टोकाचे बदल होण्याने तुमच्या गर्भाशयातील मुखाच्या स्रावामध्ये योग्य ते बदल होतात.

८. प्रवास

पाण्यातील बदलांमुळे प्रवासात ह्या स्त्रावामध्ये बदल होतात. जर पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता कमी असेल तर तुमचे शरीर त्या पाण्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल  आणि त्यामुळे स्त्राव नेहमीपेक्षा जास्त चिकट, मलईदार असेल आणि संसर्गापासून दूर राहण्यासाठी  ते संरक्षण यंत्रणा म्हणून काम करेल.

विरोधक श्लेष्मा

गर्भाशयाच्या मुखातील हा श्लेष्मा विरोधक म्हणून कार्य करतो त्यामधील काही कार्ये म्हणजे श्लेष्मा शुक्रजंतूंना जगण्यास प्रतिबंध करतो, शुक्रजंतूंच्या हालचालीवर परिणाम होतो किंवा ही दोन्ही कार्ये करतो. हा विरोधक स्त्राव हा खूप कोरडा, घट्ट, आम्लयुक्त असतो किंवा त्यामध्ये भरपूर अँटीबॉडीज असतात त्यामुळे शुक्रजंतू त्यामध्ये जिवंत राहत नाहीत. ज्या स्त्रीच्या शरीरात हा विरोधक स्त्राव तयार होत असतो त्या स्त्रीला गर्भधारणा होऊ शकते किंवा संपूर्ण आयुष्यात कधीही होत नाही. लक्षात घ्या की अशी स्त्री ही ओव्यूलेशन होत नसलेल्या स्त्री पेक्षा वेगळी असते. ज्या स्त्रीमध्ये विरोधक स्त्रावाचा प्रश्न असतो त्यांच्यामध्ये सुद्धा ओव्यूलेशन ची प्रक्रिया होत असते, त्यांचे शरीर सुद्धा प्रत्येक महिन्याला निरोगी स्त्रीबीजाची निर्मिती करत असते, तथापि ह्या स्त्रावामुळे शुक्रजंतू परिपक्व स्त्रीबीजापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे ह्या स्रावास काहीवेळा इंग्रजी मध्ये' Infertile cervical mucus' असे म्हणतात.

विरोधक स्रावास कारणीभूत घटक

ज्या स्त्रीचे शरीर निरोगी स्रावाची निर्मिती करते तेव्हा विरोधक स्रावाची निर्मिती म्हणजे तब्येतीच्या अनेक तक्रारींचे निर्देशक असते. तुमचे शरीर विरोधक स्रावाची निर्मिती करत आहे किंवा नाही हे जाणून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमची तुमच्या मासिक पाळी चक्राच्या ज्या टप्प्यावर आहात त्या टप्प्यावर असताना अपेक्षित स्रावाची निर्मिती होते आहे किंवा कसे हे तपासून पहा, जर तो स्त्राव वेगळा असेल तर काहीतरी गडबड आहे हे समजून तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा औषधांनी ही स्थिती सुधारते आणि कौन्सेलिंग मुळे तुम्हाला लवकरच गर्भधारणा होऊ शकते. दुसरीकडे असेही दिसून आले आहे की काही महिलांमध्ये नैसर्गिकरित्याच विरोधक स्त्रावाची  निर्मिती होत असते आणि तो गर्भधारणेस तितकासा पूरक नसतो. ह्या परिस्थतीतीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. जसे की जीवनशैली, आहाराच्या सवयी, फिसिओलॉजि वैगरे . त्यामुळे त्या स्त्रीसाठी तिने डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि गर्भधारणेच्या आधी नॉर्मल स्त्राव कसा असतो हे जाणून घ्यावे. जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तुमच्या शरीराची माहिती असली पाहिजे, त्यामुळे अजिबात लाजू नका आणि शोध घ्या. तुमच्या गर्भाशयाचा मुखातील हा स्त्राव तुम्हाला गर्भधारणेसाठी मदत करू शकतो तसेच तो  तुमच्या सर्वांगीण आरोग्याचा एक चांगला निर्देशक आहे. पुढच्या मासिक पाळी चक्रापासून सुरुवात करा आणि स्वतःला जाणून घ्या.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved