In this Article
तुम्ही गरोदर असल्यास तुमच्या लघवीच्या रंगात झालेला बदल तुमच्या लक्षात आला असेल. लघवी केल्यानंतर तुम्ही टॉयलेट बाऊलमध्ये खाली पाहता तेव्हा तुम्हाला नेहमीच्या हलक्या-पिवळ्या रंगाऐवजी गडद पिवळ्या रंगाची लघवी झालेली दिसू शकते. लघवीचा रंग बदलणे हे गर्भधारणेचे लक्षण असू शकते किंवा गरोदरपणात काही समस्या असू शकतात. हलक्या पिवळ्या रंगाच्या लघवीचा रंग गडद झालेला दिसू शकतो आणि तो अनेक घटकांद्वारे नियंत्रित केला जातो.
हे बदल निरोगी गर्भारपणाचे संकेत असतात. तुमच्या गरोदरपणात उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांविषयी हे बदल तुम्हाला सावधान करू शकतात. त्यामुळे लघवीतील बदलांचे निरीक्षण करणे आणि काही असामान्य आढळल्यास शक्य तितक्या लवकर डॉक्टरांना कळवणे महत्त्वाचे आहे. गरोदर असताना लघवीचा रंग कोणता असतो, सामान्य गर्भधारणा असल्यास लघवीचा रंग कुठला असतो आणि तुम्ही ते कसे तपासू शकता हे प्रश्न तुम्हाला आता पडले असतील. परंतु घाबरू नका! आम्ही ह्या लेखाद्वारे दिलेले तपशीलवार आणि समजण्यास सोपे स्पष्टीकरण तुम्हाला मदत करेल!
सर्व उपाय माहिती करून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा
सामान्यतः लघवीचा रंग म्हणजे काय?
युरोक्रोम ह्या रंगद्रव्यामुळे तुमच्या लघवीला पिवळा रंग येतो. तुमच्या लघवीच्या सुसंगतेवर हे रंगद्रव्य कसे दिसते हे अवलंबून असते. जेव्हा तुम्ही हायड्रेटेड असता तेव्हा तुमच्या लघवीतील रंगद्रव्याचा रंग फिकट होईल. जर तुमचा लघवी एकाग्र असेल तर लघवीचा रंग गडद असेल.
विशेषतः, गरोदर असताना तुमच्या लघवीचा रंग, तुमच्या आरोग्याविषयी बरेच काही सांगू शकतो. लघवीचा रंग सामान्य ते क्लाऊडी असू शकतो. चला तर मग नियमित आणि गरोदरपणातील लघवीच्या रंगामधील फरक समजून घेऊयात.
1. सामान्य मूत्र रंग
अन्न, औषधे, हिमोग्लोबिनची पातळी, हायड्रेशनचे प्रमाण आणि इतर घटकांवर लघवीचा रंग अवलंबून असतो. प्रत्येक व्यक्तीच्या लघवीच्या रंगाची छटा वेगळी असते. परंतु, त्यात पिवळ्या रंगाची छटा असते. सामान्यतः लघवीचा रंग पारदर्शक पिवळा ते काहीसा गडद पिवळा असू शकतो.
2. गरोदरपणातील लघवीचा रंग
लघवीच्या रंगातील हा बदल गरोदरपणात पाहणे सोपे असू शकते. गरोदरपणातील लघवीच्या रंगांची विस्तृत श्रेणी असू शकते. गडद पिवळा ते अगदी केशरी अशी गरोदरपणातील लघवीच्या रंगाची श्रेणी आहे.पण काळजी करण्याची गरज नाही.
गरोदर असताना स्त्रिया जास्त वेळा लघवी का करतात?
गरोदरपणात, गर्भवती स्त्रियांच्या लघवीमध्ये अनेक बदल होतात, तसेच लघवीची वारंवारता वाढते. गर्भाशयात भ्रूण रोपण झाल्यानंतर एचसीजी संप्रेरक तयार होते आणि ते शरीरात सोडले जाते, हे या बदलाचे कारण आहे. त्यामुळे गर्भवती स्त्रिया नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी करतात.
याव्यतिरिक्त,गरोदरपणात, रक्ताभिसरणाचे प्रमाण वाढते आणि त्यातील सुमारे 25% रक्त मूत्रपिंडांना पाठवले जाते. परिणामी, मूत्रपिंडांद्वारे प्रक्रिया केलेल्या द्रवपदार्थाचे प्रमाण लक्षणीय वाढते, आणि ते मूत्राशयात साठते.
गरोदरपणात लघवीचा रंग बदलतो का?
निरोगी व्यक्तीच्या लघवीचा रंग अगदी हलका, पारदर्शक पिवळा ते गडद पिवळा असू शकतो. परंतु. गरोदरपणात हा बदल अधिक स्पष्ट होऊ शकतो. गरोदरपणात लघवीचा रंग तीव्र चमकदार पिवळ्या रंगापासून ते जवळजवळ गडद केशरी-पिवळ्या रंगापर्यंत असू शकतो.
युरोक्रोम या रंगद्रव्यामुळे लघवीचा रंग तयार होतो, त्यास युरोबिलिन असेही म्हणतात. जेव्हा शरीर मृत लाल रक्तपेशींपासून हिमोग्लोबिनचे विघटन करते तेव्हा युरोबिलिन तयार होते. रंगद्रव्याचे स्वरूप तुमच्या लघवीच्या सुसंगततेवर अवलंबून असेल. तुमची लघवी पातळ झालेली असते (जेव्हा तुम्ही हायड्रेटेड असता), तेव्हा तुमच्या लघवीतील रंगद्रव्य हलक्या रंगाचे असते. परंतु, जर तुमची लघवी एकाग्र स्वरूपात असेल तर लघवीचा रंग गडद असेल.
याशिवाय, गरोदरपणात बरेच घटक तुमच्या लघवीचा रंग ठरवतात. गरोदरपणात मूत्रपिंडे द्रवपदार्थ कसे फिल्टर करतात ह्यामध्ये मोठा बदल होतो. याव्यतिरिक्त, गरोदरपणातील आहारातील बदल आणि लिहून दिलेली जीवनसत्त्वे आणि औषधांच्या अतिरिक्त सेवनाने देखील लघवीच्या रंगात बदल होऊ शकतो.
हे देखील वाचा: गरोदरपणात लघवीला वास येणे: कारणे आणि उपचार
गरोदरपणात लघवीचा रंग का बदलतो?
गरोदरपणात लघवीचा रंग ठरवणारे घटक खाली नमूद केले आहेत:
1. गरोदरपणातील आहार
गरोदरपणात, तुमचा आहार पूर्णपणे बदलतो. तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींबाबत अधिक जागरूक व्हाल. तुमच्या आहारात फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर निरोगी पदार्थांचा समावेश असेल. काही फळे आणि भाज्या गरोदरपणात तुमच्या लघवीच्या रंगात बदल घडवून आणू शकतात.
2. जीवनसत्त्वे आणि इतर औषधे
अनेक गर्भवती स्त्रियांना गरोदरपणात जन्मपूर्व जीवनसत्त्वे आणि पूरक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. स्त्रीचे शरीर संपूर्णपणे जीवनसत्त्वांचे विघटन करू शकत नाही. शोषून घेतलेली जीवनसत्त्वे आणि इतर पूरक पोषक घटक शरीरातून लघवीद्वारे टाकून दिले जातात, त्यामुळे लघवीचा रंग गडद होऊ शकतो.
3. निर्जलीकरण
गरोदरपणात तुमच्या लघवीचा रंगही तुम्ही किती पाणी पिता ह्यावर अवलंबून असतो. जरी पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले तरीसुद्धा अनेक स्त्रियांना गरोदरपणात डिहायड्रेशनची समस्या जाणवते. निर्जलीकरणाचे आणखी एक कारण म्हणजे हायपरमेसिस ग्रॅव्हिडारम नावाची एक स्थिती होय. ह्या स्थितीमध्ये मॉर्निंग सिकनेसचा त्रास होऊन मळमळ होते आणि वजन कमी होते. या स्थितीमुळे मॉर्निंग सिकनेसचा खूप त्रास होतो. एक टक्का गर्भवती स्त्रियांना हा त्रास होतो. ह्या समस्येमुळे गर्भवती स्त्रियांना जास्त उलट्या होतात परिणामी निर्जलीकरण होते. निर्जलीकरणाची कोणतीही स्पष्ट चिन्हे नसलेल्या प्रकरणांमध्ये, गडद लघवी होणे हे यकृताच्या समस्यांचे लक्षण असू शकते. तुम्ही लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
4. मूत्रमार्गात संक्रमण (युटीआय)
मूत्रमार्गात संसर्ग झाल्यास तुमच्या लघवीच्या रंगातही बदल होऊ शकतो. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) कडे दुर्लक्ष करू नका. कारण त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अकाली प्रसूती किंवा कमी वजनाचे बाळ होणे असे दुष्परिणाम होऊ शकतात. चमकदार पिवळ्या रंगाचे लघवी होणे, लघवीच्या वारंवारतेत वाढ, ओटीपोटाच्या खालील भागात दुखणे किंवा लघवीतून रक्त येणे ही सर्व मूत्रमार्गाच्या संसर्गाची लक्षणे आहेत.
5. हेमटुरिया
हेमटुरिया म्हणजे लघवीद्वारे रक्त बाहेर पडणे होय. अतिरिक्त लाल रक्तपेशी शरीरातून काढून टाकणे आवश्यक आहे. ह्या रक्तपेशी शरीरातून लघवीद्वारे टाकून दिल्या जातात आणि त्यामुळे खूप गडद पिवळ्या किंवा लालसर रंगाची लघवी होऊ शकते.
6. मूत्राशय संक्रमण
मूत्राशयाचा संसर्ग हा युटीआय चा एक प्रकार आहे आणि हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे. गरोदरपणात स्त्रीच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये बदल होतात. अशा बदलांमुळे सामान्यत: मूत्राशयाचा आकार वाढतो त्यामुळे मूत्राशयाचे अस्तर कमकुवत होते आणि संक्रमण होण्याची शक्यता वाढते. मूत्राशयाच्या संसर्गामुळे लघवीचा रंग बदलू शकतो.
7. किडनीचे आजार
किडणीद्वारे शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. मूत्रपिंडाच्या कोणत्याही विकारामुळे सहजपणे लघवीच्या रंगात बदल होऊ शकतो.
8. मूत्रपिंडातील खडे
मूत्रपिंडातील खडे सामान्य मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये व्यत्यय आणतात आणि त्यामुळे तीव्र वेदना, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात आणि परिणामी लघवीचा रंग बदलू शकतो.
गरोदरपणातील लघवीच्या चाचण्या
गरोदरपणात वेळोवेळी लघवीच्या चाचण्या करून घेणे महत्वाचे आहे कारण तसे केल्याने तुम्हाला आरोग्याची स्थिती कळेल. गरोदरपणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लघवीची चाचणी केल्याने कुठलीही समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांना ती लक्षात येईल. आणि उपचारांची गरज असल्यास डॉक्टर उपचार करू शकतील. मुत्राशयाला संसर्ग, मूत्रपिंडाचा संसर्ग, मधुमेह आणि निर्जलीकरण तपासण्यासाठी देखील चाचण्या केल्या जातील. लघवीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. हे प्रमाण मूत्रमार्गाच्या संसर्गाचे किंवा किडनीच्या आजाराचे लक्षण आहे. गरोदरपणात साखरेची पातळी जास्त असल्यास ते गरोदरपणातील मधुमेहाचे लक्षण असू शकते. सामान्यतः गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत हा मधुमेह विकसित होतो. लघवीमध्ये लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी किंवा जिवाणू आढळल्यास ते युटीआयचे लक्षण असू शकते. गरोदरपणात लघवीच्या चाचण्या करून घेणे फार महत्वाचे आहे, त्यामुळे त्या चाचण्या करणे टाळू नका. शिवाय, लघवी करताना तुम्हाला काही समस्या येत असल्यास तुमच्या डॉक्टरांना भेटण्यास अजिबात संकोच करू नका
डॉक्टरांना कधी भेटावे?
व्हिटॅमिन्सचे सेवन ते डिहायड्रेशन अशी सामान्य कारणे लघवीचा रंग बदलण्यामागे असू शकतात. परंतु त्यामागे कधीकधी अधिक गंभीर कारणे सुद्धा असू शकतात. लघवी करताना जळजळ होणे हे युटीआयचे संकेत असू शकतात. पाणी पिऊन सुद्धा, जर तुमच्या लघवीचा रंग अजूनही गडद असेल, तर त्यामागे यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्या हे कारण असू शकते. तुमच्या लघवीचा रंग फिकट-पिवळा किंवा गडद असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. गरोदरपणात गडद लघवी होण्याची कारणे काय आहेत?
गरोदरपणात चमकदार पिवळ्या रंगाची लघवी झाल्यास त्यामागे निर्जलीकरण हे कारण असू शकते. जोपर्यंत लघवीद्वारे रक्तस्त्राव होत नाही किंवा खूप अस्वस्थता वाटत नाही तोपर्यंत तुम्ही काळजी करू नये. शंका असल्यास, डॉक्टरकडे जाणे चांगले.
2. लघवीद्वारे रक्त पडणे सुरक्षित आहे का?
तुमच्या लघवीमध्ये रक्त दिसल्यास किंवा तुमच्या लघवीचा रंग गुलाबी, तपकिरी किंवा लाल असल्यास डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे. म्हणजेच, लघवीमध्ये रक्त आढळल्यास ते कोणत्याही प्रकारे सुरक्षित किंवा सामान्य नसते.
इतर अनेक शारीरिक बदलांप्रमाणे, गरोदरपणात लघवीचा रंग बदलणे सामान्य आहे. निर्जलीकरणामुळे तुमच्या लघवीचा रंग गडद होऊ शकतो. तुम्ही भरपूर पाणी प्यावे. जर तुम्हाला तुमच्या लघवीच्या रंगात बदल दिसला तर घाबरू नका. पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. परंतु ही समस्या कायम राहिल्यास, डॉक्टरांना भेटा.
आणखी वाचा:
गरोदरपणात वारंवार लघवीला होणे
लघवीची गर्भधारणा चाचणी – घरी आणि दवाखान्यात