In this Article
- लहान मुलांच्या चेहऱ्यावर पांढरे चट्टे येण्याची सामान्य कारणे काय आहेत?
- तुमच्या मुलाच्या चेहऱ्यावरील पांढरे डाग घरगुती उपायांनी कसे घालवाल?
- पिटारियासिस अल्बामुळे उद्भवलेल्या पांढऱ्या डागांवर उपचार कसे करावे?
- डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
- पांढरे डाग/चट्टे असलेल्या मुलाला कशी मदत करावी जेणेकरून त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम होणार नाही?
त्वचेवर पांढरे डाग/ चट्टे येणे ही लहान मुलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. परंतु, त्याविषयी तुम्ही घाबरण्याचे कारण नाही. कारण हे चट्टे येण्यामागच्या कारणांवर सहज उपाय केले जाऊ शकतात. लहान मुलांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या ह्या पांढऱ्या चट्ट्यांबाबत अनेक गैरसमज आहेत. तुम्हाला त्यांच्याबद्दल माहित असणे आवश्यक आहे, अशी सर्व माहिती इथे दिलेली आहे.
लहान मुलांच्या चेहऱ्यावर पांढरे चट्टे येण्याची सामान्य कारणे काय आहेत?
१. जीवनसत्वाची कमतरता
बऱ्याच लहान मुलांच्या चेहऱ्यावर पांढरे डाग दिसण्याचे हे एक सामान्य कारण आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की संतुलित आणि निरोगी आहार आवश्यक आहे आणि अनेक मुले योग्य आहार घेण्यास नकार देतात. त्यामुळे अनेक कमतरता निर्माण होतात आणि व्हिटॅमिनची कमतरता ही त्यापैकी एक आहे.
मेलेनिनच्या निर्मितीसाठी जीवनसत्व बी १२ आवश्यक असते. ह्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे पांढरे डाग येऊ शकतात. हे पांढरे डाग केवळ चेहऱ्यावरच नाही तर शरीरावर कोठेही दिसू शकतात, विशेषत: कपाळावर हे डाग खूप दिसून येतात. खूप जास्त कमतरतेमुळे खाज सुटू शकते. काही वेळा त्वचा लाल किंवा गुलाबी देखील होऊ शकते.
डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या डागांवर उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मुलाला निरोगी आणि संतुलित आहार देणे. झिंक आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे देखील ही समस्या उद्भवू शकते.
२. जन्मखूण
मुलाच्या चेहऱ्यावरील हे डाग जन्मखूण असल्याचे आढळले, अश्या अनेक केसेस आहेत. जर अशी परिस्थिती असेल तर काळजी करण्याची गरज नाही.
३. टिनिया व्हर्सीकलर
टिनिया व्हर्सीकलर/ पिटायरियासिस व्हर्सीकलर हा मालासेझियामुळे होणारा बुरशीजन्य संसर्ग आहे. या बुरशीमुळे ऍसिड तयार होऊन शरीरातील मेलेनिनच्या उत्पादनात व्यत्यय येतो.
जेव्हा असे होते, तेव्हा हे डाग मुलाच्या त्वचेच्या नेहमीच्या रंगापेक्षा हलके/ गडद असू शकतात. काही वेळा त्वचेच्या ह्या चट्ट्याना खाज सुटते आणि खवलेही असतात. हे चट्टे मुख्यतः धड आणि खांद्यावर दिसतात परंतु ते मान, चेहरा आणि पोटावर देखील दिसू शकतात.
दमट किंवा उष्ण हवामानात राहणाऱ्या लोकांना ह्याचा जास्त त्रास होतो. सूर्यप्रकाशामुळे हे डाग अधिक स्पष्ट होऊ शकतात कारण सहसा त्यांचे टँनिंग होत नाही. ही स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला फक्त मुलाला रोगप्रतिकारक शक्तीची कोणतीही समस्या नसल्याची खात्री कारणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. स्वच्छतेच्या अभावामुळेही हा त्रास होत असल्याचे समजते.
४. त्वचारोग (व्हिटीलीगो)
ह्या समस्येचा काही त्रास नसून सुद्धा पालकांना ह्या स्थितीची भीती वाटते. पिगमेंटेशन कमी झाल्यामुळे त्वचेवर पांढरे डाग पडतात. त्वचारोग हा स्वयंप्रतिकार विकार आहे. ह्याचाच अर्थ तुमचे शरीर मेलेनोसाइट्सवर हल्ला करते. मेलॅनिन तयार करणाऱ्या पेशींना मेलेनोसाइट्स असे म्हणतात.
हे डाग सामान्यतः सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असलेल्या शरीराच्या भागावर दिसतात. परंतु शरीराच्या इतर कोणत्याही भागावर देखील ते परिणाम करू शकतात. जरी विविध प्रकारच्या त्वचेच्या मुलांमध्ये ही समस्या आढळत असली तरी सुद्धा सावळ्या रंगाच्या मुलांमध्ये ही स्थिती अधिक लक्षात येते. त्वचारोग हा संसर्गजन्य नाही, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. त्वचेवर ठळक दिसणाऱ्या डागांमुळे लोकांना त्वचेच्या ह्या समस्येमुळे भीती वाटते. तसेच ह्या त्वचेच्या समस्येविषयी ज्ञानाचा आभाव हे देखील एक कारण आहे.
५. दुखापत/भाजल्यामुळे त्वचेवर पडलेले डाग
बर्याच वेळा, त्वचेच्या विशिष्ट भागाला झालेल्या दुखापतीमुळे दुखापतीच्या ठिकाणी रंगद्रव्याचा अभाव किंवा विलंब होऊ शकतो.
६. जंत संसर्ग
हे कारण थोडे शंकास्पद आहे. काही लोक असा दावा करतात की पोटात जंत झाल्यामुळे शरीरावर पांढरे चट्टे येतात. हे कारण निश्चित नसले तरी, तुम्ही तुमच्या मुलांना अधूनमधून जंतांचे औषध देऊ शकता.
तुमच्या मुलाच्या चेहऱ्यावरील पांढरे डाग घरगुती उपायांनी कसे घालवाल?
लहान मुलांच्या चेहऱ्यावरील पांढरे डाग जाण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.
- मुलांना बाहेर जाण्यापूर्वी चेहऱ्यावर ब्रॉड–स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावले जाऊ शकते. कोणतेही सनस्क्रीन लोशन वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या
- तुमचे मूल भरपूर भाज्या आणि फळे खात आहे ना ह्याची खात्री करा
- जंतांमुळे पांढरे चट्टे तयार होतात असे मानले जाते. ह्याविषयी कुठलाही शास्त्रीय पुरावा नसला तरी सुद्धा जंत काढून टाकण्यासाठी तुम्ही उपाय करू शकता. तुम्ही हे दर सहा महिन्यांनी करू शकता
- अनेक बालरोगतज्ञ नॉन–परफ्यूम आणि नॉन–डाई इमोलियन्स वापरण्याचा सल्ला देतात. ह्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. त्वचा कोरडी झाल्यामुळे कधीकधी पिटारियासिस अल्बा ही त्वचेची समस्या होऊ शकते
- जर हे पांढरे डाग बुरशीजन्य संसर्गामुळे झाले असतील, तर तुम्ही अँटीफंगल क्रीम वापरू शकता आणि ते संक्रमणाविरुद्ध काम करतील
- कोणतीही क्रीम घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण त्वचेच्या कोणत्याही समस्येचे निदान करण्यासाठी तुमचे डॉक्टर हीच सर्वोत्तम व्यक्ती आहे
पिटारियासिस अल्बामुळे उद्भवलेल्या पांढऱ्या डागांवर उपचार कसे करावे?
जेव्हा कारणे माहित नसतात तेव्हा त्यांना रोखणे कठीण असते. तुमचे मूल निरोगी फळे आणि भाज्या खात आहे याची तुम्ही खात्री करू शकता. आपण हे देखील करू शकता.
१. सनस्क्रीन वापरा
सनस्क्रीन लावल्याशिवाय तुमचे मूल बाहेर जात नाही ना ह्याची खात्री करा. सूर्यकिरणांमुळे होणारे कोणतेही नुकसान टाळण्यास ह्यामुळे मदत होईल आणि आपल्या मुलाचे संरक्षण होईल. कोणतेही सनस्क्रीन लोशन वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
२. सुगंध विरहीत मॉइश्चरायझर वापरा
आजूबाजूच्या त्वचेच्या तुलनेत त्वचेवर ठळक दिसणारे हे डाग संवेदनशील असतात. म्हणूनच कृत्रिम सुगंध आणि रसायन विरहीत मॉइश्चरायझर वापरणे चांगले. तुमचे बालरोगतज्ञ बाळासाठी कोणते मॉइश्चरायझर वापरणे योग्य आहे हे सांगू शकतील
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
वर नमूद केलेले कोणतेही कारण पांढरे डाग दिसण्याचे कारण असू शकते. जरी त्यांपैकी बहुतेक कारणे निरुपद्रवी असली तरी सुद्धा कधीकधी ही कारणे धोकादायक देखील असू शकतात. त्यामुळे योग्य निष्कर्षासाठी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे.
त्याशिवाय, त्वचेवरचा डागांसोबत खालील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- तीव्र खाज सुटणे
- डागांच्या रंगात बदल (सामान्यतः डाग लाल रंगाचे होणे)
- त्वचेच्या त्या भागात संवेदनशीलता कमी होणे
पांढरे डाग/चट्टे असलेल्या मुलाला कशी मदत करावी जेणेकरून त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम होणार नाही?
लहान मुले शक्यतोवर आपण कसे दिसतो ह्याकडे लक्ष देत नाहीत. पण जेव्हा ही मुले मोठी होतात तेव्हा त्यांची आत्म–जागरूकता वाढते. या स्थितीमुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. जर तुमच्या लहान मुलाला ह्या अवस्थेचा त्रास झाला असेल आणि त्याच्यावर उपचार करता येत नसतील, तर पालकांनी त्याला ह्या समस्येचा सामना करण्यास मदत करावी.
तुम्ही लक्षात ठेवावेत असे काही मुद्दे इथे दिलेले आहेत –
- मुलांशी बोलण्यास सुरुवात करा आणि ते कसे दिसतात त्याबद्दल ते आरामदायक आहेत याची खात्री करा
- तुम्ही त्यांना मदत करू शकत नाही असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही समुपदेशनाचा विचार करू शकता
- तुमच्यासोबत बोलण्यासाठी ते पुरेसे आरामदायक आहेत याची खात्री करा. अशा प्रकारे, कोणीतरी आपल्या मुलास त्याच्या दिसण्यामुळे धमकावत आहे की नाही हे आपण शोधू शकता
- आवश्यक असल्यास, तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षकांना कळवू शकता
- कोणत्याही गैरसमजातून मुक्त होण्यासाठी, त्यांच्या मित्रांना शिक्षित करा
मुलाच्या चेहऱ्यावर पांढरे डाग/चट्टे येणे हे खूप सामान्य आहे. विविध कारणांमुळे ते येऊ शकतात आणि त्यापैकी बहुतेक बरे होऊ शकतात. त्वचारोगाचे निदान झाल्यावर आयुर्वेदिक औषधांनी यशस्वीपणे उपचार केले जाऊ शकतात. त्यामुळे तुमच्या जवळच्या आयुर्वेद वैद्याचा सल्ला घ्या.
आणखी वाचा:
लहान मुलांच्या कानदुखीवर परिणामकारक घरगुती उपाय
बाळे आणि छोट्या मुलांना होणाऱ्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय