गर्भधारणेचे आठवडे

गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड

गरोदर स्त्रिया गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यांपर्यंत परिस्थितीशी जुळवून घेऊ लागतात. गरोदरपणाच्या ज्या लक्षणांमुळे त्यांना अस्वस्थता येते ती लक्षणे आता कमी होऊ लागतात. मॉर्निंग सिकनेस, मळमळ, थकवा आणि एकूणातच येणारी अस्वस्थता आता कमी होऊ लागते. तरीही, बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाविषयी काळजी वाटत राहते. गर्भाशयात बाळाची वाढ आणि विकास कसा होत आहे हे जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अल्ट्रासाऊंड स्कॅन. त्यामुळे गरोदर स्त्रियांमध्ये १५ व्या आठवड्यातील स्कॅन हा महत्वाचा आहे. गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील विकासाची चिन्हे आणि बदल जाणून घेण्यासाठी वाचा.

गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड - तुम्हाला याची गरज का आहे?

दुस-या तिमाहीत आईला बाळाच्या वाढीबद्दल माहिती असण्याची अनेक कारणे आहेत.

स्कॅनची तयारी कशी करावी?

ह्या अल्ट्रासाऊंड स्कॅनच्या तयारीमध्ये पूर्वीच्या चाचण्यांच्या पेक्षा वेगळे काही नाही. सर्व अल्ट्रासाऊंड स्कॅन्सप्रमाणे, तुम्हाला आधी भरपूर पाणी पिण्यास सांगितले जाईल. भरपूर पाणी प्यायल्याने बाळाची स्पष्ट प्रतिमा मिळण्यास मदत होईल. त्यामुळे प्रक्रिया सुरू होण्याच्या १-२ तास आधी तुम्ही किमान एक लिटर (किंवा जास्त) पाणी पिऊन चाचणीची तयारी सुरू करू शकता जेणेकरून तुम्हाला स्कॅनच्या वेळी लघवी करण्याची इच्छा होईल. चाचणी पूर्ण होईपर्यंत तुम्ही पुन्हा लघवीला जाऊ नये.

गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील स्कॅन पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो?

स्कॅनिंग प्रक्रिया साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटांत केली जाते, कारण सर्व अल्ट्रासाऊंड स्कॅनला जास्त वेळ लागत नाही. काही तांत्रिक बिघाड असल्यास, प्रक्रियेस जास्त वेळ लागू शकतो. तथापि, बहुतेक वेळा, चाचणी अर्ध्या तासाच्या आत पूर्ण होते.

गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन कसे केले जाते?

सहसा, गर्भवती महिलांच्या अल्ट्रासाऊंड तपासणीमध्ये कोणत्याही अवघड प्रक्रियेचा समावेश नसतो. तुमचे पोट उघडे ठेवून तुम्हाला तुमच्या पाठीवर झोपायला सांगितले जाईल. प्रोब हलवताना घर्षण कमी करण्यासाठी तंत्रज्ञ पोटावर जेल लावतील. नंतर प्रोब तुमच्या पोटाच्या वर दाबली जाते आणि संगणकाच्या स्क्रीनवर प्रतिमा मिळविण्यासाठी प्रोब फिरवला जातो. तंत्रज्ञ जेव्हा त्याला/तिला काही प्रतिमा मिळतात तेव्हा तो स्नॅपशॉट घेतो. प्रतिमा पुरेशा स्पष्ट झाल्याशिवाय संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा स्पष्ट प्रतिमा मिळत नाहीत तेव्हा अल्ट्रासाऊंड लहरी उत्सर्जित करणारे प्लास्टिकचे प्रोब तुमच्या योनीमध्ये घातले जाईल, जेणेकरून तंत्रज्ञांना बाळाची स्पष्ट प्रतिमा मिळू शकेल. चाचणी पूर्ण होण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही.

१५ व्या आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये काय दिसते?

१५ व्या आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमधील बाळाच्या प्रतिमांच्या आधारे तुम्हाला आणि डॉक्टरांना बाळाची वाढ कशी होत आहे याबद्दल बरीचशी माहिती मिळते. स्कॅन दरम्यान तुम्ही तुमच्या बाळाच्या चेहऱ्यावरील मजेदार हावभाव पाहू शकाल - बाळ वाकुल्या दाखवताना, कपाळावर आठ्या पडताना तसेच हसताना दिसेल. कधी कधी अगदी तिरकस नजरेने बघेल. असे करताना बाळ त्याच्या नवीन, विकसित स्नायूंच्या हालचालींचा प्रयत्न करत आहे. तुम्ही बाळाला त्याचा अंगठा चोखताना देखील पाहू शकता.

हात आणि पाय देखील हलताना दिसू शकतात. प्रतिमेमध्ये बाळाची त्वचा देखील दिसेल, आणि त्वचेची कागदासारखी सुसंगतता असेल. त्वचेखालील रक्तवाहिन्या दिसतील. या टप्प्यावर भुवयांसह मुलाची टाळू देखील दिसू लागते. तुमच्या मुलाच्या डोक्यावर आधीच बारीक केस असू शकतात. या तात्पुरत्या, बारीक केसांना लॅनुगो म्हणतात.

बाळाची हाडे अद्याप विकसित होत आहे, कारण बाळाच्या कूर्चेचे हळूहळू कठोर हाडात रूपांतर होते. परंतु, काळजी करू नका, हाडे अजूनही लवचिक राहतात कारण बाळाच्या जन्माच्या वेळी बाळ कुठल्याही अडचणीशिवाय जन्म कालव्यातून पुढे जाऊ शकेल. मूल वर्षाचे होईपर्यत उभे राहण्यासाठी ही हाडे पुरेशी मजबूत नसतात. ह्या आठवड्यात बाळ मान फिरवू लागतो आणि मुठी बंद करू शकतो. बाह्य जननेंद्रियाचा विकास देखील होऊ शकतो, म्हणून डॉक्टर जवळजवळ ८०% अचूकतेसह बाळाच्या लिंगाचा अंदाज लावू शकतात.

गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये असामान्यता ओळखणे

गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये नक्कीच डॉक्टरांना बाळाची वाढ कशी होत आहे याची स्पष्ट कल्पना येते, त्यामुळे डॉक्टरांना काही असामान्य आढळल्यास ते तुम्हाला पुढील चाचण्या करण्याचा सल्ला देतील. जरी १५ आठवड्यांचे थ्री डी अल्ट्रासाऊंड स्कॅन बरेच व्यापक असले, तरीही ते निश्चितपणे पुरेसे नाही.

गरोदरपणाच्या ह्या काळात मतांसाठी कोणत्याही नियमित चाचण्या नाहीत, परंतु ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गरोदर स्त्रियांना अम्नीओसेन्टेसिस आणि एकाधिक मार्कर स्क्रीनिंग चाचण्या करून फायदा होऊ शकतो. मुलामधील अनुवांशिक विकृती तपासण्यासाठी, गर्भजलाचा नमुना वापरतात.

गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन खरोखरच आई आणि मूल दोघांनाही फायदेशीर ठरू शकते. बाळाची वाढ किती झाली आहे हे डॉक्टर पाहू शकतात, तर आईला पहिल्यांदाच बाळाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता येतात. ह्या स्कॅनमुळे बाळाच्या विकासातील कोणत्याही प्रकारची असामान्यता लवकरात लवकर ओळखण्यात मदत होऊ शकते, म्हणून ह्या आठवड्यात स्कॅन करून घेण्याची शिफारस केली जाते.

मागील आठवडा: गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved