In this Article
जेव्हा ऋतुबदल होतो तेव्हा मुलांना सर्दी, खोकला आणि शिंका सुरु होण्याची शक्यता वाढते. श्वासनलिकेच्या आतल्या आवारणास थोडी चुरचुर झाल्यास खोकल्याला सुरुवात होते.
मुलांमध्ये खूप जास्त दिवस खोकला राहिल्यास अस्वस्थता येते. खोकल्यासाठी दुकानात औषधांचा दुष्काळ नसला तरी सुद्धा घरगुती उपाय आधी करणे चांगले.
खोकल्याचे प्रकार
खोकला हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, म्हणून त्यावर उपाय करण्याआधी खोकल्याचा प्रकार ओळखणे महत्वाचे असते. खोकल्याचे वर्गीकरण पाच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये करता येऊ शकते.
१. ओला खोकला
ओल्या खोकल्यामध्ये श्वासनलिकेत श्लेष्मा असतो. ओल्या खोकल्यामध्ये घरघर आवाज येतो. आणि ओला खोकला न्युमोनिया, ब्रॉन्कायटिस, सर्दी किंवा ताप ह्यामुळे येऊ शकतो.
२. कोरडा खोकला
ह्या प्रकारचा खोकला फ्लूचे लक्षण आहे. श्वासनलिकेच्या खालच्या भागात संसर्ग म्हणजेच ब्रॉन्कायटिस आणि दमा तसेच धूळ किंवा धूर ह्यांची ऍलर्जी झाल्यामुळे तो होतो. ह्यामध्ये श्लेष्मा नसतो.
३. घरघर होणारा खोकला
जेव्हा श्वासनलिका अरुंद होतात आणि सूज आल्यामुळे श्लेष्मा तयार होतो, ह्या श्लेष्मामुळे श्वसनलिकेत अडथळा निर्माण होतो. ह्या प्रकारच्या खोकल्यामध्ये श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज येतो.
४. कृप कफ
ह्या खोकल्यास इंग्रजीमध्ये बार्के कफ असे म्हणतात. हा खोकला विषाणूंच्या संसर्गामुळे होतो, त्यामुळे श्वासनलिकेच्या वरच्या भागात अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे भुंकल्यासारखा आवाज येतो.
५. डांग्या खोकला
हा खोकला संसर्गजन्य जिवाणूंच्या संसर्गामुळे होतो. हा खोकला ‘परतुसीस‘ म्हणून सुद्धा ओळखला जातो. हा खोकला कोरड्या खोकल्यासारखाच असतो परंतु हा दीर्घकाळ राहतो आणि त्यामुळे खोकताना खूप मोठा आवाज येतो.
मुलांना होणाऱ्या खोकल्यावर परिणामकारक घरगुती उपाय
मुलांमधील खोकल्यावर इथे काही नैसर्गिक उपाय सांगितले आहेत
१. तुमच्या मुलाला गुळण्या करायला सांगा
खोकल्यापासून आराम मिळावा म्हणून सर्वात सामान्य आणि साधी पद्धत म्हणजे कोमट पाण्याने गुळण्या करणे. दिवसातून कमीत कमी तीनदा गुळण्या करणे चांगले. तुम्ही पाण्यात एक टीस्पून मीठ सुद्धा घालू शकता.
२. मध द्या
मधामध्ये प्रतिसूक्ष्मजीवाणू घटक असतात आणि ते सर्दीचा सामना करतात. मधाच्या गोड चवीमुळे लाळेची निर्मिती वाढते, आणि त्यामुळे श्लेष्मा पातळ होण्यास मदत होते. मध देण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे एक टेबलस्पून मध कोमट पाण्यात घालणे आणि त्यामध्ये ताजा लिंबाचा रस घालणे ही होय. परंतु, एक वर्षाखालील बाळाला मध देणे टाळा.
३. आले द्या
आल्याची गोळी दिल्यास आले थेट जाते. आल्याच्या उग्र वासासाठी त्यामध्ये मध घालून द्यावे.
खोकल्यापासून आराम मिळावा म्हणून खालील मिश्रणाचे दोन टेबलस्पून द्या
- १/४ टेबलस्पून किसलेले किंवा बारीक केलेले आले आणि तेवढ्याच प्रमाणात लाल मिरची घेऊन मिक्स करा
- त्यामध्ये २ टेबलस्पून ऍपल सीडार व्हिनेगर आणि मध घाला तसेच त्यामध्ये दोन टेबलस्पून पाणी घालून सिरप तयार करा
४. ऍपल सिडर व्हिनेगर
प्रतिजीवाणू गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. मुलांना होणाऱ्या कोरड्या खोकल्यासाठी अँपल सिडर व्हिनेगर खूप परिणामकारक आहे. बारीक केलेल्या आल्यासोबत अँपल सिडर व्हिनेगर मिक्स करून दिल्यास त्याने खोकला बरा होतो. तसेच, तुम्ही तुमच्या मुलाला व्हिनेगरचा वास घेण्यास सांगू शकता त्यामुळे घसा दुखी पासून आराम पडू शकतो.
५. लिंबू चोखायला द्या
लिंबू रोग प्रतिकारशक्ती वाढवते कारण त्यात उपचारात्मक गुणधर्म आहेत. आल्याप्रमाणेच लिंबू औषधी गोळ्यांमध्ये वापरतात आणि त्यामुळे घसा दुखत असेल तर त्यास आराम पडतो. घसा दुखीवरच्या औषधी गोळ्यांमध्येही वापरतात. लिंबाचा रस असलेले मध एक आदर्श खोकला सिरप आहे. आपण आपल्या मुलास आराम देण्यासाठी लिंबाचा तुकडा चोखण्यास सांगू शकता
६. वाफ घ्यायला सांगा
स्टीम थेरपी हा चांगला पर्याय आहे, विशेषकरून जर तुमच्या मुलाचे नाक बंद असेल, आणि ओला खोकला येत असेल तर हा पर्याय निश्चित चांगला आहे. गरम वाफेमुळे श्लेष्मा पातळ आणि प्रवाही होईल. तुम्ही खालीलप्रकारे वाफ देऊ शकता
- पाणी भांड्यात किंवा टब मध्ये गरम करा आणि त्यामध्ये निलगिरीचे काही थेम्ब घाला. तुमच्या मुलाला वाफ घेण्यास सांगा
- बाथरूम मध्ये गरम पाण्याचा नळ सोडा. आता वाफेने भरलेली खोली तयार आहे .
७. पुरेशी विश्रांती मिळते आहे ना ह्याची खात्री करा
पुरेशी विश्रांती मिळाल्यास तुमचे मूल लवकर बरे होईल. शाळेत जायच्या ताणामुळे सुद्धा बरे होण्याची प्रक्रिया हळू होते. तसेच, घरी राहिल्याने शाळेतील इतर विद्यार्थ्यांना फ्लूचा संसर्ग होत नाही.
८. ह्युमिडीफायर वापरा
जेव्हा हवा कोरडी असते, तेव्हा घशात श्लेष्मा तयार होतो, त्यामुळे खवखव होते आणि कोरडा खोकला येतो. ह्युमिडीफायर वापरल्याने श्लेष्मा बाहेर पडतो आणि ओल्या खोकल्यापासून आराम मिळतो. सकाळ झाल्यावर हा सगळा ओलावा खिडकीद्वारे बाहेर जाऊद्या ज्यामुळे बुरशी तयार होणार नाही.
९. चिकन सूप तयार करा
म्हणजे खोकल्यावरचे सर्वात उत्कृष्ट औषध आहे आणि त्यामध्ये अँटिव्हायरल गुणधर्म असतात. त्यामुळे घसादुखी, खोकला ह्यापासून आराम मिळतो.
१०. हळदीचे दूध तयार करा
घसा दुखी आणि खोकल्यापासून लगेच आराम पडण्यासाठी अनेक वर्षे चालत आलेला घरगुती उपाय म्हणजे – हळदीचे दूध!. हळदीमध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असतात. कोमट दुधात एक टीस्पून हळद घालून तुमच्या बाळाला झोपण्याच्या आधी द्या.
११. कफ ड्रॉप्स द्या
कफ ड्रॉप्स मुळे खवखवणाऱ्या आणि दुखणाऱ्या घशापासून तात्पुरता आराम मिळतो. परंतु, तीन वर्षाखालील मुलांना हे ड्रॉप्स देऊ नयेत.
१२. सक्शन बल्ब चा वापर करा
बाळाचे नाक मोकळे करण्यासाठी तुम्ही सक्शन बल्बचा वापर करा. बल्ब दाबून तो नाकपुडीत घालून हळूच सोडा. प्रत्येक २–३ तासांनी तुम्ही हे करून पाहू शकता. ६ महिन्यांच्या बाळांसाठी हा उपाय जादुई परिणाम देतो.
१३. कोमट सलाईन किंवा सलाईन ड्रॉप्स घाला
मुलांमधील कोरडा खोकला कमी करण्यासाठी सलाईन वॉटर हा वापरात असलेला घरगुती उपाय आहे.
- कोमट पाण्यात १/२ चमचा मीठ घाला आणि ह्या मिश्रणाचे दोन ड्रॉप्स तुमच्या मुलाच्या नाकपुड्यांमध्ये घाला. नाकातील श्लेष्मा निघून जाण्यासाठी तुमच्या मुलाला नाक शिंकरून टाकण्यास सांगा.
- मोठी मुले सलाईन वॉटरने नाक धुवू शकतात. डोके थोडे वाकवून कोमट सलाईन वॉटर एका नाकपुडीतून घालून दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर येउद्या. ह्यासाठी नेती पॉट वापरा. ही प्रक्रिया करताना तुमचे मूल तोंडाने श्वास घेत असल्याची खात्री करा.
१४. पोपसिकल चोखण्यास द्या
खाजणाऱ्या घशापासून आराम मिळण्यासाठी पॉपसिकल चोखण्यास द्या. जर तुमचे मूल चार वर्षांपेक्षा मोठे असेल तर तुमच्या मुलाला साखर नसलेले चॉकलेट, पोपसिकल किंवा बारीक केलेला बर्फ चोखण्यास द्या.
१५. तुमच्या मुलाला सजलीत ठेवा
द्रवपदार्थ दिल्याने शरीरातील विषारी द्रव्ये ताबडतोब बाहेर टाकली जातात. द्रवपदार्थांमुळे श्लेष्मा सुद्धा पातळ होतो.
१६. ‘तुई ना‘ मसाज द्या
सामान्यपणे, शरीराला मसाज केल्यास बरे होण्यास मदत होते. खोकला बरा होण्यासाठी एका विशेष मसाज तयार केला गेला आहे, त्यास ‘तुई ना‘ मसाज ह्या नावाने तो ओळखला जातो. ह्या मसाज मुळे तुमच्या मुलाला खोकल्यापासून सुटका होते. मग तो खोकला कुठल्याही प्रकारचा आणि तीव्रतेचा असो.
१७. झोपताना डोके उंचावर ठेवा
तुमच्या मुलाचे डोके उंचावर ठेवा जेणे करून चोंदलेल्या नाकातून श्वास घेण्यास तुमच्या मुलाला मदत होईल. बाळाच्या डोक्याखाली एक किंवा दोन उशा ठेवा म्हणजे शरीरापेक्षा डोके थोडे उंचावर असेल. असे केल्याने श्लेष्मा घशात साठणार नाही आणि विशेषतः झोपल्यावर खोकला येणार नाही.
१८. नाक शिंकरून टाकण्यास सांगा
नाकातून श्लेष्मा काढून टाकण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे नाक शिंकरून टाकणे होय. वेळोवेळी नाक शिंकरून टाकल्याने नाकामध्ये साधलेला श्लेष्मा काढून टाकला जातो. परंतु, सतत नाक शिंकारल्याने किंवा खूप जोरात शिंकारल्याने नाकपुड्यांना सूज येऊन त्यातून रक्त येऊ शकते.
१९. स्वच्छतेवर लक्ष ठेवा
खोकल्याने विषाणू सगळीकडे पसरतो. म्हणून आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे. हे करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे बेडशीट कायम बदलून स्वच्छ ठेवा. तसेच हातरुमाल, टॉवेल सुद्धा स्वच्छ धुवून ठेवा.तुमच्या मुलाला हात स्वच्छ धुण्यास सांगा किंवा हॅन्ड सॅनिटायझर वापरण्यास सांगा.
२०. घरी तयार केलेले चेस्ट रब वापरा
दुकानातून आणण्यापेक्षा तुम्ही घरी चेस्ट रब तयार करा. त्यासाठी खालील स्टेप्स करा.
- दोन चमचे बी वॅक्स मध्ये १/२ कप ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाचे तेल घाला व उकळत्या पाण्यात ठेवा
- बी–वॅक्स वितळल्यावर त्यामध्ये पुदिना तेल, निलगिरी तेल, रोझमेरी तेल आणि लवंग तेलाचे चार किंवा पाच थेम्ब घाला
- मिश्रण मिक्स केल्यावर ते थंड करण्यास ठेवा आणि ते तुमच्या मुलाच्या घशाला, छातीला आणि पाठीला लावा म्हणजे त्याला खोकल्यापासून आराम पडेल
२१. बडीशेप सिरप द्या
ह्या वनौषधीमुळे श्लेष्मा पातळ होण्यास मदत होते आणि त्यामुळे तो मुलांना खोकून बाहेर टाकण्यास मदत होते आणि त्यामुळे श्वसन नलिका मोकळी होते. १/२ कप उकळत्या पाण्यात एक टेबलस्पून बडीशेप घालून १५ मिनिटे उकळत ठेवा. नंतर तुम्ही त्यामध्ये दोन कप मध घाला आणि कफ मोकळा होण्यासाठी नियमितपणे अर्धा टेबलस्पून देत रहा.
२२. कोरफड
कोरफडीचे इतर फायदे आहेतच, पण कोरफडीमुळे खोकल्यापासून सुद्धा आराम मिळतो. एक टीस्पून कोरफडीचा रस घेऊन त्यामध्ये मध आणि लवंग पावडर घालून चांगल्या परिणामांसाठी तुमच्या मुलाला दिवसातून दोनदा द्या
२३. ओवा
ओव्यामध्ये प्रतिजीवाणू गुणधर्म असतात त्यामुळे खोकला बरा होण्यास मदत होते. ओवा, तुळशीची पाने, सुंठ पावडर, हळद आणि मिरपूड एकत्र पाण्यात उकळा. मिश्रण गार झाल्यावर तुमच्या मुलाला द्या.
२४.लाल कांद्याच्या रसाचा वापर करा
एक टेबलस्पून लाल कांद्याचा रस घेऊन त्यात मध घाला, हे मिश्रण सायनस, सर्दी, ऍलर्जी आणि खोकला बरा करण्यासाठी चांगले असते.
२५. वनौषधींचा काढा
खोकल्यावर उपचार करण्यासाठी वनौषधींच्या काढ्याचे लहान डोस दिल्यास त्याचा फायदा होतो. खाली दिल्याप्रमाणे तुम्ही वनौषधींचा काढा करू शकता
- एक कप उकळत्या पाण्यात एक चमचा जिरे, वेखंड आणि धणे घाला
- २० मिनिटे हे मिश्रण उकळू द्या आणि नंतर गाळा
- थंड होऊ द्या आणि जेवणानंतर एक चमचा हा काढा द्या त्यामुळे खोकला कमी होण्यास मदत होईल
२६. बदाम आणि मोसंबीचा ज्यूस
बदाम श्वसनाशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करतात ज्यामध्ये खोकल्याचा समावेश आहे. काही चमचे बदामाची पूड संत्राच्या रसात मिसळा आणि खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी आपल्या मुलास द्या
२७. इतर सोपे उपाय
- लिंबाच्या फोडीवर मिरपूड आणि मीठ घालून चोखल्यास खोकल्यापासून आराम मिळतो
- मध आणि मिरपूड एकत्र करून दिल्यास तुमच्या मुलाचा खोकला कमी होऊ शकतो
२८. मोकळ्या थंड हवेत न्या
जर मुलाला खोकला येत असेल तर त्यास थंड हवेत नेल्यास त्याचा चांगला परिणाम होतो हे सर्वश्रुत आहे. जर थंडी असेल तर तुमच्या बाळाला चांगले गुंडाळून बाहेर न्या. असे केल्यास तुमचे बाळ मोकळ्या हवेत चांगला श्वास घेईल. जर असे करणे शक्य नसेल तर फ्रिजचे दार उघडा आणि तुमच्या बाळाला थंड हवेत श्वास घेऊ द्या. ह्यामुळे खोकला कमी होण्यास मदत होईल.
मुलांमधील खोकल्यास प्रतिबंध घालण्यासाठी आहार
इंग्रजीमध्ये म्हण आहे ‘Prevention is better than cure’. जरी खोकल्यावर खूप घरगुती उपाय असले तरीसुद्धा तो आधी होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. हवामानात जेव्हा बदल होतो तेव्हा तुमचे मूल निरोगी रहावे म्हणून तुमच्या मुलाच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करा
- ह्या अन्नपदार्थांमध्ये व्हिटॅमिन ए आणि बी आहे अशा अन्नपदार्थांचा समावेश केल्यास फ्लू आणि खोकल्यास प्रतिकार करता येतो
- पालक सारख्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्यास तुमच्या मुलाची प्रतिकार प्रणाली मजबूत होण्यास मदत होईल
- लसूण आणि आल्यामुळे प्रतिकार प्रणाली मजबूत होते
- गरम दुधात मध घालून दिल्याने जिवाणू आणि विषाणूंपासून संरक्षण मिळते
- तुमच्या मुलाला जंकफूड किंवा मसालेदार, तेलकट किंवा पोषक नसलेले अन्नपदार्थ देणे टाळा
- जर तुमच्या मुलाला लगेच खोकला होत असेल तर केळ आणि जास्त मीठ,साखर असलेले अन्नपदार्थ देणे टाळा कारण त्यामुळे शरीरात श्लेष्मा जास्त प्रमाणात तयार होतो.
- पोषक अन्नपदार्थ जसे की गव्हाची लापशी, व्हेजिटेबल खिचडी, कढी, ब्रोकोली सूप. बीटरूट सूप इत्यादी. हे तुमच्या मुलासाठी चांगले आहे.
- कोमट अननसाचा ज्यूस आणि मध दिल्यास श्लेष्माची निर्मिती होणार नाही
हे घरगुती उपाय करा आणि त्यासोबत पोषक आहार आणि वातावरण स्वच्छ ठेवा. जर खोकला झाला असेल तर तुमच्या मुलाच्या आसपास धूम्रपान करू नका. तुमच्या मुलाला धूळ आणि प्रदूषणापासून दूर ठेवा. तुमचे मुलं नियमितपणे हात स्वच्छ धुवत आहेत ना ह्याकडे लक्ष ठेवा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेवणाआधी हात धुतले पाहिजेत.
ह्या घरगुती उपायांचे कुठलेही दुष्परिणाम नसले तरी त्यापैकी काही तुमच्या मुलाला सूट होणार नाहीत. जर हे उपाय करून सुद्धा खोकला गेला नाही तर उशीर न करता बालरोगतज्ञांकडे जा.
आणखी वाचा: बाळ किंवा मुलांच्या डोक्यातील उवांपासून सुटका कशी करून घ्याल?