Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) लहान मुलांसाठी ५ देशभक्तीपर कविता

लहान मुलांसाठी ५ देशभक्तीपर कविता

लहान मुलांसाठी ५ देशभक्तीपर कविता

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. येत्या १५ ऑगस्ट रोजी आपण ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. ह्या दिवशी भारतामध्ये सगळी कडे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जातो. शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ शाळांमध्ये देशभक्तीपर गीते, निबंधलेखन, देशभक्तीपर कवितांचे गायन ह्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. ह्या लेखामध्ये लहान मुलांसाठी काही देशभक्तीपर कविता दिलेल्या आहेत. ह्या कविता आपल्या लहानग्यांना वाचून दाखवा.

१. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे

आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमांची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे

येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे

येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे

हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे

येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे

ग. दि. माडगूळकर

२. बलसागर भारत होवो

विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले
जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले
मी सिद्ध मरायला हो

वैभवी देश चढवीन
सर्वस्व त्यास अर्पीन
तिमिर घोर संहारीन
या बंधु सहाय्याला हो

हातांत हात घेऊन
हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून
या कार्य करायाला हो

करि दिव्य पताका घेऊ
प्रिय भारतगीतें गाऊं
विश्वास पराक्रम दावूं
ही माय निजपदा लाहो

या उठा करू हो शर्थ
संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो

ही माय मुक्त होईल
वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांती देईल
तो सोन्याचा दिन येवो

साने गुरुजी

३. झेंडा आमुचा प्रिया देशाचा

फडकत वरी महान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम

लढले गांधी याच्याकरिता
टिळक, नेहरू लढली जनता
समरधूरंधर वीर खरोखर
अर्पुनि गेले प्राण
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम

भारतमाता आमुची माता
आम्ही गातो या जयगीता
हिमालयाच्या उंच शिरावर
फडकत राही निशाण
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम

या देशाची पवित्र माती
जूळती आमुच्या मधली नाती
एक नाद गर्जतो भारता
तुझा आम्हा अभिमान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम

गगनावरी आणि सागरतिरि
सळसळ करिती लाटा लहरी
जय भारत जय, जय भारत जय, गाता ती जयगान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम!

 वि. म. कुलकर्णी

४. अनामवीरा जिथे

अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातुनि विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा

कुसुमाग्रज

५. गर्जा जयजयकार क्रांतिचा, गर्जा जयजयकार

अन्‌ वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार
खळखळु द्या या अदय श्रुंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात ?
सर्पांनो, उद्दाम आवळा कसूनिया पाश
पिचेल मनगट परी उरांतिल अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार ?
कधीही तारांचा संभार ?

क्रुद्ध भूक पोटात घालु द्या खुशाल थैमान
कुरतडु द्या आतडी करु द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीच आव्हान
बलशाली मरणाहुन आहे अमुचा अभिमान
मृत्युंजय आम्ही, आम्हाला कसले कारागार ?
अहो, हे कसले कारागार ?

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
हो‍उनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधि न थांबले विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधु न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार

श्वासांनो, जा वायुसंगे ओलांडुन भिंत
अन्‌ आईला कळवा अमुच्या हृदयांतिल खंत
सांगा “वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तिचे एकच होते वेड परी अनिवार
त्यांना वेड परी अनिवार

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यांत ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनि गुन्हेगार
देता जीवन‍अर्घ्य तुजला ठरलो वेडे पीर

देशिल ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार|
आई, वेड्यांना आधार !”

कशास आई, भिजविसि डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते|
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळाखळा तुटणार

आता कर ओंकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यांवरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येउ देत क्रूर

पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरिरांचा कर सुखेनैव या, सुखेनैव संहार
मरणा, सुखनैव संहार

 कुसुमाग्रज

ह्या देशभक्तीपर कवितांमुळे मुलांमध्ये देशभक्ती जागृत होईल. त्यांना भारत देशाचा इतिहास माहिती होण्यास मदत होईल. देशासाठी आपले प्राण पणाला लावलेल्या स्वातंत्र्यसैनिकांविषयी ह्या कवितांच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करता येईल. आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

आणखी वाचा:

मुलांसाठी सुप्रसिद्ध भारतीय देशभक्तीपर गीते (रचनेसह)
मुलांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या तयारीसाठी काही टिप्स

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article