In this Article
मखाना खूप पौष्टिक आहे. उपवासासाठी किंवा नाश्त्यासाठी पौष्टिक पर्याय म्हणून मखाना मोठ्या प्रमाणावर वापरतात. मखान्याचा उष्मांक खूप जास्त असल्यामुळे पोट खूप भरल्यासारखे वाटते. माखना केवळ प्रौढांसाठीच उत्कृष्ट आहार नाही तर वाढत्या बाळांसाठी सुद्धा एक आदर्श पर्याय आहे. असा हा बहुगुणी मखाना सुपरमार्केट किंवा किराणा दुकानात सहज उपलब्ध होतो. तुम्ही हा पौष्टिक पदार्थ तुमच्या बाळाच्या आहारातही विविध प्रकारे वापरू शकता. बाळाला मखाना खाण्याचा कसा फायदा होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. तसेच, इथे मखान्याच्या काही पाककृती सुद्धा दिलेल्या आहेत.
मखान्यात कोणते पोषक घटक आहेत?
मखान्यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात. खालील तक्त्यामध्ये मखान्यामध्ये असलेले पौष्टिक घटक दिलेले आहेत.
पोषकघटक | मूल्य |
कर्बोदके | २० ग्रॅम |
प्रथिने | ५ ग्रॅम |
व्हिटॅमिन ए | १५.५ आययू |
व्हिटॅमिन बी | ६०.३ मिलिग्रॅम |
फोलेट | ३३ एमसीजी |
लोह | १.२ मिग्रॅ |
कॅल्शियम | ५२ मिग्रॅ |
पोटॅशियम | ४३० मिग्रॅ |
फॉस्फरस | १९८ मिग्रॅ |
एकूण ओमेगा -3 फॅटी ऍसिड | ३२ मिग्रॅ |
एकूण ओमेगा – ६ फॅटी ऍसिड | ३४० मिग्रॅ |
वर नमूद केलेली मूल्ये एक कप मखाना किंवा ३२ ग्रॅम मखान्यात असलेली पौष्टिक मूल्ये दर्शवतात.
स्रोत: https://nutritiondata.self.com/facts/nut-and-seed-products/3065/
लहान मुलांना मखाना देण्यास कधी सुरुवात केली जाऊ शकते?
माखना, लहान मुलांसाठी एक आरोग्यदायी खाद्यपदार्थ आहे. बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर कोणत्याही वेळी बाळाला मखाना दिला जाऊ शकतो. सुरुवातीला थोड्या प्रमाणात मखाना देणे चांगले. उदाहरणार्थ, एक चमचा मखाना पावडर तीन ते चार दिवस देता येते. जर तुमच्या बाळाला कोणतीही ऍलर्जिक प्रतिक्रया दिसून आली नाही तर तुम्ही हळूहळू मखान्याचे प्रमाण वाढवू शकता. जी बाळे अन्नपदार्थ चावून खाऊ शकतात अशा बाळांना मखाने भाजून खायला देऊ शकता. लहान बाळे आणि मुलांसाठी मखाने हा फिंगर फूड म्हणून चांगला पर्याय आहे. परंतु ते जास्त प्रमाणात देऊ नयेत. मखान्यामुळे शरीरातील उष्णता वाढते त्यामुळे उन्हाळ्यात मखाना देताना काळजी घेणे आवश्यक आहे.
लहान मुलांसाठी मखान्याचे काय फायदे आहेत?
लहान मुलांसाठी मखान्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत
- मखान्यामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते आणि त्यामुळे मखाना तुमच्या वाढत्या बाळाची हाडे आणि दात यांच्या विकासासाठी उत्तम असतात
- स्वादिष्ट मखाना ग्लूटेन–मुक्त आहे आणि बाळांना देण्यासाठी तो सर्वात सुरक्षित पर्याय आहे. ग्लूटेन मुक्त अन्नपदार्थांमुळे बाळांमध्ये ऍलर्जी होण्याची शक्यता कमी असते
- प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत असल्याने, मखाना बाळांसाठी आदर्श अन्न आहे कारण मखाना बाळांचे स्नायू आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते.
- मखान्यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात आणि ते लहान मुलांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उत्तम असतात आणि त्यामुळे बाळाला आरोग्याच्या गंभीर समस्या होत नाहीत
- या बियांमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात आणि त्यामुळे बाळाची पाचक प्रणाली व्यवस्थित राहण्यास मदत होते
- किडनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी देखील मखान्याचा उपयोग होतो
- मखान्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात आणि त्यामुळे बाळाला तृप्त आणि समाधानी वाटते. त्यामुळे प्रवासात नेण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे
मखान्याची निवड करण्यासाठी आणि तो साठवण्यासाठी काही टिप्स
प्रत्येक आईला तिच्या बाळाला सर्वोत्तम गोष्टी द्यायच्या असतात आणि जेव्हाही तुम्ही तुमच्या बाळासाठी हा पदार्थ खरेदी करण्याचा आणि साठवण्याचा विचार करत असाल, तेव्हा इथे दिलेल्या काही टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील
- सेंद्रिय मखान्याला प्राधान्य द्या कारण ते कुठल्याही पद्धतीच्या रसायनांचा वापर न करता पिकवले जातात आणि अशा प्रकारे बाळासाठी तो एक चांगला आणि आरोग्यदायी पर्याय आहे
- नेहमी कालबाह्यता तारीख तपासा आणि छोटे पॅकेट खरेदी करा
- आर्द्रतेमुळे मखाना खराब होऊ शकतो, म्हणून मखाना नेहमी स्वच्छ हवाबंद डब्यात साठवा
- आपल्या बाळाला देण्यापूर्वी मखाना सोलून पहा. आत मध्ये किडे तर नाहीत ना ह्याची खात्री करा
- बाळाला मखाना देताना नेहमी संयम ठेवा.
लहान मुलांसाठी मखाना पाककृती
तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात हे सुपरफूड विविध प्रकारे सादर करू शकता. आम्ही काही सोप्या पाककृतींबद्दल इथे चर्चा करणार आहोत. ह्या पाककृतींचा आनंद तुमच्या लहान बाळाला घेता येईल. लहान मुलांसाठी मखान्याच्या काही पाककृती इथे दिलेल्या आहेत. तुम्ही त्या करून बघू शकता.
१. फॉक्स नट सिरिअल पावडर
ही पावडर बनविणे सोपे आहे आणि आपल्या बाळासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. विशेषत: जेव्हा तुम्ही प्रवास करत असाल किंवा तुमच्याकडे वेळ कमी असेल तेव्हा हा पर्याय जास्त उपयोगी ठरतो.
साहित्य
- १ कप मखाना बियाणे
- ४ ते ५ काजू
- १/४ टीस्पून वेलची
कृती
- आतमध्ये किडे नाहीत ना ह्याची खात्री करण्यासाठी मखान्यांचे अर्धे तुकडे करा
- मुखाने कुरकुरीत होईपर्यंत जाड तळाच्या पॅनमध्ये कोरडे भाजून घ्या
- काजू मंद आचेवर भाजून घ्या
- मखाने आणि काजू थंड होऊ द्या
- सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात ठेवा आणि बारीक वाटून घ्या
- पावडर चाळून घ्या आणि हवाबंद डब्यामध्ये साठवा
सर्व्हिंग्ज
१/२ कप अन्नधान्य पावडर बनते
२. मखाना दलिया
लहान मुलांसाठी मखाना लापशी बनवण्यासाठी तुम्ही तयार केलेली मखाना पावडर वापरू शकता किंवा खालील पाककृती करून पाहू शकता.
साहित्य
- १/२ कप माखना
- १ चमचा तूप
- ३/४ कप पाणी
- गूळ, फळांची प्युरी किंवा खजूर सरबत (आवडीनुसार)
कृती
- मखान्याचे अर्धे तुकडे करून बाजूला ठेवा
- उथळ पातेल्यात तूप गरम करा आणि मखाने २ ते ३ मिनिटे भाजून घ्या
- पाणी घाला आणि मखाने मऊ होईपर्यंत शिजवा
- आपल्या आवडीचे स्वीटनर घाला आणि चांगले एकत्र करा
- मखाना खीर किंवा लापशी मऊ होण्यासाठी मिक्सर मधून काढून घ्या
सर्व्हिंग्ज
एका माणसासाठी
३. स्वादिष्ट भाजलेले माखना
आठ महिन्यांच्या बाळांसाठी किंवा घन पदार्थ चघळू शकणाऱ्या बाळांसाठी हा एक उत्तम फिंगर फूड पर्याय आहे.
साहित्य
- २ कप मखाना
- २ चमचे देसी तूप किंवा तुम्हाला हवे असलेले इतर कोणतेही तेल
- १/२ टीस्पून हळद पावडर
- १/२ टीस्पून जिरे पूड
- १/४ टीस्पून मिरपूड पावडर
- चवीनुसार मीठ
कृती
- मखान्याचे लहान तुकडे करावेत
- एक जाड तळाचा पॅन घ्या आणि त्यात एक चमचा तूप गरम करा
- मखान्याचे तुकडे करून घ्या आणि मंद आचेवर काही मिनिटे ते कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या
- एका वेगळ्या पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करून त्यात हळद, जिरे पूड आणि मिरपूड घाला आणि काही सेकंद शिजवा
- भाजलेले मखाने मसाल्यामध्ये घालून चांगले मिक्स करून घ्या
- भाजलेले मखाने हवाबंद डब्यात साठवण्यापूर्वी थंड होऊ द्या
- मखाना घेताना स्वच्छ हात किंवा स्वच्छ चमचा वापरा. न वापरलेले मखाने पुन्हा भांड्यात ठेवू नका
सर्व्हिंग्ज
एका माणसासाठी
या मखान्याच्या काही सोप्या पाककृती आहेत ज्या तुम्ही लहान मुलांसाठी बनवू शकता. तथापि, बाळाच्या आहारात मखाना किंवा इतर कोणताही नवीन अन्न पदार्थ समाविष्ट करण्यापूर्वी, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जेव्हा तुम्ही नवीन पदार्थ सुरू करता तेव्हा तुमच्या बाळाला कोणत्याही अन्नाची ऍलर्जी आहे की नाही हे तपासण्यासाठी २ दिवसांचा नियम वापरून पहा.
आणखी वाचा:
बाळांसाठी टोमॅटो – आरोग्यविषयक फायदे आणि सूप रेसिपी
बाळांना काकडी देणे सुरक्षित आहे का?