स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे एक सामान्य कारण म्हणजे बंद झालेल्या बीजवाहिन्या हे आहे. त्यावर उपचार देखील करता येतात. वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे, समस्यांचे निदान झालेल्या महिलांसाठी आता अनेक उपचार पर्याय उपलब्ध आहेत. रोगाचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे याबद्दल आवश्यक असणारी माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे.
अवरोधित बीजवाहिन्या म्हणजे काय?
गर्भाशय आणि अंडाशय यांच्यातील उदर पोकळीमध्ये बीजवाहिन्या असतात. त्यांना इंग्रजीमध्ये युटेराइन ट्यूब किंवा ओव्हीडक्ट असेही म्हणतात. गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला दोन बीजवाहिन्या असतात. ह्या वाहिन्या शुक्राणूंना योनीमार्गातून, अंडाशयातून बाहेर पडलेल्या अंड्यापर्यंत पोहोचण्यास मदत करतात. रोपण होण्यासाठी उद्देशाने फलित अंड्याची गर्भाशयात वाहतूक करण्यास देखील ह्या बीजवाहिन्या मदत करतात. जर गर्भाशय आणि अंडाशय यांच्यातील कनेक्शन बंद असेल तर त्यास बंद झालेल्या बीजवाहिन्या म्हणजेच ब्लॉक फॅलोपियन ट्यूब म्हणतात. ह्या स्थितीत असलेल्या महिलेच्या एक किंवा दोन्ही बीजवाहिन्या अवरोधित असू शकतात.
अवरोधित बीजवाहिन्यांमुळे वंध्यत्व येते का?
अवरोधित बीजवाहिन्या हे वंध्यत्वाच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. जगभरातील ४० टक्के महिलांमध्ये हे कारण दिसून आले आहे. जर तुमच्या बीजवाहिन्या बंद झालेल्या असतील तर याचा अर्थ शुक्राणू अंड्याकडे जाऊ शकत नाहीत किंवा फलित अंडी गर्भाशयात परत जाऊ शकत नाही. या स्थितीचे निदान झालेल्या अनेक महिलांना वंध्यत्वाचा त्रास होतो. बीजवाहिन्या तपासल्याने आणि वेळेवर योग्य उपचार केल्याने तुमची वंध्यत्वातून सुटका होऊ शकते.
अडथळ्यामुळे बंद झालेल्या बीजवाहिन्या असतील तर गर्भवती होणे शक्य आहे का?
ब्लॉक झालेल्या बीजवाहिन्या असल्यास गर्भवती होणे कठीण आहे परंतु अशक्य नाही. गुंतागुंतीवर उपचार करण्याचे विविध मार्ग आहेत. तुमचे डॉक्टर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार योग्य उपचारांचा सल्ला देतील.
बीजवाहिन्या ब्लॉक होण्याचे प्रकार
ब्लॉकेज नक्की कुठे झाले आहे त्यावर आधारित फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेजचे तीन प्रकार आहेत. ते खालीलप्रमाणे
- प्रॉक्सिमल फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज - गर्भाशयाजवळ अडथळा.
- मध्यम - फॅलोपियन ट्यूबच्या मध्यभागी एक अडथळा.
- डिस्टल ब्लॉकेज - फिम्ब्रिया जवळ एक अडथळा, जो फॅलोपियन ट्यूबच्या शेवटी असतो.
बीजवाहिन्या अवरोधित होण्याची कारणे
फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होण्याची काही कारणे येथे आहेत:
- पीआयडी किंवा पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज: ह्या समस्येमध्ये संसर्गामुळे ओटीपोटाच्या भागात जळजळ होते. हा एक लैंगिक संक्रमित रोग आहे त्यामुळे तुमच्या फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होऊ शकतात.
- एसटीडी: इतर लैंगिक संक्रमित रोग जसे क्लॅमिडीया आणि गोनोरिया देखील कारणीभूत असू शकतात. काहीवेळा, जरी तुम्ही या लैंगिक संक्रमित रोगांपासून बरे झाला असलात तरीही, तुमच्या फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होण्यासाठी त्याचा इतिहास पुरेसा असतो.
- एंडोमेट्रिओसिस: ब्लॉक केलेल्या फॅलोपियन ट्यूबचे हे सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. दर महिन्याला, मासिक पाळीच्या दरम्यान, गर्भाशयाचे अस्तर तयार होते, आणि नंतर ते अस्तर मासिक पाळी म्हणून टाकून दिले जाते. ज्या स्त्रिया एंडोमेट्रिओसिसने ग्रस्त आहेत त्यांच्यामध्ये हे गर्भाशयाचे अस्तर गर्भाशयाच्या बाहेर तयार होते आणि अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये हे अस्तर अगदी बीजवाहिन्या, योनी किंवा गुदाशयह्यामध्ये देखील तयार होते. दुर्दैवाने, त्रास तिथेच संपत नाही - जेव्हा हे गर्भाशयाचे अस्तर शरीराबाहेर टाकले जात नाही परंतु साचवले जाते, आणि त्यामध्ये वाढ होते. ह्या स्थितीमुळे बीजवाहिन्यांमध्ये अडथळे आणि उती तयार होतात.
- शस्त्रक्रिया: बीजवाहिन्यांचा समावेश असलेल्या शस्त्रक्रिया
- अपेंडिसाइटिस: काही प्रकरणांमध्ये, फाटलेल्या अपेंडिक्समुळे बीजवाहिन्यांमध्ये अडथळे तयार होतात.
अडथळे निर्माण झालेल्या बीजवाहिन्या काय आहेत आणि त्या कशामुळे होतात हे आता तुम्हाला माहित आहे. बीजवाहिन्या ब्लॉक असलेल्या स्त्रियांमध्ये दिसणारी लक्षणे सुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला ही लक्षणे दिसली तर, योग्य निदानासाठी स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घेणे आणि आवश्यक असल्यास वेळेत उपचार सुरू करणे आवश्यक आहे.
बीजवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्याची लक्षणे
तुम्हाला ही समस्या आहे हे सांगणारी अनेक लक्षणे नाहीत. तुमच्या बीजवाहिन्या अवरोधित असल्याची लक्षणे खालीलप्रमाणे -
- गर्भवती होण्यास असमर्थता
- पोटदुखी
- संभोग दरम्यान वेदना
- अनियमित मासिक पाळी
- तुमच्या मासिक पाळी दरम्यान हलके डाग
- एंडोमेट्रिओसिसमुळे बीजवाहिन्या अवरोधित झाल्यास ओटीपोटाजवळील भागात जळजळ आणि वेदना होणे
अवरोधित झालेल्या बीजवाहिन्यांचे निदान
स्थितीचे निदान करण्यासाठी तुमचे डॉक्टर खालील चाचण्या करू शकतात:क आहे.
- हिस्टेरोसालपिंगोग्राम (एचसीजी): ह्यामध्ये, गर्भाशयाच्या मुखातून रंग टाकण्यासाठी एक लहान नळी वापरली जाते. ओटीपोटाच्या भागाच्या एक्स रे मध्ये हा डाय अंडाशयात पेल्विक पोकळीमध्ये पसरला आहे का हे बघितले जाते. तसे नसल्यास, बीजवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झालेला असू शकतो आणि त्यांची पुढील चाचणी करणे आवश्यक आहे.
- अल्ट्रासाऊंड: ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंडचा वापर बीजवाहिन्यांचे परीक्षण करण्यासाठी आणि असामान्यता शोधण्यासाठी केला जातो.
- एक्सप्लोरेटरी लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया (हायस्टेरोस्कोपी): ह्यामध्ये, गर्भाशयाची तपासणी करण्यासाठी गर्भाशय मुखामध्ये कॅमेरा ठेवला जातो.
- रक्त चाचण्या: क्लॅमिडीया प्रतिपिंडांची उपस्थिती शोधण्यात मदत करतात.
निदान झाल्यानंतर, तुमचे डॉक्टर ह्या स्थितीवर उपचार करण्यासाठी योग्य मार्ग सुचवतील. हे उपचार तुमच्यासाठी योग्य आहेत याची खात्री करण्यासाठी आणि ब्लॉक झालेल्या फॅलोपियन ट्यूबमुळे उद्भवू शकणार्या कोणत्याही समस्या टाळण्यासाठी पर्याय दिले जातात. उपचारांचे पर्याय जाणून घेण्याआधी ह्या समस्यांवर नजर टाकूयात.
अवरोधित नलिकांची समस्या
बंद झालेल्या बीजवाहिन्यांमुळे वारंवार उद्भवणारी गुंतागुंत म्हणजे एक्टोपिक गर्भधारणा. एक्टोपिक गर्भधारणेमध्ये, फलित अंड्याचे गर्भाशयाव्यतिरिक्त इतर ठिकाणी रोपण केली जाते. एकटोपिक गर्भधारणेमध्ये हे रोपण अवरोधित बीजवाहिन्यांमध्ये होते. अशा प्रकारची गर्भधारणा व्यवहार्य नसते आणि ती आईसाठी जीवघेणी ठरू शकते. बाधित नळी अर्धवट काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केल्यास एक्टोपिक गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. महिलांना ही समस्या असल्यास किंवा नसल्यास त्यांनी आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) चा पर्याय निवडावा.
अवरोधित बीजवाहिन्यांसाठी उपचार
अवरोधित बीजवाहिन्यांसाठी उपचार उपलब्ध आहेत, परंतु हे नळ्या किती प्रमाणात अवरोधित आहेत यावर अवलंबून असते. जर दोन बीजवाहिन्यांपैकी फक्त एक नळी अवरोधित असेल, तर तुम्हाला बाहेरील मदतीशिवाय गर्भधारणा होण्याची शक्यता असते. येथे खालील उपचारांची शिफारस केली जाऊ शकते.
- गर्भधारणा होण्याची शक्यता वाढवण्यासाठी वंध्यत्वाची औषधे दिली जाऊ शकतात.
- जर तुमच्या बीजवाहिन्या उतींमुळे अवरोधित झालेल्या असतील, तर टिश्यू काढून टाकण्यासाठी आणि अडथळा दूर करण्यासाठी लॅप्रोस्कोपिक उपचार केले जाऊ शकतात.
- सॅल्पिंगेक्टॉमी ही आणखी एक शस्त्रक्रिया आहे, ह्यामध्ये बीजवाहिन्यांचा एक भाग (सामान्यत: ब्लॉक केलेला भाग) काढला जातो, तर उर्वरित बीजवाहिन्या पुन्हा जोडल्या जातात.
- फिम्ब्ब्रियाला नुकसान झाल्यास फिम्ब्रिओप्लास्टी केली जाते. या प्रक्रियेच्या मदतीने, सिलिया आणि फिम्ब्रियाला चिकटलेल्या स्कार टिश्यूवर उपचार केले जातात.
अवरोधित झालेल्या बीजवाहिन्यांवर उपचार करण्यासाठी घरगुती उपाय
बीजवाहिन्याउघडण्याचे अनेक नैसर्गिक मार्ग आहेत. तथापि, लक्षात ठेवा की ते उपाय वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत. बीजवाहिन्या किती प्रमाणात अवरोधित आहे त्यावर त्यांचे कार्य अवलंबून असते. त्यामुळे खूप जास्त प्रमाणात स्कार टिशूंचा अडथळा किंवा नुकसान यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया आवश्यक असते. जर ब्लॉकेज कमीत कमी असेल आणि दोन बीजवाहिन्यांपैकी फक्त एक ब्लॉक असेल तर हे नैसर्गिक मार्ग तुम्हाला मदत करू शकतात. परंतु, हे उपचार करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांची संमती घ्या. विशेषत: जर वंध्यत्वावर उपचार केले जात असतील तर डॉक्टरांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
- आपल्या पिट्यूटरी ग्रंथींवर उपचार करण्यासाठी नैसर्गिक संप्रेरक संतुलित करणारी औषधे दिली जाऊ शकतात. ही औषधे संप्रेरकांच्या कार्यासाठी जबाबदार असतात.
- प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी हर्बल थेरपी वापरली जाते. ह्यामध्ये गोल्डनसेल, आले रूट, हॉथॉर्न, पेनी रूट आणि जंगली याम सारख्या औषधी वनस्पती दिल्या जातात, फायदेशीर ठरू शकतात. या औषधी वनस्पती रक्ताभिसरण प्रणालीवर कार्य करतात, लिम्फॅटिक सिस्टिमला उत्तेजित करतात, प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढवतात आणि इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी संतुलित करतात. शरीराचे कोणतेही नुकसान झालेले असल्यास ते बरे करण्यास मदत करतात. रक्तसंचय आणि जळजळ कमी करतात, ऑक्सिजन शोषण्यास मदत करतात आणि रक्त प्रवाह सुधारतात असे मानले जाते.
- एरंडेल तेल थेरपीमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करण्यासाठी आणि ओटीपोटाच्या ऊतींना बरे करण्यासाठी बाहेरून ओटीपोटाच्या भागात तेल लावले जाते. एरंडेल तेल लिम्फॅटिक प्रणालीला उत्तेजित करण्यास देखील मदत करते. त्यामुळे चयापचयाचा सर्व कचरा, मृत पेशी आणि जुन्या उती काढून टाकण्यास मदत होते.
- फॅलोपियन ट्यूब अनब्लॉक करण्याचा आणखी एक नैसर्गिक मार्ग म्हणजे पोटाची मालिश करणे. नियमितपणे चांगला मसाज केल्याने तुमचे रक्ताभिसरण सुधारण्यास आणि बीजवाहिन्यानाचा अवरोधित भाग साफ करण्यात मदत होईल. मसाज केल्याने एंडोमेट्रिओसिसमुळे होणाऱ्या कोणत्याही वेदना कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कोणत्याही उतींचे विघटन होण्यास आणि जळजळ कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही पिळलेल्या ऊतींना आराम करण्यास मदत करू शकते.
- फर्टिलिटी क्लिंझिंग ही आणखी एक प्रभावी नैसर्गिक उपचार आहे. ह्यामध्ये, औषधी वनस्पती आणि नैसर्गिक प्रतिजैविकांच्या मदतीने फेर्टीलिटी पॅसेज साफ केला जातो. हे उपचार तुमच्या पुनरुत्पादक अवयवांसाठी डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेसारखे आहे.
- सिस्टिमॅटिक एन्झाइम थेरपी मध्ये तुमच्या शरीरात नैसर्गिकरित्या आढळणारे एन्झाईम्स हे स्कार टिशूंचे विघटन करण्यासाठी, अडथळे दूर करण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी आणि बीजवाहिन्यांचे मार्ग स्वच्छ करण्यासाठी वापरली जातात.
अवरोधित बीजवाहिन्यांना प्रतिबंध
उपचारापेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो. येथे काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत आणि ते तुम्ही करू शकता.
- मद्यपान आणि धूम्रपान टाळा.
- थोडासा ध्यानाचा सराव करा. त्यामुळे तुमची ताणाची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते.
- योग्य वर्गांसाठी नोंदणी करा किंवा ते घरी करा. तुमच्या पुनरुत्पादक अवयवांच्या आरोग्यास चालना देणारी काही पोझ म्हणजे फुलपाखराची पोज आणि ब्रिज पोझ करा.
- जंक फूडचे अतिसेवन टाळा. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि खोबरेल तेल यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध स्रोत आहेत. लिंबूवर्गीय पदार्थ, अंडी, आंबा, झुचीनी आणि पालक, ह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅरोटीनॉइड्स असतात आणि ते तुमची संप्रेरके आणि रक्ताभिसरणालाही मदत करतात.
- व्हिटॅमिन सी चे सेवन वाढवा - त्यामुळे जळजळ कमी करण्यास मदत करते.
आधी सांगितल्याप्रमाणे, अवरोधित बीजवाहिन्यांसह गर्भवती होणे कठीण आहे, परंतु अशक्य नाही, विशेषत: या स्थितीवर लवकर उपचार झाल्यास ह्या स्थितीतून मुक्त होणे शक्य आहे. आपल्या डॉक्टरांशी बोलून ह्या स्थितीचे पुनरावलोकन करा आणि आपल्यासाठी काय चांगले आहे ते पहा. निरोगी जीवन जगणे, चांगला आहार आणि नियमित व्यायामाची पद्धत देखील ह्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
आणखी वाचा:
असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) – वंध्यत्वावरील उपचारपद्धती
वंध्यत्वावरील उपचारासाठी इंट्रायुटेरिन इन्सेमिनेशन (आय.यु.आय.) प्रक्रिया