सध्याच्या व्यस्त आणि तांत्रिक युगात आपण मुलांना इंटरनेटच्या स्वाधीन केले आहे. पण तुमच्या मुलांसोबत तुम्हाला चांगला वेळ घालवण्यासाठी नैतिकतेवर आधारित गोष्टी वाचून दाखवण्यासारखे दुसरे माध्यम नाही. तसेच त्यासोबत त्यांना शहाणपणाचे धडे सुद्धा देता येतील. आपण आपल्या मुलांना नैतिक मूल्यांसह एखादी गोष्ट सांगू इच्छित असाल, हो ना?
आपल्या मुलांसाठी मजेदार आणि मनोरंजक लघु नैतिक कथा
१. सुयांचे झाड
एकदा दोन भाऊ जंगलकिनारी रहात होते. मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे. लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या वस्तू, कपडे घेत असे.
एकदा मोठा भाऊ जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला. एकामागून एक अशा झाडांच्या फांद्या तोडत असताना तो एका जादुई झाडाजवळ पोहोचला.
झाड त्याला म्हणाले,”महोदय, कृपा करून माझ्या फांद्या तोडू नका, जर तुम्ही मला सोडून दिले तर मी तुम्हाला सोन्याची सफरचंदे देईन”
मोठा भाऊ तयार झाला, पण सफरचंदाची संख्या पाहून निराश झाला. लोभाने त्याचा ताबा घेतला आणि त्याने झाडाला धमकी दिली की, “जर मला जास्त सफरचंद मिळाली नाहीत तर खोड कापून टाकीन.”
झाडाने सफरचंदे तर दिली नाहीतच पण त्याच्यावर शेकडो सुयांचा वर्षाव केला. मोठा भाऊ वेदनेने विव्हळत होता. सूर्य अस्तास निघाला होता. लहान भावाला काळजी वाटली, तो मोठ्या भावाच्या शोधात निघाला. शेकडो सुया शरीरात घुसलेल्या तो अवस्थेत सापडला. लहान भाऊ त्याच्या मोठया भावाकडे धावत गेला, आणि दुःखद अंतःकरणाने त्याने प्रत्येक सुई काढली. सुया काढून झाल्यावर मोठ्या भावाने वाईट वर्तणुकीबद्दल बद्दल त्याची माफी मागितली. आणि इथून पुढे चांगला वागीन असे वचनही दिले. झाडाने मोठ्या भावात झालेला बदल पाहून त्यांना भरपूर सोनेरी सफरचंदे दिली.
तात्पर्य : दयाळू आणि कृपाळू असणे महत्वाचे आहे कारण ते नेहमीच बक्षिसपात्र ठरते.
२. शहाणपणाने केलेली मोजणी
अकबराने दरबारात एकदा एक प्रश्न विचारून सर्वांना कोड्यात टाकले.
जेव्हा सगळे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत होते, तेव्हा बिरबल आला आणि त्याने विचारले “हे काय प्रकरण आहे?”
तेव्हा त्यांनी बिरबलाला प्रश्न सांगितला,”शहरात किती कावळे आहेत?”
बिरबल हसला आणि अकबराकडे गेला, आणि घोषित केले की त्याच्या प्रश्नाचे उत्तर आहे,”एकवीस हजार पाचशे तेवीस”
अकबराने बिरबलाला विचारले,”तुला उत्तर कसे ठाऊक?”
बिरबलाने उत्तर दिले, “तुमच्या शिपायांना कावळे मोजण्यास सांगा, जर जास्त असतील तर कावळ्यांचे नातेवाईक शहराबाहेरून त्यांना भेटायला आले असतील आणि जर कमी असतील तर शहरातले कावळे नातेवाईकांना भेटायला शहराबाहेर गेले असतील.”
बिरबलाच्या उत्तरावर खूष होऊन अकबराने बिरबलाला गळ्यातील मोत्याची माळ भेट दिली.
तात्पर्य : आपल्या उत्तरासाठी स्पष्टीकरण असणे हे उत्तराइतकंच महत्वाचे आहे.
३.”लांडगा आला रे आला” ओरडणारा मुलगा
एकदा एका मेंढपाळाने आपल्या मुलाला सांगितले की “आता तू मोठा झाला आहेस, मेंढ्यांकडे आता तू लक्ष देत जा”
मेंढ्या धष्टपुष्ट आणि जाड लोकर देण्याजोगत्या होण्यासाठी, मेंढपाळाच्या मुलाला दररोज मेंढ्या माळरानावर चरायला घेऊन जाव्या लागत असत आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागत असे. त्याला खेळायला खूप आवडायचे, आणि मेंढ्याकडे लक्ष देण्याचे काम त्याला कंटाळवाणे वाटायचे. तेव्हा त्याने मजा करायचे ठरवले.
तो जोरात ओरडला ,” लांडगा आला रे आला !” लांडग्याने मेंढया खाऊन टाकू नये म्हणून सगळे गावकरी हातात दगड घेऊन धावत आले. जेव्हा त्यांनी पहिले की तिथे लांडगा नव्हता, तेव्हा सगळे गावकरी मुलाने फसवल्यामुळे चिडून तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी मुलगा पुन्हा ओरडला, “लांडगा आला रे आला !” आणि लांडग्याला हाकलण्यासाठी गावकरी पुन्हा धावून गेले. आपण कशी दहशत निर्माण केली हे बघून मुलगा हसला, गावकरी पुन्हा तिथून निघून गेले. काही खूप संतप्त झाले.
तिसऱ्या दिवशी जेव्हा मुलगा टेकडीवर गेला, त्याने अचानक लांडग्याला मेंढ्यांवर हल्ला करताना पहिले. तो खूप मोठ्याने ओरडला, “लांडगा आला रे आला!”. पण गावकऱ्यांनी विचार केला की तो पुन्हा आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि मेंढ्यांची सुटका करण्यासाठी कुणीही आले नाही. त्या दिवशी लहान मुलाने तीन मेंढ्या गमावल्या, केवळ तो तीन वेळा “लांडगा आला रे आला” असे ओरडल्यामुळेच.
तात्पर्य: लक्ष वेधण्यासाठी कथा तयार करू नका. जेव्हा आपल्याला खरोखर गरज असते तेव्हा कोणीही मदत करणार नाही.
४. सोनेरी स्पर्श
ही गोष्ट एका लोभी श्रीमंत माणसाची आहे. एकदा वाटेत त्याला परी भेटली. परीचे केस झाडाच्या फांद्यांमध्ये अडकले होते. पैसे कमावण्याची ही नामी संधी आहे असा विचार करून, त्याने परीला मदतीच्या बदल्यात एक वर मागितला. तो म्हणाला “मी ज्याला स्पर्श करीन त्याचे सोन्यात रूपांतर झालं पाहिजे”. त्याची ही इच्छा कृतज्ञ परीने मान्य केली.
लोभी मनुष्य त्याला मिळालेल्या नवीन वराविषयी, आपल्या मुलीला आणि बायकोला सांगण्यासाठी घराकडे धावला. सगळा वेळ दगड, गोट्यांना स्पर्श करून सोन्यात रूपांतर करीत राहिला. तो घरी आला तेव्हा त्याची मुलगी त्याच्याकडे धावत येऊन त्याला बिलगली. तो तिला कडेवर घेण्यासाठी खाली वाकला, मुलीला त्याचा स्पर्श होताच मुलीचे रूपांतर सोनेरी पुतळ्यात झाले. त्याला त्याची चूक लक्षात आली आणि नंतर तो मनुष्य, परीने दिलेला वर मागे घेण्यासाठी तिला शोधू लागला.
तात्पर्य: लोभीपणा अधोगतीला कारणीभूत असतो.
५. गवळण आणि तिच्या घागरी
राधा गवळणीने गायीचे दूध काढले आणि तिच्याकडे दोन घागरभर सायीचे दूध जमा झाले. तिने दोन्ही घागरी काठीला टांगल्या आणि बाजाराकडे दूध विकण्यासाठी निघाली. वाटेवर चालताना ती घागरीं मध्ये जमा झालेल्या दुधाचा आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांचा विचार ती करू लागली.” जेव्हा मला पैसे मिळतील,तेव्हा मी कोंबड्या विकत घेईन.”
तिने विचार केला, “कोंबड्या अंडी घालतील आणि मला अजून कोंबड्या मिळतील, त्या सगळ्या कोंबड्या अंडी घालतील, आणि ती विकून मला अजून पैसे मिळतील. मग मी टेकडीवर घर घेईन, गावातील सगळे जण माझा हेवा करू लागतील.
ते मला विचारतील, “तुला पोल्ट्री फार्म विकायचे आहे का?” पण मी डोकं असं हलवून नकार देईन असं म्हणत असतानाच राधा गवळणीने तिचे डोके हलवले आणि तिच्या घागरी पडल्या, सगळे दूध जमिनीवर सांडलेले पाहून राधा रडू लागली.
तात्पर्य: पेरल्याशिवाय उगवणार नाही.
६. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती दार ठोठावते
ही गोष्ट, वेगवेगळे लोक, प्रतिकूल परिस्थीशी कसा वेगवेगळ्या प्रकारे सामना करतात हे सांगते. आशाच्या वडिलांनी एक अंडे, एक बटाटा आणि काही चहाची पाने, वेगवेगळ्या भांड्यांमध्ये उकळत्या पाण्यात ठेवली. त्यांनी आशाला १० मिनिटांसाठी भांड्यांकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. १० मिनिटांनंतर त्यांनी आशाला अंडे आणि बटाट्याचे साल काढण्यास सांगितले आणि चहा गाळून घेण्यास सांगितले. आशा विचारात पडली.
तिचे वडील म्हणाले,” या तीनही गोष्टी एकाच परिस्थितीत होत्या, पण बघ प्रत्येकाने परिस्थितीला किती वेगवेगळा प्रतिसाद दिला! बटाटा आता मऊ आहे, अंडे टणक आहे आणि चहाने तर पाण्याचा रंगच बदलला. आपण पण ह्या तीनही गोष्टींसारखे आहोत. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते, आपण अगदी असाच प्रतिसाद देतो”.
आता मला सांग,”तू अंडे आहेस, बटाटा आहेस की चहाची पाने?”
तात्पर्य: परिस्थितीशी कसा सामना करायचा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते.
७. गर्विष्ठ गुलाब
एकदा एक गुलाब होता, त्याला आपल्या सौंदर्यावर खूप गर्व होता. त्याला एकच दुःख होते की तो काटेरी कॅक्टस शेजारी वाढत होता. दररोज गुलाब त्या कॅक्टसचा दिसण्यावरून अपमान करीत असे, पण कॅक्टस शांत असे, बागेतल्या इतर रोपट्यांनी गुलाबाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण गुलाब स्वतःच्या सौंदर्याबद्दल खूपच जागरूक होता.
एकदा उन्हाळ्यात बागेतली झाड़े कोरडी पडली. गुलाब कोमेजू लागला. गुलाबाने पाहिले एक चिमणी तिची चोच पाण्यासाठी कॅक्टस मध्ये डुबवत होती. गुलाबाला खूप लाज वाटली. तरीसुद्धा त्याने कॅक्टस ला विचारले,”मला पण पाणी मिळेल का?” दयाळू कॅक्टस लगेच “हो” म्हणाला आणि त्या दोघांच्या मैत्रीमुळे त्यांनी कडक उन्हाळ्याला तोंड दिले.
तात्पर्य: कोणत्याही व्यक्तीविषयी त्याच्या दिसण्यावरून मत बनवू नका.
८. एका पेन्सिलीची गोष्ट
राज अस्वस्थ होता कारण त्याने इंग्रजीच्या परीक्षेत खराब कामगिरी केली होती. त्याची आजी त्याच्याजवळ आली आणि तिने त्याला एक पेन्सिल दिली.
विचारात पडलेल्या राज ने आजी कडे पहिले आणि म्हणाला “माझ्या परीक्षेतील खराब कामगिरी नंतर मी पेन्सिल घेण्यास पात्र नाही.”
आजीने समजावले,” तू ह्या पेन्सिल कडून खूप चांगल्या गोष्टी शिकू शकतोस, कारण ती तुझ्यासारखीच आहे, ती पण धार लावून घेण्याचा वेदनादायी अनुभव घेते, अगदी तसाच जसा तू तुझा परीक्षेत खराब कामगिरी केल्याचा घेतला आहेस! तरीही ती तुला चांगला विद्यार्थी घडवण्यास मदत करणार आहे. ज्याप्रमाणे हे पेन्सिल च्या आतून येते त्याप्रमाणे तुलाही अडथळ्यांना पार करण्याचा बळ तुझ्यातच सापडेल. आणि शेवटी ज्याप्रमाणे पेन्सिल कुठलीही पृष्ठभागावर आपला ठसा उमटवते, त्याचप्रमाणे तुही जे काही करायला घेशील त्यावर तुझा ठसा राहील.”
राजला लगेच बरं वाटलं आणि त्याने स्वतःला वचन दिले की तो इथून पुढे चांगली कामगिरी करेल.
तात्पर्य: आपल्या सगळ्यांमध्ये आपल्याला हवं ते बनण्याची क्षमता असते.
९. स्फटिकाचा चेंडू
नासिरला त्याच्या बागेतल्या वडाच्या झाडामागे एक स्फटिकाचा चेंडू सापडला. जेव्हा झाडाने त्याला सांगितले की हा चेंडू तुझी मनोकामना पूर्ण करेल तेव्हा नासीर ने खूप विचार केला पण त्याला काय मागावं हे सुचलं नाही. त्यामुळे त्याने तो स्फटिकाचा चेंडू पिशवीत ठेवला, आणि मनोकामना सुचण्याची वाट बघण्याचे ठरवले. दिवसामागून दिवस गेले पण त्याने मनातली इच्छा मागितली नाही, पण त्याच्या एका चांगल्या मित्राने नासिरला स्फटिकाच्या चेंडूकडे पाहताना पाहिलं. त्याने तो नासीर कडून चोरला आणि गावातल्या सगळ्यांना दाखवला. त्या सगळ्यांनी सोने आणि राजवाडे मागितले. पण प्रत्येक जण एकच इच्छा मागू शकत होता.
आता सगळ्यांकडे फक्त सोने आणि आलिशान राजवाड्यांव्यतिरिक्त काहीही नव्हतं. सगळेजण उदास झाले आणि त्यांनी नासिरकडे मदत मागायचे ठरवले.
नासिरने मनोकामना व्यक्त केली की, गावकऱ्यांनी लोभीपणापायी जे गमावलं ते पूर्ववत होऊदे. राजमहाल आणि सोने गायब झाले आणि सगळे गावकरी अधिसारखेच आनंदी आणि समाधानी झाले.
तात्पर्य: पैसे आणि संपत्ती मधून आनंद मिळत नाही.
१०. लाकडाची मोळी
एकदा एका गावात तीन शेतकरी होते. तिघांच्याही शेतातील पिके सुकून गेली होती आणि त्यांना विषाणूंची लागण झाली होती. दररोज ते तिघेही पीक सुधारण्यासाठी नवनवीन उपाय शोधत होते. पहिल्याने बुजगावणं लावून पाहिलं, दुसऱयाने कीटकनाशके वापरली आणि तिसऱ्याने शेताभोवती कुंपण घातले.
एक दिवस गावाचे सरपंच आले आणि त्यांनी तिन्ही शेतकऱ्यांना बोलावले. त्यांनी प्रत्येकाला लाकडाची एक काठी दिली आणि मोडण्यास सांगितली. शेतकरी ती सहज मोडू शकले. मग त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला तीन लाकडांची मोळी दिली आणि तोडण्यास सांगितली. ह्या वेळेला त्यांना खूप संघर्ष करावा लागला.
सरपंच म्हणाले,” एकट्याने काम करण्यापेक्षा एकत्र केले तर आपण जास्त ताकदवान असतो.” शेतकऱ्यांनी त्यांची साधने एकत्र केली आणि कीटकांपासून सुटका करून घेतली.
तात्पर्य: एकी हेच बळ
११. दुधाचा पेला
एके दिवशी हरी शाळेतून घरी आला आणि त्याला अचानक खूप भूक लागली. त्याला माहित होते की आज आईने स्वयंपाक केलेला नाही. तो भुकेने व्याकुळ झाला आणि एका घरातून दुसऱ्या घरात जेवण मागू लागला. शेवटी एका मुलीने त्याला दुधाचा मोठा ग्लास दिला. जेव्हा हरी पैसे देऊ लागला तेव्हा तिने ते नाकारले आणि त्याला परत पाठवले.
बऱ्याच वर्षांनंतर, ही मुलगी जी आता पौढा झाली होती, आजारी पडली. बऱ्याच डॉक्टरांना दाखवूनही तिच्या तब्येतीत फरक पडत नव्हता. शेवटी ती शहरातल्या नामवंत डॉक्टर सोबत, मोठ्या इस्पितळात गेली. डॉक्टरांनी काही महिने तिच्यावर उपचार केले आणि ती बरी झाली. ती खूप आनंदून गेली पण बिलाचे पैसे भरता येणार नाही ह्या विचाराने मनातून धास्तावली.
जेव्हा हॉस्पिटलकडून तिच्या हातात बिलाचा लिफाफा आला तेव्हा तिने तो उघडला त्यावर लिहिलेली अक्षरे होती “रक्कम मिळाली,एका दुधाच्या पेल्यातून!”
तात्पर्य: चांगले काम कधीच वाया जात नाही.
१२. कोल्हा आणि द्राक्ष
एकदा एक कोल्हा खूप भुकेला होता म्हणून तो अन्नाच्या शोधात निघाला. त्याने सगळीकडे शोधले पण खाण्याजोगे त्याला काहीच मिळाले नाही. शेवटी भुकेल्या पोटी तो एका शेताच्या बांधावर आला. बांधावर अगदी उंचावर, त्याने आधी कधीही बघितली नव्हती अशी मोठी आणि रसाळ द्राक्षे दिसली. गर्द जांभळ्या रंगावरून कोल्ह्याला समजले की द्राक्षे खाण्यासाठी तयार आहेत.
द्राक्षे तोंडात पकडण्यासाठी कोल्ह्याने हवेत उंच उडी मारली पण नेम चुकला. त्याने पुनःपुन्हा प्रयत्न केला पण नेम चुकला. त्याने पुन्हा काही वेळ प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी नेम चुकला. शेवटी कोल्ह्याने घरी जायचं ठरवलं आणि मनात बराच वेळ पुटपुटत राहिला,”मला खात्री आहे की द्राक्ष आंबटच असणार”
तात्पर्य: जे आपल्याला मिळत नाही त्याचा तिरस्कार करणे खूप सोपे आहे.
१३. मुंगी आणि टोळ
एकदा एका जंगलात मुंगी आणि टोळ रहात होते. टोळ दिवसभर आरामात पडून राहत असे तसेच त्याला गिटार वाजवायला आवडत असे. पण मुंगी दिवसभर कष्ट करायची. ती बगीचाच्या कानाकोपऱ्यातून अन्नाचे कण गोळा करून आणायची, तेव्हा टोळ मस्त आराम करत असायचा, गिटार वाजवत असायचा किंवा झोपलेला असायचा. टोळ दररोज मुंगीला विश्रांती घेण्यास सांगायचा पण मुंगी नकार देऊन कामाला लागत असे.
लवकरच हिवाळा आला, दिवसरात्र थंडी पडू लागली. थंडीमुळे खूप तुरळक प्राणी बाहेर पडत असत. टोळ अन्न शोधात राहिला, आणि पूर्ण वेळ भुकेला राहिला, पण मुंगी कडे मात्र हिवाळा संपेपर्यंत निश्चिन्त पणे पुरेल इतका पुरेसा अन्नसाठा होता.
तात्पर्य: तारुण्यात कष्ट करा म्हणजे म्हातारपणात पश्चातापाची वेळ येणार नाही.
१४. ओली विज़ार
छोट्या अजयला शाळा आणि त्याचे शाळेतील मित्र खूप आवडत असत. एकदा शाळेत बाकावर बसलेला असताना अचानक त्याला काहीतरी ओलं लागलं आणि त्याला कळलं की त्याची विजार ओली झाली आहे. खजील झालेल्या अजयला काय करावे सुचेना, वर्गातले सगळे, त्याची ओली विजार पाहून टर उडवतील असे त्याला वाटले. मदतीची याचना करत तो बाकावर तसाच बसून राहिला.
दीक्षा वर्गातल्या रोपांना पाणी घालण्यासाठी पाण्याने भरलेला तांब्या घेऊन जात होती, अचानक ती ठेचकाळली आणि तांब्यातले सगळे पाणी त्याच्या मांडीवर सांडले. सगळेजण अजयच्या मदतीसाठी धावले. बाईंनी दीक्षाला तंबी दिली आणि अजयला नवीन विजार दिली.
शाळा सुटल्यावर अजयला दीक्षा बस मध्ये भेटली. त्याने विचारले,”तू हे सगळं हेतुपूर्वक केलंस नं?”
दीक्षा म्हणाली,”माझी सुद्धा विजार एकदा ओली झाली होती”.
तात्पर्य: गरजवंतांना नेहमी मदत करावी.
१५. अस्वल आणि दोन मित्र
एकदा दोन चांगले मित्र जंगलातील एकाकी आणि धोकादायक वाटेवरून चालले होते. सूर्य मावळतीला जात असताना त्यांची भीती वाढली पण दोघांनी एकमेकांना घट्ट धरून ठेवले. अचानक त्यांना वाटेत अस्वल दिसले. एकजण पट्कन जवळच्या झाडाकडे पळाला आणि क्षणार्धात झाडावर चढला. दुसऱ्या मुलाला झाडावर चढता येत नव्हते म्हणून तो जमिनीवर मेल्याचे ढोंग घेऊन पडून राहिला.अस्वल जमिनीवर पडलेल्या मुलाजवळ आले, आणि त्याने त्याला डोक्यापाशी हुंगले. मुलगा मेला आहे असा विचार करून अस्वल त्याचा वाटेने निघून गेले.
झाडावरचा मुलगा खाली उतरला. त्याने मित्राला विचारले,”अस्वलाने तुझा कानात काय सांगितले?”
तो उत्तरला,”ज्या मित्रांना तुमची काळजी नसते अशा मित्रांवर विश्वास ठेऊ नका.”
तात्पर्य: संकटकाळात जो मदत करतो तोच खरा मित्र
नैतिक मूल्यांसह असलेल्या ह्या लघुकथा, आपल्या मुलांना उत्तम धडे देतील तसेच तुम्हाला त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवण्यास मदत करतील. जेव्हा आपण मुलांचे मनोरंजन करू इच्छित असाल तेव्हा नैतिक मूल्यांसह कथा हा नेहमीच चांगला पर्याय ठरेल.