In this Article
आपल्या बाळाचे वाढीचे आणि विकासाचे वेगवेगळे टप्पे असतात. पालथे पडून तुमच्याकडे बघून हसण्यापासून, ते प्रत्येक लहान गोष्ट त्यांच्या विकासाचा टप्पा असतो. सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे जेव्हा बाळ स्वतःचे स्वतः उभं रहाते आणि पहिले पाऊल टाकते तो असतो.
बाळ चालायला केव्हा शिकते?
बरीच बाळे जेव्हा १०-१२ महिन्यांची होतात तेव्हा चालायला सुरुवात करतात. काही बाळे त्याच्या आधीसुद्धा, म्हणजे ९ व्या महिन्यातच चालायला सुरुवात करतात. वेगवेगळ्या घटकांवर ते अवलंबून असते उदा: अनुवंशिकता, बाळाची शारीरिक ताकद तसेच बाळाची इच्छाशक्ती वगैरे.
बाळाचे चालण्यास शिकतानाचे महत्वाचे टप्पे
बाळाच्या वाढीच्या पहिल्या वर्षात बाळाच्या स्नायूंमध्ये ताकद आणि समन्वय विकसित होतात, त्यामुळे बाळ उभे राहून चालू शकते. इथे काही महत्वाचे टप्पे किंवा बाळाच्या चालण्याच्या अवस्था दिल्या आहेत.
१. नवजात शिशूला आपण उभे धरले आणि पाय हवेत राहू दिले तर बाळ पाय कुठल्या तरी पृष्ठभावर ते दाबण्याचा प्रयत्न करते. बाळ काही महिने असे करत रहाते.
२. वयाच्या ६ महिन्यानंतर बाळ पालथे पडते, रांगते आणि बसायला सुद्धा शिकते. तुम्ही जेव्हा बाळाला तुमच्या मांडीवर किंवा एखाद्या पृष्ठभागावर उभे करता तेव्हा बाळ पाय आपटते किंवा उसळ्या मारते.
३. ९ महिन्यांच्या आसपास, घरातील फर्निचरला धरून हळूहळू बाळ स्वतःला पुढे ढकलते. ह्या कालावधीत घरात फक्त दणकट गोष्टी ठेवा, त्यामुळे अपघात टळतील.
४. ९-१० महिन्यांचे तुमचे बाळ उभे असताना गुडघ्यात वाकून बसू शकते. १० महिन्याच्या बाळासाठी ही मोठी गोष्ट आहे.
५. १२ महिन्यांचे झाल्यावर, कशाचातरी आधार घेऊन बाळ काही पावले पुढे टाकते. आणि कुठल्याही आधाराशिवाय उभे राहते. तुमचा हात धरून ते चालण्याची सुद्धा शक्यता आहे.
६.१२ व्या महिन्यात बरीच बाळे चालण्यास शिकतात, सुरुवातीला थोडी अस्थिर असतात. १२ महिन्याचे झाल्यावर सुद्धा बाळ चालत नसेल तरीही काळजीचे कारण नाही. बाळाला आणखी काही महिने लागू शकतात.
तुम्ही बाळाला चालण्यासाठी कशी मदत करू शकता?
जर तुमचे बाळ चालण्यासाठी जास्त वेळ घेत असेल तर, बाळाची स्नायूंची ताकद वाढवून बाळाला चालण्यास तुम्ही मदत करू शकता. खाली काही मार्ग आहेत जे वापरून तुम्ही बाळाला चालण्यासाठी प्रोत्साहित करू शकता.
१. व्यायाम
तुम्ही साधे आणि सोपे व्यायाम बाळाकडून करवून घेऊन बाळाचे स्नायू बळकट करू शकता त्यामुळे बाळाला चालण्यासाठी मदत होते.
- स्टूलवर बसणे: मागे टेकायला कुठलाही आधार नसलेले बाळासाठीचे स्टूल आणा आणि बाळाला त्यावर बसवा. बाळ जमिनीला पाय टेकवण्याचा प्रयत्न करेल. असे करताना बाळाच्या जवळ, मोठ्या लोकांनी असणे अत्यंत जरुरीचे आहे. बाळाच्या जवळ जमिनीवर काही खेळणी ठेवा आणि बाळ स्टूलवर बसलेले असताना त्याला ती खेळणी उचलण्यास सांगा. आता स्टुलपासून खेळणी अजून दूर ठेवा, आणि ती खेळणी उचलण्यास सांगा. असे केल्याने बाळाचे खांद्याचे स्नायू, पाय तसेच पाठ बळकट होण्यास सुरुवात होईल. तसेच आपले स्वतःचे वजन उचलून पाय टेकवण्यास सुद्धा बाळ शिकेल.
- बाळाला मार्गक्रमण करू द्या: तुम्ही बाळाला सोफ्याच्या आधाराने उभे राहण्यास मदत करू शकता. बाळाचा एक हात सोफ्यावर आणि दुसरा हात तुम्ही धरून सोफ्याच्या कडेकडेने पुढे मागे तुम्ही बाळाला चालवू शकता. तुम्ही बाळाचे एखादे खेळणे किंवा बाळाचा आवडता खाद्यपदार्थ सोफ्याच्या दुसऱ्या टोकाला ठेवून बाळाला ते घेण्यास प्रोत्साहित करू शकता.
- चालताना चेंडू पायाने पुढे ढकलणे: हा व्यायाम करताना बाळाला मजा येईल. जेव्हा बाळ सोफ्याच्या कडेकडेने चालते तेव्हा बाळाच्या पायाशी एखादा चेंडू ठेऊ शकता. सुरुवातीला बाळाचा पाय चुकून लागून चेंडू दूर जाईल परंतु नंतर बाळ स्वतः पाय मारून, चेंडू दूर ढकलेल. तुम्ही बाळाच्या दोन्ही पायांशी चेंडू ठेऊन बाळाला पायाने लाथ मारून चेंडू दूर करण्यास प्रोत्साहित करा.
- चालताना मदत: बाळ उभे असताना तुम्ही तुमच्या बाळाच्या खांद्याला आधार देऊ शकता, आणि बाळाचा खांदा धरून बाळाला पुढे चालण्यास मदत करू शकता.
२. बाळाला चालणे शिकवण्यासाठी काही खेळ
काही खेळ बाळांना चालण्याच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी योग्य असतात आणि हे खेळताना तुम्हाला आणि तुमच्या बाळाला मदत होऊ शकते.
- एक मोठा चेंडू आणून त्यावर बाळाला बसण्यास सांगा असे करताना बाळाचे पाय जमिनीवर टेकता कामा नयेत. बाळाच्या कुल्ल्याना धरून बाळाला चेंडूवर बसण्यास प्रोत्साहित करा. आणि चेंडू पुढे मागे करा. असे केल्यावर बाळ त्याचे शरीर संतुलित करण्यास शिकेल, बाळ त्याची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि, कुल्ल्याच्या साह्याने चेंडू वर घट्ट बसण्याचा प्रयत्न करेल.
- टोपलीतले चेंडू: तुम्ही जमिनीवर चेंडू किंवा खेळणी पसरवून ठेऊ शकता. आता बाळाला खेळणी उचलण्यास सांगा. टोपलीपर्यंत रांगत जाऊन त्यामध्ये खेळणी पुन्हा टाकायला सांगा. जर तुमचे बाळ सोफ्याला धरून चालत असेल तर तुम्ही सोफ्याच्या दुसऱ्या टोकाला टोपली ठेऊ शकता.
- फुगा पुढे पास करणे: बाळाला सोफ्याच्या किंवा फर्निचरच्या जवळ उभे करा. जेव्हा बाळ सोफ्याला धरून उभे असते तेव्हा बाळाकडे फुगा फेका आणि पुन्हा तुमच्याकडे ढकलण्यास प्रोत्साहित करा. जर बाळाला उभं राहून ही क्रिया करण्याचा आत्मविश्वास नसेल तर बाळाला बसून ते करायला सांगा. तुम्ही फुगा थोडा उंच फेकू शकता आणि बाळाला फुग्यापर्यंत पोहोचण्यास प्रोत्साहित करू शकता. तुम्ही बाळाच्या पायाजवळ फुगा ठेऊ शकता आणि बाळाला पायाने तो उडवायला शिकवू शकता. त्यामुळे स्नायू बळकट होतील.
- व्हीलब्यारो वॉक (Wheelbaro walk): तुमच्या बाळाला मऊ ब्लॅंकेटवर पोटावर झोपवा. बाळाच्या पोटाला आणि पायाला आधार देऊन ते काळजीपूर्वक वर उचला, आणि बाळाला हातावर चालण्यास प्रोत्साहित करा. बाळाच्या शरीराचा वरचा भाग मजबूत करण्यासाठी ही क्रिया महत्वाची आहे.
इतर काही सुरक्षिततेच्या टिप्स
तुमचं बाळ नुकतंच चालायला शिकत असल्यामुळे तुम्हाला योग्य काळजी घेतली पाहिजे. आणि बाळाचा योग्य विकास होण्यासाठी नीट गोष्टी निवडल्या पाहिजेत.
खाली काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत.
- बाळासाठी वॉकर आणू नका. वॉकर्सची बाळासाठी काहीही गरज नसते. उलट वॉकर वापरल्यास योग्य रीतीने चालण्यास बाळाला प्रतिबंध येऊ शकतो. कारण बाळाच्या शरीराचा काही भाग वॉकर मध्ये घट्ट अडकलेला असतो. तसेच वॉकरमुळे बाळाला गंभीर इजा सुद्धा होऊ शकते. एका विशिष्ट अंतरासाठी तुम्ही बाळासाठी जंपर्सचा वापर करू शकता. वॉकर पेक्षा जंपर्स बरे असले तरी, ते वापरण्याचे सुद्धा काही धोके आहेत. विशेषतः जेव्हा बाळावर लक्ष ठेवायला कुणीही नसते तेव्हा. जंपर्सचा खूप जास्त वापर केल्यास चालण्यासाठीचे मोटार स्किल्स विकसित होणार नाहीत.
- जेव्हा तुमचे बाळ रांगायला लागते आणि आधाराच्या साहाय्याने उभे राहू लागते तेव्हा तुम्हाला घरातल्या नाजूक वस्तू ज्या पडून लगेच फुटू शकतात आणि ज्यामुळे बाळाला इजा होण्याची शक्यता असते त्या बाजूला ठेवल्या पाहिजेत. तसेच त्यांच्या कडा टोकदार राहणार नाहीत ह्याची खात्री केली पाहिजे किंवा त्या घरातून पूर्णपणे काढून टाकल्या पाहिजेत.
- जेव्हा तुमचे बाळ रांगायला लागते आणि आधाराच्या साहाय्याने उभे राहू लागते तेव्हा घरातल्या नाजूक वस्तू, ज्या पडून लगेच फुटू शकतात आणि ज्यामुळे बाळाला इजा होण्याची शक्यता असते त्या तुम्ही बाजूला ठेवल्या पाहिजेत. तसेच त्यांच्या कडा टोकदार राहणार नाहीत ह्याची खात्री केली पाहिजे किंवा त्या घरातून पूर्णपणे काढून टाकल्या पाहिजेत.
वरील सर्व खेळांची आणि व्यायामांची दिवसातून अनेक वेळा पुनरावृती करीत राहिल्यास बाळ लवकर चालायला शिकण्यास मदत होईल. बाळाला पायात काहीही न घालता चालायला शिकवल्यास बाळाला स्वतःचा तोल सांभाळता येण्यास मदत होईल. तसेच जरी तुमचे बाळ १८ महिन्यानंतरही चालण्यास शिकले नाही आणि बाळाच्या विकासातील उशिराबाबत तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही नक्कीच तुमच्या वैद्यांशी संपर्क साधू शकता.