Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी प्रसूतीची तारीख कशी काढावी?

प्रसूतीची तारीख कशी काढावी?

प्रसूतीची तारीख कशी काढावी?

गर्भधारणेचा सरासरी कालावधी ४० आठवडे इतका असतो, तथापि मनुष्यप्राण्यामध्ये गर्भारपणाचा वास्तविक कालावधी ३८ आठवडे इतका असतो. त्यामुळे ३८ आठवड्यांनंतर जन्मलेले बाळ हे वाढीसाठी पूर्ण दिवस घेतलेले बाळ समजले जाते. प्रसूतीचा दिनांक हा वेगवेगळ्या पद्धतींनी काढला जातो जसे की एलएमपी, नेगेलेचा नियम किंवा प्रेग्नन्सी व्हील इत्यादी. ह्या सगळ्या पद्धतींमुळे प्रसूती दिनांकाचा अंदाज येतो.  फक्त ५% महिलाच प्रसूती दिनांकास प्रसूत होतात. चला तर मग प्रसूती दिनांक कशी काढतात ते सविस्तर पाहूया.

प्रसूतीची संभाव्य तारीख म्हणजे काय?

ज्या तारखेला बाळाचा जन्म होणे अपेक्षित असते त्या तारखेला प्रसूतीची संभाव्य तारीख असे म्हणतात. तुमच्या शेवटच्या पाळीच्या पहिल्या दिवसापासून ४० आठवडे मोजल्यास जी तारीख येते ती म्हणजे प्रसूतीची संभाव्य तारीख होय. तुम्हाला गर्भधारणेची अचूक तारीख माहिती असल्यास तुमच्या प्रसूतीची तारीख त्यानंतर ३८ आठवड्यांनंतर असते.

बाळाच्या वाढीनुसार किंवा अन्य काही कारणांमुळे गर्भधारणेच्या संपूर्ण कालावधी दरम्यान प्रसूतीची संभाव्य तारीख बदलली जाऊ शकते. संभाव्य प्रसूती दिनांकामुळे तुमच्या डॉक्टरना वेगवेगळ्या चाचण्यांचे वेळापत्रक ठरवता येते, बाळाची वाढीचा अंदाज येतो आणि जर प्रसूतीची तारीख उलटून गेली तर डॉक्टर प्रसूतीबाबत योग्य निर्णय घेऊ शकतात.

प्रसूतीच्या संभाव्य तारखेची गणना करणे

प्रत्येक डॉक्टरची प्रसूतीची संभाव्य तारीख काढण्याची स्वतःची एक पद्धती असते. तुम्हाला प्रसूतीची संभाव्य तारीख काढण्यासाठी ऑनलाईन बरीच विविध कॅल्क्युलेटर्स आणि टूल्स सापडतील. तथापि वापरात असलेल्या तीन सुप्रसिद्ध पद्धती खालीलप्रमाणे-

१. प्रसूतीचा संभाव्य दिनांक काढण्यासाठी नेगेलेचा नियम वापरणे

जर्मन स्त्रीरोगतज्ञ फान्झ कार्ल नेगेले ह्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने हा नियम असून ह्या नियमानुसार गर्भधारणा २८० दिवसांची असते आणि मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. ह्याचा अर्थ तुमची अपेक्षित प्रसूतीची तारीख म्हणजे तुमच्या चुकलेल्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसात २८० दिवस (९ महिने आणि ७ दिवस) अधिक करणे होय. परंतु जर तुमची मासिक पाळी कमी दिवसांची म्हणजेच २७ दिवसांची असेल तर तुम्हाला एक दिवस कमी करावा लागेल. म्हणजेच ९ महिने  आणि ६ दिवस. जर तुमच्या मासिक पाळीचे चक्र जास्त दिवसांचे असेल तर जास्त दिवस अधिक करावे लागतील म्हणजे तुम्हाला तुमची प्रसूतीची संभाव्य तारीख मिळेल.

२. गर्भधारणेच्या तारखेवरून प्रसूतीची संभाव्य तारीख काढणे

ह्या पद्धतीला एलएमपी (लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड) पद्धती असे म्हणतात. ह्या पद्धतीमध्ये तुमच्या गर्भधारणेच्या तारखेवरून तुमची प्रसूतीची संभाव्य तारीख काढता येते. बऱ्याच स्त्रियांचे मासिक पाळी चक्र २८ दिवसांचे असते आणि ओव्यूलेशन १४व्या दिवसाच्या आसपास होते. ह्या पद्धतीमध्ये तुमच्या शेवटच्या पाळीच्या पहिला  दिवस काढून त्यात ४० आठवडे मिळवले जातात आणि आलेल्या तारखेतून २ आठवडे वजा केल्यावर प्रसूतीची संभाव्य तारीख मिळते. हे अशासाठी की तुमच्या शेवटच्या पाळीनंतर ओव्यूलेशन २ आठवडयांनी झाले असे समजले जाते.

३. प्रेग्नन्सी व्हील

ह्याला गॅस्टेशनल कॅल्क्युलेटर असे म्हणतात आणि प्रसूतीची तारीख काढण्यासाठी ही पद्धत सोपी आहे. ह्या पद्धतीत तुमच्या शेवटच्या पाळीच्या तारखेपासून प्रसूतीची संभाव्य तारीख काढतात.

बऱ्याचदा, ह्यामध्ये गर्भारपणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांविषयी माहिती असते. प्रेग्नन्सी व्हील मध्ये वर्षातील विविध महिने असतात, विकासाचे टप्पे तसेच तिमाहयांची सुरुवात आणि शेवट इत्यादी सुद्धा दर्शवलेले असतात.

प्रसूतीची काढलेली तारीख चुकीची असू शकते का?

प्रसूतीची संभाव्य तारीख काढण्याच्या ह्या पद्धती अचूक तारीख देत नाहीत आणि त्यामुळे त्या तारखेला तुमच्या बाळाचा जन्म होईलच असे नाही. त्यामुळे बाळाचा जन्म हा काढलेल्या तारखेच्या २ आठवडे आधी किंवा २ आठवडे नंतर होणे हे नॉर्मल आहे. असे दिसून आले आहे की २० स्त्रियांपैकी फक्त एकीची प्रसूती काढलेल्या तारखेला होते. १०% प्रकरणांमध्ये प्रसूती तारीख उलटून गेल्यावर सुद्धा गर्भधारणा सुरु राहते. तसेच प्रसूती दिनांक उलटून खूप दिवस होऊनही प्रसूती न झाल्यास प्रसूती दिनांक चुकीच्या पद्धतीने काढला असल्याची शक्यता खूप जास्त असते.

संभाव्य प्रसूती दिनांकाविषयी काही टिप्स

जसजशी तुमची प्रसूतीची तारीख जवळ येते तसे तुम्ही संमिश्र भावनांमधून जात असता. तुम्हाला टोकाची शारीरिक अस्वस्थता जाणवत असते कारण बाळाची संपूर्ण वाढ झालेली असते. जर  तुमचे हे पहिले बाळ असेल तर संभाव्य प्रसूती मुळे तुम्हाला थोडे त्रासदायक वाटू शकेल म्हणून तुम्ही शेवटच्या काही दिवसात खालील गोष्टी करू शकता.

  • व्यायाम – तुमच्या संपूर्ण गर्भारपणाच्या कालावधीत तुम्ही आतापर्यंत करीत असलेला हलका व्यायाम करत रहा. त्यामुळे तुमची प्रसूती प्रेरित होऊन प्रसूती सुलभ होईल.
  • हॉस्पिटल बॅग पुन्हा तपासून पहा – तुमची हॉस्पिटल बॅग पुन्हा एकदा तपासून पाहणे काही त्रासदायक नाही. जे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला पहिल्या दोन दिवसांमध्ये लागू शकेल असे काही तुम्ही विसरला नाहीत ना हे बघा.
  • झोप आणि फक्त झोप – जितकी जास्तीत जास्त झोप घेता येईल तेवढी घ्या, दिवसाही थोडी थोडी विश्रांती घ्या. कारण जेव्हा बाळ घरी येईल तेव्हा पहिले काही महिने झोप दुर्मिळ होणार आहे!

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

१. प्रसूतीची संभाव्य तारीख किती अचूक असते?

जवळपास ५% बाळांचा जन्म प्रसुतीच्या संभाव्य तारखेसच होतो. ९०% बाळे संभाव्य तारखेच्या २ आठवडे अलीकडे पलीकडे जन्माला येतात. ३७-४२ व्या आठवड्यात जन्म होणे नॉर्मल असते.

२. प्रसूतीचा दिनांक बदलू शकतो का?

प्रसूतीचा दिनांक वेगवेगळ्या घटकांनुसार बदलू शकतो जसे की गर्भाचा विकास, गर्भारपणातील गुंतागुंत आणि आईचे आरोग्य इत्यादी.

३. प्रसूती दिनांक काढण्यासाठी अन्य काही पद्धती आहेत का?

हो, सोनोग्राफीची तुम्हाला प्रसूती दिनांक काढण्यास मदत होऊ शकते. गर्भारपणाचा ८वा आठवडा ते २०व्या आठवड्यादरम्यान ती केली जाते. बाळाच्या शरीराच्या विविध अववयवांचे माप घेता येते त्यामुळे डॉक्टर्स आणि रेडिओलॉजिस्ट्सना बाळाचे गॅस्टेशनल वय काढता येते. प्रसूती दिनांक काढण्यासाठी पहिल्या तिमाहीतील अल्ट्रासाऊंड अचूक असतो.

४. जर मला माझ्या शेवटच्या पाळीची तारीख लक्षात नसेल तर?

अशा वेळी ‘प्रेग्नन्सी व्हील’ च्या साह्याने तुम्ही प्रसूतीचा दिनांक काढू शकता.

५. जर तुमचे मासिक पाळी चक्र जास्त दिवसांचे असेल किंवा अनियमित असेल तर काय?

अशा वेळी संभाव्य प्रसूती दिनांक काढण्यासाठी प्रेग्नन्सी व्हीलची मदत होते.

तुमच्या बाळाचा जन्म केव्हा होणार आहे हे संभाव्य प्रसूती दिनांकावरून समजते परंतु त्याचे अन्य काही फायदे आहेत. जसे की, तुम्हाला बाळाची खोली सजवण्यास  केव्हा सुरुवात करायला हवी ते कळते तसेच बाळंतपणाची रजा केव्हा काढावी ह्याचाही अंदाज येतो. परंतु काढलेली तारीख हा फक्त एक अंदाज आहे आणि त्याचा अतिरिक्त ताण घेण्याची काही गरज नाही. फक्त स्वतःच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या पोटातील बाळाची काळजी घ्या.

अस्वीकरण: ही माहिती योग्य व्यावसायिकांकडून वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी पर्याय म्हणून नाही.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article