घरी करता येणारी गरोदर चाचणी अगदी साधी आणि सोपी असते - एक रेष दिसली तर 'नाही' आणि दोन रेषा दिसल्या तर 'हो'. परंतु कधी कधी ह्या रेषांमध्ये फिकट रेष सुद्धा दिसते आणि मग प्रश्न पडतो की नक्की गरोदर चाचणीचा अर्थ काय काढायचा?. गरोदर चाचणीवर अशा फिकट रेषा आढळणे असामान्य नाही, त्याचे कारण अगदी सोपे असू शकते आणि ते म्हणजे कदाचित तुम्ही गरोदरपणाची चाचणी खूप लवकर करून पाहात आहात. परंतु फिकट रेषांमागील कारणांवर चर्चा करण्याअगोदर गरोदर चाचणी मागचे शास्त्र समजावून घेणे महत्वाचे आहे.
गरोदर चाचणीवर फिकट रेषा का उमटतात?
बाजारात उपलब्ध असणाऱ्या बऱ्याच चाचण्या अचूक असतात आणि त्यापैकी काही पाळी चुकलेल्या पहिल्या दिवशीच सकारात्मक निकाल देतात. सामान्यपणे गरोदर चाचणी स्त्रीच्या लघवीमध्ये hCG हे संप्रेरक आहे का हे पहाते. फलित स्त्रीबीज गर्भाशयाला चिकटते तेव्हा ह्या संप्रेरकाची निर्मिती होते आणि गर्भारपणाची सुरुवात होते.
लघवीच्या चाचणीव्यतिरिक्त रक्ताची चाचणी सुद्धा गर्भारपण निश्चित करण्यासाठी विश्वासार्ह आहे.
तसेच फिकट रेषा किती "फिकट" आहे हे तपासून पहा. पहिल्या रेषेशी तुलना करून पहा जर खूपच फरक असेल, तर मात्र आता तुमच्या जवळ फिकट रेषा आहे.
फिकट रेषा बघून लगेच निष्कर्ष काढण्याआधी गरोदर चाचणीविषयी काही गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ह्याची खात्री करा. फिकट रेषेमागे काही करणे आहेत, ती खालीलप्रमाणे.
जेव्हा तुम्ही गरोदर चाचणी पहिल्यांदा करत असता तेव्हा एक किंवा दोन सूचना नजरचुकीने वाचायचे राहून जाणे ठीक आहे. ह्या चाचणीची सवय नसल्यामुळेही फिकट रेषा येऊ शकते. अशा वेळी परत एकदा चाचणी करून पाहणे उत्तम.
कधी कधी असंही होऊ शकते की तुम्ही खूप घाईत आहात आणि चाचणी केल्यानंतर फिकट रेषा बघून तुम्ही पटकन ती केराच्या टोपलीत टाकून देता.
-
चाचणीचा निकाल बघण्याची चुकीची वेळ
तुम्ही सांगितलेल्या वेळात चाचणीचा निकाल बघत नसाल तर फिकट रेषा तुम्हाला दिसतील. ह्या रेषा लघवीतील संप्रेरकांमुळे दिसतात, जर तुम्हाला चाचणीचा निकाल बघण्यास उशीर झाल्यास तुम्हाला फिकट रेषा दिसतील.
जर तुम्ही खूप लवकर चाचणी केलीत तर, तुम्हाला फिकट रेषा दिसतील. काही दिवस वाट बघून चाचणी पुन्हा करून बघा. ओव्यूलेशन नंतर १० दिवसांनी किंवा तुमची पाळी चुकल्यावर ही चाचणी करून बघणे चांगले.
-
गरोदर चाचणी किट चुकीची असणे
काही वेळा तुम्ही वापरत असलेली गरोदर चाचणी किट नीट ठेवली गेली नसेल किंवा तयार करतानाच चाचणी मध्ये काही दोष असतील, म्हणूनही कदाचित तुम्हाला चाचणीचा निकाल नीट कळत नसेल. चाचणीची समाप्तीची तारीख तपासून पहा, जर तारीख टळून गेली असेल तर चाचणीचा प्रभावीपणा कमी झालेला असू शकतो.
-
तुम्ही दिवसाच्या चुकीच्या वेळेला चाचणी करून पहिली असेल
गरोदर चाचणी सकाळी करणे चांगले असते असे सांगितले जाते कारण सकाळच्या लघवीमध्ये hCG चे जास्त प्रमाणात असते.
गरोदर चाचणीवर फिकट रेषा दिसत असल्यास शरीर सरासरीपेक्षा hCG ह्या संप्रेरकाची निर्मिती करीत आहे.
मासिक पाळीच्या चक्राची चुकीच्या पद्धतीने गणना केल्याने चाचणी वर फिकट रेषा दिसतात.
-
कमी प्रभावी गरोदर चाचणी किट
काही गरोदर चाचणी किट इतरांपेक्षा अचूक असतात. अशा किट मधील चाचणीदरम्यान hCG ची २०mlU इतकी कमी पातळी सुद्धा शोधून काढली जाते. तर काही चाचण्या hCG ची १०० mlU इतकी जास्त पातळी सुद्धा शोधून काढू शकत नाहीत. त्यामुळे संप्रेरकाच्या पातळीच्या संवेदनशीलतेमुळे फिकट रेषा दिसू शकतात. अशा वेळी तुम्ही परत जेव्हा चाचणी कराल तेव्हा इंटरनेट वरच्या फोरमवर थोडा शोध घ्या आणि ज्या ब्रँडची संप्रेरकाप्रती संवेदनशीलता जास्त आहे अशा ब्रँडची गरोदर चाचणी निवडा. जर पुढल्या वेळेला तुम्हाला गडद रेषा दिसल्या तर तुम्ही गरोदर आहात आणि जर पुन्हा फिकट रेषा दिसल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांची भेट घ्या.
लवकर गर्भपात झालेला असल्याससुद्धा फिकट रेषा दिसू शकतात कारण अजूनही तुमच्या शरीरात संप्रेरकांचा काही अंश उरलेला असू शकतो.
Thorazine आणि त्यासारख्याच काही औषधांमुळे फिकट रेषा दिसू शकतात. बाळ होण्यासाठी ज्या स्त्रिया प्रयत्न करीत आहेत आणि त्याच्याशी निगडित औषधे घेत आहेत अशा स्त्रियांना चाचणीमध्ये फिकट रेषा दिसू शकतात. अशा वेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
काही वेळा ट्युमर मुळे सुद्धा फिकट रेषा दिसतात परंतु हे कारण खूप दुर्मिळ आहे.
फिकट रेषा गर्भधारणा दर्शवते का?
फिकट रेषा दिसल्यास गर्भधारणा असू शकते परंतु काही वेळा त्यामागील कारण लवकर झालेला गर्भपात सुद्धा असू शकतो, कारण अशावेळी hCG चे राहिलेले काही अंश सुद्धा फिकट रेषा दर्शवू शकतात. त्यामुळे नक्की कशामुळे रेषा दिसल्या हे तपासून पाहण्यासाठी चाचणी परत करून पाहणे उचित आहे. जर गर्भधारणा झाली असेल तर रेषा गडद दिसतील. जर रेषा पुन्हा फिकट दिसल्या तर तात्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
गरोदर चाचणीवरची फिकट रेषा ही गर्भधारणा झाली आहे असा चुकीचा निकाल दर्शवते का?
फिकट रेषा औषधांमुळे असू शकतात. जर तुम्ही अनेक वेळा चाचणी केली असेल असेल आणि फिकट रेषा दिसत असेल तर गर्भधारणा झालेली नसते. खूप फिकट रेषा दिसत असल्यास सुद्धा गर्भधारणा झालेली नसते. परंतु ते नीट तपासून पहिले पाहिजे. सर्वात उत्तम मार्ग म्हणजे दोन दिवस वाट बघून पुन्हा चाचणी करणे होय.
जर पुन्हा चाचणी करून सुद्धा रेषा गडद होत नसतील तर संप्रेरकांची पातळी वर खाली होत असावी. त्यामुळे हे गर्भपात झाला असल्याचे चिन्ह असू शकेल.
चाचणीच्या निकालाविषयी जर अशी अनिश्चितता असेल तर अशा परिस्थतीत महत्वाचे म्हणजे तुमच्याजवळ माहितीचे योग्य स्रोत असणे जरुरीचे आहे. वेगवेगळ्या वेबसाइट्स तसेच माहिती असलेले लेख ह्यांची शक्यता पडताळून पाहण्यासाठी मदत होऊ शकते, परंतु त्यावर तुम्हाला डॉक्टरांचे मत जाणून घ्यायलाच हवे. तुम्हाला लागणारा योग्य वेळ घ्या, चाचणी पुनःपुन्हा करून बघा. तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी संपर्कात रहा. शेवटी त्यांचा सल्ला खूप महत्वाचा आहे.