In this Article
गरोदरपणाचा काळ हा तणावपूर्ण आणि रोमांचक असा दोन्ही प्रकारचा असू शकतो. गर्भधारणेमुळे स्त्रीमध्ये अनेक शारीरिक बदल होतात. शेवटी, तुमच्या आत एक संपूर्ण नवीन जीव वाढत आहे! परंतु, गरोदरपणात काही अप्रिय अनुभव आणि समस्या देखील येतात. असेच एक लक्षण म्हणजे गरोदरपणात खांदा दुखणे. खांदेदुखी ही 40% गर्भवती महिलांना भेडसावणारी समस्या आहे. तुम्ही निराश होण्यापूर्वी, लक्षात ठेवा की तुमचे शरीर आत वाढणाऱ्या एका जीवाला आधार देत आहे आणि त्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. हे का घडते आणि त्यापासून कसे मुक्त व्हावे तसेच खांदेदुखी कशी प्रतिबंधित करावी ह्याविषयीची सर्व माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे.
गरोदरपणात खांदा दुखणे सामान्य का आहे?
शरीरातील इतर सांध्यांसह खांद्याच्या सांध्यामध्ये गरोदरपणात अनेक बदल होतात. गर्भवती स्त्रीच्या शरीरात रिलॅक्सिन नावाचे हार्मोन तयार होते. हे हॉर्मोन शरीरातील सर्व अस्थिबंधनांना सैल करते. झोपल्यावर, उभे राहिल्यावर आणि चालण्याच्या स्थितीत बदल झाल्यास, अस्थिबंधन सैल होऊ शकते आणि गर्भवती स्त्रियांचे खांदे दुखू शकतात. गर्भवती स्त्रिया ह्या जखम होणे किंवा पडणे इत्यादींप्रती देखील अधिक संवेदनाक्षम असतात. त्यामुळे खांद्यामध्ये होणाऱ्या सौम्य वेदनांमुळे तीव्र अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे गरोदरपणात खांद्याच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
आणखी वाचा: गरोदरपणातील पोटदुखी
गरोदरपणात खांदेदुखीची लक्षणे
काहीवेळा, गरोदरपणात खांदे दुखणे हे झोपण्याच्या स्थितीत होणारा बदल, संप्रेरकांमधील बदल तसेच स्नायूंच्या कडकपणामुळे होते. गरोदरपणात खांदेदुखीची इतर लक्षणे आहेत:
- खांद्याचे दुखणे हे काही वेळा ओटीपोटाच्या भागापर्यंत पसरते आणि जसजसे दिवस पुढे सरकतात तसतसे त्यासोबत डोळ्यांमध्ये जळजळ आणि डोक्यामध्ये वेदना देखील होतात. त्यामुळे तणाव आणि थकवा जाणवतो.
- पहिल्या तिमाहीत खांदेदुखी मळमळ, उलट्या, मायग्रेन, बेशुद्ध पडणे, रक्तदाब कमी होणे आणि वजनात असामान्य वाढ होणे अशी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे चिंतेचे कारण असू शकतात आणि त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
गर्भवती महिलांमध्ये खांदा दुखण्याची कारणे
खांदेदुखी हे कुठल्या तरी आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते
1. पहिल्यातिमाहीतील वेदना
- गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात खांदा दुखणे हे एक्टोपिक किंवा ट्यूबल गर्भधारणेचे लक्षण असू शकते, अश्या वेळी त्वरित वैद्यकीय मदतीची गरज भासते. ह्या स्थितीमध्ये, गर्भाचा विकास गर्भाशयाऐवजी फॅलोपियन ट्यूब किंवा गर्भाशयाच्या मुखाजवळ होऊ लागतो. अशा वेळी ओटीपोटात तीव्र वेदना होऊ शकतात. खांद्यात आणि पाठीमध्ये त्यामुळे तीव्र वेदना होतात.
- पित्ताशय किंवा पित्त नलिकांमध्ये कोलेस्टेरॉल किंवा कॅल्शियमचे साठे असलेल्या पित्ताच्या खड्यांमुळे तुम्हाला खांदेदुखीचा अनुभव येत असेल. पित्ताचे खडे असलेल्या लोकांच्या पोटाच्या वरच्या भागात वेदना होतात आणि त्या पाठ आणि खांद्यापर्यंत पसरतात.
2. दुसऱ्या तिमाहीतील वेदना
- कधीकधी, बद्धकोष्ठता, सूज येणे, पोट फुगणे आणि पोटात अल्सर यांसारख्या पोटाच्या समस्यांमुळे खांदे दुखू शकतात. अशा प्रकारची वेदना पोटातून सुरु होते आणि पाठ आणि खांद्यापर्यंत पसरते.
- ओटीपोटाकडील भागाकडे जास्त वजनामुळे देखील दुस-या तिमाहीत खांद्यामध्ये वेदना होऊ शकतात. येथे, वेदना पाठीच्या खालच्या भागात उद्भवते आणि पाठीच्या स्नायू आणि खांद्यापर्यंत पसरते.
3. तिसऱ्या तिमाहीतील वेदना
- जेव्हा स्त्रिया बाळाला चांगला रक्तप्रवाह होण्यासाठी डाव्या कुशीवर झोपताततेव्हा डाव्या खांद्याचे दुखणे दुस-या आणि तिसर्या तिमाहीमध्ये वारंवार उद्भवते उजव्या खांद्यात तीव्र वेदना होणे हे काहीवेळा प्रीक्लॅम्पसियाचे लक्षण असते. ह्या स्थितीमध्ये गर्भवती स्त्रीचा रक्तदाब आणि तिच्या लघवीतील प्रथिनांचे प्रमाण खूप वाढते.
- जेव्हा खांदेदुखीसोबत डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होत असेल तर त्यामागे मानसिक ताण हे कारण असू शकते.
आणखी वाचा: गरोदर असताना छातीत दुखणे – कारणे आणि उपचार
खांदेदुखीवर उपचार
गरोदरपणात काही वेदनाशामक औषधे हानिकारक असू शकतात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत. त्यामुळे, खांदेदुखीसाठी पेनकिलर वापरण्याऐवजी, तुम्ही काही सोप्या वेदना कमी करणारे उपाय अवलंबू शकता.
- दाहक-विरोधी स्प्रे आणि क्रीम वापरा.
- दुखण्याच्या जागेवर आणि त्याच्या आजूबाजूला बर्फाचा पॅक ठेवा.
- योग, एक्यूप्रेशर, स्ट्रेचिंग एक्सरसाइज यासारखी शारीरिक स्व-चिकित्सा करा आणि झोपण्यासाठी चांगली स्थिती किंवा पलंग ह्यांची निवड करा.
- जठरासंबंधीच्या तक्रारींमुळे खांदेदुखी होण्यापूर्वी काळजी घ्या.
- ताण आणि खांदेदुखीपासून बचाव करण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या.
- तिसर्या तिमाहीमध्ये खांद्याचे दुखणे वाढवणाऱ्या शारीरिकदृष्ट्या कठोर क्रिया कमी करा.
- झोपायला जाण्यापूर्वी स्वतःला मसाज द्या.
खांदेदुखी कशी टाळाल?
बाळाला सामावून घेण्यासाठी तुमचे शरीर बदलत आहे. त्यामुळे गर्भवती स्त्रीच्या जीवनशैलीत निरोगी बदल घडायला हवेत. ज्या क्षणी तुम्ही निरोगी पर्यायांची निवड कराल, त्या क्षणी तुम्ही खांदेदुखी टाळू शकता. गरोदरपणात खांदेदुखी टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे निरोगी राहणे. खांदेदुखी टाळण्यासाठी येथे काही टिप्स आहेत:
- खांद्यावर ताण निर्माण होऊ नये म्हणून चांगली झोप घ्या.
- चांगला आहार घ्या आणि जठरासंबंधी समस्या टाळा. जठराच्या समस्येमुळे खांदे दुखू शकतात.
- झोपताना, उभे असताना, बसताना आणि चालताना वाईट स्थिती टाळा.
- धूम्रपान करत असल्यास, तुम्ही ते सोडण्याचा विचार केला पाहिजे.
- व्यावसायिक आणि घरच्या जबाबदाऱ्या कमी करा.
- शक्य असेल तेव्हा मित्र मैत्रिणींच्या विश्वासू कुटुंबातील सदस्याची मदत घ्या.
- चांगली झोप लागण्यासाठी आणि खांद्यावर ताण येऊ नये म्हणून मणक्यासाठी आणि पायांसाठी खास डिझाइन केलेली उशी वापरा.
- जठरासंबंधीच्या समस्यांमुळे निर्माण होणारी खांदेदुखी आणि पित्ताशयातील खडे दूर करण्यासाठी कमी मसालेदार आणि कमी तेलकट पदार्थ खा.
तुम्ही गरोदर असताना खांद्याच्या वेदना कमी करण्यासाठी इतर टिप्स
- तणाव आणि त्यास कारणीभूत लोक टाळा.
- खांद्याच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी आणि चांगल्या चांगल्या आरोग्यासाठी कायरोप्रॅक्टर किंवा एक्यूप्रेशर थेरपिस्ट यांची मदत घ्या.
- चहाच्या वेळी आणि जेवणासाठी जंक फूडऐवजी पौष्टिक पदार्थांची निवड करा.
- वेळ काढा. आठवड्यातील एखाद्या दिवशी सर्व कामांमधून सुट्टी घ्या ते आरोग्यासाठी चांगले असते.
- नवीन गादी खरेदी करा. चांगले स्लीपिंग मास्क आणि हेडफोन खरेदी करा. झोपताना लागणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चांगली झोप लागण्यास मदत करतात..
- स्ट्रेचिंग करून पहा.
- उबदार आणि थंड कॉम्प्रेस देखील मदत करू शकतात.
- उबदार पाण्याने अंघोळ केल्याने वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते.
मी डॉक्टरांना कधी फोन करावा?
खांदेदुखी अनेक दिवस चालू राहिल्यास तसेच जास्त ताप, गुदाशयावर दाब, खांद्याचे सांधे स्थिर राहणे, आणि त्वचेला सूज येणे अशी लक्षणे आढळ्यास गर्भवती महिलेने डॉक्टरांना फोन करण्यास अजिबात संकोच करू नये.
सतत विचारले जाणारे प्रश्न
गरोदरपणातील खांदेदुखीवर वारंवार विचारले जाणारे प्रश्न खालीलप्रमाणे
1. माझ्या शोल्डर ब्लेडमध्ये वेदना का आहेत?
ह्यास इंग्रजीमध्ये ‘शोल्डर ब्लेड पेन’ असे म्हणतात. पोश्चर नीट नसल्यास म्हणजेच जेव्हा पाठीचा वरचा भाग आणि खांदे पुढे वाकतात तेव्हा ही समस्या उद्भवते. शोल्डर ब्लेड एकमेकांपासून वेगळे झाल्यामुळे वेदना होतात. वाहन चालवणे, जास्त वेळ कामावर बसणे किंवा पोहणे इत्यादी क्रिया केल्यास ही परिस्थिती आणखी वाढवू शकते.
2. मला माझ्या खांद्याच्या टोकाला वेदना होत आहेत. कृपया मदत करा!
काही गरोदर महिलांना खांद्याच्या टोकाला, जिथे हात सुरू होतात तिथे वेदना होतात. हे दुर्मिळ आहे आणि एक्टोपिक गर्भधारणेच्या लक्षणांपैकी एक आहे.
3. डावा हात आणि खांदा दुखण्यासाठी मी काय करावे?
मज्जातंतू दाबले गेल्यामुळे किंवा सांधेदुखीमुळे डाव्या हातामध्ये किंवा खांद्यामध्ये वेदना होऊ शकतात. हे हृदयविकाराचे लक्षण देखील असू शकते. तुम्ही ताबडतोब तुमच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
4. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात खांदा दुखतो का?
होय, गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात खांदे दुखणे शक्य आहे. परंतु, एक्टोपिक गर्भारपणामध्ये खांदा दुखणे सामान्य आहे. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.
गर्भारपण वेदनांसह येते, ज्यापैकी बहुतेक वेदना टाळता येत नाहीत. पुरेशी विश्रांती, हलका व्यायाम आणि पौष्टिक खाण्याच्या सवयी बाळगल्यास, अस्वस्थता कमी करण्यासाठी खूप मदत होते. लक्षात ठेवा की कोणतीही वेदना किंवा लक्षणे तुमच्या दैनंदिन कामात व्यत्यय आणू लागल्यास डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे.
आणखी वाचा:
गरोदरपणातील पाठदुखी – प्रकार, कारणे आणि उपचार
गरोदरपणातील मानेचे दुखणे- कारणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध