बाळाचे डोळे गुलाबी रंगाचे पाहिल्यावर कुठल्याही आईला गुलाबी रंगाच आकर्षण राहत नाही. बाळाचे डोळे आल्यावर बाळाच्या डोळ्याच्या पापण्यांच्या आतील भागास सूज येते तसेच रक्तवाहिन्या अधिक स्पष्ट दिसू लागतात आणि त्यामुळे डोळ्यांना गुलाबी रंग येतो.
संसर्ग झाल्यामुळे किंवा ऍलर्जीमुळे डोळे येऊ शकतात. डोळे आल्यामुळे बाळाला डोळ्यात खाज जाणवू शकते आणि डोळ्यांच्या कोपऱ्यात स्त्राव देखील दिसू शकतो. विषाणू, जिवाणूंचा संसर्ग किंवा एलर्जीमुळे बाळाचे डोळे येऊ शकतात.
लहान मुलांचे डोळे आल्यावर माहिती असले पाहिजेत असे घरगुती उपाय
लहान बाळांची प्रतिकार शक्ती नीट विकसित न झाल्यामुळे त्यांना डोळ्यांचा संसर्ग होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. बाळांना डोळ्यांचा संसर्ग (पिंक आय) झाल्यास घरगुती उपाय तुम्ही करू शकता त्यामुळे बाळाला लगेच बरे वाटू लागते. प्राथमिक उपचार म्हणून ह्या समस्येवर बरेचसे घरगुती उपाय आहेत. लक्षणे जाणवताच, संसर्ग पसरू नये म्हणून लगेच उपचार करणे महत्वाचे आहे.
लहान बाळांचे डोळे आल्यास त्यावर बरेच नैसर्गिक उपाय आहेत. ह्या लेखामध्ये अशाच ११ घरगुती उपायांची यादी दिलेली आहे.
१. स्तनपान
आईचे दूध लहान बाळांसाठी सर्वोत्तम आहे असे म्हणतात कारण त्यामध्ये फक्त पोषण गुणधर्मच नाहीत तर हिलींग गुणधर्म सुद्धा आहेत. कोलोस्ट्रम मध्ये भरपूर प्रमाणात पोषण मूल्ये असतात.
बऱ्याचशा माता हा उपाय करतात आणि डॉक्टर सुद्धा त्याची शिफारस करतात. तुम्ही खाली नमूद केलेल्या पद्धतीनुसार बाह्य वापरासाठी आईच्या दुधाचा वापर करू शकता –
- बाळाच्या दोन्ही डोळ्यांच्या पापण्यांवर दिवसातून २–३ वेळा आईचे दूध लावा
- तुम्ही ते थेट लावू शकता किंवा वाटीमध्ये काढून घेऊन नंतर ड्रॉपरने लावू शकता
- संसर्ग न झालेल्या डोळ्यास संसर्ग होऊ नये म्हणून दोन्ही डोळ्यांना दूध लावा
२. मध
मध हा बुरशीनाशक आणि जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे आणि त्याच्या प्रतिजैविक गुणधर्मांमुळे तो मोठ्या प्रमाणात ओळखला जातो. आधुनिक थेरपीमध्ये डोळ्यांशी संबंधित संक्रमणाच्या उपचारांसाठी मध वापरले जाते. डोळ्यांच्या उपचारांसाठी मनुका मध सर्वोत्तम मानले जाते. तथापि, कोणतेही कच्चे मध देखील चांगले कार्य करते. मध खालीलप्रमाणे वापरावा –
- बाह्य वापरासाठी, १/४ कप मध घ्या आणि त्यामध्ये निर्जंतुक केलेले कोमट पाणी समान प्रमाणात घाला
- स्वच्छ ड्रॉपर वापरुन, डोळ्यात आवश्यकतेनुसार प्रत्येक काही तासांनंतर १–२ थेंब घाला
३. कोलाइडल सिल्व्हर
हे द्रावण डोळे शांत करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी मदत करते. लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी हा एक सिद्ध उपाय आहे. तुम्ही खाली दिलेल्या निर्देशानुसार बाह्य वापरासाठी ते वापरू शकता –
- स्वच्छ ड्रॉपर वापरुन डोळ्यांच्या आत २–३ थेंब टाका
- दिवसातून ३ ते ४ वेळा किंवा लक्षणे दूर होईपर्यंत याची पुनरावृत्ती करा
- संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी दोन्ही डोळ्यांवर थेंब लागू केले आहेत याची खात्री करा
४. कॅमोमाइल चहा
नैसर्गिक शीतकरण गुणधर्म आणि कॅमोमाइल चहाचा शांत सुगंध डोळ्यांना झालेला संसर्ग (पिंक आय) बरा करण्यास मदत करतो. ते खालीलप्रमाणे वापरले जाऊ शकते.
- पेय म्हणून – फुले उकळत्या पाण्यात टाका आणि हे पाणी थंड होऊ द्या. गॉज–पॅड किंवा कापसाचे गोळे वापरून नियमित अंतराने बंद पापण्यांवर ठेवा.
- कॅमोमाइल तेल – निर्जंतुक केलेल्या पाण्यामध्ये तेलाचे काही थेंब घाला. त्यामध्ये कापूस बुडवून घ्या आणि डोळ्यांवर ५–१० मिनिटे ठेवा. १ वर्षांखालील मुलांसाठी ही पद्धत वापरू नका.
५. मीठ पाण्याचे द्रावण
डोळ्यांच्या संसर्गासाठी सर्वात सोपा, स्वस्त आणि सुप्रसिद्ध उपाय म्हणजे मिठाचे पाणी वापरणे. मिठाचे पाणी डोळ्यांना शांत करते तसेच संसर्गामुळे होणारी डोळ्यांची अस्वच्छता साफ करते. उकळत्या पाण्याच्या भांड्यात थोडे मीठ घाला. थंड झाल्यावर, कापसाचा गोळा बोळा आणि पापण्यांवर ठेवा. प्रत्येक वेळी कापसाचा नवीन बोळा घ्या.
६. कच्च्या बटाट्यांचे काप
सामान्यतः सर्व घरात बटाटे असतात. कच्चे बटाटे तुरट असतात आणि त्यामुळे डोळ्यांचा त्रास कमी होतो तसेच त्यामुळे वेदना आणि जळजळ सुद्धा कमी होते. खाली दिल्याप्रमाणे तुम्ही बटाट्याचे काप वारू शकता.
- बटाटा धुवून त्याचे पातळ काप करा. प्रभावित डोळ्यांवर कच्च्या बटाट्याचे तुकडे ठेवा
- बटाटा किसून घ्या आणि बंद डोळ्यांवर ठेवा आणि ५–१० मिनिटे ते तसेच राहू द्या
- प्रत्येक वेळी बटाट्याचे ताजे स्लाइस घ्या आणि दिवसातून अनेक वेळा पुन्हा असे करा
७. डोळ्यांसाठी कॉम्प्रेस
कॉम्प्रेसेस चिकट स्त्राव काढून संक्रमण दूर करण्यास मदत करतात. सूज कमी झाल्यामुळे वेदना देखील कमी होते.
- कॉम्प्रेस गरम किंवा थंड असू शकते. स्टोअरमध्ये खरेदी केलेले कॉम्प्रेस वापरा किंवा वॉशक्लोथ गरम/थंड पाण्यात बुडवा आणि पिळून घ्या
- आणि नंतर डोळ्यांवर ठेवा. प्रत्येक डोळ्यासाठी स्वतंत्र कापड वापरा
८. व्हिटॅमिन ए
गाजर आणि पालक ह्यासारखा व्हिटॅमिन ए समृद्ध आहार शरीराचे रक्षण करतो आणि शरीरातील संसर्गाशी लढण्यासाठी निरोगी पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देतो.
९. जस्त आणि व्हिटॅमिन सी
लहान मुलांच्या आहारात भाज्या, लिंबूवर्गीय फळे, मासे आणि अंडी इत्यादी पदार्थांचा समावेश वाढवा. त्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
१०. औषधे
डोळ्यांच्या संसर्गासाठी (पिंक आय) काही औषधे उपलब्ध आहेत. परंतु कोणतेही औषधोपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
११. प्रतिजैविके
जर डोळ्यांना झालेला संसर्ग नैसर्गिकरित्या बरा होत नसेल आणि बाळाच्या शरीराचे तापमान वाढून डोळ्यांमध्ये जास्त वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. संसर्गाचे स्वरूप आणि त्याची तीव्रता ह्यानुसार औषध अवलंबून असेल.
सर्वसाधारणपणे, डोळ्यांचा संसर्ग (पिंक आय) ही फार गंभीर स्थिती नाही किंवा घातक नाही. तथापि, विशेषतः बाळांच्या बाबतीत डोळ्यांच्या ऊतींचे नाजूक स्वरूप लक्षात घेता, घरगुती उपायांची माहिती असणे आवश्यक आहे आणि बाळाच्या डोळ्यांच्या बाबतीत काही समस्या आढळ्यास लगेच त्यावर उपचार करणे जरुरीचे आहे.
आणखी वाचा:
बाळाच्या डोळ्याच्या संसर्गासाठी १० सर्वोत्तम घरगुती उपचार
बाळाच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे – कारणे आणि उपाय