In this Article
नवजात बाळाच्या आयुष्याचे पहिले १२ महिने खूप नाजूक असतात. वेगवेगळे संसर्ग, ऍलर्जी, आजार ह्या व्यतिरिक्त बाळांना Sudden infant death syndrome किंवा SIDS चा धोका असतो. पोटावर झोपणे हे SIDS चे प्रमुख कारण आहे.
बाळाचे पोटावर झोपणे बाळासाठी सुरक्षित आहे का?
असे म्हणतात की बाळाने त्याच्या आयुष्याचे पहिले १२ महिने पोटावर झोपणे टाळले पाहिजे कारण बाळे स्वतः सोडलेला उच्छवास परत श्वासाद्वारे आत घेतात. त्यामुळे बाळांना ऑक्सिजन कमी मिळतो आणि त्यामुळे फुप्फुसांचे कार्य तेवढे सुरळीत होत नाही आणि त्यामुळे SIDS चा धोका उद्भवतो. म्हणून बाळ पोटावर झोपल्याने ऑक्सिजन कमी पडून बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे डॉक्टर पालकांना बाळाला पोटावर काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपू नका असा सल्ला देतात.
बाळे पोटावर केव्हा झोपू शकतात?
अमेरिकन अकॅडेमी ऑफ पेडिऍट्रिक्स नुसार SIDS मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ५०% वर आले आहे, कारण नवजात बालकांना एक वर्षाचे होईपर्यंत पाठीवर झोपवण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. असे केल्याने बाळाची श्वसन संस्था नैसर्गिकरित्या विकसित आणि मजबूत होते. त्यामुळे बाळ जास्त प्रमाणात ऑक्सिजन आत घेते आणि त्यामुळे SIDS चा धोका कमी होतो. एक वर्षानंतर सुद्धा बाळाला खूप काळासाठी पोटावर न झोपवणे चांगले.
जर माझ्या बाळाला पोटावर झोपायला आवडत असेल तर?
एक महत्वाचे लक्षात घेतले पाहिजे की पोटावर वळण्याइतके नवजात बालकाचे हालचाल कौशल्य पहिले चार महिने विकसित झालेले नसते. बाळ जागे असताना पोटावर वळल्यावर बाळाकडे आणि त्याच्या तब्येतीकडे लक्ष दिले पाहिजे. बाळाच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षात बाळाला पोटावर झोपवणे टाळले पाहिजे. नवजात शिशुच्या शरीराची क्षमता पुन्हा शुद्ध ऑक्सिजन घेण्याइतकी विकसित झालेली नसते. जास्त झालेला कार्बन डाय ऑकसाइड, बाळ पोटावर झोपलेले असताना परत श्वासाद्वारे बाळाच्या शरीरात गेल्यास बाळासाठी ते हानिकारक होऊ शकते. जर बाळ पाठीवर झोपू शकत नसेल तुम्ही बालरोगतज्ञांशी त्वरित संपर्क साधावा.
तुमचे बाळ जर पोटावर वळू लागले तर ते तुमच्यासाठी काळजीचे कारण आहे का?
अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की SIDS ने होणारे बरेचसे मृत्यू हे नवजात बाळाच्या आयुष्याच्या पहिल्या काही वर्षांमध्ये होतात. बऱ्याच वेळेला ही बाळे दोन ते सहा महिने ह्या वयोगटातील असतात. सहा महिने वयाच्या आसपास बाळ पोटावर वळू लागते. ह्याचा फायदा सुद्धा असतो कारण सहा महिने वयाची जी बाळे जागे असताना पोटावर झोपतात त्यांच्या शरीराच्या वरच्या भागातील स्नायू मजबूत होतात आणि ही बाळे जमिनीवरून मान पटकन वर उचलतात.
सावधानता: तुम्ही ह्या काळात बाळाकडे लक्ष दिले पाहिजे कारण अजूनही SIDS चा धोका आहेच. जर बाळाच्या आसपास कुणी नसेल तर बाळाला पोटावर झोपवू नका.
जर तुमचे बाळ झोपेत किंवा जागेपणी पोटावर झोपत असेल आणि बाळाचे वय सहा महिन्यांच्या वर असेल तर ते सुरक्षित आहे. तरीसुद्धा बाळाकडे लक्ष देणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. पहिल्या सहा महिन्यात जर बाळ पोटावर झोपले तर श्वासास अडथळा येतील अशा गोष्टी बाजूला करणे महत्वाचे आहे. म्हणजेच बाळाच्या आजूबाजूला क्रिबमध्ये ब्लँकेट्स, खेळणी, मऊ खेळणी ह्यापैकी काहीही नको. तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि आवश्यक ती काळजी घ्या जेणेकरून बाळ पोटावर झोपले तरी काही प्रश्न येणार नाही.
बाळाचे पोटावर झोपणे: सुरक्षित झोपेसाठी काही मार्गदर्शक सूचना
तुमचे बाळ सुरक्षित आणि आरामात आहे ह्याची खात्री होण्यासाठी खूप मार्ग आहेत आणि बाळाने पोटावर झोपल्यामुळे काही नुकसान नाही.
- घट्ट गादी वापरा: घट्ट गादी वापरल्याने बाळाला आधार मिळेल. बाळाला उशी, सोफा किंवा कुठल्याही मऊ पृष्ठभागावर झोपवू नका कारण बाळ आत घेत असलेल्या हवेवर त्यामुळे परिणाम होईल. तज्ञांच्या मते बाळ झोपलेले असताना क्रिब मध्ये काहीही ठेऊ नका.
- बंपर पॅड्स काढून टाका: हे साहित्य अगदी सामान्य आहे आणि जवळजवळ सगळ्या क्रिब सोबत ते येते. तथापि तुमच्या बाळाच्या क्रिबमध्ये ते बसवू नका.कारण त्यामुळे गुदमरण्याची शक्यता असते.
- तुमच्या बाळाला खूप गरम होऊ देऊ नका: तुमच्या बाळासाठी खोलीचे कोणते तापमान योग्य आहे हे माहिती असणे अवघड आहे परंतु जर छोट्या बाह्यांचे कपडे घालून तुम्हाला आरामदायक वाटले तर खोलीचे ते तापमान योग्य आहे. खोलीचे तापमान २३ ते २५ डिग्री सेल्सियस दरम्यान ठेवणे चांगले.
- बाळाचे डोके झाकणे टाळा: बाळासाठी जे हलके ब्लॅंकेट वापरता त्यामुळे फक्त बाळाचा छातीखालील भाग झाकला गेला पाहिजे आणि बाळाचे हात पांघरुणाच्या बाहेर असले पाहिजेत. असे केल्यास ब्लॅंकेट बाळाच्या डोकयापर्यंत जाणार नाही ह्याची खात्री होते.
- चोखणी वापरा: ही उपकरणे बाळाला शांत करण्यासाठी वापरतात, त्यामुळे बाळाला चांगली झोप मिळते. तथापि जर बाळ त्यामुळे अस्वस्थ होत असेल किंवा जर बाळ झोपल्यावर चोखणी बाहेर पडत असेल तर ती बाळाला देणे टाळा. जबरदस्ती करू नका.
बाळ जागे असताना बाळाला पोटावर झोपवणे
बाळ झोपलेले असताना बाळाला पोटावर झोपवू नये परंतु बाळ जागे असताना त्यास पोटावर झोपवा. घट्ट पृष्ठभागावर चादर टाकुन त्यावर बाळाला पोटावर झोपवा. कारेन सोकल –गुटर्रेझ यांनी असे सांगितले आहे की , बाळांनी जागे असताना पोटावर झोपले पाहिजे त्यामुळे त्यांच्या कमरेच्या वरील भागाचे स्नायू बळकट होतात आणि बाळ झोपल्यावर श्वासोच्छवासास त्याची मदत होते.
बाळाला ह्या क्रियेमुळे खूप ताण देऊ नका. सुरुवातीला फक्त तीन ते पाच मिनिटे बाळाला पोटावर झोपवा. नंतर हळूहळू तुम्ही वेळ वाढवू शकता, नंतर बाळाला त्याची सवय होईल.
निष्कर्ष:
नवजात बाळ दिवसातील बराच वेळ झोपलेले असते. जर बाळाला भूक लागली असेल तरच त्यात अडथळा येतो. हा बाळाच्या विकासासाठी महत्वाचा टप्पा आहे, जो खूप काळजीपूर्वक आणि सावधानतेने हाताळला गेला पाहिजे. तुम्ही बाळाच्या बालरोगतज्ञांशी ह्या विषयी सविस्तर चर्चा केली पाहिजे. बाळाच्या झोपण्याच्या सवयींविषयी काय केले पाहिजे आणि काय टाळले पाहिजे हे जाणून घेतले पाहिजे.
आणखी वाचा:
बाळाला रात्री कसे झोपवावे?
एसआयडीएस (SIDS) आणि बाळाला झोपवताना घ्यावयाची काळजी