Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना प्रजननक्षमता स्त्रीबीजाची गुणवत्ता सुधारण्यासाठी 12 खाद्यपदार्थ

स्त्रीबीजाची गुणवत्ता सुधारण्यासाठी 12 खाद्यपदार्थ

स्त्रीबीजाची गुणवत्ता सुधारण्यासाठी 12 खाद्यपदार्थ

जेव्हा एखादे जोडपे बाळासाठी विचार करू लागते, तेव्हा गर्भधारणेपूर्वी त्यांनी काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. आर्थिक बाबी, घर, स्थान, कुटुंबाशी जवळीक इत्यादी बाह्य पैलू आहेत. आरोग्य आणि जीवनशैली यासारखे अंतर्गत पैलू आहेत. मूल होण्यासाठी खरं तर खूप विचार आणि कृती गरजेची आहे! त्यासाठी स्त्रीची प्रजनन प्रणाली गर्भ टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी मजबूत आहे का आणि तिची स्त्रीबीजे निरोगी आहेत का हे लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे.

स्त्रीच्या अंडाशयातील अंडी निरोगी आहेत किंवा नाही हे, मासिक पाळीची नियमितता, भविष्यातील प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेची क्षमता ह्या घटकांवर अवलंबून असते. स्त्रीच्या अंड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी जीवनशैलीतील साधे बदल, नियोजित पोषण आणि पौष्टिक आहाराचा समावेश इत्यादींची मदत होऊ शकते आणि स्त्री गर्भवती होण्याची शक्यता वाढू शकते.

अंड्याचा दर्जा महत्त्वाचा का आहे?

स्त्रीबीजाची गुणवत्ता तिच्या गर्भाधान आणि रोपणाच्या शक्यतांवर परिणाम करते.  गर्भधारणा टिकवून ठेवण्याची शक्यता देखील त्यानुसार ठरते. अंड्याला ओव्हुलेशनसाठी तयार होण्यासाठी 90 दिवस लागतात. ते पूर्ण परिपक्व होण्याआधी, आरोग्य, जीवनशैली, हार्मोन्स, तणाव, आहार इत्यादी घटकांचा त्यावर परिणाम होतो.

स्त्रिया त्यांच्या स्त्रीबीजांसह जन्माला येतात.  नंतर त्या अंड्यांचे उत्पादन करू शकत नाहीत असे पूर्वी मानले जात असे. परंतु, अलीकडील संशोधनाने हे सिद्ध केले आहे की, स्त्रीच्या पुनरुत्पादक वर्षांमध्ये अंडाशयातील स्टेम पेशी नवीन अंडी तयार करण्यास सक्षम असतात. अंड्याच्या गुणवत्तेवर वयाचा परिणाम होतो असेही मानले जाते तुम्ही तुमच्या तिशीत किंवा चाळीशीत गर्भवती होऊ शकत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्हाला वैद्यकीय मदतीची मात्र गरज भासू शकते. तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल आणि जीवनशैलीबद्दल अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

स्त्रीच्या अंड्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक

एखादी स्त्री तिची अंडी निरोगी असल्याची खात्री कशी करू शकते? आहार आणि पोषण, दैनंदिन जीवनातील ताणतणाव आणि विश्रांतीचे प्रमाण, सामाजिक जीवनशैली, पर्यावरणीय घटक, हार्मोन्स आणि शरीरातील रक्ताभिसरण यांसारख्या घटकांचा स्त्रीच्या अंड्यांच्या गुणवत्तेवर आणि आरोग्यावर परिणाम होत असतो.

  • वय
  • जीवनशैली घटक
  • वजन आणि बीएमआय
  • डिम्बग्रंथि साठा
  • हार्मोनल असंतुलन
  • पर्यावरणीय विषारी घटक
  • वैद्यकीय परिस्थिती
  • ताण
  • पोषण
  • प्रजनन उपचार
  • जेनेटिक्स
  • औषधे

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे पोषण

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असलेले काही महत्त्वाचे पोषक घटक म्हणजे लोह, फायबर, कार्बोहायड्रेट्स, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स (‘चांगली’ चरबी), वनस्पती प्रथिने, उच्च चरबीयुक्त डेअरी,  भरपूर जीवनसत्त्वे आणि फॉलिक अॅसिड इत्यादी. तसेच, गर्भधारणेची तयारी करताना तुम्ही दूर राहिले पाहिजे असे काही पदार्थ म्हणजे लाल मांस, प्रक्रिया केलेले पदार्थ, फास्ट फूड, कृत्रिम शर्करा, गोड सॉफ्ट ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स हे आहेत. जर तुम्हाला यापैकी कोणताही पदार्थ खरोखर हवासा वाटत असेल, तर तो कमी प्रमाणात खा!

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खालील पोषक तत्वे आवश्यक आहेत.

  • जीवनसत्त्वे
  • फॉलिक ऍसिड
  • तंतुमय पदार्थ
  • लोखंड
  • लोहयुक्त पदार्थ
  • कर्बोदके
  • प्रथिने
  • उच्च चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ

अंडाशयातील अंड्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रजनन आहार

जर तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही आहार आणि पोषण ह्यांची सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे. पौष्टिक आणि संतुलित अन्न खाल्ल्याने तुम्हाला भरपूर पोषण मिळेल. तुमची पुनरुत्पादक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी आणि तुमचे हार्मोन्स स्थिर ठेवण्यासाठी तसेच तुमचे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. निरोगी आणि संतुलित आहार राखल्याने तुमची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होईल! रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांचा समावेश असलेला ‘इंद्रधनुष्य’ आहार घेणे हा तुमच्या जेवणात उच्च प्रमाणात पोषण समाविष्ट करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

आता, काही चविष्ट पदार्थांची यादी पाहू ज्यामध्ये हे महत्त्वाचे पोषक घटक असतात. हे पदार्थ तुमचे अंडाशय आणि अंड्यांचे आरोग्य चांगले राखतील.

1. एवोकॅडो

एवोकॅडो हे एक सुपरफूड आहे आणि ते खूप पौष्टिक आहे. त्यांच्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स खूप जास्त प्रमाणात असते.  ते अंड्याचे आरोग्य सुधारण्यास आणि चांगले पुनरुत्पादक आरोग्य राखण्यास मदत करते. एवोकॅडो सँडविच, सॅलड्स, डिप्स, स्प्रेड्स आणि स्मूदीजमध्ये वापरले जाऊ शकतात आणि मफिन आणि कुकीजमध्ये देखील वापरता येतात.

2. बीन्स आणि मसूर

तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असल्यास, ते चिंतेचे कारण असू शकते, कारण त्यामुळे ओव्हुलेशनमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या आहारात बीन्स आणि मसूर यांचा समावेश करणे चांगले असते, कारण बीन्स आणि मसूर हे लोह, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम आणि प्रजननक्षमतेसाठी आवश्यक असलेल्या इतर आवश्यक पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहेत. दररोज आपल्या आहारात बीन्स आणि मसूरचा किमान एक भाग समाविष्ट करणे महत्वाचे आहे. मसूर डाळ ही आमटी किंवा भातात वापरली जाऊ शकते.  तर बीन्स सॅलड आणि सँडविचमध्ये जोडले जाऊ शकतात तसेच  मफिन किंवा ब्राउनी बनवण्यासाठी देखील वापरले शकतात. ह्या दररोजच्या घटकांचा इतका उपयोग होतो हे कोणाला माहित होते का?

3. नट्स आणि सुका मेवा

सुकामेवा आणि नट्स हे प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचे उत्तम स्रोत आहेत. ब्राझील नट्समध्ये विशेषत: सेलेनियमचे प्रमाण जास्त असते. हे एक खनिज आहे आणि ते अंड्यांमधील गुणसूत्रांचे नुकसान कमी करण्यास मदत करते. ते एक अँटिऑक्सिडेंट देखील आहे जे मुक्त रॅडिकल्सला दूर ठेवते आणि चांगल्या अंड्यांचे उत्पादन करण्यास मदत करते. स्मूदी, सॅलड्स किंवा मुख्य पदार्थांमध्ये नट्स, बदाम, अक्रोड, शेंगदाणे आणि काजू घालू शकता किंवा स्नॅकच्या वेळी ते फक्त मूठभर खाऊ सुद्धा शकता!

4. तीळ

तीळ

तुम्ही विचार करता त्यापेक्षा तीळ हे जास्त आरोग्यदायी आहेत! त्यामध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते आणि अंड्याच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे हार्मोन्स तयार करण्यासाठी तिळाची  मदत होते. बोनस म्हणून, त्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स देखील भरपूर प्रमाणात असतात. तीळ, जवस, नट्स आणि ड्रायफ्रूट्ससह ट्रेल मिक्स बनवा. तुम्ही पौष्टिक असे हुमस देखील बनवू शकता, त्यामध्ये तिळाची पेस्ट असते. अंड्याचे आरोग्य वाढवण्यासाठी तुमच्या आहारात त्याचा समावेश करा. तृणधान्ये आणि सॅलड्समध्ये तिळाच्या बियांचा समावेश केला जाऊ शकतो. अर्थात जर तुम्हाला ते तसेच खायचे नसेल तर!

5. बेरी

बेरी खूप पौष्टिक असतात. त्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी, फोलेट (फॉलिक ऍसिड) आणि अँटिऑक्सिडंट असतात आणि ते अंड्यांचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. अंडी मजबूत आणि निरोगी राहतात. रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, क्रॅनबेरी आणि ब्लूबेरी सारख्या बेरी तुम्ही तशाच खाऊ शकता किंवा  स्मूदी किंवा फ्रूट सॅलडमध्ये घालू शकता. ओटमील, कॉर्नफ्लेक्स आणि मफिन्समध्ये सुद्धा तुम्ही त्या घालू  शकता. दर आठवड्याला किमान तीन वेळा बेरी खाण्याचा सल्ला दिला जातो.

6. हिरव्या पालेभाज्या

पालक, कोबी, ब्रोकोली, फ्लॉवर आणि इतर पालेभाज्यांमध्ये फोलेट, लोह, मॅंगनीज, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई जास्त प्रमाणात असतात (व्वा, हे खूप पोषण आहे!). हे पौष्टिक घटक आपल्या अंड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक आहेत. दररोज आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचे किमान दोन भाग समाविष्ट करा. तुमच्‍या दैनंदिन गरजा पूर्ण करण्‍यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश तुम्ही सॅलड, करी, डाळ, भात किंवा नूडल डिश आणि स्मूदीजमध्‍ये करू शकता.

7. आले

आणखी एक सुपरफूड म्हणजे आले आहे. ह्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. आल्यामुळे रक्ताभिसरण आणि पचन चांगले होते. प्रजनन प्रणालीतील कोणतीही अस्वस्थता दूर करण्यास, मासिक पाळी नियमित करण्यास आणि पुनरुत्पादक अवयवांची जळजळ कमी करण्यासाठी आल्याची मदत होते. तुमच्या आहारात आल्याचा समावेश करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे आल्याचा चहा पिणे (आपल्या सगळ्यांना आले घालून केलेला कडक चहा आवडतो,  नाही का?). आशियाई खाद्यपदार्थातील एक महत्त्वाचा घटक म्हणून, आले तुम्ही आमटीमध्ये तसेच भाजीमध्ये घालू शकता.

8. मका

हे एक निरोगी मूळ आहे. ह्यामध्ये 31 भिन्न खनिजे आणि 60 फायटोन्यूट्रिएंट्स (वनस्पतींद्वारे उत्पादित केलेले महत्त्वाचे पोषक) असतात. तसेच ह्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे ब आणि सी भरपूर प्रमाणात असतात. आदिवासी मोठ्या प्रमाणावर हे वापरतात. ह्यामुळे शुक्राणू आणि अंड्यांचे आरोग्य चांगले होते असे मानले जाते. हार्मोनल असंतुलन देखील स्थिर होऊ शकते. कामवासना वाढते. हे पावडर किंवा कॅप्सूल स्वरूपात वापरले जाऊ शकते. मका रूट पावडर स्मूदीज किंवा न्याहारीच्या जेवणात जोडले जाऊ शकते किंवा चॉकलेट ट्रफल्ससारखे पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते!

9. दालचिनी

दालचिनी हे आणखी एक सुपरफूड आहे आणि ते डिम्बग्रंथिचे कार्य सुधारण्यासाठी आणि इंसुलिनच्या प्रतिकाराचा सामना करून योग्य अंडी उत्पादन वाढवण्यासाठी चांगले असते. ज्या स्त्रियांना पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) असल्याचे निदान झाले आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे. जर तुम्हाला पीसीओएस असेल किंवा तुमची प्रजनन क्षमता वाढवायची असेल तर तुमच्या आहारात दालचिनीचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. एक चतुर्थांश चमचे दालचिनीचे दररोज सेवन केल्यास तुमच्या पुनरुत्पादक आरोग्यासाठी ते चमत्कार करू शकते. चवदार न्याहारीसाठी टोस्ट, चहा, ओट्स किंवा स्मूदीवर दालचिनी घालून पहा.

10. पाणी

होय, हे तांत्रिकदृष्ट्या अन्न नाही, परंतु अंड्याच्या आरोग्यासाठी पाणी देखील एक अत्यंत आवश्यक घटक आहे. दिवसातून 8 ग्लास पाणी पिण्याचे ध्येय ठेवा. शुद्ध पाणी प्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणे टाळा. प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधील रसायनांमुळे उत्पादित अंड्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. स्वतःला पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी तुमचे बेडसाइड टेबल किंवा कामाच्या टेबलाजवळ एक जग भरून पाणी किंवा ग्लास ठेवा!

11. सॅल्मन

सॅल्मन ओमेगा -3 फॅटी ऍसिडने समृद्ध आहे. ते हार्मोन्सचे नियमन करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. हे फॅटी ऍसिडस् अंड्याच्या गुणवत्तेसाठी आणि एकूणच पुनरुत्पादक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. प्रजनन क्षमता वाढवणारे फायदे मिळवण्यासाठी तुमच्या आहारात सॅल्मनचा समावेश करा.

12. हळद

हळदीमध्ये सक्रिय कंपाऊंड कर्क्यूमिन असते. ह्यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे पुनरुत्पादक अवयवांमध्ये जळजळ कमी करण्यास आणि हार्मोनल संतुलन चांगले राखण्यास मदत करू शकते. तुमच्‍या प्रजननक्षमतेच्‍या आहारात वाढ होण्‍यासाठी तुम्ही करी, सूप आणि स्मूदीजमध्‍ये हळद घालू शकता.

गर्भधारणेसाठी स्त्रीच्या अंड्याचे आरोग्य सुधारण्याचे इतर मार्ग

तुमच्या शरीरात तयार होणाऱ्या अंड्यांच्या गुणवत्तेबद्दल काळजी करणे हे पूर्णपणे सामान्य आहे, विशेषत: तुमचे वय 35 किंवा त्याहून अधिक असल्यास. तुमच्या अंड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी तुम्ही बरेच काही करू शकता – जीवनसत्व पूरक आहार घेणे आणि हर्बल मिश्रण घेणे,  जीवनशैलीतील बदल हे सर्व पुनरुत्पादक आरोग्य सुधारण्यासाठी अनेक विहित मार्ग आहेत! तुमच्या जीवनशैलीतील साधे बदल तुमच्या गरोदर होण्याच्या क्षमतेवर जबरदस्त परिणाम करू शकतात.

येथे काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपण गर्भवती होण्यासाठी अंड्याची गुणवत्ता सुधारू शकता:

1. कॅफिन, अल्कोहोल आणि सिगारेटपासून दूर रहा

कॅफिन, अल्कोहोल आणि सिगारेटपासून दूर रहा

सिगारेट हे आरोग्यासाठी कधीही चांगले नाही. पुनरुत्पादक आरोग्याच्या बाबतीत, सिगरेट मुळे अंडाशयातील अंडी नष्ट होण्यास गती मिळते आणि सिगारेटमधील रसायने अंड्यातील डीएनएमध्ये बदल करतात. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. याव्यतिरिक्त, अल्कोहोलमुळे तुमची सेक्स ड्राइव्ह कमी होते. मासिक पाळी आणि तुमच्या अंड्यांच्या दर्जावर त्याचा परिणाम होतो. तुम्ही दररोज मोठ्या प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्यास, तुम्हाला गर्भधारणेसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो आणि तुम्हाला गर्भपात होण्याचा धोकाही असू शकतो.

2. तुमचा ताण व्यवस्थापित करा

तणावामुळे कॉर्टिसोल आणि प्रोलॅक्टिन सारख्या संप्रेरकांचे उत्पादन होते. ते ओव्हुलेशन आणि अंडी उत्पादनात अडथळा आणू शकतात. तुमच्या जीवनातील ताणतणाव (घर, काम, इतर मुले इ.) व्यवस्थापित करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करा. सकारात्मक विचार आणि पोहणे, चालणे, नृत्य, योग, ध्यान इ. यासारख्या क्रियाकलापांवर तुमची ऊर्जा केंद्रित करा. तुमच्या गरजेनुसार बदल करा. तुमच्यावर असणारा कोणताही ताण कमी करण्यासाठी योग्य जीवनशैली अंगिकारा!

3. पौष्टिक आहार घ्या

स्त्रियांमध्ये अंड्याचे आरोग्य चांगले ठेवण्याचा नैसर्गिक उपाय म्हणजे पालेभाज्या, फळे, नट्स  मासे आणि मांस यांचा आहारात समावेश केल्याने निरोगी राहण्यास आणि प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत होते. परंतु,  तळलेले अन्न, प्रक्रिया केलेले अन्न किंवा मांस,  मीठ व साखरेपासून दूर रहा.

4. निरोगी आणि सामान्य बॉडी मास इंडेक्स (BMI) पर्यंत पोहोचा

जास्त वजनामुळे प्रजनन प्रक्रियेत अडथळा येतो आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढतो. यामुळे प्रजनन समस्या उद्भवू शकतात, कारण त्यामुळे हार्मोनल संतुलन बदलते आणि ओव्हुलेशनमध्ये व्यत्यय येतो. स्त्रीचा बॉडी मास इंडेक्स 18.5 ते 24.9 दरम्यान असावा. उदाहरणार्थ, 5 फूट 6 इंच उंच असलेल्या महिलेचे वजन 52 किलो – 70 किलो दरम्यान असले पाहिजे. योग्य पदार्थ खाऊन आणि नियमित व्यायाम करून निरोगी वजन राखण्याचा प्रयत्न करा.

  5. रक्ताभिसरण चांगले असावे

अंडाशयाचे कार्य चांगले होण्यासाठी पुनरुत्पादक अवयवांमध्ये रक्ताचे निरोगी अभिसरण आवश्यक आहे, कारण रक्तामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्यास निरोगी अंड्यांच्या उत्पादनात मदत होते. निर्जलीकरण रक्त प्रवाह कमी करू शकते, म्हणून पुरेसे पाणी प्या. रक्ताभिसरण वाढवण्यासाठी योग हा खूप चांगला व्यायाम आहे – लोटस पोझ, चाइल्ड पोझ, रिक्लाइनिंग हिरो आणि पुढे वाकणे ही योगातील काही आसने आहेत. ही आसने प्रजनन क्षमता वाढवतात.

6. पूरक आहार घ्या

पूरक आहार घ्या

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्या स्त्रिया गरोदर राहण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना गर्भधारणा होण्यापूर्वी आणि नंतरही फॉलिक अॅसिड सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त, इतर अनेक पूरक औषधांची शिफारस केली जाते. आपल्यासाठी सर्वात योग्य असलेला पूरक आहार जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्त्रीरोगतज्ञाला भेट द्या. उदाहरणार्थ, कोएन्झाइम Q10 हे वारंवार शिफारस केलेले पूरक औषध आहे आणि ते अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते, परंतु कृपया आधी तुमच्या डॉक्टरांचे मत घ्या!

7. तुमची अंडी गोठवा

काही स्त्रिया नेहमीपेक्षा उशीरा मूल होण्याचा पर्याय निवडू शकतात. परंतु ,वय वाढल्यानंतर गर्भधारणाहोणे थोडे कठीण असू शकते. त्यामुळे, गर्भधारणेला उशीर करण्याची तुमची योजना असल्यास, तुमची प्रजनन क्षमता नीट ठेवण्यासाठी अंडी गोठवून ठेवण्याचा पर्याय आहे. वयामुळे प्रजनन क्षमता वाढते आणि गर्भधारणेच्या क्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो यात शंका नाही, परंतु गोठवलेली अंडी जैविक घड्याळाचा अवलंब करतात आणि क्रायो-प्रिझर्व्ड अंडी भविष्यात गर्भधारणा होण्याची शक्यता वाढवतात!

8.एक्यूपंक्चर वापरून पहा

हे एक प्राचीन तंत्र आहे. ह्या तंत्राचा हजारो वर्षांपासून चिनी लोकांना फायदा झाला आहे आणि पाश्चात्य औषधांमध्ये त्याला मान्यता मिळू लागली आहे. अंड्यांचा दर्जा सुधारण्यात मदत करणाऱ्या ह्या तंत्राचे फायदे सर्वांनाच माहिती आहेत.  आयव्हीएफ चे रुग्ण अनेकदा अॅक्युपंक्चर सत्रासाठी जातात.  तणाव कमी करण्यासाठी हे तंत्र ओळखले जाते आणि त्याद्वारे निरोगी अंडी उत्पादन होण्यास मदत होऊ शकते. मात्र, हा उपाय आयव्हीएफ तज्ज्ञाने सांगितल्यासच करावा.

9. भरपूर नाश्ता करा

हे विशेषतः पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) असलेल्या महिलांसाठी आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की न्याहारी दरम्यान तुमच्या दैनंदिन कॅलरीजचा एक भाग खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉन आणि इन्सुलिनची पातळी कमी होण्यास मदत होते.  स्थिती आणि लक्षणे नियंत्रणात राहतात. इंसुलिन आणि टेस्टोस्टेरॉनची उच्च पातळी असेल तर पीसीओएस असलेल्या स्त्रियांच्या प्रजननक्षमतेत अडथळा निर्माण होतो. म्हणून, तुमच्या नाश्त्याच्या जेवणात तुम्ही पोषक तत्वांचा समावेश करा! संपूर्ण गहू, नाचणी, ओट्स इत्यादी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स खा आणि तुमच्या जेवणात भरपूर चरबी आणि प्रथिने घाला. ह्यामुळे तुमची इन्सुलिन पातळी नियंत्रित राहील.  प्रजनन क्षमता आणि पुनरुत्पादक आरोग्य चांगले राहील.

काय टाळावे?

प्रजननक्षमतेसाठी मादीच्या अंड्यांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करताना, प्रजनन आरोग्यावर नकारात्मक परिणाम करणारे खाद्यपदार्थ टाळण्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आहारातील काही पदार्थांमुळे अंड्यांचा विकास आणि गुणवत्तेला अडथळा निर्माण होतो. अंड्याची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी काही पदार्थ टाळले पाहिजे किंवा कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे,

  • साखर आणि परिष्कृत कार्बोहायड्रेट
  • कॅफीन
  • दारू
  • सोया उत्पादने
  • उच्च पाराअसलेले मासे
  • प्रक्रिया केलेले मांस
  • कृत्रिम स्वीटनर्स
  • जास्त प्रमाणात मीठ
  • फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले जेवण

स्त्रियांना कोणत्याही समस्यांशिवाय गर्भधारणा होण्यासाठी त्यांची प्रजननप्रणाली निरोगी असणे आवश्यक आहे. अलिकडच्या काळातील प्रजनन उपचारांनी अनेक स्त्रियांना आशेचा किरण दिला आहे.  तरीसुद्धा, प्रजनन वर्षांमध्ये स्त्रीने अंडी आणि अंडाशयांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. स्त्रियांनी अंड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. औषधे, पूरक आहार आणि उपचारांबद्दल त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article