In this Article
- ट्रिपल मार्कर टेस्ट म्हणजे काय?
- ह्या चाचणीला स्क्रीनिंग टेस्ट का म्हणतात?
- गरोदरपणात ट्रिपल मार्कर चाचणी करून घेण्यामागची कारणे
- तुम्ही ट्रिपल मार्कर टेस्ट कधी करावी?
- ट्रिपल मार्कर स्क्रीन टेस्टसाठी तुम्ही कशी तयारी करावी?
- चाचणी कशी केली जाते?
- ट्रिपल स्क्रीन टेस्ट केल्यावर काय समजते?
- चाचणी दरम्यान घ्यावयाची खबरदारी
- ट्रिपल मार्कर स्क्रीन टेस्टचे फायदे
- आई आणि बाळासाठी दुष्परिणाम आणि जोखीम
- चाचणीच्या निकालांचे स्पष्टीकरण
- नेगेटिव्ह स्क्रीन म्हणजे काय?
- चाचणीचे परिणाम असामान्य असल्यास तुम्ही काय कराल?
- पुढील चाचण्या करण्याची कारणे कोणती आहेत?
- वैकल्पिक स्क्रीनिंग चाचण्या
गर्भवती स्त्रीला तिच्या गरोदरपणाची प्रगती चांगली होत आहे हे समजण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या करून घ्याव्या लागतात. जर तुम्ही गरोदर असाल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला वेगवेगळ्या चाचण्या करून घेण्यास सांगतात. त्यापैकीच एक चाचणी म्हणजे ट्रिपल मार्कर टेस्ट होय. तुमच्या बाळामध्ये कुठलीही आनुवंशिक आरोग्याची समस्या असल्यास ही चाचणी केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. ट्रिपल मार्कर टेस्ट ही मल्टिपल मार्कर टेस्ट किंवा मल्टिपल स्क्रीनिंग गेस्ट म्हणून सुद्धा ओळखली जाते. ह्या चाचणी विषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि ही चाचणी गरोदरपणात का महत्वाची आहे हे माहिती करून घेण्यासाठी हा लेख वाचा.
ट्रिपल मार्कर टेस्ट म्हणजे काय?
ट्रिपल मार्कर स्क्रीन टेस्ट (ट्रिपल मार्कर टेस्ट म्हणूनही ओळखली जाते) ही रक्ताची एक साधी चाचणी आहे आणि गरोदरपणाच्या १५ व्या आणि १८ व्या आठवड्यादरम्यान केली जाते. ह्या चाचणीमध्ये, रक्ताचा नमुना घेतला जातो आणि गर्भामध्ये असलेली कोणतीही समस्या निर्धारित करण्यासाठी रक्तातील एफपी, एचसीजी आणि एस्ट्रिओलची पातळी मोजली जाते.
- अल्फा–फेटोप्रोटीन (एएफपी) – एएफपी हे प्रथिन विकसनशील गर्भाद्वारे तयार केले जाते. ह्या प्रोटीनची उच्च पातळी बाळामधील न्यूरल ट्यूब मधील संभाव्य दोष दर्शवू शकते.
- ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन (एचसीजी) – एचसीजी हे नाळेद्वारे तयार केले जाणारे संप्रेरक आहे. या संप्रेरकाची उच्च पातळी मोलर प्रेग्नन्सी किंवा एकाधिक गर्भधारणा दर्शवते. ह्या संप्रेरकाची पातळी जर कमी असेल तर ही कमी असलेली पातळी गर्भपात किंवा एक्टोपिक गर्भधारणा ह्यासारखी गरोदरपणातील संभाव्य गुंतागुंत सुद्धा दर्शवू शकते.
- एस्ट्रिओल – एस्ट्रिओल हे गर्भ आणि प्लेसेंटा या दोघांद्वारे तयार केलेले इस्ट्रोजेन आहे. या हार्मोनची कमी पातळी डाउन सिंड्रोम असलेल्या बाळाचा धोका दर्शवू शकते.
विकसनशील गर्भाला काही जन्मजात दोष असण्याचा धोका आहे की नाही हे शोधण्यासाठी चाचणी केली जाते.
ह्या चाचणीला स्क्रीनिंग टेस्ट का म्हणतात?
ही चाचणी करताना आरामदायी वाटण्यासाठी ही चाचणी का केली जाते हे आधी समजून घेणे आवश्यक आहे. स्क्रीनिंग चाचणी कुठलेही निदान करत नाही. विशिष्ट विकृती अस्तित्वात असल्यास आणि त्याविषयीच्या जोखीम घटकाचे संकेत देण्यापूर्वी वय, वांशिकता, रक्त चाचण्यांचे परिणाम इत्यादींसारख्या अनेक घटकांची तुलना केली जाते. ह्या चाचणीद्वारे एखादी समस्या अस्तित्वात आहे हे समजत नाही, तथापि, विशिष्ट स्थिती किंवा समस्या निश्चित करण्यासाठी पुढील चाचण्या करणे आवश्यक आहेत कि नाही हे मात्र ह्या चाचणीद्वारे समजते
गरोदरपणात ट्रिपल मार्कर चाचणी करून घेण्यामागची कारणे
ट्रिपल मार्कर टेस्ट तुमच्या गरोदरपणाबद्दल तुमच्या डॉक्टरांना महत्त्वाची माहिती देऊ शकते. येथे दिलेले चाचणीचे काही फायदे त्यासाठी मदत करतात.
- गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात ही चाचणी करून, न्यूरल ट्यूबच्या समस्या आणि इतर जन्मजात दोष शोधले जाऊ शकतात.
- ही चाचणी बाळाला डाऊन सिंड्रोम होण्याचा धोका आहे की नाही हे ओळखण्यासाठी मदत करू शकते.
- गरोदरपणातील ट्रायसोमी १८ (एडवर्ड सिंड्रोम) ओळखण्यासाठी ही चाचणी मदत करते.
- ट्रायसोमी टेस्ट स्त्रीला जुळे किंवा तिळे होणार आहे कि नाही हे ओळखण्यास मदत होते
- इतर काही समस्या असतील तर त्यासुद्धा ह्या चाचणीद्वारे समजतात त्यामुळे डॉक्टरांना निदान करता येऊ शकते.
तुम्ही ट्रिपल मार्कर टेस्ट कधी करावी?
वर नमूद केल्याप्रमाणे, ही चाचणी गरोदरपणाच्या १५ व्या आणि २० व्या आठवड्यात केली जाऊ शकते. परंतु, सर्वात अचूक परिणाम १६ व्या आणि १८ व्या आठवड्यादरम्यान मिळू शकतो. चाचणीचे निकाल सामान्यतः दोन ते चार दिवसांत उपलब्ध होतात.
ट्रिपल मार्कर स्क्रीन टेस्टसाठी तुम्ही कशी तयारी करावी?
या चाचणीसाठी कोणतीही तयारी आवश्यक नाही. तुम्ही या चाचणीसाठी जाण्यापूर्वी तुमच्या खाण्यावरही कोणतेही निर्बंध नसतात. ह्या चाचणीचे दुष्परिणाम देखील नगण्य आहेत. ही चाचणी रक्ताचा नमुना घेऊन केली जाते. ह्या चाचणीचा आईला तसेच बाळाला कमीत कमी धोका असतो.
चाचणी कशी केली जाते?
ट्रिपल टेस्ट इतर चाचण्यांसारखीच केली जाते. तुमचे डॉक्टर किंवा तंत्रज्ञ ही चाचणी कशी करतात ते येथे दिलेले आहे.
- स्टेप 1: सर्वात आधी, तंत्रज्ञ तुम्हाला तुमचा हात पुढे करून हाताची मूठ करण्यास सांगतील. असे केल्याने तुम्हाला रक्तवाहिनी शोधण्यास मदत होईल.
- स्टेप 2: मग डॉक्टर हाताभोवती एक पट्टा बांधून रक्तवाहिनी सापडलेला भाग घट्ट दाबून धरतील.
- स्टेप 3: तंत्रज्ञ त्या भागाला अँटिसेप्टिक लावतील.
- स्टेप 4: रक्त साठवण्यासाठी वापरल्या जाणार्या कुपीला जोडलेली सुई रक्तवाहिनी मध्ये घातली जाईल.
- स्टेप 5: एकदा कुपी भरली की, तंत्रज्ञ कुपी बाहेर काढतील, आणि अँटिसेप्टिक लावलेल्या कापसाच्या दुसऱ्या बोळ्याने तो भाग स्वच्छ करतील.
- स्टेप 6: रक्ताचा नमुना नंतर एका प्रयोगशाळेत मूल्यांकनासाठी पाठवला जाईल आणि तिथे बियोकेमिस्ट रक्ताचा नमुना तपासून पाहतील.
- स्टेप 7: परिणाम नंतर सॉफ्टवेअरमध्ये टाकले जातील आणि डॉक्टरांकडे पाठवले जातील. त्यानंतर डॉक्टर तुमच्यासोबत निकाल शेअर करतील.
डॉक्टर तुमच्या पुढील भेटीदरम्यान, परिणामांवर चर्चा करतील आणि परिणामांवर आधारित संबंधित माहिती देतील.
टीप: चाचणीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. कृपया चाचणीविषयी आणि चाचणीच्या परिणामांच्या आधारावर आवश्यक असलेल्या कृतींबद्दल तुम्हाला काही चिंता असल्यास तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा.
ट्रिपल स्क्रीन टेस्ट केल्यावर काय समजते?
ट्रिपल स्क्रीन टेस्ट ही एक सूचक चाचणी आहे. ह्या चाचणीदरम्यान काही असामान्यता आढळल्यास कुठली उपाययोजना करावी हे डॉक्टरांना समजते. ही चाचणी एचसीजी ची पातळी मोजते आणि एचसीजी तसेच इस्ट्रियॉलची पातळी सामान्य आहे की नाही हे सुद्धा त्यावरून समजते. चाचणीचे परिणाम वापरून नंतर निदान करण्यासाठी आईचे वय, वजन, गर्भारपणाचा कालावधी आणि वांशिकता लक्षात घेतली जाते.
चाचणी दरम्यान घ्यावयाची खबरदारी
ही चाचणी करत असताना, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संबंधित माहिती शेअर करणे महत्त्वाचे आहे. माहितीनुसार चाचणीचे निकाल बदलू शकतात. नवीन सुया, जंतुनाशक आणि जंतुनाशक वाईप्स तसेच प्रतिजैविके वापरून, गर्भावर रक्तातील रोगजनकांचा परिणाम होणार नाही ह्याची खात्री करण्यासाठी, डॉक्टर रक्त काढताना आवश्यक ती खबरदारी घेतात.
ट्रिपल मार्कर स्क्रीन टेस्टचे फायदे
ट्रिपल मार्कर चाचणीच्या मदतीने गरोदरपणातील संभाव्य गुंतागुंत लक्षात येते तसेच एका पेक्षा जास्त गर्भ असल्यास ते सुद्धा ह्या चाचणीद्वारे समजते . ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसाठी ट्रिपल मार्कर स्क्रीन टेस्ट करून घेणे फायदेशीर आहे. बाळामध्ये जन्मतःच काही दोष असल्यास ते समजण्यास ह्या चाचणीची मोठी मदत होते तसेच त्याबाबतची आधीच तयारी करण्यासाठी सुद्धा मदत होते. त्यापैकी काही काही आनुवंशिक विकार आणि विकृती खाली दिलेल्या आहेत.
- ट्रायसोमी १८ किंवा एडवर्ड सिंड्रोम ही एक गुणसूत्रांशी संबंधित असामान्यता आहे
- डाऊन सिंड्रोम, ह्या स्थितीमध्ये क्रोमोसोम २१ मधील अतिरिक्त अनुवांशिक सामग्री पेशीमध्ये असते.
- न्यूरल ट्यूब मधील दोष, हे दोष मुख्यत्वे करून मेंदूचे, मणक्याचे आणि पाठीच्या कण्यातील जन्मजात दोष असतात.
आई आणि बाळासाठी दुष्परिणाम आणि जोखीम
ह्या चाचणीचे कोणतेही ज्ञात दुष्परिणाम नाहीत. स्त्रीच्या शरीरातून खूपच कमी प्रमाणात रक्त काढले जाते त्यामुळे रक्त कमी होऊन आईच्या आरोग्यावर परिणाम होत नाही.
चाचणीच्या निकालांचे स्पष्टीकरण
ट्रिपल मार्कर चाचण्यांचे परिणाम बाळाला अनुवांशिक विकार असण्याची शक्यता दर्शवतात. तथापि, परिणाम खालील घटकांवर अवलंबून असतात:
- गर्भवती महिलेचे वय
- वांशिकता
- गर्भवती महिलेचे वजन
- गर्भवती स्त्रीला एकच बाळ होणार आहे कि जुळे
- तिचे गरोदरपणाचे किती महिने पूर्ण झालेले आहेत
तुम्ही ही चाचणी केल्यानंतर, तुमचे स्त्रीरोगतज्ञ तुमच्या ट्रिपल मार्कर चाचणीच्या अहवालाचे विश्लेषण करतील आणि परिणाम नकारात्मक की सकारात्मक आहेत हे तुम्हाला कळवतील . या चाचणीचे निकाल चुकीचे पॉझिटिव्ह असल्यास किंवा डॉक्टरांना चाचणीचा निकाल सामान्य वाटलं नाही तर ते तुम्हाला आणखी चाचण्या सुचवू शकतात.
नेगेटिव्ह स्क्रीन म्हणजे काय?
तुमच्या गर्भाला न्यूरल ट्यूब दोष, डाउन सिंड्रोम आणि ट्रायसोमी १८ सारखे जन्म दोष होण्याचा धोका कमी असतो असा नेगेटिव्ह स्क्रीनचा अर्थ होतो.परंतु नेगेटिव्ह स्क्रीन असल्यास बाळाचा सामान्यपणे जन्म होईल किंवा पूर्णपणे निरोगी बाळ जन्माला येईल असा त्याचा अर्थ होत नाही.
चाचणीचे परिणाम असामान्य असल्यास तुम्ही काय कराल?
चाचणी परिणाम असामान्य असल्यास, सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. गर्भातील विकृतीचे नेमके स्वरूप निश्चित करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला आणखी काही चाचण्या सुचवतील. ह्यापैकी पहिली चाचणी बहुधा अल्ट्रासाऊंड चाचणी असेल. ह्या चाचणीद्वारे बाळाचे वय निश्चित होईल. तसेच, बाळाला मेंदू, पाठीचा कणा, मूत्रपिंड आणि हृदयाच्या काही समस्या आहेत का हे देखील डॉक्टर तपासतील.
ट्रिपल मार्कर टेस्टचे परिणाम असामान्य असले तरीसुद्धा डॉक्टर तुम्हाला येणाऱ्या परिस्थितीसाठी तयार करू शकतील किंवा ते विकार बरे करण्यास मदत करतील.
पुढील चाचण्या करण्याची कारणे कोणती आहेत?
ट्रिपल मार्कर टेस्ट करून घेतल्याने संभाव्य जन्म दोष आणि अनुवांशिक परिस्थिती ओळखण्यास किंवा निदान करण्यास मदत होऊ शकते परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे पालकांना त्यासाठी तयार करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. विशेष गरजा असलेल्या मुलांना घेऊन जीवन जगण्यासाठी पालकांना तयार करणे हा ह्या चाचणीमागचा मुख्य हेतू आहे.
- विशेष अपंग मुलाच्या गरजांबद्दल पालकांना शिक्षित करणे.
- पालकांना समर्थन गट आणि थेरपिस्टशी जोडणे.
- संभाव्य स्थितीबद्दल जागरूकता वाढवणे.
- पालकांना शस्त्रक्रिया, औषधोपचार आणि पर्यायी उपचारांसह त्यांच्या सर्व पर्यायांचा विचार करण्याची संधी देणे.
वैकल्पिक स्क्रीनिंग चाचण्या
काही पालक चाचणीचे निदान अधिक समजून घेण्यासाठी किंवा दुसरे मत मिळविण्यासाठी वैकल्पिक स्क्रीनिंग चाचण्या करू शकतात. प्रसवपूर्व अल्ट्रासाऊंडसारख्या चाचण्या केल्याने पालकांना निदानाची पुष्टी करता येते. तुमच्या गरजेनुसार कोणती चाचणी करून घ्यावी ह्यासाठी तसेच पर्यायी चाचण्यांच्या यादीसाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला.
संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार राहणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. तुमचे बाळ निरोगी आहे की नाही हे जाणून घेणे ही तुमच्या पुढील आयुष्यासाठी तयार होण्याची पहिली पायरी आहे. ट्रिपल मार्कर टेस्ट तुम्हाला त्यासाठी तयार करण्यासाठी मदत करेल. तसेच तुमच्या मुलाला इतर आरोग्यविषयक समस्या तर नाहीत ना हे जाणून घेण्यासाठी ह्या चाचणीची मदत होईल . म्हणून ह्या चाचणीसाठी आणि इतर आवश्यक चाचण्यांसाठी वेळापत्रक तयार करा. तुम्हाला निरोगी गर्भारपणासाठी शुभेच्छा!
आणखी वाचा:
गरोदरपणातील नॉन स्ट्रेस चाचणी
गरोदरपणातील कोरिऑनिक व्हीलस सॅम्पलिंग (सीव्हीएस) चाचणी