In this Article
गर्भधारणा झाल्यानंतर तुमच्या शरीरात काही सुंदर आणि असामान्य बदल होऊ शकतात. तुमच्या स्तनांचा आणि पोटाचा आकार वाढेल, तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल आणि तुमच्या नाभीच्या खाली, प्युबिक एरियापर्यंत एक गडद रेषा तयार झालेली दिसेल. ह्या रेषेला लिनिया निग्रा किंवा गरोदरपणातील रेषा असे म्हणतात. तुम्हाला ही रेषा दिसल्यास काळजीचे कोणतेही कारण नाही. लिनिया निग्रा आधीपासूनच असू शकते, परंतु त्या रेषेच्या फिकट रंगामुळे तिच्याकडे लक्ष जात नाही. गरोदरपणात ही रेषा गडद होते. म्हणूनच ह्या रेषेला लिनिया निग्रा म्हणजेच काळी रेषा असे म्हणतात.
लिनिया निग्रा म्हणजे काय?
लिनिया निग्रा किंवा काळी रेषा ही पोटावरील एक गडद रेषा आहे. ही रेषा गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात दिसते. ही खरं तर एक फिकट रेषा असते. गरोदरपणापूर्वी ही रेषा जवळजवळ अदृश्य असते, म्हणून ह्या रेषेकडे लक्ष जात नाही. ह्या फिकट दिसणाऱ्या रेषेला लिनिया अल्बा (पांढरी रेषा) म्हणतात. जेव्हा एखाद्या स्त्रीला गर्भधारणा होते तेव्हा ही रेषा गडद होते, परंतु ते चिंतेचे कारण असू नये. लिनिया निग्रा पूर्णपणे सामान्य आहे आणि त्यामुळे काहीही त्रास होत नाही.
लिनिया निग्रा कधी दिसते?
लिनिया निग्रा ही खरं तर गडद झालेली रेषा असते, ही रेषा स्त्रीच्या पोटावर आधीपासूनच असते परंतु स्त्री गरोदर होईपर्यंत आणि रेषा गडद होईपर्यंत ती दिसत नाही. गर्भधारणा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पोटावर लिनिया निग्रा दिसल्यास, ती गडद रेषा पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. काळी रेषा म्हणून ओळखली जाणारी रेषा म्हणजेच लिनिया निग्रा गडद तपकिरी रंगाची असते. काही स्त्रियांमध्ये, ही रेषा बरगड्यांपासून देखील सुरू होऊ शकते. ही रेषा दिसण्याची विशिष्ट अशी वेळ नाही. गरोदरपणाचा शोध लागताच ही रेषा दिसायला सुरुवात होते आणि जसजसे गरोदरपणाचे दिवस पुढे सरकतात तसतसे ही रेषा आणखी गडद होऊ शकते.
लिनिया निग्रा कशामुळे तयार होते?
ओटीपोटाच्या स्नायूंच्या संयोजी ऊतींचे मिलन जिथे होते ती जागा म्हणजे लिनिया अल्बा होय. सुरुवातीला ही रेषा खूप फिकट असते त्यामुळे तिकडे लक्ष जात नाही. गरोदरपणात स्त्रीच्या शरीरातील संप्रेरकांमधील बदलांमुळे ही रेषा गडद होते. पोटावरील रेषा दुसऱ्या तिमाहीत गडद होते कारण इस्ट्रोजेनची पातळी वाढते त्यामुळे अतिरिक्त मेलेनिन स्राव होतो. या मेलेनिनमुळे त्वचा काळी पडते आणि त्यामुळे लिनिया निग्रा लक्षात येण्याइतपत गडद दिसू लागते. जसजसे गरोदरपणाचे दिवस पुढे सरकतात तसतसे ही रेषा हळूहळू गडद होत जाते. गर्भवतीच्या पोटावरील गडद रेषा सुमारे १/२ ते १ सेंटीमीटर रुंद असते. तुमच्या त्वचेवर कोणतेही गडद ठिपके किंवा चट्टे असल्यास, मेलॅनिनच्या वाढीमुळे हे चट्टे आणखी गडद होऊ शकतात.
लिनिया निग्रा असणे योग्य का आहे याची कारणे
काही स्त्रियांना लिनिया निग्राबद्दल चिंता वाटू शकते, परंतु काही मुद्दे दिलेले आहेत, त्यामुळे लिनिया निग्रा दिसत असल्यास काळजी करण्याचे काही कारण नाही.
1. नैसर्गिक आहे
गरोदरपणात लिनिया निग्रा दिसणे अगदी सामान्य आहे. तुमच्या शरीरात मेलॅनिनचे प्रमाण जास्त आहे असे ही रेषा सूचित करते. या कालावधीत स्तनाग्रांभोवतीचा भाग आणि क्लिटॉरिस गडद होतात हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. परंतु ते चिंतेचे कारण नाही. गरोदरपणाच्या या सुंदर टप्प्याचा आनंद घ्या. गरोदरपणात दिसणारी ही रेषा तुमच्यातील जीवनाची एक अद्भुत आठवण आहे.
2. निरुपद्रवी आहे
गर्भधारणा रेषा तुमच्या बाळासाठी निरुपद्रवी आहे. गरोदरपणात दिसणारी ही रेषा तुमच्या शरीरातील नैसर्गिक बदलांमुळे दिसू लागते. परंतु काळजी करण्यासारखे काही नाही आणि ही रेषा रोखण्याचे नक्कीच कोणतेही कारण नाही. लिनिया निग्रा टाळण्यासाठी कोणतेही क्रीम लावणे टाळणे चांगले आहे कारण त्यामुळे इतर समस्या उद्भवू शकतात. काळजी करण्याऐवजी तुम्ही ते स्वीकारू शकता आणि जीवनाचे पालनपोषण करण्याच्या तुमच्या क्षमतेचा तुम्ही अभिमान बाळगू शकता.
3. ही रेषा आपोआप नाहीशी होते
बाळाच्या जन्मानंतर काही महिन्यांनी ही रेषा आपोआप नाहीशी होईल. प्रसूतीनंतर,तुमच्या संप्रेरकांची पातळी स्थिर होते. मेलेनिनचे प्रमाण देखील सामान्य होऊन तुमचा रंग पूर्ववत होईल.
4. तुम्हीही रेषा झाकू शकता
लिनिया निग्रा दिसणे अपरिहार्य आहे, परंतु तरीही तुम्ही ही रेषा गडद होण्यापासून रोखू शकता. शक्य असल्यास उन्हात बाहेर जाणे टाळावे. घराबाहेर असताना चांगले सनस्क्रीन लावा. असे मानले जाते फॉलिक ऍसिडची पातळी कमी असल्यास लिनिया निग्रा दिसू लागते. म्हणून, ह्या रेषेचा रंग हलका करण्यासाठी पालकाच्या भाजीसारख्या नैसर्गिक स्त्रोतांमधून फॉलिक ऍसिडचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करू शकता.
गर्भधारणा रेषेबद्दल आपण काय करू शकता?
लिनिया निग्रा टाळता येत नाही पण तुम्ही प्रयत्न करून तिचे गडद दिसणे टाळू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे, सूर्यप्रकाशात जाणे टाळणे, सनस्क्रीन लावणे आणि आपले पोट झाकणे यासारखे काही सोपे उपाय मेलॅनिनचे उत्पादन कमी करण्यास मदत करू शकतात, त्यामुळे ही रेषा अधिक गडद होत नाही. लिनिया निग्रासाठी कोणताही विशिष्ट उपचार नाहीत, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर कोणतेही क्रीम किंवा औषधे वापरणे चांगले.
लिनिया निग्रा तयार होणे कसे टाळता येईल?
लिनिया निग्रा होण्यापासून रोखण्यासाठी कोणताही विशिष्ट उपाय किंवा मार्ग नाही. परंतु ही रेषा दिसणे टाळण्यासाठी कोणताही प्रयत्न करू नका असा सल्ला डॉक्टर देतात. कारण त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. ही रेषा रोखण्याचे काही दावे असू शकतात परंतु प्रत्यक्षात, ही रेषा टाळण्याचे दुसरे कोणतेही मार्ग नाहीत.
प्रसूतीनंतर गर्भधारणा रेषेचे काय होते?
बाळंतपणानंतर, शरीर सामान्य होण्यास सुरवात होते, शरीरातील संप्रेरकांची पातळी देखील सामान्य होते. परंतु बाळंतपणानंतर दोन महिन्यांत गर्भधारणा रेषा आपोआप नाहीशी झाली पाहिजे. परंतु ही रेषा कायम तशीच राहिल्यास तुम्ही काही विशिष्ट क्रिम्ससाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता त्यामुळे ही रेषा फिकट होण्यास मदत होईल. टीप: गरोदरपणात आणि स्तनपान करताना ओव्हर-द-काउंटर क्रीम किंवा औषधे वापरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. गर्भधारणा रेषा (लिनिया निग्रा) बाळाच्या लिंगाचा अंदाज लावते का?
लिनिया निग्रा नुसार बाळाच्या लिंगाचा अंदाज लावता येतो हे मिथक आहे. परंतु घरातील ज्येष्ठ स्त्रिया असे सांगतात की जर ही रेषा ओटीपोटापासून बेंबीपर्यंतच असेल तर गर्भवती स्त्रीला मुलगा होऊ शकतो आणि जर ही रेषा बरगड्यांपर्यंत असेल तर त्या स्त्रीला मुलगी होऊ शकते. परंतु बाळाच्या लिंगाचा अंदाज लावणे कधीच विश्वासार्ह नसते. मुलगा किंवा मुलगी होण्याची शक्यता सामान असते. लक्षात ठेवा, मुलगा असो अथवा मुलगी बाळ निरोगी असणे खूप महत्वाचे आहे.
2. लिनिया निग्राचा बाळाच्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो का?
लिनिया निग्राचा काहीच त्रास होत नाही. हे केवळ बाह्य पेशींपुरते मर्यादित आहे त्याचा बाळाशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही!
3. गर्भधारणा रेषा नसणे सामान्य आहे का?
गर्भधारणा रेषा नसणे अगदी सामान्य आहे कारण काही प्रकरणांमध्ये मेलेनिनचे प्रमाण कमी असल्यास, रेषा गडद होत नाही.
काही गर्भवती स्त्रियांना लिनिया निग्रा दिसणे लाजिरवाणे वाटू शकते. आणि स्त्रिया ही रेषा लपविण्याचा प्रयत्न करू शकतात. परंतु ही रेषा फक्त गरोदरपणात दिसते हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे आणि त्यामुळे बाळाला कोणतेही नुकसान होत नाही. गर्भधारणेमुळे स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात आणि लिनिया निग्रा दिसणे हे त्यापैकीच एक आहे. एक नवीन जीवन निर्माण करून त्या जीवाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी देवाने स्त्रियांना दिली आहे त्यामुळे स्त्रियांना स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे. तुम्ही लिनिया निग्राची चिंता करू नका कारण ही रेषा पूर्णपणे सामान्य आणि सुरक्षित आहे!
आणखी वाचा:
गरोदरपणात पोटावर खाज सुटणे
गरोदरपणात पोटात वायू होणे आणि पोट फुगल्यासारखे वाटणे