In this Article
जोपर्यंत तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचाली जाणवणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला तुमचे गरोदरपण एक वास्तव आहे असे वाटणार नाही. तुम्ही गरोदर आहात हे समजण्यासाठीची प्रमुख लक्षणे म्हणजे मळमळ आणि मॉर्निंग सिकनेस ही आहेत. परंतु, एकदा तुमचे बाळ तुम्हाला जाणवतील अशा हालचाली करण्यासाठी पुरेसे मोठे झाले की, तुम्हाला तुमचे गर्भारपण पूर्वीपेक्षा अधिक वास्तविक वाटू लागते! प्रत्येक आईसाठी हा एक अतिशय रोमांचक टप्पा असतो.
गरोदरपणाच्या इतर अनेक पैलूंप्रमाणेच, गर्भात पाय मारणाऱ्या बाळाबद्दलही अनेक रोमांचक तथ्ये आहेत. जेव्हा तुमचे बाळ खरोखरच लहान असते, तेव्हा त्याला तुमच्या गर्भाशयात हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा असते. तो ह्या टप्प्यात स्वस्थ नसतो आणि सक्रिय असू शकतो. ते तुम्हाला लक्षात सुद्धा येत नाही. परंतु, तो जसजसा मोठा होतो तसतसे जागेच्या मर्यादांमुळे त्याच्या हालचालीचे स्वातंत्र्य मर्यादित होते. असे असले तरी, तुमचे बाळ स्थिर राहण्याची अपेक्षा करू नका. ह्यावेळी देखील तुमच्या लहान बाळाच्या हालचाली जाणून घेण्यासाठी स्वतःला तयार करा.
प्रत्येक बाळाचे व्यक्तिमत्व आणि क्रियाकलाप ह्यामुळे प्रत्येक गरोदरपण एकमेकाद्वितीय होते. परंतु काही तथ्ये आहेत ज्यांच्या आधारे गरोदरपणात सगळी प्रगती नीट होत आहे हे तपासून पहिले जाऊ शकते. बाळाचे पोटात असताना पाय मारण्याशी संबंधित घटकांविषयी ह्या लेखात अधिक जाणून घेऊयात.
व्हिडिओ: गरोदरपणात बाळाचे पाय मारणे
बाळाने पोटात असताना पाय मारण्याविषयी रोमांचक तथ्ये
बाळाचे पाय मारणे रोमांचक वाटू शकते. परंतु, त्यामागे करणे असतात. त्याविषयी जाणून घेण्यासाठी खाली वाचा.
१. बाळाचे पाय मारणे बाळाला कुठलाही त्रास होत नाही हे सूचित करते
तुमच्या बाळाच्या पाय मारण्याबाबत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमचे बाळ ठीक आहे आणि त्याला कुठलाही त्रास होत नाही हे सूचित करते. त्यामुळे तुमच्या बाळाच्या बाबतीत सर्वकाही ठीक आहे हे सूचित होते. ह्या हालचाली पुढे वाढत जातील. तथापि, एकदा तुमचे बाळ मोठे झाले आणि त्याने तुमच्या गर्भाशयातील सर्व जागा व्यापली की, जागेच्या कमतरतेमुळे हालचाली मंद होतील. असे असले तरी, त्या हालचाली मजबूत असतील आणि त्यांचा स्वतःचा एक निश्चित नमुना असेल.
२. बाळाने पाय मारण्याची कोणतीही निश्चित वेळ नाही
गर्भधारणा झाली आहे हे निश्चित झाल्यानंतर आणि तुम्ही सुरुवातीच्या अस्वस्थतेतून बाहेर पडल्यानंतर, बाळ कधी पाय मारण्यास सुरुवात करेल ह्याविषयी तुम्ही विचार करू लागाल. तुमच्या सभोवतालचे इतर लोक सुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारू लागल्यावर तुम्ही गोंधळून जाऊ शकता. तुम्हाला गरोदरपणाच्या कोणत्या महिन्यात बाळाचे पाय मारणे जाणवू लागते किंवा गरोदरपणाच्या कोणत्या महिन्यात तुम्हाला ते जाणवले पाहिजे? तर एक लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक गरोदरपण वेगळे असते. तुम्हाला तुमच्या बाळाची हालचाल कधी जाणवतील ह्याबाबत कोणताही कठोर आणि जलद नियम नाही. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणात हे लवकर जाणवते, तर काही जणींना ते खूप नंतर जाणवते. जर तुम्हाला आधी मुले झाली असतील तर तुमच्या प्रत्येक गरोदरपणात बाळाचे पाय मारणे आणि कालावधी वेगवेगळा असू शकतो.
३. बहुतेक मातांना १६–२५ आठवड्यांच्या दरम्यान बाळाचे पाय मारणे जाणवू शकते
साधारणपणे, गरोदरपणाच्या १६–२५ आठवड्यांच्या दरम्यान बाळाचे पाय मारणे जाणवू शकते. जर तुम्ही पहिल्यांदा आई झालेला असाल तर, पंचवीसव्या आठवड्याच्या आसपास बाळाच्या हालचाली जाणवण्याची अपेक्षा करा. तुम्ही हा टप्पा ओलांडल्यानंतरही कोणतीही स्पष्ट हालचाल होत नसल्याने तुम्हाला काळजी वाटत असल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बाळ पाय मारत असेल परंतु ते खरोखरच बाळाचे पाय मारणे आहे का हे तुम्हाला काही वेळा समजू शकणार नाही. ह्याचे कारण असे की सुरुवातीच्या टप्प्यात बाळाचे पाय मारणे खरोखरच जाणवत नाही. कारण बाळाची ही हालचाल अगदी हळूवार आणि लक्षात न येण्यासारखी असते. पुढे पुढे ती स्पष्ट होत जाते.
४. बाळाच्या हालचालींचा मागोवा घ्या
सर्व काही ठीक आहे याची खात्री करण्यासाठी मातांनी त्यांच्या बाळाच्या हालचालींचा मागोवा ठेवावा असे तज्ञ सुचवतात. तुम्हाला हे सतत करण्याची गरज नाही. तुम्ही त्यासाठी दिवसाचा ठराविक वेळ निश्चित करू शकता. आवश्यक असल्यास एक जर्नल बनवा आणि बाळाला ठराविक वेळा पाय मारण्यासाठी किती वेळ लागतो हे निश्चित करा. जरी दिवसभरात हे वेगवेगळे असले तरीसुद्धा, तुमचे बाळ केव्हा सक्रिय आहे आणि तो कधी झोपतो किंवा विश्रांती घेतो हे समजण्यासाठी ही पद्धती तुम्हाला उपयोगी पडेल.
५. रात्रीच्या वेळी बाळाचे पाय मारणे अधिक स्पष्ट होते
पोटातील बाळ रात्रीच्या वेळेला पाय का मारते? हा प्रश्न बऱ्याच गरोदर स्त्रिया विचारतात. किंबहुना पोटातील बाळाच्या सततच्या हालचालीमुळे बऱ्याचश्या गरोदर स्त्रियांची रात्रीची झोप नीट होत नाही. ह्याचे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही विश्रांती घेत असता तेव्हा तुमचे बाळ सतर्क आणि सक्रिय असते. तसेच दिवसा जेव्हा तुम्ही स्वतः कार्यरत असता तेव्हा तुम्हाला बाळाच्या हालचाली लक्षात येत नाहीत. परंतु जेव्हा तुमचे शरीर विश्रांती घेत असते तेव्हा रात्रीच्या वेळी हालचाली अधिक स्पष्ट होतात.
६. बाळाचे पाय मारणे अतिक्रियाशीलता दर्शवत नाही
तुमचे गरोदरपणाचे दिवस पुढे सरकत असताना, बाळ खूप पाय का मारत होते हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तुमचे पोटातील बाळ अतिक्रियाशील आहे अशी जरी तुम्हाला काळजी वाटत असली तरी ते काळजी करण्याचे कारण नाही. उलट तुमचे बाळ चांगले आणि सक्रिय असल्याचे ते लक्षण आहे. बाळाची हालचाल जाणवणे हे चांगले लक्षण आहे.
७. बाळाचे पाय मारणे हे आईच्या आहारावर अवलंबून असते
बाळाच्या हालचाली देखील तुम्ही खात असलेल्या पदार्थांशी संबंधित असतात. तुमच्या जेवणानंतर तुमचे बाळ उत्तेजित होते आणि सक्रिय हालचाल दाखवते हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही घेत असलेल्या अन्नपदार्थातून अचानक ऊर्जा मिळत असल्यामुळे असे होते. कॅफीन सारख्या उत्तेजक घटकांमुळे तुमच्या बाळाच्या क्रियाकलापांमध्ये वाढ होऊ शकते. तुमचे बाळ खूप सक्रिय आहे असे तुम्हाला वाटत असेल तर, तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी, साखरयुक्त पदार्थ आणि कॅफिनयुक्त पेये कमी करण्याचा विचार करा. त्यानंतर तुम्हाला सकारात्मक फरक जाणवू लागेल. जर तुमचे बाळ तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणत असेल, तर थोडा वेळ उठून फिरण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे बाळ शांत होते आणि तुम्हाला चांगली झोप मिळते.
८. जेवण घेतल्यानंतर तुमच्या बाळाच्या हालचालींचा मागोवा घ्या
सुरुवातीला बाळ जेव्हा पोटात हालचाल करू लागते तेव्हा पोटात फुगे फुटणे किंवा फुलपाखरे फडफडणे अश्या हालचालींशी त्याची तुलना करता येते. पॅटर्नचे निरीक्षण करून आणि ह्या हालचाली नक्की केव्हा होतात याचा मागोवा ठेवून तुमचे बाळ खरोखरीच हालचाल करत आहे किंवा नाही हे तुम्ही ओळखू शकता. तुमच्या जेवणानंतर ऊर्जा वाढल्यामुळे बाळाची हालचाल वाढते. तुमचे जेवण झाल्यानंतर बाळाच्या हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी तुम्ही थोडा वेळ देणे चांगले असते. त्यानंतर तुम्हाला बाळाच्या हालचाली ओळखता आल्या पाहिजेत.
९. दुस–या गरोदरपणात बाळाच्या हालचाली लवकर जाणवू शकतात
दुसऱ्यांदा गरोदर असणाऱ्या स्त्रिया बाळाच्या हालचालींविषयी उत्सुक असतात. वस्तुस्थिती अशी आहे की दुस–यांदा गरोदर असणाऱ्या मातांना सामान्यतः बाळाच्या हालचाली ओळखणे पहिल्या वेळेपेक्षा सोपे जाते. तुमचे शरीर दुसऱ्या गरोदरपणाशी अधिक चांगले जुळवून घेत असल्याने, तुमच्या पहिल्या गरोदरपणाच्या तुलनेत तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचाली लवकर जाणवण्याची शक्यता आहे. तथापि, हे तुमच्या बाळाच्या हालचालींवर देखील अवलंबून असेल.
१०. तुमच्या पतीला बाळाच्या हालचाली तिसऱ्या तिमाहीमध्ये जाणवू लागतील
तुमच्या पोटातील बाळाच्या हालचाली लवकरच जलद होतील आणि तुमचे बाळ सक्रिय असल्याचे ते चिन्ह असेल. तुमच्या गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये बाहेरून सुद्धा तुमच्या बाळाच्या हालचाली स्पष्ट दिसू लागतील. तुमच्या पोटावर कुणी हात ठेवल्यास त्यांना ह्या बाळाच्या हालचाली स्पष्ट जाणवू लागतील.
पोटातील बाळाच्या हालचाली ह्या बाळाच्या आरोग्याच्या महत्वाच्या सूचक आहेत. बाळाचे पाय मारणे हा तुमचा त्याच्याशी झालेला पहिला संवाद आहे. तुम्ही मागोवा घ्यावा असा तो एक घटक आहे. एकसारख्या पॅटर्न मध्ये होत असलेल्या बाळाच्या हालचाली म्हणजे तुमचे बाळ चांगले आणि सक्रिय असल्याचे ते चिन्ह आहे. नेहमीच्या पॅटर्न मध्ये काही बदल आढळल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्याविषयी बोलून घेणे चांगले असते.
आणखी वाचा:
बाळाला पोटात असताना उचकी लागणे – हे सामान्य आहे का?
गरोदरपणात रात्रीच्या वेळी पोटातील बाळाची हालचाल किंवा त्याचे पाय मारणे – सुरक्षित आहे का?