In this Article
गर्भधारणा होणे सगळ्याच स्त्रियांसाठी सोपे नसते. गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असताना स्त्रीला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. गर्भधारणा होणे अवघड करणारी एक सर्वसामान्यपणे आढळणारी समस्या म्हणजे हायपोथायरॉयडीझम, त्याचे निदान वेळेवर झाले नाही तर स्त्रीला गर्भधारणा होणे अवघड होते. दहा मधील एका स्त्रीला गर्भधारणेच्या आधी किंवा गरोदरपणात कुठल्या तरी स्वरूपाचा हायपोथायरॉयडीझम असतो, पण बऱ्याच वेळा त्याचे निदान होत नाही. हायपोथायरॉयडीझम विषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आणि त्याचा वंध्यत्वाशी कसा संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा.
हायपोथायरॉयडीझम म्हणजे काय?
सर्वात प्रथम, ही स्थिती म्हणजे काय हे माहिती करून घेऊयात. मानेकडील भागात आपल्या स्वरयंत्राखाली थायरॉईड ग्रंथी असतात. ह्या ग्रंथी थायरॉईड संप्रेरकांची निर्मिती करतात आणि त्याद्वारे शरीरातील चयापचयाची क्रिया नियमित केली जाते.
काही वेळा, थायरॉईड ग्रंथी योग्य रित्या काम करीत नाहीत आणि परिणामी हे संप्रेरक कमी प्रमाणात तयार केले जाते. ह्या स्थितीला हायपोथायरॉईडीझम असे म्हणतात. तसेच, थायरॉईड संप्रेरकाची निर्मिती जास्त प्रमाणात झाली तर हायपरथायरॉईडीझम म्हणतात. शरीराची सर्व कार्य सुरळीत राहण्यासाठी थायरॉईड ग्रंथी महत्वाच्या आहेत.
हायपोथायरॉयडीझम ची कारणे
जर थायरॉईड ग्रंथींचे काम योग्यरित्या न होणे हे हायपोथायरॉयडीझम चे प्रमुख कारण आहे. परंतु,
१. थायरॉईड ग्रंथींकडून थायरॉईड संप्रेरकांची निर्मिती योग्य प्रमाणात होण्यासाठी आयोडीनची आवश्यकता असते. जर शरीरात आयोडीन खूप कमी प्रमाणात असेल तर हायपोथायरॉयडीझम होऊ शकतो, तसेच आयोडीन खूप जास्त प्रमाणात असेल तर हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो.
२. जर थायरॉईड ग्रंथींना संसर्ग झाला किंवा सूज आली (थायरॉईडीटीस) तर तयार झालेली संप्रेरके रक्तात मिसळतात आणि त्यामुळे हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो आणि काही महिन्यांनंतर तो हायपोथायरॉईडीझम मध्ये परावर्तित होऊ शकतो.
३. जर तुम्हाला खूप ताण असेल, तर तुमच्या ऍड्रिनल ग्रंथी सक्रिय होतात आणि जास्त प्रमाणात कोर्टिसोल हे संप्रेरक तयार होते. कोर्टिसोल मुळे थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मितीस अडथळा येतो आणि त्यामुळे हायपोथायरॉईडीझम होऊ शकतो.
४. पाऱ्यासारख्या जड धातूशी संपर्क आल्यास हायपोथायरॉयडीझम होऊ शकतो
५. हाशिमोटो डिसीजमुळे थायरॉईड ग्रंथींना सूज येते आणि त्यामुळे थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मितीवर परिणाम होतात. आणि हे हायपोथायरॉयडीझमचे सर्वात सामान्यपणे आढळणारे कारण आहे.
६. गलगंड, थायरॉईड ग्रंथींचा कर्करोग झाल्यास शस्त्रक्रिया करून थायरॉईड ग्रंथी काढून टाकल्या जातात आणि त्यामुळे थायरॉईड ग्रंथींच्या कार्यावर परिणाम होतो आणि हायपोथायरॉयडीझम होऊ शकतो.
त्यामुळे गर्भधारणा आणि गरोदरपणावर कसा परिणाम होतो?
जर स्त्रीच्या शरीरात थायरॉईड संप्रेरकांचे प्रमाण खूप कमी (किंवा जास्त) असेल तर त्यामुळे तिच्या मासिक पाळीवर परिणाम होतो. स्त्रीच्या ओव्यूलेशन क्षमतेवर परिणाम होऊन तिला गर्भधारणा होणे अवघड होते आणि काही वेळा वंध्यत्व सुद्धा येऊ शकते. दुसरीकडे, हायपोथायरॉयडीझम असून सुद्धा गर्भधारणा राहिली तरी गर्भपाताचा धोका असतो. तसेच बाळाला जन्मतःच अपंगत्व येण्याची सुद्धा शक्यता असते. हे भयानक वाटू शकते, परंतु काळजीचे काही कारण नाही, ह्यावर अनेक उपचार आहेत आणि नॉर्मल पद्धतीने बाळ होऊ शकते.
थायरॉईडची चाचणी मी केव्हा करून घ्यावी?
जर तुम्ही बाळाचा विचार करीत असाल तर, सर्वात आधी तुम्हाला थायरॉइडची चाचणी केली पाहिजे. तुम्हाला गर्भधारणा होण्याआधी तुमचे डॉक्टर तुम्हाला काही चाचण्या करून घेण्यास सांगतील. खालील परिस्थितीत तुम्ही थायरॉइडची चाचणी करून घेतली पाहिजे
१. गर्भधारणेचा प्रयत्न करण्याआधी थायरॉइडची चाचणी
खालील लक्षणे आढळ्यास तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे
- थायरॉईड डिसऑर्डर चा कौटुंबिक इतिहास असेल तर
- तुम्ही गर्भधारणेसाठी सहा महिने प्रयत्न करून यश मिळत नसेल तर
- जर तुम्हाला पुढील लक्षणे आढळली तर – सांधे दुखी, स्नायू दुखी, केस गळणे, बद्धकोष्ठता, थकवा, आळस, लैंगिक इच्छा कमी होणे, हृदयाचे ठोके मंदावणे आणि गलगंड
- थंड वातावरण सहन न होणे
- तुमची मासिक पाळी अनियमित असेल आणि खूप वेदना होत असतील तर
- तुमचे दोन पेक्षा अधिक वेळा गर्भपात झाले असतील तर
- तुमचे वजन वेगाने वाढत असेल आणि व्यायाम तसेच पोषक आहार घेऊन कमी होत नसेल तर
तुमचे डॉक्टर तुम्हाला दोन संप्रेरकांची पातळी जाणून घेण्यासाठी रक्ताची चाचणी करायला सांगतील आणि ते म्हणजे – थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (टी एस एच ) आणि थायरॉक्झीन (टि ४). जर तुमच्या शरीरात टी ४ ची पातळी कमी असेल आणि टी एस एच जास्त असेल तर तुम्हाला हायपोथायरॉयडीझम असू शकतो आणि ह्या उलट झाल्यास पाळी अनियमित होते आणि ओव्यूलेशन होत नाही.
२. गर्भधारणा झाल्यावर थायरॉइडची चाचणी
गर्भारपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर तुम्ही चाचणी केली पाहिजे जर
- जर तुम्हाला वरीलपैकी कुठलीही लक्षणे दिसून आली तर
- तुमच्या कुटुंबात कुणाला थायरॉइडच्या आजार असेल तर
- तुम्हाला मधुमेह किंवा त्वचाक्षय सारखे आजार असतील तर
- तुम्ही मानेच्या कुठल्याही भागात रेडिएशन घेतले असेल तर
- जर तुमचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त असेल तर (वय जसे वाढते तसे हायपोथायरॉयडीझम होण्याची शक्यता वाढते)
हायपोथायरॉयडीझम आई आणि बाळावर कसा परिणाम होऊ शकतो?
जर तुम्हाला गर्भारपणादरम्यान हायपोथायरॉयडीझम झाला असेल तर तुम्ही त्यावर योग्य उपचार वेळीच घेतले नाहीत तर गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या रक्तदाबात वाढ होऊ शकते तसेच गर्भपात, अकाली प्रसूती, ऍनिमिया, हृदयरोग आणि प्रसूतीनंतर औदासिन्य येऊ शकते.
तसेच तुमच्या बाळाला जन्मतःच व्यंग असण्याची शक्यता असू शकते. बाळाचे वजन जन्मतःच कमी असू शकते, थायरॉईड तसेच मतिमंदत्व सुद्धा असण्याची शक्यता असते. तसेच अकाली जन्म किंवा पोटात असतानाच मृत्यूची शक्यताही असते.
गर्भधारणेच्या आधी घ्यायची खबरदारी
जर तुम्हाला हायपोथायरॉयडीझम असेल आणि तुम्हाला लवकर गर्भधारणा हवी असेल तर तुम्ही तात्कळ वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. गर्भधारणेच्या आधी तुम्ही योग्य उपचार घेऊन ते नियंत्रणात आणले पाहिजे. ह्याचे कारण म्हणजे तुमच्या बाळाची थायरॉईड ग्रंथीचे कार्य गर्भावस्थेच्या पहिल्या १२ आठवड्यातच सुरु होते. तोपर्यंत तुमचे बाळ थायरॉईड संप्रेरकाची तुमच्यावर अवलंबून असते. त्यामुळे थायरॉइडचे कार्य नीट सुरळीत होणे गरजेचे असते तसेच गर्भधारणेचा प्रयत्न करण्याआधी त्याची पातळी नियंत्रित असली पाहिजे.
हायपोथायरॉयडीझम वर डॉक्टर गोळ्या लिहून देतात. ह्या गोळ्यांमध्ये थायरॉक्झीन असते ( हे थायरॉईड ग्रंथी तयार करीत असलेल्या टी ४ सारखेच असते आणि ह्याचा उद्देश थायरॉईड संप्रेरकाची कमतरता भरून काढणे हा असतो. तुमचे डॉक्टर हि गोळी किती वेळा घ्यायची ते सांगतात तसेच गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात थायरॉईड संप्रेरकांची पातळी प्रत्येक चार आठवडयांनी तपासून पहिली जाते. तसेच हळूहळू डोस नियमित करून तुमच्या थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुरळीत केले जाते.
ही उपचारपद्धती सुरक्षित आहे, तथापि त्याचे अगदी थोडे दुष्परिणाम सुद्धा आहेत. परंतु ह्या स्थितीतुन नॉर्मल झाल्यावर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करू शकता. परंतु जर थायरॉइडची पातळी कमीच राहिली तर तज्ञांची भेट घ्या.
सबक्लिनिकल हायपोथायरॉयडीझम म्हणजे काय?
हा सौम्य स्वरूपाचा हायपोथायरॉयडीझम आहे जो कुठलीही लक्षणे दिसत नसल्यामुळे लक्षात येत नाही. टी.एस. एच. ची चाचणी केल्यावर ते लक्षात येऊ शकते. परंतु जर गर्भधारणेदरम्यान ते लक्षात आले तर योग्य उपचार घेणे हा चांगला पर्याय आहे.
गरोदरपणात घ्यायची काळजी
तुमचे हायपोथायरॉयडीझम वर उपचार चालू असताना जर तुम्हाला गर्भधारणा झाली तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. तुमचे डॉक्टर खालील काळजी घेण्यास सांगतील
- तुमच्या गोळीचा डोस(सिंथेटिक थायरॉक्झीन) ते वाढवू शकतील कारण तुम्ही आधीच उपचार घेत आहात
- गरोदरपणात दर सहा ते आठ आठवडयांनी थायरॉईडचे कार्य तपासून पहिले जाते
- थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (टी एस एच) च्या पातळीवर लक्ष ठेवणे जेणेकरून त्याची रक्तातील पातळी नियमित राहील. तुमचे डॉक्टर ह्या पातळीप्रमाणे औषधांचा डोस बदलतील
तुम्ही तुमच्या पातळीवर काय करू शकता?
- जर तुमच्या डॉक्टरांनी गोळीचा डोस ५०% नी वाढवला तर काळजी करू नका कारण गरोदरपणात तुमच्या शरीराला थायरॉईड संप्रेरकांची दुप्पट गरज असते कारण तुम्ही बाळाला सुद्धा त्याचा पुरवठा करीत असता
- गरोदरपणात अचानक पणे सध्या औषधांकडून ब्रॅडेड औषधांकडे वळू नका. किंवा ब्रँडेड औषधे घेत असाल तर साधी औषधे घेऊ नका. तुमचे डॉक्टर जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत आधीचीच औषधे घेत रहा
- डॉक्टरांनी सांगितलेलाच डोस घ्या – त्यापेक्षा जास्तही नको आणि कमी सुद्धा नको. तुमच्याही कुठल्याही कृतीचा तुमच्या बाळावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या
- आणि शेवटचं म्हणजे, काळजी अजिबात करू नका. औषधे सुरक्षित आहेत आणि त्याने तुम्हाला आणि बाळाला नुकसान पोहोचणार नाही
हायपोथायरॉयडीझम हा आजार कुठल्याही स्त्रीला वयाच्या कुठल्याही टप्प्यावर होऊ शकतो. जर तुम्ही गर्भारपणासाठी प्रयत्न करीत असाल आणि तुम्हाला हायपोथायरॉयडीझम असेल तर त्यावर योग्य उपचार करून स्थिती नियंत्रणात आणू शकता. तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा आणि त्यांच्या सूचनांचे पालन करा आणि त्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही! तुमचे डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे करत रहा आणि तुम्हाला लवकरच आनंदी आणि निरोगी बाळ होईल!
आणखी वाचा: पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम: कारणे, लक्षणे आणि उपचार