Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ३१वा आठवडा

गर्भधारणा: ३१वा आठवडा

गर्भधारणा: ३१वा आठवडा

तुमचं बाळ तुमच्याजवळ येण्यासाठी अगदी थोडा काळ राहिला आहे. जर तुम्हाला ३१व्या आठवड्याविषयी काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरे हा लेख वाचल्यास तुम्हाला मिळतील आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या बाळाच्या स्वागताची तयारी करू शकता.

गर्भारपणाच्या ३१व्या आठवड्यातील तुमचे बाळ

आता तुमच्या बाळाच्या मेंदूची वाढ वेगाने होत असते. कोट्यवधी चेतासंधी (synapses) चेतापेशींमध्ये विकसित होत असतात, सगळ्यांना पंचेंद्रियांकडून सतत माहिती मिळत असते. बाळ पोटामध्ये वेगवेगळे हावभाव करीत असते तसेच श्वासोच्छवास घेत असते आणि गर्भजलात पोहत असते तसेच अंगठा चोखण्यात वेळ घालवते. बाळ तुमच्या आवाजास पाय मारून प्रतिसाद देते परंतु त्यामुळे तुम्हाला कुठलीही हानी पोहचत नाही किंवा वेदना होत नाहीत. काही बाळांना सतत उचक्या लागतात त्यामुळे उचक्यांच्या आवाजाने तुम्हाला जाग येणार आहे त्यास तयार रहा. तुमच्या बाळाचे डोळे पूर्णपणे विकसित झाले आहेत आणि त्यामुळे ते प्रकाशास प्रतिसाद देऊ लागले आहे. शरीरावरील स्नायू आणि चरबी आधीपेक्षा खूप जास्त प्रमाणात वाढली आहे. तुम्हाला असे लक्षात येईल की तुमचे बाळ तुम्ही त्याच्यासाठी  लावलेल्या वेगवेगळ्या गाण्यांवर डुलत राहील.

बाळाचा आकार केवढा असतो?

गर्भारपणाच्या ३१व्या आठवड्यात बाळाचा आकार हा मोठ्या शहाळ्याएवढा असतो. बाळाचे वजन हे १ किलोग्रॅम इतके असते आणि बाळाची लांबी डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत ४० सेंटीमीटर इतकी असते.

शरीरात होणारे बदल

तुमच्या पोटातील वाढत्या बाळाला घेऊन हालचाल करणे प्रत्येक आठवड्याला अवघड होत चालले आहे. तुम्हाला गर्भारपणाच्या ३१व्या आठवड्यात नवीन काही बदलांचा अनुभव येईल.

श्वसनास त्रास

बाळामुळे गर्भाशयाचा दाब हा फुप्फुसांवर पडतो आणि त्यामुळे नेहमीपेक्षा तुम्ही, उथळ आणि संथ श्वास घ्याल, परंतु तुम्हाला बाळाची काही चिंता नसावी कारण बाळाला नाळेद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होतो. जर तुम्ही जास्त धावपळ करत असाल तर थोडा वेग कमी करण्याची गरज आहे. येत्या काही महिन्यांमध्ये फुप्फुसांवरील ताण वाढणार असल्यामुळे श्वसनास त्रास होण्याची शक्यता आहे.

स्तनांमधील स्त्राव

तुमचे स्तन कोलोस्ट्रम (Colostrum) नावाचा पिवळा पदार्थ निर्मिती करण्यास सुरुवात करतील, जे तुमच्या बाळाचे जन्मानंतरचे पहिल्या ३ दिवसाचे अन्न आहे.

नखे तुटणे

आत्तापर्यंत तुमचे केस आणि नखे ह्यांची वाढ वेगाने होत होती, परंतु तुमची नखे आता कोरडी होतील आणि संप्रेरकांमधील बदलांमुळे त्यांना लगेच तडे जातील. त्यामुळे नखे वेळीच कापून छोटी ठेवण्याची काळजी घ्या.

सराव कळा (Braxton Hicks Contractions)

ह्या सराव कळा तुम्ही आधीपेक्षा जास्त अनुभवाल. सजलीत रहा. तसेच एकाच जागी जास्त वेळ बसून किंवा झोपून राहू नका. असे केल्यास अस्वस्थता कमी होण्यास मदत होईल.

रक्ताच्या घनतेमध्ये वाढ

बरीचशी पोषणमूल्ये  आणि ऑक्सिजनचा पुरवठा तुमच्या नाळेला केला जात असल्याने तुमच्याकडे ५०% जास्त रक्ताचा साठा आहे.

३१ व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाच्या लक्षणे

तिसऱ्या तिमाहीच्या मध्यावर, गर्भारपणाची लक्षणे खूप बदलतात आणि सहन करण्याची क्षमता कमी होते. तथापि, त्या अस्वस्थतेविषयी आणि त्यावरील उपायांविषयी माहिती असल्यास तुम्हाला त्यातून बाहेर पडणे सहज शक्य होईल.

  • वारंवार लघवीला होणे

तुम्हाला आधीपेक्षा जास्त वेळ बाथरूमला जावे लागेल. मूत्राशयावर दाब पडल्याने, मुत्राशयामध्ये जास्त प्रमाणात मूत्र साठून रहात नाही.

  • पाठदुखी

बाळाच्या वजनामुळे तुमच्या पाठीच्या कण्यावर जास्त प्रमाणात दाब पडेल आणि तुमचा बांधा सुद्धा बदलेल. शरीराचा  तोल सांभाळणे कठीण होईल. त्यामुळे नियमितपणे स्ट्रेचिंग करा आणि शरीराचा बांधा चांगला राहण्याचे तंत्र शिका.

  • झोपण्यास त्रास होणे

गर्भारपणामुळे हे होत नाही, परंतु बाकीचे इतर घटक जसे की पेटके येणे, अपचन, रात्रीचे लघवीसाठी उठणे किंवा झोपण्यासाठी आरामदायक स्थिती नसणे इत्यादींमुळे झोपण्यास त्रास होतो.

  • ओटीपोटात दुखणे

गर्भाशय वाढल्यामुळे ओटीपोटावर दाब पडतो आणि त्यामुळे ओटीपोटात दुखते. ते सहन करणे खूप कठीण असते त्यामुळे तुमच्या डॉक्टरांशी किंवा फिजिओथेरपिस्टशी संपर्क साधून योग्य व्यायाम शिकून घ्या, त्यामुळे तुमचे दुखणे कमी होण्यास मदत होईल.

गर्भधारणेच्या ३१व्या आठवड्यात पोटाचा आकार

गर्भारपणाच्या ३१व्या आठवड्यात तुमचे वजन १०-१२ किलोंनी जास्त असते. ह्या जास्तीच्या वजनामुळे तुम्हाला तोल सांभाळणे कठीण जाईल, परंतु काळजी करण्याचे कारण नाही. तसेच पोटाचा घेर वरून खालपर्यंत ३०सेंमी इतका आहे, तुमच्या पोटाची त्वचा ताणली गेल्यामुळे मॉइश्चरायझर आणून ठेवा.

गर्भधारणेच्या ३१व्या आठवड्यातील सोनोग्राफी

आता इथूनपुढे  तुमच्या गर्भारपणातील प्रत्येक प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी तुमचे डॉक्टर्स तुम्हाला दर आठवड्याला सोनोग्राफी  करण्यास सांगू शकतात, विशेषतः जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तुम्हाला एकापेक्षा जास्त बाळे होणार असतील तर ही शक्यता जास्त असते. स्कॅन मध्ये तुम्हाला कळते की तुमचे बाळ आता पूर्णपणे विकसित झालेले आहे, तसेच बाळाचे सगळे अवयव संपूर्णतः विकसित झालेले आहेत. तुम्ही थ्री डी अल्ट्रासाऊंड सुद्धा करून पाहू शकता, त्यमुळे बाळाचा चेहरा आणि शरीरातील तपशील दिसतील.

बाळाचा आहार कसा असावा?

तुमच्या बाळाची तब्येत तुमच्या आहारावर अवलंबून आहे त्यामुळे प्रथिने, फळे, भाज्या, संपूर्ण धान्य तसेच दुग्धजन्य पदार्थ ह्यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करा. पोटदुखी आणि अपचन टाळण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने खात रहा. तळलेले, प्रक्रिया केलेले आणि चरबीने समृद्ध असलेले  अन्नपदार्थ टाळले पाहिजेत किंवा अगदीच वाटलं तर कधीतरी खा. ३१ व्या आठवड्यात आहारातील बदल खालीलप्रमाणे:

व्हिटॅमिन सी आणि लोह:

तुमचे बाळ स्वतःच्या रक्त पेशी तयार करू लागले आहे त्यामुळे बाळाला आहारामध्ये जास्त लोहाची गरज भासते. आहारामध्ये व्हिटॅमिन सी घेतल्यास लोह शोषणास मदत होते. पालक, आंबट फळे, मासे, मटण आणि हिरव्या पालेभाज्या खा.

कॅल्शिअम:

बाळाच्या हाडांसाठी तसेच नखे, उपास्थी ह्यांच्या विकासासाठी कॅल्शिअमची खूप गरज असते. तसेच निरोगी राहण्यासाठी कॅल्शिअमची गरज असते. भरपूर दूध प्या, कोबी, पालक, टोफू, पनीर, सोयाबीन हे कॅल्शिअम चे उत्तम स्रोत आहेत, त्यांचा आहारात समावेश करा.

तसेच तुमच्या शरीराला लोह आणि कॅल्शिअम दोघांची गरज असते, त्यामुळे लोह आणि कॅल्शिअम एकत्र घेऊ नका कारण कॅल्शिअममुळे लोहाचे शरीरातील शोषण कमी होते. त्यामुळे तुम्ही लोह आणि कॅल्शिअमच्या पूरक गोळ्या दिवसातून वेगवेगळ्या वेळेला घेऊ शकता.

काय काळजी घ्याल आणि त्याविषयीच्या काही टिप्स

इथे काही टिप्स दिल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या गर्भारपणात जवळ ठेऊ शकता:

हे करा

  • प्रसुतीपूर्व वर्गांची नोंदणी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. त्या वर्गांचे प्रशिक्षक हे बाळाच्या जन्माच्या वेळी येणाऱ्या सगळ्या प्रश्नांची माहिती देतात जसे की दुखण्याचे नियोजन कसे करावे?, ताणापासून सुटका कशी करावी? आणि नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी? इत्यादी.
  • तुमची दवाखान्यात जातानाची बॅग भरून ठेवा.
  • नेहमी दिवसाकाठी कमीत कमी २-३ लिटर्स पाणी प्या त्यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल तसेच तुम्ही सजलीत रहाल.
  • kegel सारखे व्यायाम करा त्यामुळे तुमच्या ओटीपोटावरचे स्नायू  बळकट होण्यास मदत होईल.

हे करू नका

  • बाळाच्या पाय मारण्याकडे दुर्लक्ष करू नका. बाळाच्या  पाय मारण्याच्या नमुन्याच्या अभ्यासामुळे बाळाचे पोटात असतानाचे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
  • वजन वाढल्यामुळे चेहऱ्याला सूज आली आहे असे समजू नका. कारण ते preeclampsia चे लक्षण असू शकते, त्यामुळे तुमच्या डॉक्टरांशी तात्काळ संवाद साधा.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

तुमच्या नवजात बाळाची खोली कशी सजवावी ह्याविषयीचा विचार आणि माहिती काढण्यासाठी ही योग्य वेळ आहे. गर्भारपणासाठी पुरेसे मॅटर्निटी कपडे आणून ठेवा, तसेच बाळंतपणानंतर तुम्हाला लागणारे कपडे खरेदी करण्यास विसरू नका. तुम्ही नार्सिंग ब्रा, बाळासाठी बाटल्या आणि इतर गोष्टी आणून ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही बाळासाठी क्रिब घेणार असाल तर बंपर्स असलेले क्रिब घेऊ नका तसेच त्यामध्ये उशा, खेळणी किंवा ब्लँकेट्स ठेऊ नका कारण ह्या वस्तूंमुळे सीड्स (Sudden Infant Death Syndrome ) चा धोका असतो. तसेच बाळाला बाहेर नेण्यासाठी छोटी बाबागाडी घ्या  त्यामुळे बाळाला ताजी हवा मिळेल.

तुमच्या प्रसूतीची वेळ जवळ आल्यामुळे तुम्ही सगळी तयारी करून ठेवा आणि बाळासोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी तयार रहा.

मागील आठवडा: गर्भधारणा: ३०वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: ३२वा आठवडा

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article