In this Article
- व्हिडिओ: ७ ते ९ महिन्यांच्या बाळाची झोप
- माझ्या बाळाच्या झोपेची पद्धत काय आहे?
- बाळाला किती झोपेची आवश्यकता असते? (७–९ महिने)
- बाळाला झोपण्याच्या चांगल्या सवयी कशा लावायच्या?
- ह्या वयात बाळाच्या काही झोपेच्या समस्या असतात का?
- बाळाची झोप आणि विकास
- तुमचे बाळ झोपेच्या प्रशिक्षणासाठी तयार आहे का?
- तुमच्या बाळाला झोपायला मदत करणे
- थकलेल्या आणि झोपेला आलेल्या बाळाची लक्षणे
एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना किती काम असते नाही का! बाळांची दिवसभरातील हालचाल बघता गमतीने असे म्हणावेसे वाटते. सर्व नवीन गोष्टी पहिल्यांदाच बघत असल्याने त्यांच्यासाठी तो खूप रोमांचक अनुभव असतो. खूप हालचाल झाल्यामुळे बाळे थकून जातात. त्यामुळेच बाळांना मोठ्या माणसांपेक्षा जास्त झोपेची गरज असते कारण ह्या त्यांच्या वाढीच्या महिन्यांमध्ये, बाळे बऱ्याच गोष्टींचे निरीक्षण करून त्यावर विचार प्रक्रिया करत असतात. .
व्हिडिओ: ७ ते ९ महिन्यांच्या बाळाची झोप
माझ्या बाळाच्या झोपेची पद्धत काय आहे?
प्रत्येक बाळ जसे वेगळे असते तशीच त्याच्या झोपेची पद्धत सुद्धा वेगळी असते. सहसा, वयाचा ६ महिन्यांचा टप्पा ओलांडल्यानंतर, तुमचे बाळ रात्री जास्त वेळ झोपू लागेल आणि अधूनमधून दूध पिण्यासाठी जागे होईल. बाळाच्या झोपेची पद्धत बाळाच्या स्वभावावर आणि झोपण्याच्या दिनचर्येवर अवलंबून असते. ज्या बाळांच्या खाण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा नियमित असतात त्यांना चांगली झोप लागते हे खरे आहे. ७–९ नऊ महिन्यांच्या बाळाच्या झोपेचे वर्गीकरण करताना ते दिवसाची जास्त आणि रात्रीची कमी झोप असे केले जाऊ शकते.
बाळाला किती झोपेची आवश्यकता असते? (७–९ महिने)
बाळ ७ महिन्यांचे झाल्यावर त्याच्या झोपेचा पॅटर्न हा मोठ्या माणसांसारखाच असतो. म्हणजेच बाळ रात्रीचे चांगले झोपते आणि त्याची दिवसाची झोप कमी होते. बाळाला रात्रीची मध्येच जाग आली तर त्याला पुन्हा झोपवा. काही बाळांना पुन्हा झोपी जाण्यासाठी स्तनपान किंवा बाटलीने दूध द्यावे लागू शकते.
दिवसा
वयाच्या ६ व्या महिन्यानंतर बाळाच्या झोपेच्या पॅटर्न मध्ये फारसा बदल होत नाही. ७ व्या आणि ९ व्या महिन्यांच्या दरम्यान बाळ दिवसा ३–४ वेळा झोपू शकते. बाळाच्या झोपेच्या वेळा सकाळ, दुपार आणि दुपारी उशिरा अश्या वर्गीकृत केल्या जाऊ शकतात. तुमचे बाळ जेव्हा दिवसा ३–४ वेळा झोपते तेव्हा त्याच्या दिवसाच्या झोपेचा एकूण कालावधी साधारपणे ३ ते ४ तास इतका असतो.
रात्री
७ व्या महिन्यापासून बाळे रात्रीची जास्त वेळ झोपू लागतात. ह्या वयातील बाळे रात्री सलग ११ ते १४ तासांपर्यंत झोपू शकतात. काही बाळे रात्री मध्येच जाग आली तर आनंदी असतात, तर काही बाळे रात्री दूध पिण्यासाठी उठतात.
बाळाला झोपण्याच्या चांगल्या सवयी कशा लावायच्या?
तुम्ही खालील गोष्टी करून तुमच्या बाळाला झोपण्याच्या चांगल्या सवयी लावू शकता:
- झोपेची दिनचर्या करा: ७–९ महिन्यांपर्यंत बाळ झोपेच्या दिनचर्याशी जुळवून घेण्यास तयार होते. तुम्ही रोजची दिनचर्या नीट पाळा म्हणजे बाळाला सुद्धा त्याची सवय होईल. आंघोळ, मसाज, खेळण्याची वेळ, अंगाई गीत आणि झोपण्याची वेळ हे प्रत्येक रात्री त्याच क्रमाने असावे. त्यामुळे बाळाला त्याच्या झोपेच्या वेळेची कल्पना येईल
- दिनचर्येचे पालन करा: एकदा झोपेची दिनचर्या ठरवल्यानंतर, त्याचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. ह्याचा अर्थ दिनचर्या अगदी काटेकोर पणे पाळावी असे नाही,पण साधारणपणे झोपेची वेळ एकच असावी
- बाळाला स्वतःचे स्वतः शांत होऊ द्या: एकदा तुम्ही झोपेची दिनचर्या पाळायला सुरुवात केली, आणि तरीही तुम्हाला तुमचे बाळ अधूनमधून विनाकारण जागे होत असल्याचे लक्षात आले, तर तुम्ही त्याला स्वतःहून शांत होऊ द्यावे. काही वेळाने बाळ स्वतःचे स्वतः झोपायला शिकेल
ह्या वयात बाळाच्या काही झोपेच्या समस्या असतात का?
७–९ महिन्यांच्या बाळाला खाली दिल्याप्रमाणे झोपेच्या समस्या असू शकतात:
- शारीरिक आणि विकासात्मक बदल: रांगणे, बसणे, उभे राहणे आणि पालथे पडणे हे विकासाचे काही टप्पे आहेत. तुमचे लहान मूल ह्या वयात हे टप्पे गाठते आणि ही नवीन कौशल्ये वापरून बघण्यासाठी रात्रीचे जागू शकते
- दात येणे: ह्या वयात तुमच्या बाळाला दातांच्या समस्या येऊ शकतात. त्यामुळे त्याच्या रात्रीच्या झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो
- विभक्त होण्याची चिंता: तुमच्या बाळाला तुमच्यापासून दूर राहण्याची भीती वाटू शकते आणि त्यामुळे तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी बाळ अधूनमधून जागे होऊ शकते
बाळाची झोप आणि विकास
मोठ्या माणसांच्या तुलनेत बाळाला त्यांच्यापेक्षा दुप्पट झोपेची गरज असते. बाळांसाठी, झोप हा ऊर्जा मिळवण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. बाळाची झोप चांगली झाल्यास बाळ आनंदी राहते आणि आनंदी बाळ हे निरोगी बाळ असते. बाळाच्या झोपेचे वर्गीकरण करताना ते सक्रिय झोप आणि गाढ झोप असे केले जाते. सक्रिय झोपेदरम्यान, बाळाचा विकास होत असला तरी, गाढ झोपेत, बाळाच्या मेंदूचा भाग विकसित होत असतो. अशा प्रकारे, बाळाच्या विकासासाठी अखंडित झोप आवश्यक आहे.
तुमचे बाळ झोपेच्या प्रशिक्षणासाठी तयार आहे का?
तुमचे बाळ चार ते सहा महिन्यांचे होईपर्यंत, बाळाच्या दूध पिण्याच्या आणि झोपेच्या वेळा ठरलेल्या असतात. अशाप्रकारे, एकदा बाळाच्या झोपेच्या आणि उठण्याच्या वेळा ठरल्या की तुमचे बाळ झोपेच्या प्रशिक्षणासाठी तयार होते. प्रत्येक बाळ वेगळे असते आणि बाळाच्या झोपेचे प्रशिक्षण देखील वेगळे असते. काही बाळांचे चौथ्या महिन्यात झोपेचे रुटीन तयार होते, तर काही बाळांचे खूप मोठे झाल्यानंतर सुद्धा झोपेचे रुटीन लागत नाही.
तुमच्या बाळाला झोपायला मदत करणे
आई ह्या नात्याने आपल्या बाळाला रात्रभर चांगली झोप कशी लागेल असा विचार तुम्ही करत असता. तुमच्या बाळाला चांगली झोप येण्यासाठी खाली काही टिप्स दिलेल्या आहेत:
- बाळासाठी झोपेचे वेळापत्रक बनवा आणि ते पाळण्याचा प्रयत्न करा
- झोपेच्या नित्यक्रमात बदल करू नका
- बाळाला रात्री लवकर झोपायला लावा आणि झोपेची वेळ झाल्यानंतर त्याला जागे राहू देऊ नका
- बाळाला स्वतःचे स्वतः झोपू द्या
थकलेल्या आणि झोपेला आलेल्या बाळाची लक्षणे
कधीकधी बाळांना खूप थकवा येतो आणि झोप येते. अशा परिस्थितीत, तुमचे बाळ अस्वस्थ होऊ शकते, विक्षिप्त वागू शकते, खायला त्रास देते आणि लक्ष वेधून घेते. सारखे तुम्हाला चिकटून राहते.
तुम्ही ह्या लक्षणांची नोंद घेऊन बाळाच्या झोपेसाठी विविध उपाय करून पाहावेत. झोपण्याआधी तुम्हाला तुमच्या बाळाला शांत करावे लागेल. बाळ रात्रीचे मध्येच उठले तर तुम्ही त्याच्या साठी गाणी म्हणू शकता, त्याला झुलवू शकता तसेच त्याला खायला घालण्याचा प्रयत्न करू शकता. वरीलपैकी कुठलाच उपाय लागू पडला नाही तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.
बाळाची दिनचर्या असणे हे महत्वाचे असले तरी ती तंतोतंत पाळण्यासाठी खूप ताण घेतला पाहिजे असे नाही. बाहेरच्या जगाकडे बाळाची ओढ असणे साहजिक आहे आणि योग्य वेळी बाळाला झोपण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. वर दिलेल्या तंत्रांच्या साहाय्याने तुम्हाला तुमच्या बाळाच्या झोपेची दिनचर्या व्यवस्थापित करणे सोपे जाईल.
आणखी वाचा:
बाळाला रात्री कसे झोपवावे?
तुमच्या बाळाला किती झोप आवश्यक असते?