तुमचे ४ महिन्यांचे बाळ हळूहळू एका विशिष्ट व्यक्तिमत्वात विकसित होत आहे. तुम्ही सुद्धा आता गर्भारपण आणि प्रसूती ह्यामधून पूर्ववत होत आहात. आता पर्यंत तुम्हाला बाळाच्या गरजा समजू लागल्या असतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढला असेल. तसेच बाळ कशामुळे आनंदी होते आणि सर्वसामान्यपणे बाळाला काय आवडते ह्याचा अंदाज तुम्हाला आलेला आहे. बाळाच्या झोपेच्या आणि दूध पिण्याच्या सवयी तयार होत असतात त्यामुळे बाळाच्या गरजा तुम्हाला समजू लागल्या आहेत. आणि त्याप्रमाणे तुम्ही बाळाच्या गरजा आता तुम्ही भागवू शकत आहात. काही दिवस तुम्हाला हे सगळं खूप सोपं वाटेल तर काही दिवस तुमच्यासाठी ते आव्हानात्मक असू शकते.
ह्या टप्प्यात तुमच्या बाळामध्ये लक्षणीय विकास होतो आणि बाळाचे वजन वाढू लागते. म्हणजेच बाळाला पुरेशी पोषणमूल्ये मिळत आहेत असा त्याचा अर्थ होतो. ४ महिन्यांच्या बाळाची सरासरी उंची, मुलांची ६३. ८ सेंमी आणि मुलींची ६२ सेंमी इतकी असते. मुलांचे सरासरी वजन हे ७ किलो आणि मुलींचे ६. ४ किलो इतके असते.
आणखी एक लक्षणीय विकास म्हणजे जवळची दृष्टी विकसित होते आणि डोळे व हातांचा समन्वय सुधारतो, पालथे पडण्यास सुरुवात होते, हात तोंडाजवळ नेऊन हातात खेळणी घेऊन हलवते. बाळ प्रतिक्रिया देण्यास सुरुवात करते जसे की लोकांकडे बघून हसणे आणि इतरांच्या हालचाली किंवा चेहऱ्यावरील हावभावांची नक्कल करणे इत्यादी. बाळ बोबडी बडबड करू लागते आणि आनंद, दुःख आणि चिडचिड ह्या भावना व्यक्त करू लागते.
तुमच्या ४ महिन्यांच्या बाळाची काळजी कशी घ्याल?
प्रत्येक दिवसागणिक तुमच्या ४ महिन्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्याबाबतचा तुमचा अनुभव वाढत राहतो. काही वेळा ह्या १६ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेणे म्हणजे एक जबाबदारी वाटू शकते. तुमच्या ४ महिन्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्या बाबतच्या काही टिप्स इथे देत आहोत.
१. तुमच्या बाळाला पाजणे
आपल्या बाळाला फक्त आईचे दूध दिले पाहिजे कारण आईचे दूध पूर्ण पोषण प्रदान करते. घन पदार्थांची ओळख करुन देण्याची घाई करू नका. या टप्प्यावर आपल्या बाळास बाटलीच्या दुधाची ओळख करुन देणे चांगले ठरेल. आपण बाटलीत पंप केलेले आईचे दूध किंवा फॉर्म्युला दूध भरून कधीकधी आपल्या बाळाला ते देण्याचा प्रयत्न करू शकता.
२. झोपेचा नमुना
बाळाच्या दुपारच्या आणि रात्रीच्या झोपेचे रुटीन लागण्यासाठी त्यावर सतत काम करा. बाळाला झोपण्यासाठी झुलवणे टाळा ज्यामुळे बाळ स्वतःचे स्वतः आरामदायी होईल आणि झोपी जाईल.
३. बाळ पडू नये म्हणून दक्षता घ्या
तुमचे बाळ आता पाय मारू लागेल, एका कुशीवर वळेल किंवा पालथे पडू लागेल. त्यामुळे बाळाच्या आसपास कुठल्याही वस्तू नसल्याची खात्री करा, ज्या मुळे बाळाला इजा होण्याची शक्यता असते. तसेच तुम्हाला बाळापासून थोडा वेळ दूर जायचे असल्यास बाळाच्या अवतीभोवती उशा लावून जा जेणेकरून बाळ पडणार नाही.
४. लसीकरण
बाळाच्या लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरणाची ठरवलेली वेळ पाळा. बाळाला लस देताना बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधून घ्या. नंतर, तुम्ही बाळाला थोडा वेळ झुलवून शांत करू शकता. लसीकरणानंतर बाळ चिडचिड करू लागण्याची शक्यता असते तसेच बाळाला सौम्य ताप सुद्धा येऊ शकतो. तुमच्या डॉक्टरांशी ह्याविषयी बोलून घ्या आणि योग्य ते मार्गदर्शन घ्या.
५. डायपर रॅश
डायपर ओले झाल्यावर लगेच बदलल्यास तसेच थोडा वेळ बाळाला डायपर न लावता ठेवल्यास आणि स्वच्छता राखल्यास डायपर रॅश होणार नाही. ओल्या जागेत जिवाणूंची वाढ झपाट्याने होते. डायपर स्वच्छ आणि कोरडा असल्याची खात्री करा. बाळांसाठी सुरक्षित असलेले डायपर रॅश क्रीम वापरा.
६. मसाज
बाळाला दररोज मसाज करा. मसाज केल्याने बाळाच्या पाठीच्या स्नायूंचा आणि मणक्याचा चांगला विकास होतो आणि बाळाची एकुणात वाढ चांगली होते. हलका मसाज केल्याने बाळ शांत होते आणि बाळाला झोप सुद्धा चांगली लागते. तसेच तुमचे बाळाविषयी असलेले प्रेम आणि काळजी व्यक्त करण्याचा हा चांगला मार्ग आहे त्यामुळे तुमचा तुमच्या बाळासोबतचा बंध घट्ट होईल. बाळाला भरवल्यानंतर लगेच मसाज करणे टाळा.
७. दात येताना
ह्या टप्प्यावर बाळाला दात येण्यास सुरुवात होते. त्यामुळे बाळाची खूप लाळ गळेल किंवा बाळ वस्तू वस्तू चावेल. हातात जे मावेल त्या सगळ्या वस्तू बाळ तोंडात घालू लागेल. म्हणून तुम्ही जी खेळणी बाळाला देत आहात त्याविषयी विशेष काळजी घ्या कारण त्या वस्तू बाळाने तोंडात घातल्यास बाळाचा श्वास गुदमरू शकतो. तुम्ही तुमच्या बाळासाठी दात येताना तोंडात घालण्यासाठी मऊ चकती आणू शकता.
८. कार सुरक्षितता
नेहमी तुमच्या बाळाला कार सीट मध्ये काळजीपूर्वक ठेवा आणि कार मधून प्रवास करताना कार सीट मागच्या सीट वर ठेवा. बाळाला कारमध्ये एकटे आणि मोकळे सोडू नये.
बाळाची काळजी घेताना, बाळाने दिलेले संकेत आणि तुमच्या मनाचे ऐकल्यास तुम्ही तुमच्या बाळाची चांगली काळजी घेऊ शकता. जर तुम्हाला काहीतरी गडबड आहे असे वाटल्यास वैद्यकीय सल्ला घेण्यास जराही संकोच करू नका.