Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळाला मालिश कशी करावी आणि त्याचे फायदे

बाळाला मालिश कशी करावी आणि त्याचे फायदे

बाळाला मालिश कशी करावी आणि त्याचे फायदे

बाळाला मालिश करणे हा बाळाला शांत करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. बाळाच्या आरोग्यासाठी मालिशचे खूप फायदे आहेत. मालिश केल्याने बाळाचे रक्ताभिसरण वाढते, वजन वाढण्यास मदत होते, पचनयंत्रणा सुधारते, तसेच दात येण्याची प्रक्रिया सुद्धा सुलभ होते. तुमच्या छोट्याशा बाळाला मालिश करण्याने तुमचं बाळाविषयीचे प्रेम, काळजी व्यक्त होते तसेच तुमच्या आणि बाळामध्ये एक बंध तयार होतो.

बाळाची मालिश म्हणजे काय?

बाळाची मालिश करणे म्हणजे हलक्या हाताने आणि लयबद्ध पद्धतीने बाळाच्या शरीराला चोळणे. तुम्ही तेल, क्रीम किंवा मॉइश्चरायझर वापरू शकता ज्यामुळे मालिश करणे सोपे जाईल. तुम्ही बाळाच्या छाती, पोट, पाठ, खांदे, पाय आणि डोक्याला मालिश करू शकता. बाळाला मसाज करताना गाणे गुणगुणल्याने बाळाला शांत आणि आरामदायी वाटते. बाळाला मालिश केल्याने तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या शरीरात चांगल्या संप्रेरकांची म्हणजेच ऑक्सिटोसिनची निर्मिती होते. ऑक्सिटोसिनमुळे प्रेमभावना जागृत होते.

तुमच्या बाळासाठी मालिशचे फायदे

बाळाला आपल्या आई-बाबांचा स्पर्श आवडतो आणि तुमच्या बाळाशी संवाद साधण्याचा हा एक मार्ग आहे. तुम्हाला लक्षात आलंच असेल की रडणाऱ्या किंवा त्रासलेल्या बाळाला मिठीत घेतलं, प्रेमाने गोंजारलं किंवा पाठीवर नुसता हात फिरवला तरी बाळ शांत होते. मालिश करणे म्हणजे स्पर्शाच्या पलीकडचे आहे आणि त्याचे बाळाला खूप फायदे आहेत ते खालीलप्रमाणे:

तुमच्या बाळासाठी मालिशचे फायदे

१. बाळाच्या आरोग्यासाठी बाळाला मालिश करणे चांगले आहे

मालिश केल्याने बाळाचे रक्ताभिसरण सुधारते तसेच पोटाच्या तक्रारी कमी होतात. बाळाला मालिशचे खूप फायदे आहेत आणि मालिश केल्याने बाळाचे श्वसन सुधारते.

२. मालिश केल्याने बाळ शांत होते आणि बाळाला आरामदायी वाटते

बाळाला मालिश केल्याने बाळाच्या मज्जासंस्थेला आराम पडतो. तसेच बाळाला पोटाला मुरडा पडला असेल तर बाळाला आराम मिळतो व बाळ झोपी जाते. तसेच बाळाच्या त्वचेला सुद्धा पोषण मिळते.

३. बाळ आणि तुमच्यामध्ये बंध निर्माण होतो

तुमच्या बाळाबरोबर बंध निर्माण करण्याचा मालिश हा सर्वात परिणामकारक मार्ग आहे. मालिश केल्याने आई आणि बाळाला एकमेकांसोबत एकत्र चांगला वेळ घालवता येतो आणि त्यामुळे बाळाची गरज समजून घेण्यास मदत होते.

४. बाळाला तुम्ही नीट हाताळू शकता ह्याबद्दलचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होतो

तुमच्या नवजात शिशूला जाणून घेण्यासाठी मालिश हा उत्तम मार्ग आहे आणि तुम्ही बाळाला हाताळू शकता हा आत्मविश्वास सुद्धा तुमच्यात निर्माण होतो. तुमच्या बाळाबरोबर वेळ घालवल्याने तुम्हाला तुमच्या बाळाच्या गरजांबाबत सूचना मिळतात.

५. तुमच्या बाळाला आराम मिळतो

पोटाला मालिश केल्याने, पोटाशी संबंधित सर्व प्रश्न जसे की गॅस, बद्धकोष्ठता आणि कॉलिक सुद्धा कमी होण्यास मदत होते.

मालिशसाठी योग्य वेळ

जेव्हा तुमचे बाळ भुकेलं असेल किंवा त्याला झोप आली असेल किंवा ते थकलेले असेल तर ती वेळ मालिशसाठी योग्य नाही. सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातील कुठलीही वेळ तुम्ही मालिशसाठी निवडू शकता. बाळाला मालिश करणे हे बाळाच्या अंघोळीची, जेवणाची आणि झोपण्याची वेळ ठरवण्याचा एक परिणामकारक मार्ग आहे.

मालिश एका ठराविक वेळेलाच करण्याचे सुचवले जाते. नियमितता ठेवल्यास बाळाला आपल्याला आता मालिश करणार आहेत हे समजते. आणि त्यामुळे बाळाला सुरक्षित वाटते आणि आनंद सुद्धा होतो.

बाळाला अंघोळीच्या आधी मालिश करणे हा एक चांगला पर्याय आहे. झोपेच्या वेळेच्या आधी मालिश केल्याने बाळाला रात्रभर छान झोप लागते. सुरुवातीला बाळाची दिनचर्या नियमित करणे तुम्हाला कठीण वाटू शकेल परंतु जसजसे बाळ मोठे होते तसे तुम्हाला ते करणे सोपे जाईल.

नुकत्याच आई झालेल्या स्त्रियांना बाळाला मालिश कशी करावी हा प्रश्न पडतो. परंतु तुम्ही तुमच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला बाळाला तेलाने किंवा लोशनने मालिश करण्याआधी १०-१४ दिवस वाट पहावी. अकाली जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत मालिश सुरु करण्याआधी तुमच्या डॉक्टरांची सल्ला घेणे चांगले.

बाळाला मालिश करण्याआधी काय कराल?

बाळाला मालिश करण्याआधी पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मालिशसाठी जागा निवडणे. ती जागा तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी आरामदायी पाहिजे. तुम्ही तुमच्या बाळाला टॉवेल किंवा ब्लँकेटवर ठेवा. तुमची खोली उबदार असेल ह्याची खात्री करा. (खूप जास्त गरम किंवा गार नको)

लक्ष विचलित होतील अशा गोष्टी बाळाला मालिश करताना दूर ठेवा उदा: पाळीव प्राणी आणि मोबाइल फोन वगैरे. तुम्ही मालिशच्या खोली मध्ये संगीत सुरु ठेवू शकता किंवा तुम्ही गाणे गुणगुणू शकता. तुम्ही कुठलेही चांगले बेबी ऑइल किंवा लोशन मालिश साठी निवडू शकता कारण त्यामुळे बाळाला मालिश करणे सोपे जाईल. जर तुमच्या बाळाला त्वचेचे काही प्रश्न असतील उदा: एक्झिमा तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

तथापि, काही तेलं आणि लोशन्स उदा: मोहरीचे तेल, रिफाईंड न केलेले शेंगदाणा तेल बाळाच्या मालिशसाठी वापरू नका कारण त्यामुळे बाळाच्या मऊ आणि नाजूक त्वचेला हानी पोहोचू शकते.

बाळाची मालिश – क्रमाक्रमाने

बाळाच्या मालिशची तयारी झाल्यावर तुम्ही खालील तंत्र वापरून बाळाचे डोके, चेहरा, पाठ, छाती, पोट, पाय आणि पावलाला मालिश करू शकता.

बाळाच्या मालिशला सुरुवात करूया

१. डोके

तुम्ही बाळाच्या डोक्यावर थोडे तेल लावू शकता. आणि हळू हळू ते डोक्यावर सगळीकडे पसरवा. असे करताना टाळूची (बाळाच्या डोक्यावरील मऊ भाग) काळजी घ्या आणि तिथे दाब देऊ नका.

डोके

२. चेहरा

तुमच्या बाळाच्या चेहऱ्यावर तेल लावा. आणि बोटांनी कपाळापासून हनुवटीकडे असा मसाज द्या. भुवयांवर हलकासा दाब देवून बाहेरच्या बाजूला बोटानी चोळत या. गाल, हनुवटी आणि नाकावर हलके स्ट्रोक्स द्या.

चेहरा

३. कॉलिक पासून आराम

बाळाच्या बेंबीला मालिश केल्यानंतर तुमच्या बाळाचे पाय गुडघ्यामध्ये दुमडून पोटावर हलकेच दाबा. ह्या स्थितीमध्ये ३० सेकंद राहू द्या आणि असेच पुन्हा काही वेळ करत रहा. बाळाच्या पोटाला बेंबीपासून खालच्या दिशेला मालिश करा त्यामुळे पोटातील वायू बाहेर पडण्यास मदत होते.

कॉलिक पासून आराम

४. पाठ

तुमच्या बाळाला पोटावर झोपवा. आणि पाठीवर दोन्ही हातांनी मालिश करा. बाळाच्या मानेपासून कुल्ल्यापर्यंत पुढे आणि मागे असा हाताने हलकेच मसाज द्या. बाळाच्या मणक्यावर अगदी हलक्या हाताने वर्तुळाकार मालिश करा.

पाठ

५. छाती

तुम्ही तुमचे दोन्ही हात बाळाच्या छातीवर अगदी मध्ये ठेऊन बाहेरच्या बाजूला खांद्याच्या दिशेने स्ट्रोक्स द्या. हे स्ट्रोक्स असेच काही वेळ पुन्हा करत राहा. दोन्ही हात छातीवर ठेऊन तुम्ही खालच्या दिशेने सुद्धा मालिश करू शकता.

छाती

६. पोट

बरगड्यांच्या खाली सुरुवात करून तुम्ही तुमच्या बाळाच्या पोटाला वर्तुळाकार मालिश करू शकता. बेंबीच्या जवळ तुम्ही तुमची बोटे ठेऊन वर्तुळाकार दिशेने तुम्ही मसाज करू शकता. बाळाची नाळ संपूर्णतः कोरडी झाली नसेल किंवा तो भाग नीट भरून आलेला नसेल तर बाळाच्या पोटावर मालिश करणे टाळावे.

पोट

७. पाय आणि पावलं

बाळाचा पाय हातात घेऊन मांडीपासून घोट्यापर्यंत खालच्या दिशेने स्ट्रोक्स द्या. बाळाची मांडी हातात घेऊन तुमच्या दोन्ही हातांनी विरुद्ध दिशेला हळूहळू मालिश करत या. (आपण धुतलेले कपडे पिळतो तसे )

पाय आणि पावलं

तुमच्या बाळाचं पाऊल हातात घ्या आणि तुमच्या अंगठ्याच्या साहाय्याने हळूहळू वरच्या दिशने म्हणजेच टाचेपासून ते बोटापर्यंत दाब द्या. हाताच्या साह्याने संपूर्ण पावलाला स्ट्रोक्स द्या. तुम्ही खूप हलकेच एक एक बोट ओढू शकता आणि घोट्याला वर्तुळाकार मालिश करू शकता.

तुम्ही बाळाला वरीलप्रमाणे मालिश करू शकता परंतु बाळाच्या शरीराच्या कुठल्याही भागावर खूप जास्त दाब होत नाही ना ह्याची खात्री करा.

काही टिप्स

इथे काही टिप्स आहेत जे तुम्ही बाळाच्या मालिश करताना वापरू शकता.

397522018

१. हलकेच दाब द्या

तुमचे बाळ खूप नाजूक आणि मऊ आहे म्हणून मालिश करताना खूप दाब देणे किंवा जोरात स्ट्रोक्स देणे टाळा. तसेच बाळाची शू ची जागा आणि आजुबाजूच्या भागाला मालिश करू नका.

२. बाळाचा मूड चांगला आहे ह्याची खात्री करा

जर बाळ चिडचिड करत असेल किंवा त्रस्त असेल तर कधीही बाळाला मालिश करू नका. जर तुम्हाला असे वाटत असेल की शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागाला मालिश करत असताना बाळाला त्रास होत असेल तर तो भाग सोडून इतर ठिकाणी मालिश करावी. तथापि बाळ आनंदी नसेल तर मालिश करणे ताबडतोब थांबवा.

३. तुमच्या बाळासोबत बोला

मालिश करताना तुम्ही तुमच्या बाळाशी हसा आणि बोलत राहा. तुम्ही बाळासाठी एखादं गाणं सुद्धा म्हणू शकता किंवा नुसता गुणगुणू शकता. त्यामुळे बाळाला मजा येईल आणि बाळ आनंदी होईल.

४. मालिशची वेळ एकच ठेवा

मालिशची वेळ शक्यतो चुकवू नका. वेळेला धरून राहिल्यास बाळाला त्याची सवय होईल आणि बाळ मालिशसाठी तयार राहील आणि बाळाला मालिश वेळेवर मसाज मिळाल्याने आराम पडेल.

५. जास्त झालेलं तेल पुसून टाका

तुमची बाळाला मालिश करून झाल्यावर तुम्ही बाळाचे हात आणि बोटं नीट पुसून घेतली पाहिजेत. ह्याचे कारण म्हणजे बाळे तोंडात बोटे घालतात. तसेच बाळासाठी सुरक्षित असलेले तेल वापरा.

बाळाला मालिश करणे हा बाळाशी बंध जुळवण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. तुम्ही तुम्हाला जितका वेळ हवा तितका वेळ मालिश करू शकता. तथापि तुम्हाला मालिश संदर्भात काही शंका असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article