In this Article
गरोदरपणातील तुमचे आरोग्य जाणून घेण्यासाठी अनेक चाचण्या केल्या जातात. तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून तुमच्यासाठी कोणत्या चाचण्या योग्य आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
जन्मपूर्व चाचण्या काय आहेत आणि त्या का महत्त्वाच्या आहेत?
प्रसवपूर्व चाचण्या ह्या वैद्यकीय चाचण्या आहेत. तुमची गरोदरपणातील प्रगती आणि बाळाच्या आरोग्याची कल्पना येण्यासाठी डॉक्टर तुमच्या ह्या चाचण्या करून घेतील. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या प्रसूतीपूर्व तपासणीसाठी जाल तेव्हा तुमचे डॉक्टर तुमच्या काही चाचण्या करतील. यामध्ये तुमचे आरोग्य जाणून घेण्यासाठी लघवी आणि रक्ताच्या चाचण्या केल्या जाऊ शकतात. तुमच्या बाळामध्ये कोणतेही जन्म दोष किंवा समस्या असल्यास त्याची तपासणी करण्यासाठी इतर काही प्रसवपूर्व स्क्रीनिंग चाचण्या केल्या जातात.
जन्मपूर्व चाचण्यांची आवश्यकता कोणाला आहे?
गरोदर असलेल्या स्त्रीने नियमित जन्मपूर्व चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. परंतु, जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही आनुवंशिक समस्येबद्दल माहिती असेल, तर तुम्हाला कोणत्या स्क्रीनिंग किंवा अनुवांशिक चाचण्या कराव्या लागतील याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करावी लागेल. उच्च–जोखीम गर्भधारणा असलेल्या स्त्रियांसाठी नेहमीपेक्षा इतर काही चाचण्या करून घेण्याची शिफारस केली जाते: –
- ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया
- किशोरवयीन असल्यास
- आधी अकाली प्रसूती झालेली असल्यास
- अनुवांशिक परिस्थिती किंवा जन्म दोष असलेले बाळ झाल्यास
- जुळी किंवा एकाधिक गर्भधारणा
- उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, ल्युपस, दमा, एसटीडी, फेफरे इ. समस्या असल्यास
- अनुवांशिक विकारांचा उच्च धोका असलेल्या वांशिक गटातील असल्यास
स्क्रीनिंग चाचण्या आणि निदान चाचण्या म्हणजे काय?
स्क्रिनिंग चाचण्या करून घेतल्यावर तुमच्या बाळाला कुठल्या आरोग्यविषयक समस्यांचा धोका आहे हे समजू शकते. परंतु तुमच्या बाळाला नक्की ही समस्या आहे किंवा नाही हे समजत नाही. तुमच्या बाळाला एखाद्या विशिष्ट स्थितीसाठी उच्च धोका असल्यास निदान चाचण्या केल्या जातात. तुमच्या बाळाला आरोग्य विषयक किंवा अनुवांशिक समस्य आहेत कि नाही हे तपासण्यासाठी ह्या चाचण्या केल्या जातात.
पहिल्या तिमाहीत जन्मपूर्व चाचण्या केल्या जातात
तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत केल्या जाणाऱ्या काही चाचण्या येथे दिलेल्या आहेत.
१. नुचल ट्रान्सलुसेंसी (एनटी) स्कॅन
नुकल ट्रान्सलुसेन्सी स्कॅन ही एक अल्ट्रासाऊंड चाचणी आहे. तुमच्या बाळामध्ये डाउन सिंड्रोम, हृदयाच्या समस्या आणि क्रोमोसोमल विकृतींसह अनुवांशिक परिस्थितीचा कोणताही धोका तपासण्यासाठी हा स्कॅन केला जातो. तुमच्या बाळाला खरंच या स्थितीचा त्रास आहे की नाही हे ह्या चाचणीद्वारे समजत नाही, परंतु जोखीम कमी असल्यास पालक निर्धास्त राहू शकतात. धोका जास्त असल्यास, तुमच्या बाळाला समस्या आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी तुम्हाला सीव्हीएस चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
तुमच्या गरोदरपणाच्या ११ व्या आणि १६ व्या आठवड्यांच्या दरम्यान एनटी स्क्रीनिंग केले जाते. एनटी चाचण्यांची किंमत रु. ६०० ते रु. ४००० रुपये इतकी असते.
२. रक्त चाचणी
सिफिलीस, हिपॅटायटीस बी आणि एचआयव्ही सारखे कोणतेही संक्रमण शोधण्यासाठी रक्त तपासणी केली जाते. रक्तचाचणीदरम्यान तुमच्या रक्तातील आरएच फॅक्टर नावाच्या प्रोटीनची पातळी देखील मोजली जाते. जर तुमच्यामध्ये आरएच फॅक्टरची कमतरता असेल आणि तुमच्या बाळामध्ये तो असेल, तर बाळामध्ये आरएच डिसीज नावाची स्थिती निर्माण होऊ शकते. रक्ताच्या चाचण्या देखील ऍनिमियाची स्थिती आहे का हे देखील तपासतात.
तुमच्या गरोदरपणात नियमितपणे रक्ततपासणी अनेक वेळा केली जाते. ह्या चाचणीची किंमत रु. ४०० ते २००० च्या दरम्यान असते.
३. सीव्हीएस
कोरिओनिक व्हिलस सॅम्पलिंग (सीव्हीएस) ही एक निदान चाचणी आहे. ह्या चाचणीदरम्यान कोणतीही अनुवांशिक आणि गुणसूत्र विषयक समस्या तपासण्यासाठी नाळेतील ऊतकांचा नमुना घेतला जातो. ही चाचणी केल्यावर डाउन सिंड्रोम, सिस्टिक फायब्रोसिस आणि इतर अनुवांशिक विकार शोधले जाऊ शकतात.
तुमच्या गरोदरपणाच्या १० व्या आणि १३ व्या आठवड्यादरम्यान सीव्हीएस चाचणी केली जाते. चाचणीची सरासरी किंमत रु. १०,००० रुपये इतकी आहे.
४. अनुवांशिक समस्यांसाठी वाहक स्क्रीनिंग
तुम्ही तुमच्या बाळाला प्रभावित करू शकणार्या कोणत्याही अनुवांशिक परिस्थितीचे वाहक आहात की नाही हे तपासण्यासाठी ह्या चाचणी दरम्यान रक्त किंवा लाळेचा नमुना वापरला जातो. तुम्हाला ह्या आनुवंशिक समस्या असतीलच असे नाही, परंतु जनुकीय बदल तुमच्या बाळापर्यंत पोहोचू शकतो. जर तुम्ही आणि तुमचे पती दोघेही समान अनुवांशिक स्थितीचे वाहक असाल तर तुमच्या बाळामध्ये ही स्थिती असण्याचा धोका वाढतो. सिस्टिक फायब्रोसिस, थॅलेसेमिया, स्पाइनल मस्क्यूलर ऍट्रोफी हिमोग्लोबिनोपॅथी यासारख्या परिस्थितींचा धोका मोजण्यासाठी वाहक तपासणी केली जाऊ शकते. फ्रजाईल एक्स सिंड्रोम, तसेच टे सॅक्स डिसीज यांसारख्या समस्यांसाठी देखील वाहक चाचण्या केल्या जाऊ शकतात.
जर तुम्हीगरोदरपणाची योजना आखत असाल किंवा गरोदरपणाच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये ही प्रसूतीपूर्व अनुवांशिक चाचणी केली जाऊ शकते. स्क्रिनींगच्या प्रकारानुसार ह्या चाचणीसाठी ७००० रु.पेक्षा जास्त खर्च येऊ शकतो.
५. नॉन–इन्वासिव्ह प्रीनेट्ल स्क्रीनिंग
नाळेतील डीएनए पाहण्यासाठी आणि तुमच्या बाळाला कोणत्याही अनुवांशिक परिस्थितीचा धोका आहे की नाही हे ओळखण्यासाठी तुमच्या रक्ताचा नमुना वापरून नॉन–इनवेसिव्ह प्रसवपूर्व तपासणी केली जाते. एनआयपीटी सारख्या जन्मपूर्व तपासणी चाचण्या केवळ तुमच्या बाळाला ही स्थिती असण्याची शक्यता आहे की नाही हे ठरवू शकतात. बाळाला निश्चितपणे ह्या समस्या आहेतच हे मात्र ह्या चाचण्यांद्वारे समजणार नाही.
एनआयपीटी चाचणी तुमच्या गरोदरपणाच्या ९ व्या महिन्यानंतर केली जाते. चाचणीची किंमत रु.१८,००० पासून सुरू होते.
६. अल्ट्रासाऊंड
अल्ट्रासाऊंड स्कॅन तुम्हाला तुमच्या बाळाची प्रतिमा देते आणि तुमच्या गरोदरपणात किती प्रगती झाली आहे हे देखील सांगते.
सामान्य गर्भारपणात दोनदा अल्ट्रासाऊंड केले जाईल – एकदा तुमच्या गरोदरपणाच्या सुरुवातीला आणि दुसऱ्यांदा १८ व्या आणि २० व्या आठवड्यादरम्यान अल्ट्रासाऊंड केले जात. तुमचे बाळ योग्यरित्या वाढत आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी ही चाचणी केली जाते. अल्ट्रासाऊंडची किंमत रु. ४५० पासून सुरू होते. आणि प्रयोगशाळेनुसार बदलते.
७. ट्रान्सव्हॅजिनल स्कॅन (टीव्हीएस)
ट्रान्सव्हॅजिनल स्कॅन गर्भाशय, फेलोपियन ट्यूब, योनी, गर्भाशय आणि अंडाशय तपासते. ही चाचणी नाळेमधील कोणतीही विकृती आणि गर्भाच्या हृदयाचे ठोके तपासू शकते. तसेच असामान्य रक्तस्त्राव आणि गर्भाशय ग्रीवामधील कोणतीही समस्या असल्यास ह्या चाचणीद्वारे तपासल्या जाऊ शकतात.
हे स्कॅन गरोदरपणाच्या ६ व्या आणि १० व्या आठवड्यादरम्यान केले जाते आणि त्याची किंमत रु. ५०० इतकी आहे.
८. ओटीपोटाचा स्कॅन
यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड, मूत्रपिंड, अपेंडिक्स, आतडे आणि प्लीहा यांसह ओटीपोटातील अवयवांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी ओटीपोटाच्या स्कॅनचा वापर केला जातो. बाळाची वाढ आणि विकास कसा होतो आहे हे पाहण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.
हे स्कॅन गरोदरपणाच्या ६ व्या आणि ७ व्या आठवड्यादरम्यान केले जाते आणि स्कॅनची किंमत रु. ५०० पासून सुरू होते आणि ठिकाणानुसार बदलते.
९. लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी) चाचण्या
एसटीडी चाचण्यांमध्ये एचआयव्ही विषाणू शोधण्यासाठी रक्त तपासणी केली जाते. ह्या विषाणूंमुळे एड्स होतो. हे विषाणू प्रसूतीदरम्यान किंवा त्यापूर्वी नाळेमध्ये प्रवेश करू शकतात आणि त्यामुळे गर्भाला संसर्ग होऊ शकतो. सिफिलीस तपासण्यासाठी रक्त चाचणी देखील वापरली जाते. गोनोरिया आणि क्लॅमिडीया गर्भाशयाच्या मुखातून स्वॅब केलेल्या नमुन्याद्वारे शोधले जातात.
ही चाचणी तुमच्या डॉक्टरांच्या पहिल्या जन्मपूर्व भेटीमध्ये केली जाते आणि त्याची किंमत रु. ३००० पासून सुरू होऊ शकते.
१०. पॅप स्मीअर
पॅप स्मीअर चाचणी गर्भाशयाच्या मुखातून काढलेल्या पेशींचा वापर करून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची चिन्हे शोधते.
ही चाचणी तुमच्या डॉक्टरांच्या पहिल्या जन्मपूर्व भेटीमध्ये केली जाते आणि त्याची किंमत रु.२०० ते १,५०० च्या दरम्यान असू शकते.
११. रक्तदाब
गरोदरपणात तुम्हाला प्रीक्लॅम्पसिया किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होतो का हे पाहण्यासाठी ह्या चाचणीचा वापर केला जातो. प्रीक्लॅम्पसियामुळे तुमचे मूत्रपिंड, यकृत आणि इतर अवयव कार्यक्षमतेने कार्य करत नाहीत आणि गरोदरपणात इतर समस्या निर्माण होऊ शकतात.
तुमच्या डॉक्टरांच्या भेटीदरम्यान रक्तदाब तपासला जाऊ शकतो.
१२. मूत्र चाचण्या
गर्भावस्थेतील मधुमेह (मूत्रात जास्त साखर), प्रीक्लेम्पसिया (लघवीतील प्रथिने), संसर्ग (लघवीतील रक्त आणि बॅक्टेरिया) इत्यादींसह विविध कारणांसाठी लघवीच्या चाचण्या केल्या जातात.
प्रत्येक जन्मपूर्व भेटीदरम्यान लघवीची चाचणी केली जाते आणि चाचणीची सरासरी किंमत रु. १०० इतकी असते.
१३. सिस्टिक फायब्रोसिस (सीएफ)
सिस्टिक फायब्रोसिसमुळे पचन आणि श्वास घेण्यात समस्या निर्माण होते. या स्थितीचा वाहक कोण आहे हे जाणून घेण्यासाठी लाळ किंवा लघवीच्या नमुन्याची सीएफ चाचणी केली जाऊ शकते. दोघेही पालक ह्या स्थितीचे वाहक असल्यास, बाळाला हा आजार होण्याची शक्यता चारपैकी एक असू शकते.
ही चाचणी तुमच्या गरोदरपणाच्या २० व्या आठवड्यापूर्वी केली जाते आणि त्यासाठी सुमारे रु. ६००० इतका खर्च येऊ शकतो.
दुसरी तिमाही स्क्रीनिंग चाचणी
दुसऱ्या तिमाहीत केल्या जाणाऱ्या काही चाचण्या येथे आहेत.
१. मल्टिपल मार्कर/क्वॉड्रपल स्क्रीन
गरोदरपणात जन्मजात दोषांसाठी ही चाचणी बाळाला डाऊन सिंड्रोम आणि एनेन्सफॅली (कवटीतील असामान्यता) आणि स्पायना बिफिडासह काही न्यूरल ट्यूब दोष आहेत का हे तपासते.
गरोदरपणाच्या १६ व्या आणि १८ व्या आठवड्यादरम्यान ही चाचणी केली जाते. ह्या चाचणीची किंमत रु.१७०० पासून सुरू होऊ शकते.
२. इंटिग्रेटेड किंवा सिक्वेन्शिअल स्क्रीनिंग
डाऊन सिंड्रोम, स्पायना बिफिडा, मेंदूचा विकार आणि पाठीच्या काण्याची समस्या असल्यास ती निर्धारित करण्यासाठी हे स्क्रीनिंग केले जाते. बाळाच्या मानेची अल्ट्रासाऊंड प्रतिमा आणि रक्ताच्या चाचण्या केल्या जातात. चाचणीमध्ये कोणताही धोका नसला तरीही, फॉलो–अप चाचणी केली जाईल.
पहिली चाचणी गरोदरपणाच्या ११व्या आणि १४ व्या आठवड्यात आणि दुसरी चाचणी १६ व्या आणि १८ व्या आठवड्याच्या दरम्यान घेतली जाते.
३. ऍम्नीओसेन्टेसिस
डाउन सिंड्रोम, न्यूरल ट्यूब दोष इत्यादींसह अनुवांशिक परिस्थितीची चाचणी करण्यासाठी अम्नीओसेन्टेसिस ह्या प्रक्रियेदरम्यान गर्भजल काढले जाते.
गरोदरपणाच्या १५ व्या ते २९ व्या आठवड्यादरम्यान ही चाचणी केली जाते. चाचणीची किंमत रु.८००० पासून सुरू होते.
४. अल्ट्रासाऊंड
अल्ट्रासाऊंड इमेजिंगचा वापर तुमच्या बाळाची वाढ तपासण्यासाठी आणि बाळामधील जन्मजात दोष शोधण्यासाठी केला जातो.
हा स्कॅन गरोदरपणाच्या १६ व्या ते २० व्या आठवड्यात केला जातो आणि त्याची किंमत रु. ४५० पासून सुरू होऊ शकते.
५. ग्लुकोज स्क्रीनिंग
तुमच्या रक्ताचा नमुना वापरून तुम्हाला गर्भावस्थेतील मधुमेह असण्याचा धोका मोजण्यासाठी ग्लुकोज तपासणी केली जाते. रक्त काढण्याच्या एक तास आधी तुम्हाला साखरयुक्त पेय प्यायला सांगितले जाईल.
ही स्क्रीनिंग चाचणी गरोदरपणाच्या २४ व्या आणि २८ व्या आठवड्यादरम्यान केली जाते. ह्या चाचणीची किंमत ५०० रु आहे.
६. गर्भाचे डॉपलर अल्ट्रासाऊंड
गर्भाच्या डॉपलर अल्ट्रासाऊंडचा वापर बाळाच्या नसांमधील रक्त प्रवाह आणि गर्भाचे एकूण आरोग्य तपासण्यासाठी केला जातो. बाळाच्या नसांमधील रक्ताच्या दृश्याचा ऑडिओ किंवा ऑडिओ ह्या चाचणीदरम्यान दिला जाऊ शकतो.
गरोदरपणाच्या २२ व्या आणि २४ व्या आठवड्यात तसेच ३० व्या आणि ३४ व्या आठवड्यादरम्यान ही चाचणी दोनदा केली जाऊ शकते. अल्ट्रासाऊंडसाठी सुमारे रु. ३५०० किंवा अधिक खर्च येऊ शकतो.
७. फुटोस्कोपी
फुटोस्कोपी मध्ये फुटोस्कोप नावाचे एक साधन वापरले जाते. बाळामधील कोणत्याही जन्मजात दोषांची तपासणी करण्यासाठी हे साधन पोटावरील लहान चीरेद्वारे गर्भाशयात घातले जाते, कोणत्याही जन्मजात दोषांची तपासणी करण्यासाठी तसेच नाळेतून नमुना गोळा करण्यासाठी फुटोस्कोपी केली जाते. गोळा केलेला नमुना इतर अनुवांशिक परिस्थितींसाठी तपासला जाऊ शकतो.
ही प्रक्रिया गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यात केली जाते आणि ह्या चाचणीची किंमत ८०,००० इतकी आहे.
गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील चाचण्या
गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत काही चाचण्या केल्या जातात
१. जीबीएस
ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस चाचणी ही योनी आणि गुदाशयातील जिवाणूंचे संवर्धन करून केली जाते. हे जीवाणू प्रसूतीदरम्यान तुमच्या बाळाच्या शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे फुफ्फुस, पाठीचा कणा आणि मेंदूला सूज येऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये ते प्राणघातक देखील असू शकते. तुमची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास बाळाला होणारा जिवाणूंचा संसर्ग प्रतिजैविके रोखू शकतात.
जीबीएस चाचणी गरोदरपणाच्या ३५ व्या आणि ३७ व्या आठवड्यादरम्यान केली जाते.
२. गर्भाच्या हृदयाचे इलेक्ट्रॉनिक निरीक्षण
गरोदरपणात, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूती नंतर तुमच्या बाळाच्या हृदयाच्या गतीचा मागोवा ह्या चाचणीद्वारे केला जातो.
प्रसूतीदरम्यान ही चाचणी अनेक वेळा केली जाते.
३. कॉन्ट्रक्शन स्ट्रेस टेस्ट
गरोदरपणात ही प्रसूतीपूर्व चाचणी बाळाच्या हृदयाचे ठोके मोजते तेव्हा तुम्हाला गर्भाशयाचे आकुंचन अनुभवता येते आणि बाळाला प्रसूतीदरम्यान प्लेसेंटाकडून पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत आहे ह्याची खात्री होते.
तुम्ही तुमच्या बाळाची प्रसूती करता तेव्हा प्रसूतीदरम्यान ही चाचणी केली जाते.
४. नॉन स्ट्रेस टेस्ट
जेव्हा एखाद्या स्त्रीला गरोदरपणात प्रीक्लेम्पसिया आणि गरोदरपणातील मधुमेह यासारख्या समस्या असतात तेव्हा गर्भाच्या हृदयाची गती मोजण्यासाठी नॉन–स्ट्रेस चाचणी केली जाते.
ही चाचणी तिसऱ्या तिमाहीत केले जाऊ शकते. ह्या चाचणीची किंमत रु ३०० ते ६०० च्या दरम्यान असू शकते.
५. बायोफिजिकल प्रोफाइल
बायोफिजिकल प्रोफाइल हे अल्ट्रासाऊंड आणि नॉन–स्ट्रेस चाचणीचे कॉम्बिनेशन आहे. गर्भाच्या हृदयाचे ठोके आणि शरीराच्या हालचाली तसेच गर्भजल पिशवीमधील गर्भजलाचे प्रमाण ह्या चाचणीद्वारे निर्धारित केले जाते.
जन्मपूर्व चाचण्या केल्याने तुमची गरोदरपणात कशी प्रगती होते आहे ह्याची तुम्हाला पूर्ण कल्पना येते. बाळाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कुठल्या अतिरिक्त उपाययोजनांची गरज आहे हे लक्षात येते. तुमच्या तब्येतीनुसार तुम्हाला कोणत्या चाचण्या कराव्या लागतील याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा.
आणखी वाचा:
गरोदरपणातील नॉन स्ट्रेस चाचणी
गरोदरपणातील जनुकीय चाचण्या: उद्धेश, प्रकार आणि अचूकता