गर्भारपण

गरोदरपणात लघवीला वास येणे: कारणे आणि उपचार

आपल्या शरीरात गरोदरपणात अनेक बदल होतात. त्यापैकी काही बदल हे गर्भावस्थेचा नियमित भाग म्हणून अपेक्षित आहेत तर काही बदलांकडे वैद्यकीय लक्ष देण्याची गरज भासू शकते. लघवीला वास येणे ही गरोदरपणाशी संबंधित एक सामान्य समस्या आहे. गरोदरपणात लघवीला वास येणे ही बहुतेक स्त्रियांसाठी अस्वस्थ करणारी आणि लाजीरवाणी गोष्ट असू शकते . गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत किंवा नंतरच्या टप्प्यांमध्ये सुद्धा लघवीला वास येत असल्याचे लक्षात येऊ शकते.

गरोदरपणात लघवीला वास येण्याचे कारण काय आहे?

गरोदरपणात लघवीला वास येण्याची अनेक कारणे असू शकतात. काही कारणे ही गरोदरपणाशी संबंधित असू शकतात. आणि ह्या कारणांकडे डॉक्टरांचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. गरोदरपणात लघवीला वास येण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.

. वासाची संवेदना वाढणे

गरोदरपणात, तुमची संप्रेरकांची पातळी वाढत असते. लघवीच्या वासातील अगदी सूक्ष्म बदल सुद्धा तुमच्या लक्षात येतील. वासाबद्दलच्या ह्या वाढलेल्या संवेदनेमुळे तुम्हाला लघवीला वास येत आहे असे जाणवेल.

. निर्जलीकरण

सामान्यतः लघवीला वास नसतो, परंतु त्यात अमोनिया असतो जो तुम्ही पाणी प्यायल्यामुळे सौम्य होतो. पुरेसे पाणी न प्यायल्यामुळे लघवीला वास येतो. कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकते आणि ते तुमच्या बाळासाठी चांगले नाही.

. मूत्रमार्गात संसर्ग

मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग हे एक सामान्य संक्रमण आहे आणि ते गरोदरपणात होते आणि बहुतेक वेळा गंधयुक्त लघवी होण्याचे ते कारण असते. मूत्रमार्गाचा संसर्ग झाल्यास ताप, पाठदुखी आणि लघवीदरम्यान वेदना सुद्धा होऊ शकतात.

. योनीतून संक्रमण

बॅक्टेरियल व्हजायनोसिस (बीव्ही) नावाच्या योनिमार्गाच्या संसर्गामुळे लघवीला वास येऊ शकतो आणि जेव्हा मूत्र योनीच्या स्रावांमध्ये मिसळते तेव्हा बहुतेकदा ते लक्षात येते. ही लघवीला वास येण्याची बाब लाजिरवाणी ठरू शकते. बॅक्टेरियल व्हजायनोसिस मुळे प्रसूती लवकर होण्याची शक्यता वाढते.

. मूत्र गळती

गरोदरपणात मूत्रमार्गाचे टिश्यू आणि मूत्रमार्ग थोडा सैल होतो, त्यामुळे काही प्रमाणात अनैच्छिक मूत्र गळती होते. ही बाब मूत्रमार्गातील असंयम म्हणून देखील ओळखली जाते. जेव्हा तुम्ही हसता किंवा शिंकता तेव्हा ही स्थिती अधिक तीव्र होते. लघवीला तीव्र वास येणे हे गरोदरपणाचे लक्षण आहे आणि ह्याची सुरुवात गरोदरपणाच्या पहिल्या तिमाही मध्ये होते.

. आहार

आपल्या दैनंदिन आहारामध्ये ब्रोकोली आणि शतावरीसारख्या पदार्थांचा समावेश होणे हे देखील लघवीला वास येण्याचे कारण असू शकते. जर तुमच्या लघवीला वास येत असेल तर असे पदार्थ कमी प्रमाणात खाण्याचा विचार करा.

. पूरक आहार घेणे

तुम्ही गर्भवती असल्याने तुम्हाला पोषक आहारासोबत पूरक औषधे घेण्याचा सल्ला दिला जाईल. परंतु, ह्या पूरक औषधांमुळे तुमच्या लघवीला त्रास होऊ शकतो. कुठलीही पूरक औषधे घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला गरज नसतील अशी पूरक औषधे घेणे टाळा. कॅल्शिअम, लोह आणि फॉलिक ऍसिड युक्त आहार घ्या.

गरोदरपणात लघवीला येणाऱ्या वासावर उपचार कसा करावा?

गरोदरपणात लघवीच्या वासावर काही सोपे आणि सुलभ उपचार आहेत:

. सजलीत रहा

गरोदरपणात, आपल्या शरीराची पाण्याची मागणी वाढते. म्हणून, दिवसभर सजलीत राहणे फार महत्वाचे आहे. यामुळे लघवीची वारंवारता नक्कीच वाढेल, आणि त्यामुळे तुमच्या शरीराकडून पाण्याची मागणी वाढेल. पाणी प्यायल्यामुळे मूत्र सौम्य होईल आणि शरीरातील जीवाणू काढून टाकले जातील. त्यामुळे वास येण्याची शक्यता कमी होईल.

. स्वतःला स्वच्छ ठेवा

मूत्रचा अप्रिय वास कमी करण्यासाठी जननेंद्रियाच्या भागात वैयक्तिक स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. लघवीचे अवशेष आपल्या कपड्यांवर आणि अंडरगारमेंट्सवर राहतात आणि त्यामुळे जिवाणूंची वाढ होऊन अप्रिय वास येऊ शकतो. आंघोळ करताना आणि वॉशरूमला जाऊन आल्यावर प्रत्येक वेळी स्वत: ला चांगले स्वच्छ करा. अशा परिस्थितीत पीएच-बॅलेन्स वॉश वापरण्याची शिफारस केली जाते.

. वैद्यकीय उपचार

या स्थितीबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला. वासाच्या तीव्रतेनुसार डॉक्टर तुम्हाला अँटीबॅक्टेरिअल उपचार किंवा नॉन - टेराटोजेनीक औषधे लिहून देऊ शकतात. लघवीच्या संसर्गासाठी अनेकदा प्रतिजैविक औषधे लिहून दिली जातात.

. अनेकदा लघवी करणे

गरोदरपणात किंवा अगदी इतर वेळी सुद्धा,लघवी जास्त वेळ धरून ठेवू नका. मूत्राशय पूर्ण भरण्याची वाट न पाहता जेव्हा तुम्हाला लघवीला जावेसे वाटेल तेव्हा जा. त्यामुळे लघवी साठून राहत नाही आणि दुर्गंधी येण्याची शक्यता कमी होते.

. नियमित तपासणी करा

लघवीला वास येण्यासॊबत इतर काही लक्षणे आहेत की नाहीत हे तपासणे महत्वाचे आहे. जर ह्याचे उत्तर होय असेल तर त्याचे कारण मूत्रपिंड किंवा मुत्राशयाशी संबंधित असू शकते किंवा लैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा संक्रमण यासंबंधी समस्या असू शकतात.

. व्हिटॅमिन सी चे सेवन वाढवा

आपल्या आहारात व्हिटॅमिन सी समृध्द फळे आणि भाज्या जोडल्यामुळे मूत्रमार्गाचे संक्रमण (यूटीआय) टाळणे शक्य आहे. संत्री, किवीज आणि द्राक्षे ह्यासारखी फळे व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात आणि ती तीव्र गंध दूर ठेवण्यास मदत करू शकतात. दुर्गंधीयुक्त लघवीची समस्या जीवघेणी नसली तरी, समस्या लक्षात येताच आपण त्या समस्येचे निराकरण केले पाहिजे. तसेच, त्या सोबत इतर काही लक्षणे आहेत की नाहीत हे देखील तपासणे महत्वाचे आहे कारण ते इतर गंभीर समस्यांचे लक्षण असू शकते. आणखी वाचा: गरोदरपणात शरीराला येणारा दर्प: कारणे आणि उपाय गरोदरपणात योनीला येणारा दुर्गंध: कारणे आणि उपचार
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved