In this Article
- प्रसूतीदरम्यान कळा केव्हा द्याव्यात हे कसे माहिती करून घ्यावे?
- कळा आल्यावर जोर देणे
- जेव्हा तुमचे शरीर तुम्हाला कळा देण्यास उद्युक्त करते तेव्हा तुम्हाला कसे वाटते?
- प्रसूती दरम्यान किती वेळ कळा द्याव्या लागतात?
- प्रसूती दरम्यान कळा कशा द्याव्यात?
- प्रशिक्षित पद्धतीने कळा कशा दिल्या जातात?
- कळा देताना प्रशिक्षण का दिले जाते?
- कळा देण्याबाबतचे मार्गदर्शनाचे फायदे आणि तोटे
- उत्स्फूर्तपणे कळा कशा दिल्या जातात?
- एपिड्यूरल घेतलेले असताना बाळाला प्रसूतीच्या वेळी बाहेर ढकलणे
- प्रसूती दरम्यान कळा देण्यासाठी योग्य स्थिती
- कळा देताना श्वास घेण्याचे तंत्र
- तुमच्या बाळाला बाहेर ढकलण्यात मदत करण्यासाठी टिप्स
- कळा देऊन सुद्धा तुमचे बाळ बाहेर येत नसेल तर?
- तुम्हाला कळ देण्याची इच्छा वाटत नसेल तर काय?
- ऊती फाटण्याची जोखीम कशी कमी करावी?
- एपिसिओटॉमी कधी आवश्यक आहे?
प्रसूती दरम्यान कळा देणे हा प्रसूतीचा दुसरा टप्पा असतो. गर्भाशयाचे मुख उघडल्यानंतर, बाळाचे डोके जन्मकालव्यातून बाहेर येण्यास तयार असताना हा टप्पा सुरु होतो. आईने कळा देण्याचा चांगला प्रयत्न केल्यास, बाळासाठी ती प्रक्रिया सोपी जाते. आईने योग्य पद्धतीने कळा दिल्यास बाळ पुढे सरकण्यास मदत होते. प्रसूतीदरम्यान जोर लावताना त्यामागील विज्ञान ह्या लेखामध्ये दिलेले आहे तसेच त्यादरम्यान कुठली काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा सांगितलेले आहे.
प्रसूतीदरम्यान कळा केव्हा द्याव्यात हे कसे माहिती करून घ्यावे?
गर्भाशयाचे मुख पूर्णपणे उघडणे, हे प्रसूतीचा पहिला टप्पा संपल्याचे लक्षण आहे. यानंतर प्रसूतीचा दुसरा टप्पा सुरु होतो. प्रसूतीच्या ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही तुमच्या बाळाला बाहेर ढकलण्यासाठी तयार असता. योनिमार्गाच्या मुखाशी बाळाचे डोके आल्यावर स्त्रीने कळा दिल्या पाहिजेत. वेदनांपासून आराम मिळण्यासाठी कळा देणे हा एक नैसर्गिक आणि आवश्यक प्रतिसाद असतो . ओटीपोटाजवळील भागात वाढलेला दाब, जननेंद्रियातील जडपणा, वाढलेले रक्ताभिसरण हे एकत्रितपणे प्रसूतीच्या सक्रिय टप्प्याला चालना देणारे घटक असतात.
कळा आल्यावर जोर देणे
कळा देत असताना, पूर्ण दिवस भरलेल्या गर्भवतीचे गर्भाशय दर पाच मिनिटांनी सुमारे ४५ ते ९० सेकंद आकुंचन पावत असते. कळा खूप झपाझप येत असतात तेव्हा जोर देण्याची नैसर्गिक इच्छा काही वेळेला होते किंवा होत नाही. तुमचे बाळ जन्मकालव्यातून पुढे सरकल्यावर नक्कीच वेगळे वाटते. त्या क्षणी शांत रहा आणि नैसर्गिक रित्या तुमच्या बाळाचा जन्म होऊ द्या.
जेव्हा तुमचे शरीर तुम्हाला कळा देण्यास उद्युक्त करते तेव्हा तुम्हाला कसे वाटते?
बाळ खाली सरकल्यामुळे आईला दाब जाणवतो आणि गर्भाशयाचे मुख पूर्ण उघडण्याआधीच तिला काही वेळेला जोर द्यावासा वाटतो.
प्रसूती लवकर होण्यापेक्षा सुरक्षितपणे होणे गरजेचे आहे. प्रसूतीचा प्रत्येक टप्पा स्वतःचा वेळ घेतो. नैसर्गिक प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे असते. सहसा, जेव्हा तुम्ही कळा देऊ लागता तेव्हा तुम्हाला खालील गोष्टी जाणवू शकतात.
- तीव्र इच्छा: बाळ शरीराच्या बाहेर येत आहे हे शरीराला समजते. कळ देण्याच्या तीव्र इच्छेला प्रतीकार करणे कठीण जाते. अशा परिस्थितीत ग्रॅव्हिटी न्यूट्रल स्थिती उपयुक्त ठरू शकते.
- सामान्य इच्छा: तुम्हाला प्रत्येक कळ आल्यानंतर किंवा कळेच्या शिखरावर जोर द्यावासा वाटेल. जोपर्यंत तुम्हाला कळ देण्याची तीव्र इच्छा होत नाही तोपर्यंत स्थिती बदलून आणि श्वासोच्छ्वास करून ते नियंत्रित केले जाऊ शकते. काही वेळेला, बाळ सहजपणे खाली सरकते आणि तुम्हाला तीव्र वेदना होत नाहीत.
- अजिबात इच्छा नसणे: तुम्हाला कळ देण्याची अजिबात इच्छा नसणे हे सुद्धा शक्य आहे. अशा वेळी, वेळ आणि स्थान महत्त्वाचे आहे. जर गर्भाशयाचे मुख उघडून ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ झालेला असेल तर तुम्ही स्वतःहून किंवा दुसर्या व्यक्तीने सांगितल्यावर झटपट कळा देण्याचा विचार करू शकता.
प्रसूती दरम्यान किती वेळ कळा द्याव्या लागतात?
पहिल्यांदाच प्रसूती होणाऱ्या स्त्रियांमध्ये काही तास कळा द्याव्या लागतात. आणि ज्या स्त्रिया दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा बाळाला जन्म देत असतील त्या स्त्रियांना १० मिनिटांपेक्षा कमी काळ कळा द्याव्या लागतात. सर्वसाधारणपणे, काही मिनिटे ते काही तास कळा द्याव्या लागू शकतात. किती वेळ कळा द्याव्या लागतील हे खालील घटकांवर अवलंबून आहे
१. पहिली किंवा दुसरी प्रसूती
ओटीपोटाकडील स्नायू जर बाळाला सामावून घेण्यासाठी कधीही ताणले गेले नसतील तर ते घट्ट असतात. स्ट्रेचिंग हळूहळू आणि स्थिर पद्धतीने होते, त्यामुळे वेळ लागतो. त्यानंतरची प्रसूती झाल्यास, बाळाला बाहेर काढण्यासाठी कमी वेळ लागेल. ज्या स्त्रियांच्या अनेक प्रसूती झाल्या असतील त्यांना फक्त एकदा किंवा दोनदा कळा द्याव्या लागतात कारण स्नायू आधीच ताणलेले असतात.
२. पेल्विक संरचना
श्रोणीकडील भागाची शरीररचना वेगवेगळ्या स्त्रियांमध्ये वेगवेगळी असते. श्रोणीचा एक आदर्श आकार म्हणजे अंडाकृती आकार होय. काही वेळा श्रोणीचे मुख लहान असते, परंतु बहुतेक बाळे त्यामधून पुढे सरकू लागतात. अगदी क्वचित प्रसंगी, श्रोणीचे मुख लहान असेल तर बाळाला जन्माच्या वेळी ते कठीण जाते. अशा वेळी प्रसूतीसाठी वेळ लागू शकतो किंवा जन्मतःच बाळामध्ये काही समस्या असल्याचे ते लक्षण असते.
३. बाळाचा आकार
काही बाळांची डोकी आकाराने मोठी असतात. क्रॅनियल हाडे मोठ्या आकाराची असतात. ही हाडे प्रसूतीच्या वेळी एकमेकांवर आच्छादित होऊन जन्म कालव्याद्वारे सामावून घेतली जातात. अशा परिस्थितीत, बाळाचे डोके लांब होऊ शकते आणि त्याला “कॅपट” असे म्हणतात. ते जन्मानंतर नॉर्मल होते.
४. गर्भाचे डोके आणि श्रोणिकडील भाग
योनीमार्गे प्रसूतीसाठी, बाळाच्या सामान्य स्थिती मध्ये बाळाचा चेहरा आईच्या पाठीकडे किंवा सेक्रमकडे असतो. ह्या स्थितीला पूर्ववर्ती स्थिती असे म्हणतात. वर्टेक्स प्रेझेंटेशनच्या काही प्रकरणांमध्ये, बाळाचे तोंड प्यूबिस कडे, मागच्या बाजूला असू शकते, अशा वेळेला प्रसूती करताना बाळाला हाताने फिरवावे लागते.
५. लेबर फोर्स
आईने बाळाला बाहेर ढकलण्याचा हा प्रयत्न आहे. गर्भाशयाचे मुख उघडण्यासाठी गर्भाशयाचे आकुंचन महत्वाचे आहे. या दोन्हींशिवाय, प्रसूती नैसर्गिकरित्या शक्य नाही. गर्भाशयाचे मुख पुरेसे उघडण्यासोबत कळा येणे हे सुलभ प्रसूती साठी गरजेचे असते.
प्रसूती दरम्यान कळा कशा द्याव्यात?
नवख्या मातांना कदाचित प्रसूतीच्या वेळी कळा कशा द्यायचा असा प्रश्न पडतो. कळा देण्याचे दोन प्रकार आहेत. चला त्या प्रत्येकाचा तपशीलवार विचार करूया.
१. कळा देताना प्रशिक्षित व्यक्तीची मदत घेणे
तुमच्या गर्भाशयाचे मुख पूर्णपणे उघडले कि नर्स किंवा दाई तुम्हाला प्रसूतीदरम्यान कळा देण्याचे आदेश देतात. तुम्हाला कळ देण्याची इच्छा आहे किंवा नाही ह्याची पर्वा ह्या पद्धतीमध्ये केली जात नाही. काही तज्ञांच्या मते ही पद्धत आई आणि बाळ दोघांसाठी धोकादायक आहे.
२. उत्स्फूर्त कळा देणे
प्रसूती दरम्यान कळा देण्याचा हा एक सुरक्षित आणि अधिक नैसर्गिक मार्ग मानला जातो. ह्या पद्धतीत, स्त्री बाळाला जन्मदेण्यासाठी, बाळाला तिच्या योनीमार्गातून बाहेर ढकलण्याची तीव्र इच्छा जाणवल्यानंतरच बाहेर ढकलण्यास सुरुवात करते. कळा देण्याच्या ह्या पद्धतीला डॉक्टर प्राधान्य देतात. ही पद्धत सुरक्षित असल्याचे सुद्धा अभ्यासकांचे पुरावे आहेत.
प्रशिक्षित पद्धतीने कळा कशा दिल्या जातात?
गर्भाशयाचे मुख १० सेमी उघडल्यानंतर प्रसूतीचा दुसरा टप्पा सुरु होतो. बाळाचा जन्म होईपर्यंत हा टप्पा सुरु राहतो. ह्या टप्प्यामध्ये प्रशिक्षण दिले जाते आणि हा टप्पा काही तासांचा असू शकतो.
- प्रत्येक कळ देण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्या, जेणेकरून तुम्हाला कळ देता येईल, तुमच्या पोटाचे स्नायू ताठ ठेवा. शौचास घट्ट झाल्यास जसा जोर द्यावा लागतो तसेच प्रयत्न कळा देताना करावे लागतात.
- १ ते १० अंक मोजेपर्यंत कळ दिली जाऊ शकते. प्रत्येक कळ आल्यानंतर २–३ वेळेला कळ देणे पुरेसे आणि फलदायी असू शकते. बाळ खाली सरकताना योग्य वेळेला कळा देणे गरजेचे असते.
कळा देताना प्रशिक्षण का दिले जाते?
प्रसूतीचा दुसरा टप्पा जर प्रदीर्घ असेल तर बाळाच्या जगण्यासाठी तो हानिकारक असू शकतो. कळा देताना योग्य प्रशिक्षण मिळाले तर दुसऱ्या टप्प्याचा कालावधी कमी करण्यास मदत होते. म्हणून जग भरात मोठ्या प्रमाणावर ही पद्धत लागू केली जाते.
अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकोलॉजिस्टच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रदीर्घ दुसऱ्या टप्प्यातील प्रसूतीचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यात असे नमूद केले आहे की पहिल्यांदाच आई होणाऱ्या स्त्रीसाठी दुसरा टप्पा एपिड्युरलशिवाय तीन तासांपेक्षा जास्त काळ आणि एपिड्यूरलसह दोन तासांचा असू शकतो तर दुसऱ्यांदा आई होणाऱ्या स्त्रियांसाठी हा टप्पा अनुक्रमे २ आणि १ तासांचा असू शकतो.
दुसरा टप्पा दीर्घकाळ राहिल्यास सी–सेक्शन किंवा व्हॅक्यूम किंवा फोर्सेप यांसारख्या सहाय्यक प्रसूती तंत्राचा वापर केला जाऊ शकतो. आई आणि बाळ ह्या दोघांसाठी ते सोयीस्कर असल्यास कुठल्याही अडचणीशिवाय ते केले जाऊ शकते. तथापि, हस्तक्षेप टाळण्यासाठी आणि दुसरा टप्पा दीर्घकाळ चालू नये ह्यासाठी कळा देण्याबाबतचे मार्गदर्शन घेणे चांगले असते.
कळा देण्याबाबतचे मार्गदर्शनाचे फायदे आणि तोटे
२००६ च्या एका अभ्यासानुसार एपिड्युरल ऍनेस्थेसियाशिवाय सामान्य प्रसूती होत असलेल्या सुमारे ३०० महिलांचे मूल्यांकन केले गेले. आणि असे दिसून आले की प्रशिक्षित विरुद्ध उत्स्फूर्त कळा देणाऱ्या स्त्रियांमध्ये कोणताही फरक नव्हता. अभ्यासानुसार आई किंवा बाळाला कोणतेही महत्त्वपूर्ण फायदे नव्हते.
ज्या महिलांना कळा देण्यास प्रशिक्षित केले गेले अशा महिलांमध्ये लघवीच्या समस्यांचा उच्च धोका पूर्वीच्या संशोधन पथकाने नोंदवला होता. उत्स्फूर्त पणे कळा देण्याऱ्या स्त्रियांमध्ये कोणतेही प्रतिकूल परिणाम नोंदवले गेले नाहीत.
कळा देण्यास जेव्हा सांगितले जाते तेव्हा खालील गोष्टी आढळतात:
- एपिसिओटॉमी किंवा पेरेनिअल नुकसान होण्याची उच्च शक्यता
- मातांना ओटीपोटाच्या ऊतींना आणि/किंवा मुत्राशयाकडील भागाला नुकसान होण्याचा धोका जास्त असतो
- होणाऱ्या आईला थकवा आणि अस्वस्थता जाणवते – जेव्हा तुम्हाला कळ देण्याची इच्छा असते तेव्हा खूप प्रमाणात ऊर्जा लागते
- पोटातील बाळाला त्रास होत असल्याची लक्षणे
- सी–सेक्शन आणि असिस्टेड डिलिव्हरीची जास्त आवश्यकता
उत्स्फूर्तपणे कळा कशा दिल्या जातात?
ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला आतून कळ जाणवल्यानंतर त्या आवेशाला प्रतिसाद म्हणून जोर देण्याची परवानगी आहे. ही पद्धत म्हणजे आईद्वारे प्रसूती सुलभ करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. आपण या चरणांचे अनुसरण करू शकता:
- जसजसे आकुंचन सुरू होते, तसतसे खोलवर आणि पूर्ण श्वास घ्या आणि कळ देण्यासाठी स्वत: ला तयार करा.
- प्रत्येक वेळेला कळ देताना श्वास घेणे सुरू ठेवा. तुम्ही मोठ्याने, कर्कश आवाज करत असाल तर ते सामान्य आहे. जोपर्यंत तीव्र इच्छा जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही दर पाच सेकंदांनी श्वास घेत राहावे. तुम्ही तुमचा श्वास जास्त काळ रोखू नये.
- आकुंचन संपल्यावर, सहजपणे श्वास घ्या आणि पुढची कळ आल्यावर जोर देण्याची वाट पहा.
- जेव्हा तीव्र इच्छा पुन्हा जाणवते, तेव्हा कळ आल्यावर काही सेकंद पुन्हा जोर देणे तुम्ही सुरू करू शकता.
जसजसे बाळ खाली सरकते तसे बाळाच्या ओटीपोटाकडील भागावर दबाव वाढत जातो. कळ आल्यानंतर तुम्हाला वारंवार जोर द्यावासा वाटू लागतो.
एपिड्यूरल घेतलेले असताना बाळाला प्रसूतीच्या वेळी बाहेर ढकलणे
एपिड्युरल ऍनेस्थेसिया घेतल्यानंतर तुमचा श्रोणिकडील भाग सुन्न होईल. ह्याचा तुमच्या प्रयत्नांवर खूप परिणाम होईल. ओटीपोटाकडील भागात संवेदना नसल्यामुळे जोर कधी लावायचा हे समजत नाही. पहिल्यांदाच आई होणाऱ्या स्त्रियांसाठी हे सर्व भयानक आहे कारण त्यांना याची सवय नाही. ह्या टप्प्यावर, जर गर्भाशयाचे मुख उघडलेले असेल तर तुम्हाला जोर देण्यास सांगितले जाईल. योग्य वेळ असल्यास, पेल्विक फ्लोअरवर थोडा दबाव जाणवू शकतो.
कळ आल्यानंतर तिच्याशी समक्रमित होण्यासाठी जोर दिला पाहिजे. ह्या टप्प्यावर बाळाची स्थिती देखील निर्धारित केली जाऊ शकते. एपिड्यूरलचा प्रभाव काही स्त्रियांच्या बाबतीत कमी होऊ शकतो, त्यामुळे पुन्हा कळ देण्याची इच्छा होते. जर जन्म कालवा योग्य असेल आणि आकुंचन कायम राहिल्यास, बाळ सतत खाली सरकेल आणि बाहेर येईल. ह्यास प्रसूती प्रक्रिया म्हणतात.
कळ देण्यासाठी योग्य स्थिती घेणे आवश्यक असते. हे नियमित अंतराने केले जाते. कळ आल्यानंतर तीनदा किंवा जेव्हा जेव्हा तीव्र इच्छा जाणवते तेव्हा जोर दिला जातो. ह्या प्रक्रियेत तुम्हाला थकवा येऊ शकतो आणि तुम्ही अधूनमधून विश्रांती घेऊ शकता.
प्रसूती दरम्यान कळा देण्यासाठी योग्य स्थिती
सुरक्षित प्रसूती होण्यासाठी वेगवेगळ्या स्थिती लक्षात घेण्याचा सल्ला दिला जातो. तणावग्रस्त ओटीपोटाचे स्नायू गर्भाशयातून बाळाला बाहेर ढकलण्यात लक्षणीय मदत करतात.
तुमच्या प्रसूतीदरम्यान तुमची स्थिती विशेषत: बसण्याची स्थिती महत्वाची असते आणि गुरुत्वाकर्षणाद्वारे प्रसूतीस मदत करते. जर तुम्ही खूप उत्स्फूर्तपणे कळा देत असाल, तर तुम्ही इतर स्थिती वापरून पाहू शकता जसे की कुशीवर झोपणे किंवा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव निष्प्रभ करण्यासाठी तुमचे हात आणि गुडघे टेकणे इत्यादी. यापैकी कुठल्या स्थितीची मदत होते ते आपण पाहुयात:
- स्क्वॅटिंग पोझिशन: ह्या स्थितीमुळे ओटीपोटाकडील भाग त्याच्या कमाल रुंदीपर्यंत, म्हणजे एक ते दोन बोटांपर्यंत रुंद होण्यास मदत होते. त्यामुळे बाळाला खाली ढकलण्यासाठी कमी बेअरिंगची आवश्यकता असते. ह्या स्थिती मध्ये गुरुत्वाकर्षणाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. कळा देण्याची इच्छा नसलेल्या मातांसाठी ही स्थिती खूप उपयुक्त आहे. कठीण प्रसूतीमध्ये बाळ खाली सरकण्यास ह्या स्थितीमुळे मदत होते. जर तुम्हाला स्क्वॅटिंगची ही स्थिती अवघड वाटत असेल, तर तुम्ही स्टूलवर किंवा उशीवर अर्ध–स्क्वॅटिंग स्थिती करून पाहू शकता. स्क्वॅटिंग बार लावलेले बर्थिंग बेड देखील उपलब्ध आहेत आणि ते आरामदायक असतात.
- सीटिंग पोझिशन: ही स्थिती चांगल्या विश्रांतीची स्थिती प्रदान करते. ही स्थिती सहसा गर्भ निरीक्षणाशी संलग्न असते. या स्थितीतही गुरुत्वाकर्षण महत्त्वाची भूमिका बजावते. ह्या स्थितीमध्ये पुढे झुकण्याची परवानगी असते. ह्या स्थितीमुळे स्त्रीला पाठदुखीपासून मुक्त होण्यास मदत होते.
- सेमी सीटिंग किंवा अपराईट पोझिशन: गुरुत्वाकर्षणाची येथे पुन्हा मदत होते. ओटीपोटाकडील भागात वाकून तुम्ही तुमच्या पाठीमागे ठेवलेल्या तुमच्या पतीच्या हातावर दाब देण्याचा प्रयत्न करू शकता. ह्या स्थितीमुळे श्रोणिकडील भाग जास्तीत जास्त रुंद होण्यास मदत होते. ह्या स्थितीमध्ये गर्भाचे निरीक्षण सुद्धा करता येऊ शकते. ही एक आरामदायी स्थिती आहे. ह्या स्थितीत, योनी तपासणी देखील केली जाऊ शकते.
- हात आणि गुडघ्यांवर वाकणे: गुरुत्वाकर्षण प्रबळ नसल्यामुळे प्रसूतीचा कालावधी वाढतो. ह्या स्थितीमुळे पाठदुखीपासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते. बाळाची स्थिती बदलण्यास त्यामुळे मदत होऊ शकते.
- एका कुशीवर पडून राहणे: ह्या स्थितीमुळे चांगली विश्रांती मिळते आणि योनीची तपासणी सुद्धा करता येते. ही स्थिती घेतलेली असताना गर्भाचे निरीक्षण करता येते. ह्यामुळे एपिसिओटॉमी टाळण्यास मदत होऊ शकते.
तुम्ही वैयक्तिक स्थिती वापरून पाहू शकता आणि आरामदायक स्थिती निवडू शकता.
कळा देताना श्वास घेण्याचे तंत्र
पुरेसा श्वास घेतल्याने तुम्हाला बरे वाटेल आणि त्रास टाळता येईल. योग्य श्वासोच्छवासामुळे स्नायूंचे योग्य आकुंचन होईल आणि त्यानंतरच्या आकुंचनांसाठी तुम्हाला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा मिळेल.
- तोंड उघडे ठेवा आणि जबडा वाकलेला ठेवा: ओटीपोटाच्या आणि गुदद्वाराजवळील स्नायूंच्या आकुंचनासाठी, तुम्ही तुमचे तोंड उघडे ठेवले पाहिजे आणि जबडा वाकवला पाहिजे. हे तंत्र तुम्ही श्वास घेत असलेल्या हवेचे प्रमाण वाढवण्यास देखील मदत करेल.
- तुमचे हात पोटाच्या वरच्या भागावर ठेवा: तुमचे हात तुमच्या पोटाच्या सर्वात वरच्या भागावर ठेवा. असे केल्याने कळा देणे सोपे जाईल.
- पूर्ण श्वास घ्या: सहज, नियमितपणे श्वास घ्या आणि पूर्णपणे सोडा.
- सर्व उत्स्फूर्त आवाज सोडून द्या: काही स्त्रियांसाठी, त्यांचे श्वास रोखून धरणे सोपे असते. अशा स्त्रिया कळ देताना त्यांचा श्वास रोखू शकतात परंतु जास्त काळ नाही.
तुमच्या बाळाला बाहेर ढकलण्यात मदत करण्यासाठी टिप्स
तुमच्या बाळाला बाहेर ढकलण्यात मदत करण्यासाठी येथे काही महत्त्वाच्या आणि सोप्या टिप्स दिलेल्या आहेत:
1. शौचास कठीण झाल्यास जोर लावतो तसे करणे: शरीर रिलॅक्स ठेवा आणि चांगला श्वास घ्या. त्याच वेळी तुम्हाला लघवीला आणि शौचास होते आहे का ह्याची पर्वा न करता फक्त खाली जोर लावण्यावर लक्ष केंद्रित करा.
2. तुमच्या हनुवटीने तुमच्या छातीला स्पर्श करा: तुमच्या पाठीवर झोपा आणि जोर देण्यासाठी तुमची हनुवटी तुमच्या छातीकडे लावण्याचा प्रयत्न करा. ह्यामुळे कळ देताना लक्ष केंद्रित होते.
3. स्थिती बदला: जोर पुरेसा प्रभावी नसल्यास, वेगवेगळ्या स्थिती वापरून पाहिल्यास मदत होऊ शकते.
4. आराम करा: जोर देताना घाबरू नका आणि शांत रहा.
5. तुमचा सर्वोत्तम प्रयत्न करा: तुम्ही जितक्या प्रभावीपणे जोर लावल, तितकी तुम्हाला जास्त ताकद येईल आणि तुमच्या बाळाची प्रसूती लवकर होईल.
6. पुरेशी विश्रांती घ्या: पुढील कळ येण्याची वाट पाहत असताना, तुम्ही फक्त विश्रांती घ्या आणि टवटवीत व्हा.
7. तुमच्या अंतःप्रेरणेने कळ आली कि जोर लावा: कळ आल्यास जोर कसा लावावा ह्या बाबतीत तुमच्यापेक्षा चांगले तुम्हाला कोणीही मार्गदर्शन करू शकत नाही. जोर देण्यासाठीची सर्वोत्तम वेळ तुम्हाला माहीत आहे.
8. तुमच्या मैलाच्या दगडाचे साक्षीदार व्हा: तुमची प्रसूती होत असताना तुमचे एड्रेनालाईन वाढू शकते आणि तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. तुम्ही आरसा मागवू शकता. लक्षात ठेवा की बाळाचे डोके क्षणिक दिसू शकते कारण अधूनमधून सारखा जोर लावावा लागतो.
9. खालच्या दिशेने ढकलणे: जर तुम्ही चांगले लक्ष केंद्रित करून खालच्या दिशेने जोर लावत असाल तर तुमचा चेहरा लाल झालेला दिसेल, डोके जड होईल आणि छातीत घट्टपणा जाणवेल. ओटीपोटाच्या खालच्या भागाच्या स्नायूंच्या आकुंचनांवर, लघवी करताना जसे लक्ष केंद्रित करतो तसे करा.
10. किंचाळणे: जोर लावण्यासाठी खूप शक्ती आवश्यक आहे आणि प्रसूती वेदना काय आहेत हे तुम्ही जगाला दाखवू शकता. ओरडण्याने काहीही फरक पडणार नाही. त्याऐवजी तुम्ही खोल आणि लांब आवाज काढा, त्यामुळे तुम्हाला खालच्या दिशेने जोर लावण्यास मदत होईल.
11. तुमच्या बाळाला स्पर्श करा: तुमच्या बाळाच्या बाहेर आलेल्या डोक्याला तुम्ही स्पर्श करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला जोर कसा लावावा ह्याचे मार्गदर्शन मिळेल. बाळ बाहेर येत आहे हे तुम्हाला जाणवेल.
12. लघवीला जाऊन या: जर तुम्ही लघवी केलेली नसेल, तर तुम्ही बाथरूम ला जाऊन येणे चांगले
13. योग्य श्वासोच्छ्वास: सहज आणि आरामात श्वास घेतल्याने तुम्हाला थकवा न येता जास्त काळ श्वास घेण्यास मदत होते.
कळा देऊन सुद्धा तुमचे बाळ बाहेर येत नसेल तर?
काही वेळा, पुरेसा जोर देऊनही प्रसूती होऊ शकत नाही. तुम्ही सर्व ऊर्जा खर्च केली असली तरी कदाचित बाळ बाहेर येणार नाही, त्यामुळे थकवा येतो आणि प्रसूती अवघड होते.
ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाला योग्य स्थितीची आवश्यकता आहे. तुम्ही प्रसूती साठी शेवटी दोन तीन कळा देऊन सुद्धा बाळ बाहेर येत नसेल तर डॉक्टर उपकरणे वापरून प्रसूती करण्याचा निर्णय घेऊ शकतात. बाळ बाहेर येत असल्याचे दिसल्यानंतरच फोर्सेप किंवा व्हॅक्यूम उपकरण सहसा वापरले जातात. तुम्ही जोर देत असताना डॉक्टर बाळाला योग्यरित्या मार्गस्थ करतील, परंतु बाळाला कधीही बाहेर काढणार नाहीत.
तुम्हाला कळ देण्याची इच्छा वाटत नसेल तर काय?
गर्भाशयाचे मुख पूर्णपणे उघडल्यानंतर सुद्धा स्त्रीला जोर देण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी कूस बदलल्याने लवकरात लवकर तुम्हाला कळ देण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. तुम्हाला झोप येत असल्यास ताठ उभे राहण्याचा प्रयत्न करा. बर्थिंग बॉलवर बसण्याने सुद्धा मदत होऊ शकते. तुम्हाला कळ देण्याची तीव्र इच्छा लवकर जाणवण्यास मदत होऊ शकते.
तुम्ही स्थिती बदलून आणि चालल्यानंतरही कळा देण्याची इच्छा निर्माण होत नसेल तर तुम्ही आणखी काही करू शकत नाही. जर तुम्हाला आरामदायक वाटत असेल आणि बाळाची हालचाल योग्यरित्या होत असेल तर आरामात राहण्याचा आणि शांत होण्याचा प्रयत्न करा.
तुमची इच्छा असल्यास, तुम्ही श्वास रोखून खाली थोडा जोर लावू शकता आणि त्यामुळे काही मदत होते का ते पहा. स्त्रियांना कधीकधी कळा देण्याची इच्छा होत नाही परंतु कळ आल्यावर जोर देण्याने फायदा होऊ शकतो. खालच्या बाजूने थोडा दाब दिल्यावर तुम्हाला कळ देण्याची इच्छा होऊ शकते आणि तुमची लवकरच प्रसूती होऊ शकते.
ऊती फाटण्याची जोखीम कशी कमी करावी?
गुदद्वाराजवळील ऊती फाटू नये म्हणून कळा कशा द्याव्यात हे स्त्रीला माहिती असणे महत्वाचे आहे. प्रसूतीसाठी योग्य स्थिती प्राप्त केल्यानंतर, आईला जन्म–संबंधित जननेंद्रियाच्या दुखापतींचा धोका कमी करण्यासाठी चांगला पेरीनियल सपोर्ट असणे अत्यंत महत्वाचे आहे.
- गरोदरपणाच्या मध्यावर केगल व्यायाम आणि दररोज पेरीनियल मसाज सुरू करा. प्रसूतीच्या वेळी स्नायू फाटू नयेत म्हणून हे व्यायाम प्रकार गदद्वाराकडील स्नायू मजबूत करण्यास मदत करू शकतात. प्रसूतीच्या वेळी गुदद्वाराकडील स्नायूंचे संरक्षण करण्यासाठी इतर विविध तंत्रे वापरली जाऊ शकतात.
- बाळ खाली सरकत असताना, पेरिनियमवर उबदार कॉम्प्रेस लागू केले जाऊ शकते. असे केल्याने त्या भागातील वेदना आणि जळजळ कमी होते. पेरीनियल टिश्यूजला तेलाने मसाज देखील केला जातो. त्यामुळे जेव्हा तो भाग ताणला जातो तेव्हा तेल वंगणासारखे काम करते.
- तुम्हाला काही पेरेनिअल प्रॉब्लेम असल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कळवावे. तुम्हाला पुरेसा पेरिनल सपोर्ट मिळण्यासाठी डॉक्टर्स मार्गदर्शन करतील.
- काही वेळा एपिसिओटॉमीची गरज असू शकते. फाटण्याची समस्या एपिसिओटॉमीपेक्षा बरी आहे असे म्हटले जाते कारण त्यामध्ये फक्त मऊ ऊतींचे नुकसान होते आणि म्हणूनच ते लवकर बरे होतात. एपिसिओटॉमीमध्ये त्वचा आणि स्नायूंच्या थरांचा समावेश होतो आणि त्यामुळे नंतर डाग पडू शकतात आणि मूत्रमार्गातील संयम कमी होतो.
एपिसिओटॉमी कधी आवश्यक आहे?
एपिसिओटॉमी ही प्रसूतीदरम्यान जन्म कालवा मोठा करण्यासाठी आणि बाळाचे डोके बाहेर येण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया आहे. ही शस्त्रक्रिया योनिमार्गाच्या भित्तिकांवर केली जाते. पूर्वी प्रत्येक प्रसूतीच्या वेळी एपिसिओटॉमी केली जात असे. सुमारे ७० टक्के महिलांना जन्म देताना योनिमार्गाच्या ऊतींची नैसर्गिकरित्या झीज होते.
डॉक्टर खालील परिस्थितींमध्ये एपिसिओटॉमीचा विचार करू शकतील.
- ज्या भागाच्या उती फाटतात त्या भागांमध्ये मूत्रमार्ग आणि क्लिटॉरिससारख्या नाजूक भागांचा समावेश होतो.
- गर्भाला होणारा त्रास पाहून तातडीने प्रसूतीसाठी
- प्रसूती दरम्यान काही प्रगती होत नसेल तर किंवा जास्त विलंब झालेला दुसरा टप्पा
एपिसिओटॉमीचा अंदाज लावला जाऊ शकत नाही, परंतु एपिसिओटॉमी टाळण्यास मदत करणारे काही घटक आहेत:
- संतुलित आणि पौष्टिक आहार
- प्रसूतीच्या सुमारे चार आठवडे अगोदर हळुवारपणे योनीमार्ग ताणणे.
गर्भारपण आणि प्रसूती या दोन्ही नैसर्गिक प्रक्रिया आहेत. तुमचे शरीर ह्या बदलांशी स्वतःहून चांगले जुळवून घेते. शांत राहण्यासाठी, चुका टाळण्यासाठी आणि बाळंतपणाचा चांगला अनुभव घेण्यासाठी तुम्हाला ह्या घटनांची जाणीव असायला हवी.
आणखी वाचा:
सुलभ आणि सामान्य प्रसूतीसाठी उपयुक्त टिप्स
तुम्हाला माहिती असाव्यात अश्या प्रसूतीच्या वेगवेगळ्या पद्धती