Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य मुलांसोबत घरून काम करणे सोपे आणि सुलभ करण्यासाठी काही टिप्स

मुलांसोबत घरून काम करणे सोपे आणि सुलभ करण्यासाठी काही टिप्स

मुलांसोबत घरून काम करणे सोपे आणि सुलभ करण्यासाठी काही टिप्स

कोरोनाविषाणूच्या साथीमुळे लॉंक डाऊन घोषित केले गेल्यामुळे बहुतेक लोक घरून काम करत आहेत. बरेच लोक घरून काम करताना अगदी व्यवस्थित व्यवस्थापन करीत आहेत, परंतु ज्यांना मुले आहेत त्यांना हे शक्य होत नाही. तुम्ही सुद्धा घरून काम करणारे पालक असाल तर मुले तुमच्या अवतीभोवती असताना तुम्हाला ऑफिसचे काम करावे लागेल. तुम्हाला पूर्ण वेळ त्यांचे मनोरंजन करावे लागेल, प्रत्येक एक तासानंतर त्यांना खायला देण्यासाठी उठावे लागेल आणि हे सगळे खूप आव्हानात्मक असेल. मुलांकडे २४ तास लक्ष द्यावे लागते आणि अशातच डेडलाईन सांभाळणे, इमेल बघून त्यांना उत्तर देणे, दर दोन तासाला कॉन्फरन्स कॉल घेणे खूप कठीण होऊन बसते. कोरोनाविषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहेत त्यामुळे आपल्याला घरात किती काळ रहावे लागणार आहे कुणालाच माहिती नाही. त्यामुळे मुले आणि त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत तुम्हाला घरून काम करावे लागणार आहे. परंतु तुम्ही घाबरून जाऊ नका, मुले असताना घरून काम करावे लागले तर ते मजेदार कसे करावे हे तुम्हाला माहिती असल्यास तुम्हाला त्याची मजा घेता येईल.

घरात मुलांसोबत क्वारनटाईन असताना ऑफिसचे काम कसे करावे?

कोरोनाविषाणूच्या उद्रेकादरम्यान मुलांबरोबर घरून काम करत असताना उत्पादक राहण्यासाठी काही टिप्स आम्ही येथे देत आहोत.

१. आपल्या ‘होम ऑफिस’ साठी जागा निश्चित करा

होय, तुम्ही घरी असताना तुम्हाला तुमच्या मुलांवर सतत लक्ष ठेवावे लागते परंतु त्यांचा आवाज आणि दंगा ह्यामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. त्यामुळे तुमच्या कामासाठी घरात निश्चित जागा असणे महत्वाचे आहे. स्वयंपाकघरात काम करीत असताना, किचन टेबल ऑफिस टेबल म्हणून वापरण्यास मजा येऊ शकते परंतु ते तुमचे कार्यक्षेत्र नाही. जर तुमची मुले व्रात्य असतील तर तुमच्या फाईल्स, लॅपटॉप आणि कामाशी संबंधित इतर गोष्टी त्यांच्यापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे घरातील एखादी चांगली जागा तुमचे ऑफिस म्हणून निवडा. तिथे ड्रॉवर असलेले एक छोटेसे टेबल ठेवा जेणेकरून ड्रॉवर मध्ये तुम्हाला तुमच्या फाईल्स आणि रेकॉर्ड्स ठेवता येतील. तिथे जास्त कचरा न करता सगळ्या गोष्टी नीट संयोजित ठेवा.

आपल्या ‘होम ऑफिस’ साठी जागा निश्चित करा

आपण आपल्या घरातील कार्यालयात आपल्या मुलांसाठी काम करण्याची एक लहान जागा देखील तयार करू शकता. एक लहान टेबल सेट करा आणि कागद, पेन, रंग, पेन्सिल, टेप आणि स्टिकर यासारख्या गोष्टी  तिथे ठेवा. मूल व्यस्त असल्याने तुम्हाला काळजी वाटणार नाही आणि तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाच्या जवळ आहात हे त्याला जाणवेल.

२. आपली मुले झोपेत असताना काम करा

जर तुम्ही घरून काम करत असाल आणि तुमची मुले लहान असतील तर तुम्ही त्यांच्या झोपेच्या वेळेचा उपयोग करून घेऊ शकता. तुमची मुले दुपारी दोन ते तीन तास झोपलेली असताना तुमच्याकडे कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अखंडीत वेळ असू शकतो. महत्वाची कामे करण्यासाठी ह्या वेळेचा उपयोग करा. पूर्ण लक्ष केंद्रित करून करावयाची कामे ह्या वेळेत करून घ्या. मुले जागी असताना तुम्ही कमी आवाहनात्मक आणि प्राधान्यक्रम कमी असलेली कामे करू शकता आणि मुले झोपेत असताना कामाचे नियोजन आणि महत्वाच्या प्रकल्पांचे फोन कॉल्स घेऊ शकता.

जर तुमची मुले किशोरवयीन असतील तर ती दुपारच्या वेळी झोपत नाहीत अशा वेळी त्यांना शांतपणे वाचन करण्यास किंवा खेळण्यास सांगा किंवा घर स्वच्छ करण्यास सांगा. असे केल्यानं तुम्हाला त्रास न होता मुले सुद्धा नवीन काहीतरी शिकतील. हा सगळा वेळ तुम्ही महत्वाची कामे करण्यावर केंद्रित करा. खूप नियोजन करून सुद्धा काही वेळा गोष्टी नियोजन केल्याप्रमाणे होत नाहीत पण ते ठीक आहे. तुम्ही जास्त ताण न घेता जेवढे करता येऊ शकेल तेवढे करा.

३. खेळांचे बॉक्स तयार करा

जेव्हा आपल्या मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी तुम्ही आखलेली सर्व धोरणे अपयशी ठरतात तेव्हा असे बॉक्स तयार केल्यास तुमची थोडी सुटका होऊ शकते. तुमच्या मुलाच्या आवडीनुसार त्यामध्ये आर्ट, क्राफ्ट आणि इतर क्रियाकलापांसाठी लागणाऱ्या गोष्टी ठेवा. असे केल्याने मुले विशिष्ट खेळ खेळू शकतील आणि काही प्रकल्प तयार करू शकतील. हे बॉक्स मुलांना नक्की आवडतील. उदा: जर तुमच्या मुलाला क्राफ्ट आवडत असेल तर त्या बॉक्स मध्ये स्ट्रॉ, ग्लू, कागद, चमकी, रंग, बटन्स आणि त्याच्याशी संबंधित घरात असणाऱ्या इतर वस्तू तुम्ही ठेऊ शकता. ह्या सर्व गोष्टी तुम्ही गोळा केल्यानंतर तुम्ही त्याला कार्ड किंवा इतर गोष्टी तयार करण्यास सांगू शकता. असे केल्याने तुमची मुले आनंदाने व्यस्त राहतील आणि तुम्ही तुमचे काम घरून व्यवस्थितपणे करू शकाल.

४. आपल्या मुलांशी बोला

तुम्ही एखाद्या महत्वाच्या कॉलवर असताना मुले ते पाहतात परंतु त्याच खोलीत मोठ्याने ओरडणे आणि रडणे तसेच भावंडांविषयी तक्रारी करणे सुरु असते. हे ऐकून गंमत वाटू शकते परंतु तुम्ही जेव्हा अशा परिस्थतीत असता तेव्हा नक्कीच ती गंमत नसते. तुमच्या बॉसला तुमच्याकडून वेगवेगळे इनपुट्स हवे असताना तुम्ही मात्र एकीकडे तुमच्या मुलाला शांत करण्यास व्यस्त असता. तुम्ही जर अशाच परिस्थितीला सामोरे जात असाल तर लगेचच स्मार्ट फोनचे म्यूट बटन दाबा. आमच्यावर विश्वास ठेवा पण हा पर्याय अगदी योग्य आहे. परंतु सर्वात चांगला पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाशी ह्याबद्दल बोलू शकता.

आपल्या मुलांशी बोला

तुमचे मूल काही वेळ एकटे असल्यावर त्याने काय करू नये हे त्याला पुनःपुन्हा सांगा. सर्वात आधी, तुमचे काम सुरु असताना त्याने व्यत्यय आणू नये हे त्याला सांगा आणि त्यावेळेला त्याने काय केले पाहिजे हे सुद्धा त्याला सांगा. तुमची मिटिंग किंवा कॉल सुरु असल्याचे नाटक करा आणि तुमचे मूल कशी प्रतिक्रिया देते ते पहा. असे एकापेक्षा जास्त वेळा करून पहा. जर त्यांनी योग्य वर्तणूक केली तर त्यांना बक्षीस द्या आणि जर योग्य वर्तणूक केली नाही तर त्यांना हळुवारपणे मार्गदर्शन करा. ह्याचा जेवढा तुम्ही जास्त सराव कराल तेवढे तुमची मुले लवकर शिकतील. चांगली वर्तणूक एका रात्रीत मुले शिकत नाहीत त्यासाठी खूप सराव आणि सहनशीलता लागते. तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत थोडासा धीर धरलात तर कसे वागावे हे मुले शिकतील.

५. आपली वचनबद्धता दर्शवा

जेव्हा तुम्ही घरून काम करीत असता तेव्हा तुम्ही तुमच्या कामाप्रती आणि तुमच्या बॉस सोबत वचनबद्ध आणि प्रामाणिक राहणे महत्वाचे आहे. त्यांना हे कळू द्या की तुम्ही नेहमीप्रमाणे कामात उत्पादक आणि जलद आहात. आपली वचनबद्धता दर्शविण्याचे एक उदाहरण म्हणजे त्यांच्या ईमेलला लगेच किंवा शक्य तितक्या लवकर प्रतिसाद देणे. बहुतेक लोकांना घरच्या कपड्यांमध्येच काम करणे आवडत असले तरी, जेव्हा तुम्ही व्यावसायिक पोशाख करता तेव्हा कदाचित आपली उत्पादनक्षमता आणि आत्मविश्वास वाढेल. जेव्हा आपण ऑफिस-वेअर घालता तेव्हा आपण ऑफिसचे काम करत असता आणि महत्त्वाच्या कॉल दरम्यान त्यांनी व्यत्यय आणू नये हे देखील आपल्या मुलांना कळेल.

६. आपल्या कुटुंबासाठी वेळ काढा

आता प्रत्येकजण घरी आहे तेव्हा आपल्या कुटुंबासोबत आणि मुलांमध्ये थोडा वेळ घालविण्याची ही योग्य वेळ आहे. जर तुम्ही तुमच्या मुलांना प्रत्येक दोन तासांनंतर वीस मिनिटे दिलीत तर तुम्हाला काम करण्यासाठी दर्जेदार वेळ मिळेल. जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिले तर मुले बराच काळ आनंदी असतील आणि तुम्ही काम करताना तुम्हाला त्रास देणार नाहीत. ही विश्रांती काम करताना तुमच्यासाठी देखील स्फूर्तिदायक असेल आणि तुम्हाला स्वतःला चांगले वाटण्यास त्यामुळे मदत होईल. त्यामुळे तुम्ही काम, घर आणि मुले नीट व्यवस्थापित करू शकता हा तुम्हाला आत्मविश्वास येईल. तर आपल्या मुलांशी मस्ती करा, त्यांच्यासाठी काही लहान कथा वाचा किंवा जमिनीवर बसून आणि संधी मिळेल तेव्हा त्यांच्याशी ब्लॉक गेम खेळा.

७. मुलांना काही निर्णय घेऊ द्या

तुमच्या मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे निवड करण्याची संधी दिल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्यांना काय घालायचे आहे, कोणते गेम खेळायला आवडेल किंवा कोणती स्टोरीबुक वाचायला आवडेल हे त्यांना ठरवू द्या. त्यांना स्वत: साठी काही स्नॅक्स (ज्याला गॅस लागणार नाही किंवा आगीबरोबर खेळण्याची गरज नाही) बनवण्याची संधी द्या आणि स्वतःचे स्वतः खाऊ द्या. जेव्हा ते ही सोपी कामे स्वतः करतात, तेव्हा तुम्हाला व्यत्ययाशिवाय काम करण्याची संधी मिळेल. मुलांनी करावयाच्या कामांची यादी देखील तुम्ही करून ठेवू शकता जेणेकरून तुमची मुले यादीचे अनुसरण करू शकतील.

मुलांना काही निर्णय घेऊ द्या

लहान मुलांसाठी आपण काही अन्न पदार्थ तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुपारी २ पर्यंत ते पूर्ण संपवण्यास सांगू शकता. मोठ्या मुलांना तुम्ही काही सोपे अन्नपदार्थ तयार करण्यास सांगू शकता. हे प्रयोग त्यांना स्वतंत्र होणे शिकवतील.

८. युक्त्या वापरा

टीव्ही वरील कार्टून किंवा तुमच्या मुलाचे आवडते चॉकलेट ह्या अशा दोन गोष्टी आहेत ज्या नेहमीच त्याचे रडणे थांबवू शकतात. तुमच्या मुलांसाठी कुठला उपाय लागू होतो हे पालक म्हणून तुम्हाला जास्त चांगले माहिती आहे. जर मुले त्यांचे आवडते कार्टून टीव्ही वर बघण्यात मग्न होत असतील आणि त्यामुळे तुम्हाला व्यत्यय होत नसेल तर तुम्ही हा उपाय वापरू शकता आणि त्याबद्दल स्वतःला दोषी मनू नका. जर तुमचा एखादा महत्वाचा कॉन्फेरंस कॉल असेल किंवा मीटिंग असेल तर टीव्ही सुरु करून त्यांना खायला स्नॅक्स द्या. असे केल्याने मुले थोड्या काळासाठी व्यस्त राहतील आणि त्यामुळे तुम्हाला मिटिंग वर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल. स्क्रीन टाईम मर्यादित ठेवल्यास हा उपाय ठीक आहे. त्यांनासुद्धा काही वेळ त्यांच्या आवडत्या कार्टून बघण्याचा आनंद घेऊ द्या.

९. पतीशी संवाद साधा

जर तुमचे पती घरी असतील तर जबाबदाऱ्यांविषयी त्यांच्याशी संवाद साधणे महत्वाचे आहे जेणेकरून दोघांच्याही गरजा आणि अपेक्षा समजतील. जर दोघांपैकी एकाला डेडलाईन्स आणि मीटिंग्ज असतील तर ह्याची मदत होऊ शकते. तसेच जेव्हा तुम्ही महत्वाच्या कॉलवर असता किंवा मीटिंग मध्ये असता तेव्हा दारावर तसे चिन्ह लटकवणे ही एक चांगली कल्पना आहे त्यामुळे कुटुंबातील सदस्य तुम्हाला कामात व्यत्यय आणणार नाहीत. तसेच तुम्ही त्यासाठी एखाद्या खेळण्याचा सुद्धा वापर करू शकता आणि तुम्ही मुलांना हे सांगू शकता की तुम्ही जेव्हा हे खेळणे त्यांना दाखवाल तेव्हा तुम्ही बिझी आहात असा त्याचा अर्थ होतो. तुमच्या मुलांसाठी हे खूप शक्तिशाली सिग्नल्स आहेत.

१०. आधीच योजना आखा

शेवटच्या क्षणापर्यंत थांबण्याऐवजी काही तास आधीच आपले काम संपवण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास तुम्ही आपल्या स्वतःच्या कामाचा ताबा घेऊ शकता आणि स्वतःची डेडलाईन तयार करू शकता. विलंब केल्याने तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाही. दुसर्‍या दिवसासाठी काम न ठेवणे चांगले. कोणत्या आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते हे आपणास माहित नाही, म्हणून आपले काम वेळेत पूर्ण करा, खरं तर वेळेपूर्वी पूर्ण करा.

मुलांची काळजी घेणे आणि घरामधून काम करत असताना मुलांच्या मागण्या सतत पूर्ण करणे अवघड आहे परंतु हे शक्य आहे. आम्ही ह्या लेखात दिलेल्या टिप्सची तुम्हाला मदत होईल. ह्या टिप्स आपल्या फायद्यासाठी वापरा आणि घरी उत्तम वर्क लाईफ बॅलन्स ठेवा. आपल्या पतीशी  बोला आणि जबाबदाऱ्या शेअर करा. घरकामाचे विभाजन करा आणि आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी वेळा ठरवून घ्या. हा अवघड काळ आहे, परंतु लक्षात ठेवा की आपल्या मुलांसोबत आणि कुटूंबातील सदस्यांसह आपल्याला बंध निर्माण करण्याची ही संधी आहे. त्याचा उपयोग करून घ्या, कामाचा ताण घेऊ नका. नित्यक्रम निश्चित करा आणि आपले कार्य नियोजित वेळेत पूर्ण करा. आपला सर्व वेळ आपल्या प्रियजनांसह घालवा.

आणखी वाचा:

कोरोनाविषाणूचा उद्रेक झालेला असताना, तुमच्या मुलाला व्यस्त ठेवण्यासाठी घरात करता येतील असे १५ क्रियाकलाप

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article