तोंडातील अल्सर म्हणजे तोंडात आढळणारे पांढरे डाग होय. त्यांच्याभोवतीचा भाग लालसर आणि सुजलेला असतो . विशेषकरून हे अल्सर ओठ आणि हिरड्यांवर आढळतात. ते वेदनादायी असतात आणि त्यांचा तुम्हाला बोलताना आणि चावताना त्रास होतो. ह्या वेदना कमी होण्यासाठी तुम्ही काही उपचार नक्कीच शोधत असाल. तोंडात होणारे हे अल्सर संसर्गजन्य नसतात आणि त्यांच्यावर घरी उपचार करता येतात. ह्या लेखामध्ये आपण बाळांच्या आणि लहान मुलांच्या तोंडातील अल्सरवर काही घरगुती उपचार बघणार आहोत.
छोटी बाळे आणि लहान मुलांच्या तोंडात होणाऱ्या अल्सरवर ११ सर्वोत्तम घरगुती उपचार
तणाव, इजा, व्हिटॅमिन आणि खनिजे ह्यांची कमतरता, शरीराची उष्णता किंवा फूड ऍलर्जी सारख्या अनेक कारणांमुळे मुलांच्या तोंडात अल्सर होऊ शकतात. खालील प्रभावी घरगुती उपायांनी ते सहजपणे बरे करता येतात.
१. मध
जर तुमच्या मुलाचे वय एक वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्याच्या तोंडाच्या अल्सरवर उपचार करण्यासाठी मध वापरू शकता. बाधित भागावर काही वेळासाठी मध लावून ठेवा. मधात अँटी–मायक्रोबियल गुणधर्म आहेत, जे फोडांना बरे करते. कृपया लक्षात घ्या की आपल्या मुलाचे वय एक वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला मध देऊ नका.
२. हळद
बहुतेक घरांमध्ये आढळणारी हळद मुलांच्या तोंडाच्या अल्सरचा उपचार करण्यासाठी वापरली जाऊ शकते. हा विरोधी दाहक, जंतुनाशक आणि जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ सर्व प्रकारच्या जखमा बरा करतो. हळदीचा वापर सुलभ करण्यासाठी हळद मधात मिसळून लावा.
३. नारळ
सर्व भारतीय घरात नारळ असतोच आणि तोंडातील अल्सरवर उपचारासाठी त्याचा उपयोग होतो. आपण एकतर आपल्या मुलास नारळ पाणी पिण्यास देऊ शकता किंवा नारळाच्या दुधाने त्याला गुळण्या करायला सांगू शकता. तुमच्याकडे घरात नारळ नसल्यास तुम्ही शुद्ध नारळाचे तेल तोंडात येणाऱ्या फोडांवर लावू शकता. तथापि, तुमच्या बाळाचे वय १ वर्षापेक्षा लहान असल्यास नारळ तेल वापरू नका.
४. दही
दही आणि ताक हे तोंडाच्या अल्सरसाठी उत्तम उपाय आहेत. तुमच्या मुलास दही तोंडात ठेवण्यास सांगा. दही हा एक उत्तम उपाय आहे कारण त्यामधील अनुकूल जिवाणू हानिकारक जंतूंविरुद्ध लढण्यास आणि बुरशीजन्य संसर्ग रोखण्यास मदत करतात.
५. तुळस
तुळशीची पाने (तुळशी) चावणे हा तोंडाच्या अल्सरवर आणखी एक चांगला उपाय आहे. पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात आणि त्यामुळे तोंडातील अल्सर लवकर बरे होतात. तुळशीची पाने दिवसातून दोनदा गरम पाण्याबरोबर चावून खाल्ली पाहिजेत, त्यामुळे लवकरच परिणाम दिसून येतो.
६. तूप
दुधापासून तयार झालेला आणखी एक पदार्थ म्हणजे तूप, तोंडातील अल्सर बरे करू शकतो. उत्तम परिणामांसाठी आपल्याला दिवसातून कमीतकमी तीन वेळा तोंडातील अल्सरवर तूप लावण्याची गरज आहे. असे केल्याने फोड बरे होण्यास मदत होईल आणि आपल्या मुलास आराम मिळेल. जर बाळाला तुपाची चव आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी बाळाला लोणी लावू शकता.
७. कोरफड
मुलांच्या तोंडातील अल्सर बरे करण्यासाठी कोरफड एक उत्तम पर्याय आहे. कोरफड वेदनांपासून आराम देते आणि जिवाणूंची वाढ रोखते त्यामुळे हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते. तुम्ही एकतर बाधित भागावर जेल लावू शकता किंवा पाण्यात मिसळून त्याने दिवसातून दोन तीन वेळा तोंड स्वच्छ धुवू शकता. जर तुम्ही दुसरा पर्याय निवडला तर त्यासाठी थंड पाणी वापरा कारण त्यामुळे तुम्हाला वेदनांपासून आराम पडेल आणि मुले सुद्धा त्याचा आनंद घेतील. तथापि, हा उपचार चुकीच्या पद्धतीने केला जाऊ शकतो त्यामुळे तुमचे मूल मोठे असेल तरच ही उपचारपद्धती वापरा. तसेच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हा उपचार करू नका.
८. ज्येष्ठमध
तोंडातील व्रण बरे करण्यासाठी तुम्ही एक चमचा ज्येष्ठमध २ कप पाण्यात भिजवून ठेवू शकता. आणि त्या पाण्याने दिवसातून काही वेळा त्यांना गुळण्या करण्यास सांगू शकता. ज्येष्ठमधाची पावडर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती मध आणि हळद ह्यामध्ये मिसळून तोंडातील अल्सरवर लावू शकता. जरी तुमच्या मुलाच्या तोंडातील अल्सर तीव्र असले तरीसुद्धा तुम्हाला लवकर चांगले परिणाम दिसतील. जखमा लवकर बऱ्या होतील आणि त्यांचा लालसर रंग कमी होईल. तथापि हा उपाय मोठ्या मुलांसाठीच केला पाहिजे.
९. आईस्क्रीम
थंड पदार्थ तुमच्या मुलाच्या अल्सरच्या वेदना कमी करू शकतात. लहान मुले त्वरित आराम मिळण्यासाठी आईस्क्रीम खाऊ शकतात. आईस्क्रीम हे असे औषध आहे जे आपले मूल कधीही नाकारणार नाही.
१०. खारट पाणी
एका ग्लासभर पाण्यात मीठ किंवा बेकिंग सोडा मिसळून द्रावण तयार करा. तुमच्या मुलाला या द्रावणाने तोंड स्वच्छ करण्यास सांगा आणि नंतर थुंकून टाकण्यास सांगा. तुमची मुले हे मिश्रण गिळत नाहीत ना ह्याकडे लक्ष द्या.
११. कढीपत्ता
कढीपत्त्यामध्ये अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुणधर्म असल्यामुळे कढीपत्त्याची पाने चघळल्यास तुमच्या मुलाच्या तोंडाचा अल्सर बरा होतो.
बहुतेक प्रकरणांमध्ये, मुलांवर दीर्घकाळ टिकणारे प्रभाव न सोडता मुलांच्या तोंडातील अल्सर कमी होतो आणि नाहीसा होतो. आम्ही सांगितलेल्या उपायांमुळे तुमचे मूल लवकर बरे होईल आणि भविष्यात अल्सर होण्याची शक्यता कमी होईल. जर समस्या आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिली तर बालरोगतज्ञांचा सल्ला घेणे चांगले ठरेल.
आणखी वाचा:
मुलांमधील पोटदुखीसाठी १० प्रभावी घरगुती उपचार
मुलांना होणाऱ्या खोकल्यावर २८ सुरक्षित घरगुती उपाय