आपल्याला सगळ्यांना बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी स्तनपान किती महत्वाचे आहे हे माहित आहे. परंतु काही मातांना स्तनपान सुरु करताना काही आव्हानांना सामोरे जावे लागते. स्तनपानाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये थोडा गोंधळ उडू शकतो आणि त्याविषयी काही प्रश्न सुद्धा पडू शकतात. तुम्हाला स्तनपानाविषयी माहिती मिळाल्यास, त्यादरम्यान येणाऱ्या आव्हानांना सहज सामोरे जाता येईल. तसेच तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल.
स्तनपानाविषयी २० प्रश्नोत्तरे
स्तनपानाविषयी सर्वसाधारणपणे बऱ्याचदा विचारले जाणारे प्रश्न उत्तरासहित इथे देत आहोत.
१. प्रसूतीनंतर साधारण दूध केव्हा येते?
” दूध आलेच नाही” असं हल्ली सर्रास ऐकायला मिळते. पण हे असं म्हणणं चुकीचं आहे. बऱ्याच वेळा बाळाच्या जन्मानंतर आईला घट्ट दूध येत असते, ज्याला “कोलोस्ट्रम ” म्हणतात. ह्या पहिल्या दुधामध्ये भरपूर प्रमाणात अँटीबॉडीज असतात, आणि त्यानंतर पातळ दूध येते. बाळाच्या जन्मानंतर साधारणपणे २-३ दिवसांनी आईला दूध येण्यास सुरुवात होते.
२. स्तनांच्या आकारावर दुधाचे प्रमाण ठरते का?
नाही, स्तनांच्या आकारावर दुधाचे प्रमाण ठरत नाही. स्तनांचा आकार कसाही असला तरीही आपल्या बाळाला पुरेल इतक दूध आईला नक्कीच येते. स्तनांचा आकार लहान असलेल्या आईला सुद्धा भरपूर प्रमाणात दूध येऊ शकते, किंवा स्तनांचा आकार मोठा असूनही पुरेसं दूध बाळाला मिळत नाही.
३. काही मातांना दूध जास्त प्रमाणात का येते?
डॉक्टरांच्या मते, प्रत्येक मातेची दूध साठवण्याची क्षमता वेगवेगळी असते. ही क्षमता मॅमरी टिश्यू वर अवलंबून असते. पण उगाचच काळजी करण्याचे कारण नसते. सर्वसाधारणपणे आपल्या बाळाला पुरेल इतकं दूध प्रत्येक आईला येतं. पण तुम्हाला दूध कमी येते आहे असे वाटत असेल तर तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
४. स्तनपान सोपे का नाही?
स्तनपान ही खूप नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण प्रत्येकासाठी ती सोपी नाही. थोडा धीर आणि सरावाने आईला स्तनपानाचे कौशल्य आत्मसात करता येऊ शकते. काहींना सुरुवातीचे काही दिवस खूप त्रास होऊ शकतो. पण काही काळानंतर आणि अनुभवाने स्तनपान सोपे होते.
५. माझ्या बाळाला खरंच दूध मिळत आहे ना?
दुधाव्यतिरिक्त अन्य काही कारणांसाठी सुद्धा बाळ आईच्या छातीला चिकटून बसते. काही बाळांना नुसतं स्तनांना चोखत राहून बरे वाटते. जर तुम्हाला बाळ दूध पीत आहे की नाही ह्याची खात्री नसेल, तर बाळ दूध पिताना त्याचा बाळाचा जबडा वर खाली होत आहे ना ते पहा. तसेच पाजल्यावर स्तन हलके होत आहे ना ह्याकडेही लक्ष ठेवा.
६. मला माझ्या बाळाला पुरेल इतकं दूध येत आहे ना?
बऱ्याच मातांना काळजी वाटत राहते की बाळाला पुरेसं दूध आपल्याला येत आहे नं? तेव्हा तुम्ही खालील गोष्टी तपासून पहा.
- जर दिवसातून ७-८ वेळा बाळाची नॅपी बदलावी लागत असेल
- जर तुमचे स्तन दुधाने भरून वहात असतील
- जर बाळाचे वजन प्रत्येक आठवड्याला वाढत असेल
- जर बाळाला प्रत्येक २-३ तासांनंतर दुधाची गरज वाटत असेल
७. दुधाचा कमी पुरवठा मी कसा वाढवू शकते?
कमी दूध येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जर तुम्हाला कमी दूध येतंय म्हणून काळजी वाटत असेल तर खालील उपाय करून पहा:
- बाळाला थोड्या थोड्या वेळाने पाजत राहा. जितकं तुम्ही पाजत राहाल तेवढा दूध पुरवठा जास्त वाढेल.
- बाळाला पाजून झाल्यावर, पंप वापरून दूध काढून टाकण्याचा प्रयत्न करा.
- तुम्ही चौरस आहार घेत आहात ह्याची खात्री करा.
- पुरेशी झोप घ्या आणि आराम करा.
८. खूप जास्त दूध येत असेल तर काय करावे?
काही मातांना स्तन दुधाने पूर्ण भरतात तेव्हा स्तनांमध्ये खूप वेदना होतात. बाळाच्या गरजेपेक्षा जास्त दूध आल्यास असे होते. कधी कधी स्तनांना सूज येते. अशावेळी सूज कमी करण्यासाठी स्तनांवर थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा कोबीची पाने ठेवा. पंप वापरून किंवा हाताने हळूहळू दाबून तुम्ही स्तनांमधून दूध काढू शकता.
९. स्तनपानादरम्यान बाळाच्या पोटात मुरडा येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
जर तुमच्या बाळाच्या पोटात मुरडा आला असेल तर तुम्ही काय खाल्ले ह्याकडे लक्ष द्या. तुमच्या बाळाला काही पदार्थ पचायला जड पडत असतील जसे की गाईचे दूध, कॉलीफ्लॉवर, चॉकलेट, ब्रोकोली, कांदे आणि मसालेदार खाद्यपदार्थ इत्यादी. या संदर्भात तुमच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधा.
१०. भेगा पडलेल्या स्तनाग्रांची काळजी कशी घ्यावी?
स्तनाग्रांना जर भेगा असतील तर स्तनपान करताना खूप दुखू शकते. प्रत्येक स्तनपानानंतर स्तनाग्रे कोरडे होऊ द्या. घट्ट ब्रा घालणे टाळा. त्वचेसाठी सौम्य मऊ आणि सुती कपडे घाला. नर्सिंग पॅड्स वेळोवेळी बदलत रहा. स्तनाग्रांवर थोडे दूध लावा, त्यामुळे ते भरून येण्यास मदत होईल.
११. जर स्तनाग्रांमधून रक्त येत असेल तर मी स्तनपान करू शकते का?
काहीवेळा स्तनाग्रांच्या भेगांमधून रक्तही येते. स्तनपानात थोडेसे रक्त आल्यास ते हानिकारक नसते. पण भेगा असतील तर बाळाला लॅच होणे अवघड जाते. अशावेळी काही लाँचिंगचे तंत्र शिकून घेण्याची गरज आहे.
१२. बाळाला स्तनपान करण्यास कसे शिकवावे?
स्तनपान करताना कुठल्याही वेदना होता काम नयेत. जर वेदना होत असतील तर बाळाला नीट लॅच होता येत नाहीये असा ह्याचा अर्थ होतो. बाळाचे तोंड पूर्ण उघडा त्यामुळे त्याला स्तनाचा जास्तीत जास्त भाग तोंडात धरता येईल. जर बाळाचे तोंड पुरेसे उघडले नाही तर स्तनाग्रे नीट तोंडात घेता ना आल्याने त्यांना भेगा पडण्याची शक्यता असते.
१३. स्तनांमध्ये वेदनादायी गाठ असणे सामान्य आहे का?
बंद दुग्धनलिकांमुळे स्तनांमध्ये वेदनादायी गाठी तयार होतात, कारण स्तनांमधून दुधाचा प्रवाह नीट होत नाही. जर तुम्ही बाळाला वारंवार पाजत राहिलात तर परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. स्तनांना हळुवार मसाज केल्याने दूध प्रवाह सुरळीत होण्यास मदत होऊ शकते.
१४. स्तनपानादरम्यान काय खाल्लं पाहिजे?
स्तनपानादरम्यान चौरस आहार घेतला पाहिजे. वातूळ पदार्थ खाणे टाळा. भरपूर पाणी, ज्युस आणि सूप प्या.
१५. निपल शिल्ड केव्हा वापरली पाहिजे?
सपाट किंवा भेगा पडलेली स्तनाग्रे असतील तर डॉक्टर निपल शिल्ड वापरण्याचा सल्ला देतात. पण ते बराच काळ वापरत राहिले पाहिजे तसेच ते वापरताना तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
१६. दुधाचा पंप केव्हा वापरला पाहिजे?
दुधाचा पंप केव्हा वापरावा याबाबत काही नियम नाहीत. ज्या मातांना बाळास स्तनपान करता येत नाही अशा बाळांना दूध देता यावे म्हणून काही माता पंपाचा वापर करतात. काही जणी दुधाचा पुरवठा वाढावा म्हणून पंप वापरतात. तुम्हाला पंप वापरायचा असेल तर दिवसातून २ वेळा स्तनपानानंतर तो वापरा.
त्यामुळे बाळाची एकवेळची भूक भागेल एवढं दूध जमा होईल.
१७. स्तनपान कावीळ म्हणजे काय?
बिलिरुबिन ची पातळी वाढल्यामुळे काही बाळांना जन्मानंतर कावीळ होते. त्यामुळे त्यांचे डोळे आणि त्वचा पिवळी दिसू लागते. काही प्रकरणांमध्ये कावीळ तीव्र होते आणि त्यामुळे स्तनपानादरम्यान बाळाला कमी दुधाचा पुरवठा होतो. त्यामुळे बाळाचे वजन झपाट्याने कमी होते व निर्जलीकरण सुद्धा होते. अशा परिस्थितीत डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधून स्तनपान सुरळीत कसे होईल ह्याविषयी मार्गदर्शन घ्यावे.
१८. स्तनपान किती काळापर्यंत करत राहावे?
WHO च्या नियमांनुसार पहिले ६महिने बाळास फक्त स्तनपान दयावे. नंतर बाळ अडीच वर्षांचे होईपर्यंत बाळास घनपदार्थांसोबत थोडे स्तनपान देत राहावे. तरीसुद्धा हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे.
१९. मी आजारी असताना स्तनपान बंद करावे का?
आजारी असताना स्तनपान बंद करण्याची गरज नाही. जर काही गंभीर आजार असतील जसे की HIV, कॅन्सर, स्तनांमध्ये गाठी वगैरे तर स्तनपान बंद केले पाहिजे. पण साधा सर्दी खोकला ताप असेल तर बाळाला पाजणे बंद करण्याची गरज नसते. अर्थात तुमच्या डॉक्टरांचा सल्ला ह्या बाबतीत अंतिम असेल.
२०. दररोज बाळाला किती वेळ पाजले पाहिजे?
नुकत्याच जन्मलेल्या बाळाला पहिले काही महिने दिवसातून ८-१२ वेळा पाजले पाहिजे. बाळाला दर ३-४ तासांनी भूक लागू शकते. प्रत्येक वेळी बाळ ५० मिली दूध पिते आणि कालांतराने ते १२० मिली पर्यंत जाते. पहिले ६ महिने दर महिना ३० मिली वाढ अपेक्षित आहे.
स्तनपानामुळे आई आणि बाळाचे अनेक रोगांपासून संरक्षण होते. त्यामुळे आईने बाळाला दीर्घकाळापर्यंत स्तनपान दिले पाहिजे.