In this Article
- वैद्यकीय गर्भपात विरुद्ध सर्जिकल गर्भपात
- गर्भपातानंतर मासिक पाळी कधी सुरू होते?
- सर्जिकल/वैद्यकीय गर्भपातानंतरच्या रक्तस्रावाबद्दल लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
- गर्भपातानंतर मासिक पाळीत होणारा बदल
- तुमची मासिक पाळी असामान्य असल्यास काय?
- मासिक पाळी दरम्याच्या क्रॅम्पिंगसाठी औषधे
- गर्भपातानंतर स्वत: ची काळजी घेण्यासाठी काही टिप्स
- तुमच्या डॉक्टरांना कधी फोन कराल?
काही स्त्रियांना गर्भपातानंतरच्या मासिक पाळीबद्दल विचार करून थोडी चिंता वाटू शकते. प्रत्येक स्त्रीसाठी गर्भपातातून बरे होण्याची प्रक्रिया वेगळी असू शकते. गर्भपाताला एखाद्या स्त्रीचे शरीर कसे सामोरे जाते, गर्भपातानंतर ती तिच्या आरोग्याची किती काळजी घेते आणि गर्भपात होण्यापूर्वी ती किती महिन्यांची गरोदर होती यासारख्या घटकांवर त्या स्त्रीची गर्भपातातून बरे होण्याची प्रक्रिया अवलंबून असते.
परंतु गर्भपातानंतरचा रक्तस्त्राव आणि प्रक्रियेनंतर नियमित मासिक पाळी सुरू होणे यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. सर्जिकल गर्भपाताच्या बाबतीत, गर्भपाताच्या प्रक्रियेनंतर रक्तस्त्राव होणे सामान्य आहे, परंतु त्यास मासिक पाळी समजू नये.
तसेच गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीत होणारे गर्भपात स्त्रीमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात. एकूणच, बहुतेक स्त्रियांना गर्भपातानंतर अनियमित किंवा विलंबित मासिक पाळी येते.
वैद्यकीय गर्भपात विरुद्ध सर्जिकल गर्भपात
सर्जिकल आणि वैद्यकीय गर्भपातामध्ये काय फरक आहे? आमच्याकडे तुमच्यासाठी उत्तरे आहेत.
सर्जिकल गर्भपात | वैद्यकीय गर्भपात |
ह्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर गर्भाशय रिकामे करण्यासाठी सक्शन वापरतात | गर्भाशयाच्या अस्तरांना सांडण्यास मदत करणारी औषधे ह्या प्रक्रियेमध्ये वापरली जातात |
तुमची शेवटची पाळी सुरू झाल्यापासून 14 आठवड्यांपर्यंत करता येते | तुमची शेवटची पाळी सुरू झाल्यापासून 9 आठवड्यांपर्यंत करता येते |
प्रक्रियेसाठी सहसा डॉक्टरांकडे एकदा जाणे आवश्यक असते | प्रक्रियेसाठी सहसा डॉक्टरांकडे एकापेक्षा जास्त वेळा जाणे आवश्यक असते |
98% परिणामकारक | 95-97% परिणामकारक |
तुम्हाला सौम्य पेटके येऊ शकतात | तुम्हाला तीव्र पेटके येऊ शकतात आणि मळमळ होऊ शकते |
वैद्यकीय गर्भपातापेक्षा सर्जिकल गर्भपात हे सामान्यतः सुरक्षित आणि अधिक प्रभावी असतात. वैद्यकीय गर्भपातामध्ये जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो आणि काही काळ टिकणारे अप्रिय दुष्परिणाम होऊ शकतात. तुमचे डॉक्टर तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचे याबाबत योग्य सल्ला देऊ शकतात.
गर्भपातानंतर मासिक पाळी कधी सुरू होते?
गर्भपातानंतर, 2 ते 6 आठवडे काही प्रमाणात रक्तस्त्राव होणे सामान्य मानले जाते. गर्भपातानंतरचा रक्तस्त्राव साधारणपणे सुरुवातीला जास्त असतो पण शेवटी हलका होतो. गर्भपातातून थोडे बरे झाल्यावर रक्तस्त्राव कमी होऊ लागतो. शरीर गर्भपातानंतरच्या पहिल्या मासिक पाळीसाठी तयारी सुरू करते आणि त्यास अनेक आठवडे लागू शकतात.
ज्या स्त्रिया त्यांच्या गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत गर्भपात करतात त्यांना गर्भपातानंतर 4 ते 8 आठवड्यांच्या आत पहिली मासिक पाळी येण्याची शक्यता असते. परंतु, जर गर्भपातानंतरचा रक्तस्त्राव 8 आठवड्यांपेक्षा जास्त काळ तसाच सुरु राहिला आणि तुमची मासिक पाळी सुरू झाली नसेल, तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
गर्भपातानंतरही शरीरातील गरोदरपणातील संप्रेरकांची पातळी जास्त असू शकते. त्यामुळे मासिक पाळीत बदल होऊ शकतात. तसेच, गर्भपात केल्याने प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नाही. त्यामुळे गर्भपातानंतर असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास, तुम्ही पुन्हा गर्भवती होऊ शकता.
सर्जिकल/वैद्यकीय गर्भपातानंतरच्या रक्तस्रावाबद्दल लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
गर्भपात झाल्यानंतर रक्तस्त्राव होण्याबद्दल लक्षात ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी येथे आहेत:
- शस्त्रक्रियेने गर्भपात केल्यानंतर, अनेक आठवडे जास्त रक्तस्त्राव होणे, किंवा अनियमित रक्तस्त्राव होणे सामान्य आहे.
- वैद्यकीय प्रक्रियेद्वारे गर्भपात केल्यानंतर, शस्त्रक्रियेच्या गर्भपातापेक्षा जास्त रक्तस्त्राव सामान्य मानला जातो.
- रक्तस्त्राव होत असताना, स्त्रावामध्ये काही उती सुद्धा असू शकतात आणि हे सहसा काही दिवस टिकते.
- तुमची नियमित मासिक पाळी सुरू होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. गर्भपाताच्या प्रक्रियेतून बरे होण्यासाठी किंवा गर्भधारणेचे हार्मोन्स तुमच्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी तुमच्या शरीराला जास्त वेळ लागू शकतो. जर तुम्ही तणाव आणि नैराश्याने ग्रस्त असाल तर तुम्हाला मासिक पाळी येण्यास विलंब होऊ शकतो.
गर्भपातानंतर मासिक पाळीत होणारा बदल
गर्भपातानंतर तुमच्या मासिक पाळीत काही बदल होऊ शकतात आणि ते पुढीलप्रमाणे आहेत:
1. रक्तप्रवाहात बदल
जर तुम्ही सर्जिकल प्रक्रियेद्वारे गर्भपात केला असेल, तर तुमच्या पहिल्या मासिक पाळीचा रक्त प्रवाह कमी होऊ शकतो. तुमच्या सामान्य मासिक पाळीच्या विपरीत, हे फक्त काही दिवस टिकू शकते. परंतु जर तुम्हाला जास्त रक्तस्त्राव होत असेल आणि तो बरेच दिवस होत राहिला तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. जर तुमचा गर्भपात वैद्यकीय माध्यमांद्वारे केला गेला असेल, तर तुम्हाला जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.
2. काही नवीन लक्षणे
गर्भपातानंतरची तुमची मासिक पाळी तुमच्या नियमित मासिक पाळीपेक्षा वेगळी आहे असे तुम्हाला आढळेल. तुम्हाला आता वेदनादायक क्रॅम्पिंग, मोठ्या रक्ताच्या गुठळ्या आढळू शकतात.पाठदुखी, स्तनाना सूज येणे आणि थकवा जाणवणे अशीही लक्षणे आढळतात. हे बदल काही महिने राहण्याची शक्यता असते.
3. अनियमित मासिक पाळी
गर्भपातानंतर, तुम्हाला मासिक पाळी नियमित येत नाही हे जाणवेल. उदाहरणार्थ, तुमच्या मासिक पाळीच्या 2 आठवड्यांनंतर तुम्हाला हलका रक्तस्त्राव दिसू शकतो. शरीरात गर्भधारणा हार्मोन्सच्या उपस्थितीमुळे असे बदल उद्भवू शकतात.
तुमची मासिक पाळी असामान्य असल्यास काय?
गर्भधारणा अचानक संपुष्टात आल्याने तुमचे शरीर गोंधळात पडते. तुमच्या शरीराला पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. गर्भधारणेच्या हार्मोन्सपासून मुक्त होण्यासाठी आणि त्याच्या नियमित चक्रात परत येण्यासाठी वेळ लागू शकतो. शरीरात गर्भधारणेच्या संप्रेरकांच्या उपस्थितीमुळे मासिक पाळीत काही बदल होऊ शकतात किंवा उशीर होऊ शकतो. गर्भपातानंतर मासिक पाळी अनियमित होऊ शकते.
तुमच्या गर्भपातानंतरच्या पहिल्या मासिक पाळी दरम्यान तुम्हाला खूप जास्त अथवा हलका रक्तस्त्राव होऊ शकतो. हा रक्तस्त्राव तुमच्या गर्भपाताच्या प्रकारावर अवलंबून असतो. रक्तस्रावासोबत रक्ताच्या गुठळ्या आणि पेटके येऊ शकतात. गर्भावस्थेतील उर्वरित सर्व उती बाहेर काढण्याचा हा शरीराचा मार्ग आहे. पुढील मासिक पाळीदरम्यान तुम्हाला ह्याचा अनुभव येऊ शकतो.
मासिक पाळी दरम्याच्या क्रॅम्पिंगसाठी औषधे
तुमचे डॉक्टर मासिक पाळीच्या क्रॅम्पिंगसाठी आयबुप्रोफेन, असिटॅमिनोफेन किंवा नॅपरोकसेन सारखी वेदनाशामक औषधे तुम्हाला सुचवू शकतात. क्रॅम्पिंग किंवा रक्तस्त्राव सुरू होताच ही औषधे घेणे उपयुक्त ठरू शकते. टॉवेलमध्ये गुंडाळलेली गरम बाटली किंवा गरम पॅड पाठीच्या खालच्या बाजूला किंवा पोटावर ठेवल्याने वेदना कमी होऊ शकतात. तुम्ही तुमचे पाय वर ठेवण्याचा प्रयत्न करू शकता किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा विचार करू शकता, परंतु डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हे करा.
गर्भपातानंतर स्वत: ची काळजी घेण्यासाठी काही टिप्स
गर्भपातामुळे स्त्रीला शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या खूप त्रास देऊ शकतो. म्हणून, गर्भपातानंतर पूर्ण बरे होण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी काही उपयुक्त टिप्स खाली दिलेल्या आहेत.
- पुरेशी विश्रांती घ्या आणि सकस आहार घ्या.
- परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भावनिक आधारासाठी तुमचे कुटुंब आणि मित्रमैत्रिणींचा आधार घ्या.
- तुमच्या जोडीदारासोबत असुरक्षित संभोग टाळा.
- तुमच्या डॉक्टरांसोबत नियमित तपासणी आणि फॉलो-अप काळजी घ्या.
- जड वस्तू उचलणे टाळा.
- थोडा वेळ जड व्यायाम करू नका.
तुमच्या डॉक्टरांना कधी फोन कराल?
तुम्हाला जास्त रक्तस्त्राव होत असल्यास – एका तासात दोन किंवा त्याहून अधिक पॅड भिजत असल्यास – किंवा वेदनादायक क्रॅम्पिंगसह रक्ताच्या मोठ्या गुठळ्या येत असल्यास तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. जर तुम्हाला वेदनादायक क्रॅम्पिंगसह रक्तस्रावातून ऊती बाहेर पडत असतील, योनीतुन दुर्गंधीयुक्त स्त्राव येत असल्यास किंवा ताप येत असल्यास, तुम्हाला वैद्यकीय मदतीची गरज भासू शकते. गर्भपात झाल्यानंतर काही स्त्रियांना मासिक पाळी उशीरा येऊ शकते. परंतु, गर्भपातानंतर मासिक पाळी येण्याची चिन्हे नसल्यास, हे चिंतेचे कारण असू शकते. तसेच, तुमच्या गर्भपातानंतर होणारा रक्तस्त्राव 8 आठवडे किंवा त्याहून अधिक काळ होत असेल तर वैद्यकीय मदतीची गरज भासू शकते. गर्भपातानंतर काही स्त्रियांना त्यांची पहिली मासिक पाळी येते परंतु दुसरी पाळी येत नाही. अशावेळी त्यांची र्भधारणा चाचणी करून घ्यावी किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गर्भपातानंतर मासिक पाळी अनियमित होणे सामान्य आहे. तरीही, काही शंका असल्यास, आवश्यक मार्गदर्शन घ्या. वेळेवर उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच योग्य असते. विनाकारण काळजी न करणे, तणावमुक्त राहणे तसेच चांगली विश्रांती व सकस आहार घेतल्याने तुमच्या शरीराला गर्भपाताच्या आघातातून बरे होण्यास मदत होईल.
आणखी वाचा:
गरोदरपणानंतरची मासिक पाळी
पाळीच्या आधी, नंतर आणि पाळीदरम्यान गर्भधारणेची शक्यता