In this Article
- घशाच्या संसर्गाची कारणे काय आहेत?
- घश्याला संसर्ग झाल्याची कोणती लक्षणे आहेत?
- घशाला संसर्ग झाल्याचे निदान कसे करावे?
- तुम्ही बाळाला स्तनपान देत असाल आणि जर तुम्हाला घशाचा संसर्ग झाला तर त्यावर उपचार कसा कराल?
- स्तनपान करताना घसादुखीवर घरगुती उपाय
- घसा दुखत असताना स्तनपान देताना घ्यावयाची खबरदारी
- स्तनपान करणाऱ्या मातांना बरे वाटण्यासाठी अतिरिक्त टिप्स
- डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
स्तनपान करणाऱ्या मातांना थकल्यासारखे वाटणे हे खूप सामान्य आहे. परंतु जेव्हा बाळाची आई आजारी असते, तेव्हा तिने बाळाला स्तनपान सुरू ठेवावे की नाही असा प्रश्न तिला पडू शकतो. स्तनपान करणा–या मातांना संसर्ग होऊ शकतो आणि त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. घसा खवखवणे हा एक प्रकारचा संसर्ग आहे. हा संसर्ग एकतर जीवाणू किंवा विषाणूंमुळे होऊ शकतो. स्तनपान करणाऱ्या आईच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. संसर्ग बरा करण्यासाठी तुम्ही घेत असलेली औषधे तुमच्या दुधाद्वारे बाळापर्यंत पोहोचू शकतात. मग तुम्ही काय करावे? स्तनपान करताना घसा खवखवण्याशी संबंधित विविध उपाय, सावधगिरीचे उपाय आणि इतर महत्त्वाच्या माहितीची चर्चा ह्या लेखात केलेली आहे.
घशाच्या संसर्गाची कारणे काय आहेत?
जर तुमचा घसा दुखत असेल आणि खवखवत असेल तसेच तुम्हाला अन्न गिळताना त्रास होत असेल तर तुम्हाला घशाचा संसर्ग झालेला असू शकतो. खालील घटकांमुळे हा त्रास होऊ शकतो.
- घशातील कोरडेपणा, घशातील स्नायू ताणणे, ऍलर्जी, जीईआरडी इत्यादींमुळे हा त्रास वाढू शकतो
- स्ट्रेप्टोकोकस पायोजेन्स सारख्या जीवाणूंमुळे त्याचा प्रसार होऊ शकतो. घसा खवखवणे कधीकधी इतर जिवाणू संसर्गाच्या लक्षणांपैकी एक असू शकते, उदा: डिप्थीरिया किंवा डांग्या खोकला
- सामान्य सर्दी किंवा इन्फ्लूएंझा सारख्या विषाणूजन्य संसर्गामुळे हा घशाचा त्रास होऊ शकतो
- चिकन पॉक्स, मोनोन्यूक्लिओसिस इत्यादीसारख्या इतर व्हायरल इन्फेक्शनच्या लक्षणांपैकी हे एक लक्षण असू शकते
घश्याला संसर्ग झाल्याची कोणती लक्षणे आहेत?
खाली नमूद केलेली काही किंवा सर्व लक्षणे दिसत असल्यास, तुम्हाला घसा खवखवण्याचा त्रास होऊ शकतो:
- गिळताना वेदना होणे
- वाढलेले टॉन्सिल
- तीव्र डोकेदुखी
- ताप
- थंडी
- वेदना
- घसा बसणे
- वाहते नाक
- शिंका येणे
घशाला संसर्ग झाल्याचे निदान कसे करावे?
घशाला संसर्ग झाल्याची लक्षणे अगदी स्पष्ट आहेत. तुमचा घसा, जबडा, नाक आणि कान यांची शारीरिक तपासणी करून, तुमचे डॉक्टर घशाला संसर्ग झाला आहे की नाही हे सांगू शकतील. परंतु, काही वेळा आरोग्यविषयक समस्येचे नेमके निदान करण्यासाठी डॉक्टर ऍलर्जी चाचण्या आणि घशातील स्वॅब कल्चर करून घेण्यास सांगू शकतात. डॉक्टर तुमच्या लालरक्त पेशींची संख्या देखील तपासू शकतात.
तुम्ही बाळाला स्तनपान देत असाल आणि जर तुम्हाला घशाचा संसर्ग झाला तर त्यावर उपचार कसा कराल?
बाळाला स्तनपान करत असाल आणि घसा खवखवण्याची समस्या उद्भवली तर कुठले औषध घ्यावे ह्याविषयी तुम्ही विचार करत आहात का? ठीक आहे, उपचाराची पद्धत मुख्यत्वे आपल्या समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असू शकते. परंतु, तुमचे डॉक्टर तुम्हाला खालील उपाय सुचवू शकतात.
- पॅरासिटामॉल आणि आयबुप्रोफेन ही काही औषधे आहेत. ही औषधे स्तनपान करवताना घसा खवखवण्यावर सुरक्षित आहेत. जर तुम्हाला ताप येत असेल आणि तुमचे अंग दुखत असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला ही औषधे लिहून देऊ शकतात. डॉक्टर तुम्हाला तुमच्या घशासाठी एक स्प्रे देऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला घसादुखीपासून आराम मिळू शकेल आणि तुम्हाला कफ ड्रॉप्स घेण्याचा सल्ला दिला जाईल
- डिकंजेस्टंट्स वापरणे टाळा कारण ते तुमच्या अंगावरच्या दुधाच्या पुरवठ्यात अडथळा आणू शकतात
- स्तनपान करताना, तुमच्या डॉक्टरांनी सुचविल्यास तुम्ही अधूनमधून अँटीबायोटिक्स किंवा अँटी–एलर्जिक औषधे घेऊ शकता
स्तनपान करताना घशाची खवखव कमी करण्यासाठी तुम्ही हे काही उपाय करू शकता. परंतु, कोणतेही औषध घेण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे
स्तनपान करताना घसादुखीवर घरगुती उपाय
ओव्हर–द–काउंटर किंवा अॅलोपॅथिक औषधे तुमच्यासाठी काम करत नसल्यास, तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. घसादुखीसाठी येथे काही प्रभावी घरगुती उपाय आहेत:
१. कॅमोमाइल चहा
कॅमोमाइल चहा प्यायल्याने तुम्हाला घसादुखी पासून आराम मिळू शकतो आणि इन्फेक्शनशी लढण्यास मदत होते. हा सुगंधित चहा घेतल्यास घशाची जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी मदत होते.
२. ज्येष्ठ मध किंवा मुळेथी
घसा खवखवणे कमी करण्यासाठी हा एक जुना उपाय आहे. घाण निघून जाण्यासाठी ज्येष्ठ मध स्वच्छ धुवून घ्या नंतर बारीक करून घ्या. मुळाचा रस घशात जाण्यासाठी चघळत राहा जेणेकरून तुम्हाला होणारा त्रास कमी होईल.
३. कोमट सूप आणि इतर द्रवपदार्थ
कोमट द्रवपदार्थ प्यायल्याने तुमच्या घशातील खाज आणि वेदना दूर होऊ शकतात. तुमचा घशाचा त्रास कमी करण्यासाठी सूप आणि इतर कोमट द्रवपदार्थ पीत रहा.
४. ऍपल सायडर व्हिनेगर
अँपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून घेतल्याने घसादुखीची लक्षणे दूर होण्यास मदत होऊ शकते.
५. वाफ घेणे
अनुनासिक रक्तसंचय आणि घश्याच्या कोरडेपणातून सुटका होण्यासाठी तुम्ही वाफ घेऊ शकता.
६. घसा ओला ठेवण्यासाठी गोळ्या किंवा वड्या (थ्रोट लोझेंज)
तुमचा कोरडा घसा ओलावण्यासाठी तुम्ही गोळ्या किंवा वड्या वापरू शकता. तुमच्या घशाला वंगण मिळण्यासाठी तुम्ही आल्याचा चहा किंवा ब्लॅक टी पिऊ शकता किंवा बर्फाचे तुकडे चोखू शकता.
७. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
तुमच्या घसादुखीवर आणि अस्वस्थता कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे दिवसातून ४ ते ५ वेळा मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे होय.
८. एल्म बार्क
ह्याची साले उकळत्या पाण्यात टाकून तुम्ही काढा बनवू शकता. घसा दुखणे आणि घशाची खवखव कमी करण्यासाठी हा चहा दिवसातून काही वेळा प्या.
९. मध आणि लिंबू पाणी
एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध घालून त्यात लिंबाचा रस पिळून घ्या. नीट ढवळून घ्या आणि हा चहा कोमट असतानाच प्या.
घसा दुखत असताना स्तनपान देताना घ्यावयाची खबरदारी
तुम्ही बाळाला स्तनपान देत असल्यामुळे तुम्ही काय खाता किंवा पिता याबद्दल तुम्ही जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. येथे काही सावधगिरीचे उपाय आहेत. हे उपाय तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत.
- तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
- शक्य तितक्या वेळा कोमट पाणी प्यावे.
- दिवसातून तीन ते चार वेळा मिठाच्या पाण्याने गुळण्या करा.
- झोपण्यापूर्वी तुम्ही कोमट हळदीचे दूध पिऊ शकता.
- तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही कच्चा लसूण खाऊ शकता.
- जंतूपासून मुक्त होण्यासाठी आपले हात वारंवार धुवा.
- बाळाच्या जवळ जाऊन शिंकू नका.
- तुमच्या बाळाजवळ खोकताना किंवा शिंकताना चेहरा झाकून घ्या.
स्तनपान करणाऱ्या मातांना बरे वाटण्यासाठी अतिरिक्त टिप्स
आजारी असणे ही सर्वसाधारणपणे चांगली भावना नसते. स्तनपान करणा–या आईला आजारी असल्यावर खूप जास्त अस्वस्थता येऊ शकते. परंतु आपण खाली नमूद केलेल्या काही टिप्सचे अनुसरण केल्यास, तुम्हाला लवकरच बरे वाटू शकते:
- जलद पुनर्प्राप्ती सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या
- तुमच्या घरामध्ये हवा खेळती राहू द्या. तुमचे घर धूळ आणि धुरापासून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा
- लवकर बरे वाटण्यासाठी कच्चा लसूण किंवा लसूण पूरक आहार घ्या
- भरपूर द्रवपदार्थ घेऊन सजलीत रहा
- गरम पाण्याने आंघोळ करा आणि वाफ घ्या
- घरातील कोरडी हवा शक्यतो टाळा. तुमची खोली खूप गरम किंवा खूप थंड नाही याची खात्री करा
- लवकर बरे होण्यासाठी तुम्ही झिंक सप्लिमेंट्स घेऊ शकता
- ज्या ठिकाणी तुम्हाला ऍलर्जी, प्रदूषण किंवा धूळ आढळते अशा ठिकाणी जाण्यापासून परावृत्त करा
- तुम्ही थंड प्रदेशात असल्यास गरम कपडे घाला
- तुम्ही दुचाकीवरून जात असाल तर कान झाका
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
तुम्हाला त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता असू शकते इतकी घसा खवखवणे ही काही गंभीर स्थिती नाही. परंतु, जर तुम्हाला खाली नमूद केलेली कोणतीही लक्षणे दिसली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे.
- घसा खवखवण्याची लक्षणे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ असल्यास
- तुम्हाला खूप ताप असल्यास आणि तो ४ अंश किंवा त्याहून अधिक असल्यास
- औषधे खाऊनही तुमचा ताप उतरत नसल्यास
- तुम्ही थायरॉईड विरोधी औषधे घेत असल्यास
घसा खवखवण्यावर घरी सहज उपचार केले जाऊ शकतात. परंतु, जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळली तर तुम्ही वैद्यकीय मदत घ्यावी.
तसेच, घसादुखीवर औषधे घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या दुधाच्या पुरवठ्यात काही बदल जाणवला तर ते तुमच्या डॉक्टरांच्या निदर्शनास आणा. औषधांमध्ये काही दोष आढळल्यास तुम्हाला ती बंद करण्यास सांगितले जाऊ शकते.
आम्हाला आशा आहे की हा लेख तुम्हाला घसा खवखवणे आणि त्याची लक्षणे हाताळण्यास मदत करेल!
आणखी वाचा:
आई आणि बाळासाठी स्तनपानाचे फायदे
स्तनपान आणि कावीळ – कारणे, उपचार आणि प्रतिबंध