In this Article
हिवाळा आता जवळ आला आहे आणि ह्या थंडीच्या दिवसात आपले शरीर उबदार ठेवणारे स्वादिष्ट पदार्थ आपल्याला आवडतात. जेव्हा बाळे घन पदार्थ खाण्यास सुरुवात करतात तेव्हा अगदी नवीन आणि वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद घेऊ लागतात. पण हिवाळ्यात तुमच्या लहान बाळाला खायला घालताना आणखी काळजी घ्यावी लागते. तुमच्या बाळाच्या आहारात बाळाची प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या तसेच सर्दी आणि फ्लूपासून बाळाचे संरक्षण करणाऱ्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. तर हिवाळ्यात, तुमच्या छोट्या बाळाला देण्याचे पदार्थ पाककृतींसह येथे दिलेले आहेत.
व्हिडिओ: पाककृतींसह लहान बाळांसाठी ५ भारतीय हिवाळी खाद्यपदार्थ
हिवाळ्यात बाळांना देण्यासाठी योग्य असलेले पौष्टिक पदार्थ आणि त्यांच्या पाककृती
तुमचे लहान बाळ जेव्हा घनपदार्थ खाऊ लागते, तेव्हा त्याच्या आरोग्यासाठी त्याला चांगले अन्न खायला मिळावे यासाठी तुम्ही थोडे सर्जनशील असणे आवश्यक आहे. येथे काही खाद्य पदार्थांच्या पाककृती दिलेल्या आहेत. ह्या पाककृतींमुळे तुमच्या बाळाला योग्य पोषण मिळेल आणि तुमचा जास्त वेळ लागणार नाही.
१. सुकामेवा घातलेले मसाला दूध
हिवाळ्याच्या हंगामात तुमच्या बाळाच्या आहारात सुक्या मेव्याचा समावेश करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. या रेसिपीमधील सुक्यामेव्यामुळे तुमचे लहान बाळ उबदार राहील आणि त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होईल.
फायदे
सुक्यामेव्यामुळे तुमच्या लहान बाळाला ताकद मिळते आणि प्रतिकारशक्ती सुधारते. मसाला दुधाची सौम्य सुगंधी चव त्याला मोहक बनवते आणि या डिशची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सुक्यामेव्याची पूड करून ठेवता येते आणि दुधात ती कधीही घालता येते.
सुचवलेली रेसिपी
- बदाम – १०
- पिस्ता – १०
- काजू – १०
- वेलची पावडर– १/२ टीस्पून
- जायफळ पावडर– १/४ – १/२ टीस्पून
- केशराच्या काड्या – २–३
- दूध: १ कप
- साखर – चवीनुसार
सुकामेवा घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. वेलची पूड आणि जायफळ पावडर बारीक केलेल्या सुक्यामेव्यामध्ये घाला आणि चांगले एकत्र करा. आता हे मिश्रण हवाबंद डब्यात ठेवा. कढईत दूध घाला आणि गरम होईपर्यंत गरम करा. पण दुधाला उकळी आणू नका. साखर घाला आणि चांगले ढवळा, नंतर सुकामेव्याचे मिश्रण घाला जेणेकरून दूध घट्ट होईल. गॅसवरून दुधाचे भांडे खाली घ्या. कपांमध्ये दूध घाला आणि हे स्वादिष्ट पेय केशरच्या काड्यानी सजवा आणि त्यावर थोडे सुक्यामेव्याचे मिश्रण शिंपडा.
२. फ्लफी आणि चीझी स्क्रॅम्बल्ड अंडी
अंडी हे सर्वात अष्टपैलू खाद्यपदार्थांपैकी एक आहे आणि अंड्यांचे पदार्थ बनवणे खूप सोपे आहे. अंड्याची ही उत्कृष्ट पाककृती करून पहा. तुमच्या मुलांना ही पाककृती खूप आवडेल.
फायदे
अंडी हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे आणि त्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ही खनिजे तुमच्या मुलाच्या वाढीस आणि विकासास मदत करतात. चीज हा उच्च प्रथिनांचा आणखी एक स्रोत आहे आणि त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे ए आणि डी देखील आहेत.
सुचवलेली रेसिपी
- अंडी – २
- पाणी – १/४ टीस्पून
- लोणी– १/२ टीस्पून
- चिरलेले चेडर चीज– २ टेस्पून
- चवीनुसार मीठ आणि मिरपूड
एका वाडग्यात, अंडी फेटून घ्या आणि फेटलेल्या अंड्यांमध्ये पाणी, मीठ आणि मिरपूड घाला. एका पॅनमध्ये, लोणी वितळवून अंड्याचे मिश्रण घाला. ३ ते ५ मिनिटे अंडी चांगली फेटून घ्या. एकदा तुम्हाला हवी ती सुसंगता मिळाली की, पॅन गॅसवरून खाली घ्या आणि अंड्यामध्ये चीज घाला.
३. गार्लिक बटर ब्रोकोली
तुमच्या मुलांमध्ये ब्रोकोलीची आवड निर्माण करायची आहे का? परंतु ते कसे करायचे हे माहित नाही का? परंतु काळजी करू नका तुमच्या मुलांना ही भाजी लवकरच आवडू लागेल.
फायदे
ब्रोकोलीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात आणि ती बाळाच्या विकासासाठी आवश्यक असतात. ब्रोकोली मध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. ब्रोकोली मुळे हाडांचा विकास चांगला होतो. याव्यतिरिक्त, लसूण रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि फ्लू आणि सर्दीपासून शरीराचे संरक्षण करते.
सुचवलेली रेसिपी
- ब्रोकोली– १ घड किंवा १/२ किलो
- लसूण– २ पाकळ्या, चिरून
- लोणी – २ चमचे (नसाल्ट केलेले)
- चवीनुसार मीठ आणि मिरपूड
हलक्या खारट पाण्यात ब्रोकोली मऊ होईपर्यंत उकळवा. एका पॅनमध्ये, लोणी वितळवून लसूण मऊ होईपर्यंत शिजवा. शिजवलेली ब्रोकोली पॅनमध्ये घाला आणि मीठ आणि मिरपूड मिक्स करा. ही डिश स्नॅक म्हणून किंवा जेवणात साइड डिश म्हणून दिली जाऊ शकते.
४. क्रीम ऑफ टोमॅटो सूप
हे एक तिखट सूप आहे आणि ते मलई, मसाले आणि ताज्या टोमॅटोपासून बनवले जाते. हे सूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे.
फायदे
ह्या सूपमध्ये व्हिटॅमिन सी असते आणि ते नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवते. एक वाटी टोमॅटो सूप घेतल्यास खूप ताजेतवाने आणि उत्साहवर्धक वाटते. लहान मुलांना ते आवडेल.
सुचवलेली रेसिपी
- टोमॅटो : ३ ते ४
- कांदे: १ टेस्पून, बारीक चिरून
- लसूण: ४ लहान पाकळ्या, बारीक चिरून
- ब्रेड क्यूब्स: पर्यायी
- लोणी/तूप: १ टीस्पून
- मिरी पावडर: १/२ टीस्पून
- ताजी मलई: १ टीस्पून
टोमॅटो नीट धुवून नंतर उकडून घ्या. उकडलेले आणि सोललेले टोमॅटो बारीक करून बारीक प्युरी बनवा. ब्रेडचे चौकोनी तुकडे थोड्या बटरमध्ये भाजून घ्या. कढईत उरलेले लोणी वितळवून त्यात चिरलेला कांदा आणि लसूण घाला. कांदे सोनेरी रंगाचे झाले की त्यामध्ये प्युरी केलेले टोमॅटो घाला. नंतर १/४ कप पाणी घालून मध्यम आचेवर उकळा. मीठ, मिरपूड आणि ताजी मलई घालून चांगले एकत्र करा. टोस्ट केलेल्या ब्रेडचे चौकोनी तुकडे घालून गरम सर्व्ह करा.
५. भाज्या आणि मसूर सूप
एक वाटी मलईदार आणि चविष्ट सूप घेतल्यानंतर तुमच्या लहान मुलाचे पोट भरलेले असेल. जर तुमचे लहान बाळ नीट पौष्टिक जेवण खात नसेल तर तुम्ही त्याला भाज्या आणि मसूरचे सूप देऊ शकता.
फायदे
विविध प्रकारच्या भाज्या, मसूर आणि हलके मसाले पौष्टिकतेने परिपूर्ण असतात. शेंगा आणि भाज्या देखील प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांचा चांगला स्रोत आहेत.
सुचवलेली रेसिपी
- मूग डाळ ४ चमचे
- जिरे: १/४ टीस्पून
- गाजर, बीन्स, मटार, बटाटा: १ कप, एकत्र करा
- लसूण: १ किंवा २
- लोणी/तूप: १/४ टीस्पून.
- चवीनुसार मीठ आणि मिरपूड
चिरलेल्या भाज्या घालून मूग शिजवून घ्या. मूग किंचित थंड होऊ द्या आणि गुळगुळीत पेस्ट बनवा. लोणी किंवा तूप घालून पुन्हा गरम करा आणि त्यात मीठ आणि मिरपूड घाला आणि गरम सर्व्ह करा.
६. बदाम हलवा
हे एक स्वादिष्ट, आरोग्यदायी मिष्टान्न आहे आणि ते दूध, साखर, तूप आणि बदाम घालून बनवले जाते.
फायदे
हिवाळ्यात बदाम खाल्ल्यास शरीराला उष्णता मिळते आणि बदाम पचन प्रक्रियेला चालना देतात. बदाम हे प्रथिनांचे एक चांगले स्त्रोत देखील आहेत. बदाम हाडे मजबूत करण्यास मदत करतात. बदामात प्रथिने आणि कर्बोदकांमधे भरपूर असल्याने, बाळांना त्वरित ऊर्जा प्राप्त होते.
सुचवलेली रेसिपी
- बदाम: १ कप
- दूध: ३/४ कप
- साखर:३/४
- तूप: १/४ कप
बदाम ४ तास भिजत ठेवा आणि नंतर बदामाचे साल काढून घ्या. बदाम, साखर आणि दूध मिक्सरमध्ये एकत्र करून जाडसर पेस्ट तयार करा. २ टेस्पून कढईत घालून वितळून घ्या आणि त्यामध्ये ही बदामाची पेस्ट घाला. सतत ढवळत असताना उरलेले तूप घाला. हलवा घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. हलवा मऊ असावा. चिकट किंवा ओलसर नसावा.
७. गाजर हलवा
हे भारतातील एक पारंपारिक मिष्टान्न आहे. शरीराला उबदार ठेवण्यासाठी हिवाळ्यात गाजर हलवा तयार केला जातो.
फायदे
या रेसिपीमध्ये तूप, सुकामेवा, दूध तसेच ताजे गाजर इत्यादी घटक आवश्यक असतात. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक पोषक घटक असतात. पांढऱ्या साखरेऐवजी पाम किंवा ब्राऊन शुगर घातल्यास ते अधिक आरोग्यदायी बनते.
सुचवलेली रेसिपी
- गाजर: ३
- दूध: १ कप
- पाम/ब्राऊन शुगर: १/२ कप
- तूप: ३ चमचे
- काजू: १०
- मनुके: १ टेस्पून.
गाजर स्वच्छ धुवा, सोलून आणि किसून घ्या. एक चमचा तुपात काजू आणि बेदाणे घालून तळून घ्या. काजू तळून झाल्यावर पॅनमधून काढून घ्या. किसलेले गाजर घालून कच्ची चव जाईपर्यंत परतून घ्या. दूध घालून मध्यम आचेवर शिजवा. दूध आटले की साखर घाला. हलवा घट्ट झाल्यावर त्यात तळलेले काजू आणि बेदाणे घालून गॅस बंद करा.
हिवाळ्यात तुमच्या बाळाला कोणते पदार्थ द्यायचे याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास, वर नमूद केलेले पदार्थ बाळाला देऊन पहा. ह्या पदार्थांमधील पौष्टिक घटकांमुळे तुमच्या बाळाचे पोट भरेल.
आणखी वाचा:
बाळांसाठी सर्वोत्तम फळे आणि भाज्यांच्या रसांची यादी
बाळांना सुकामेवा कधी द्यावा आणि बाळांसाठी त्याचे आरोग्यविषयक फायदे