In this Article
बाळाची वाढ आणि विकास कसा होतो हे समजून घेण्यासाठी, तसेच बाळाची काळजी अधिक चांगल्या प्रकारे घेण्यासाठी वैज्ञानिक प्रगतीची मदत होते. परंतु, अजूनही काही वेळा पारंपरिक विचारसरणी मुळे अनेक अंधश्रद्धा आहेत आणि ह्या अंधश्रद्धांमुळे बाळाचे पालक आणि इतर नातेवाईकांना बाळाची चिंता वाटू लागते. बाळाचे दात येताना ताप येतो आणि त्याविषयी असेच काही गैरसमज आहेत. त्यामुळे बाळाला दात येतानाची परिस्थिती नीट हाताळली जात नाही. तुम्हाला मिथक आणि वास्तविकता यातील फरक माहिती असल्यास परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळण्यास मदत होऊ शकते.
व्हिडिओ: बाळाला दात येण्याबाबतची मिथके आणि त्यामागील तथ्य
बाळाला दात येतानाचे समज आणि अंधश्रद्धा
बाळाचा विकास होत असताना दात येणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. आम्ही येथे काही मिथके आणि त्यामागील वास्तविक तथ्ये दिलेली आहेत. त्यामुळे तुमच्या लहान बाळाला दात येत असताना त्याबाबत तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे माहिती मिळू शकते.
१. मिथक
तुम्ही तुमच्या लहान बाळासाठी फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरू नये कारण ते त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते आणि नवीन दातांना त्यामुळे हानी पोहोचू शकते
तथ्य:
होय, तुमचे बाळ त्याच्या तोंडात येणारी प्रत्येक गोष्ट गिळू शकते. त्यामुळे बाळ टूथपेस्ट सुद्धा गिळू शकेल ह्याबाबत तुम्हाला चिंता वाटू शकते. त्यामुळे तुमच्या बाळाच्या वयाला योग्य अश्या टूथपेस्टचा वापर करून, त्याचे दात घासत असताना नीट लक्ष दिल्यास बाळाचे टूथपेस्ट गिळणे टाळता येऊ शकते. फ्लोराईडयुक्त टूथपेस्ट वापरल्यास दात किडणे रोखता येऊ शकते.
२. मिथक
जर बाळाचे वरचे दात येण्यास आधी सुरुवात झाली तर, बाळाच्या मामावर वाईट वेळ येईल आणि त्यामुळे त्याच्या जीवाला सुद्धा धोका पोहोचू शकतो.
ह्यावर लोक अनेक उपाय करतात. त्यापैकी काही लोक बाळाच्या आईला तिच्या भावाला भेटायला जाण्यास सांगतात. तर काही जण बाळाच्या दातांना तांब्याचे नाणे लावतात.
तथ्य:
हे एक हास्यास्पद मिथक आहे. देशाच्या उत्तरेकडील भागात असा गैरसमज जास्त आहे. ह्या अंधश्रद्धेवरचा उपाय आणखी हास्यास्पद आहे. दात येण्यासारख्या एखाद्या लहान घटनेमुळे एखाद्या व्यक्तीवर कोणताही परिणाम होत नाही. हे समजून घेणे आवश्यक आहे.
३. मिथक
शिशुंचे दात घासण्यास सुरुवात करणे चांगले नाही. दात घासायला सुरुवात करण्यापूर्वी मूल मोठे असणे गरजेचे आहे. त्यांना कोणत्याही अतिरिक्त काळजीची आवश्यकता नाही.
तथ्य:
तुमच्या मुलाच्या हिरड्या संवेदनशील किंवा मऊ असू शकतात परंतु त्यांना दात आल्यानंतर दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. दात दिसू लागल्यानंतर लगेच आपल्या बोटाना थोडी टूथपेस्ट लावून हिरड्याना मसाज करून दात स्वच्छ करणे गरजेचे आहे.
४. मिथक
दात येताना वेदना होणे हे काही चांगले लक्षण नाही आणि पहिला दात आल्यावर देवाला कोंबडे वाहून ह्या वेदना कमी केल्या जाऊ शकतात.
काही भागात, पहिला दात आलेला दिसला की लगेच मुलाच्या तोंडावर चापट मारतात. काही भागात लोक गाढवाचे चुंबन घेऊन त्या वेदना प्राण्याला देतात किंवा बाळाच्या पाळण्याजवळ कच्चे अंडे लटकवतात.
तथ्य:
वेदनांना प्रतिकार करण्याचे हे मार्ग विचित्र आहेत. ते केवळ अतार्किक नाहीत तर त्यामुळे बाळांना हानी पोहचू शकते. तसेच त्याला किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना दुखापत होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि बाळाला गंभीर हानी पोहोचण्याची शक्यता असते. दात येताना चावण्यासाठी चकती किंवा खेळणी वापरणे हे बाळाला शांत करण्यासाठी काही उपाय आहेत.
५. मिथक
जेव्हा आपल्याला दातांची समस्या असते तेव्हाच आपल्याला दंतवैद्याकडे जावे लागते. लहान मुले सहसा ३ वर्षांची होईपर्यंत त्यांना दंतवैद्याची गरज नसते. त्यांना जेव्हा सगळे दात येतात किंवा कायमचे दात येतात तेव्हा त्यांच्या दातांच्या पहिल्या तपासणीची वेळ येते.
तथ्य:
बाळाचा जेव्हा पहिला दात दिसू लागतो तेव्हा लोकांच्या मतांपेक्षा दंतवैद्यांची भूमिका महत्वाची असते. बाळाचा पहिला दात, भविष्यात त्याच्या दातांचे आरोग्य कसे राहील ह्याचे चांगले संकेत देतो आणि नंतर दातांची समस्या उद्भवण्याची शक्यता असल्यास आपले दंतचिकित्सक आपल्याला दातांची काळजी घेण्यास मदत करू शकतात.
६. मिथक
बाळाचे वय ८ महिने किंवा त्याहून जास्त झाल्यानंतरच बाळाला दात येऊ लागतात. जर एखाद्या बाळाला जन्मतःच एक किंवा दोन दात असतील तर ते एक अपवित्र आणि राक्षस गुण असल्याचे चिन्ह आहे. तो राक्षस किंवा वाईट व्यक्ती होऊ नये म्हणून ताबडतोब दात काढणे आवश्यक आहे.
तथ्य:
वर दिलेल्या मिथकांप्रमाणेच हे मिथक सुद्धा हास्यास्पद आहे. कदाचित त्याहूनही अधिक! आईच्या पोटात असतानाच बाळाला दात का असतात ह्याचे स्पष्टीकरण देणारे कोणतेही निर्णायक पुरावे नाहीत. संप्रेरकांमध्ये होणारे बदल तसेच वाढीला उत्तेजन देणाऱ्या गोष्टींमुळे असे होऊ शकते. तरीसुद्धा, जर जन्मतःच बाळाला दात असतील आणि ते सैल असतील, तर तुमचे डॉक्टर नंतर कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी ते काढून टाकू शकतात.
७. मिथक
जर एखाद्या बाळाला लवकर दात आले तर पुढील वर्षभरात त्याला भावंडं असतील आणि त्यांच्यासोबत तो खेळू शकेल.
तथ्य:
काही बाळांना ६ महिन्यांचे असताना दात येतात. ज्या प्रक्रियेद्वारे स्त्री गर्भवती होऊ शकते अशी एकच प्रक्रिया आहे आणि ती सर्वांना माहिती आहे. दात येण्याशी त्याचा काहीही संबंध नाही.
८. मिथक
जर बाळाच्या दातांमध्ये कीड निर्माण झाली तर त्यावर लगेच उपचार करण्याची गरज नाही तसेही हे दात पडणारच आहेत.
तथ्य:
जरी हे दात पडणार असतील तरीसुद्धा दातांना किड लागल्यावर संसर्ग वाढू शकतो आणि त्यामुळे नंतर बाळांना खूप वेदना होऊ शकतात. दातांमध्ये पोकळी असल्यास ती भरून काढणे जरुरीचे आहे आणि जितका उशीर होईल तितके ते दातांच्या डॉक्टरांना हाताळणे कठीण होईल.
९. मिथक
दात येताना नेहमी ताप येतो आणि ते बाळासाठी त्रासदायक ठरू शकते त्यामुळे लगेच औषधोपचार करणे आवश्यक आहे.
तथ्य:
निश्चितच, दात येताना झोपेच्या वेळी त्रास होणे, चिडचिड होणे आणि शरीराच्या तापमानात थोडीशी वाढ होणे ह्यासारखी काही लक्षणे दिसून येतात. परंतु शरीराच्या तापमानात हलकी वाढ झाल्यास त्याला ताप म्हणता येणार नाही. जर तुमच्या बाळाला ताप येत असेल, तर ते कदाचित दुसऱ्या संसर्गाचे किंवा रोगाचे लक्षण असू शकते. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
१०. मिथक
कोंबडी किंवा इतर प्राण्यांचे मांस हाडांसह बाळाला दिल्यास त्यामुळे दातदुखी कमी होते तसेच दातांचे सुद्धा संरक्षण होते.
तथ्य:
हिरड्यांवर दाब दिल्यास दातदुखी कमी होऊ शकते, परंतु मांसाचे पदार्थ किंवा इतर हर्बल मणी वापरणे टाळले पाहिजे कारण त्यातील रसायने आणि इतर घटक मुलासाठी घातक ठरू शकतात. त्याऐवजी घरगुती टीदिंग बिस्किटे तुम्ही वापरू शकता.
बाळाला दात येतानाच्या ह्या वेगवेगळ्या अंधश्रद्धा वाचून आणि त्यामागची कल्पनाशक्ती बघून खूप मनोरंजन होऊ शकते. परंतु, ह्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे आणि खऱ्या आयुष्यात त्या समस्येवर उपाय शोधला पाहिजे. दात येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक मूल त्यास वेगवेगळा प्रतिसाद देते. परंतु, काही वेळा ही प्रक्रिया थोडी आव्हानात्मक असू शकते, कारण प्रत्येक दात येताना बाळाला वेदना होऊ शकतात आणि दात येतानाची लक्षणे दिसू शकतात. दात येण्याच्या विविध टप्प्यांबद्दल माहिती मिळवा. तुमच्याकडे माहिती असल्यास, तुम्ही त्या टप्पास सामोरे जाताना तुमच्या जवळ टिप्स आणि उपाय असतील. या मिशनमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी एक बेबी टीथिंग टूल उपयुक्त ठरेल! कोणत्या वयात कोणता दात येतो हे समजून घेण्यासाठी दिलेल्या प्रतिमेच्या वेगवेगळ्या भागांवर क्लिक करा. तुम्ही तुमच्या बाळाचे दात एकामागून एक केव्हा येतात ते दिवस देखील रेकॉर्ड करू शकता किंवा बाळाला दात येण्याबद्दल अधिक लेख शोधण्यासाठी टूलमधून स्क्रोल करू शकता.
आणखी वाचा:
बाळाला दात येतानाची लक्षणे
बाळांना उशिरा दात येण्यामागची कारणे आणि गुंतागुंत