In this Article
फॉर्म्युला फिडींग खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहे. फॉर्मुल्याची संरचना आणि त्यामधील घटक हे बऱ्याच अंशी आईच्या दुधाशी अगदी मिळते जुळते आहेत. परंतु त्यामुळे नैसर्गिक सत्य बदलत नाही. स्तनपानाचा उद्देश बाळाची भूक भागवण्याचा पलीकडला आहे. स्तनपान आई आणि बाळामध्ये बंध निर्माण करण्यास मदत करते. ज्या स्त्रिया आपल्या बाळाला स्तनपान देण्यास उत्सुक नसतात त्यांना ह्या लेखाचा नक्कीच उपयोग होईल. फॉर्म्युला फीडिंगपेक्षा हा एक चांगला पर्याय का आहे हे समजून घेतल्यास त्यांना खूप फायदा होईल.
व्हिडिओ: बाळांसाठी आणि मातांसाठी स्तनपानाचे आश्चर्यकारक फायदे – ह्याबद्दल तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.
कोलोस्ट्रमचे फायदे
कोलोस्ट्रम हे स्तनांद्वारे तयार केले जाणारे पहिले दूध आहे. काही तज्ञ ह्यास ‘हाय ऑक्टेन मिल्क‘ देखील म्हणतात. हे दूध कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि प्रतिपिंडांनी समृद्ध असते. प्रमाण कमी असल्याने, हे बाळासाठी अगदी योग्य असे पहिले अन्न आहे. जेव्हा बाळ कोलोस्ट्रमचे स्तनपान करते, तेव्हा ते पहिले लसीकरण केल्यासारखेच असते कारण कोलोस्ट्रम अँटीबॉडीज आणि इम्युनोग्लोबुलिनने समृद्ध असते. ते रेचक म्हणून देखील कार्य करते आणि बाळाला त्याचे पहिले मल उत्सर्जित करण्यास मदत करते. त्याद्वारे बिलिरुबिन शरीराच्या बाहेर फेकले जाते आणि बाळाला कावीळ होत नाही.
कोलोस्ट्रम एक नैसर्गिक लस म्हणून काम करते कारण त्यात रोगप्रतिकारक घटकांचे प्रमाण सर्वाधिक असते. हे घटक बाळाला संसर्गापासून वाचवतात. गर्भाशयात असताना, बाळाची नाळ, बाळाच्या रक्ताभिसरण प्रणालीला इम्युनोग्लोब्युलिन जी(आयजीजी) नावाच्या प्रतिपिंडाचा पुरवठा करत राहते. ही प्रतिपिंडे रोगांशी लढा देण्यास मदत करतात. जन्माला आल्यावर, कोलोस्ट्रम बाळाला इम्युनोग्लोब्युलिन ए (आयजीए) नावाच्या दुसऱ्या प्रतिपिंडांचा पुरवठा करतात. त्यामुळे बाळाचा घसा, फुफ्फुस आणि आतड्यांतील श्लेष्मल त्वचा यासारख्या भागांना संरक्षण मिळते.
नवजात बाळाचे आतडे हे पारदर्शक असते. कोलोस्ट्रममुळे बाळाचे बाहेरील घटकांपासून संरक्षण होते. पचनसंस्थेवरील छिद्रांवर कोलोस्ट्रमचा थर हे कार्य करते. कोलोस्ट्रममध्ये ल्युकोसाइट्स नावाच्या संरक्षणात्मक पांढऱ्या पेशी देखील जास्त असतात. ह्या पेशी सूक्ष्मजंतूंपासून बचाव करतात.
फॉर्म्युल्यापेक्षा स्तनपान कसे चांगले आहे?
आईचे दूध हा बाळाच्या अन्नाचा नैसर्गिक स्रोत आहे. आईचे दूध हे बाळाला आवश्यक असलेले कार्बोहायड्रेट, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संक्रमणाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिपिंडांनी भरलेले असते. आईच्या दुधात चरबीचे प्रमाण सुद्धा कमी असते. फॉर्मुला घेणाऱ्या बाळांमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त दूध घेण्याची शक्यता असते, तसे स्तनपान घेणाऱ्या बाळांमध्ये होत नाही. आईचे दूध बाळाला वेगवेगळ्या चवींसाठी तयार करते. आईच्या आहारानुसार दुधाची चव बदलत असल्याने बाळ मोठे होऊन पोषक पदार्थ खाऊ लागते. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे बाळाला रोगप्रतिकारक शक्ती आईच्या दुधामुळे मिळते. जेव्हा जेव्हा बाळ आजारी पडते आणि संसर्ग आईला सुद्धा होतो तेव्हा तिचे शरीर बाळामध्ये संसर्गाशी लढण्यासाठी प्रतिपिंड तयार करू शकते. ही प्रतिपिंडे आईच्या दुधाद्वारे बाळाला पुरवली जातात.
बाळासाठी स्तनपानाचे फायदे
स्तनपान ही बाळांसाठी सर्वात नैसर्गिक आहार पद्धत आहे आणि त्याचे जास्तीत जास्त फायदे आहेत कारण आईच्या दुधात बाळांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी योग्य प्रमाणात असतात. काही सुप्रसिद्ध फायदे खालीलप्रमाणे आहेत:
१. पोषणाचा संपूर्ण स्रोत
आईच्या दुधात कर्बोदके, प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे योग्य संतुलन असते आणि ते बाळासाठी पचनासाठी आणि शोषण्यासाठी सोपे असते. कालांतराने वाढत्या बाळाच्या पोषणाची मागणी पूर्ण करण्यासाठी आईच्या दुधातही बदल होतो.
२. प्रतिकारशक्ती वाढवते
जन्मानंतर बाळाला दिले जाणारे कोलोस्ट्रम अनेक रोगांशी सामना करण्यासाठी सक्षम असलेल्या प्रतिपिंडांनी समृद्ध असते. आईच्या दुधात संक्रमण, ऍलर्जी यांच्याशी लढण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिपिंडे असतात. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे बाळाचे कानाच्या संसर्गापासून सुद्धा संरक्षण होते. फॉर्म्युला घेणाऱ्या बाळांमध्ये कानाचा संसर्ग जास्त प्रमाणात आढळतो. फॉर्म्युला घेणाऱ्या बाळांच्या तुलनेत स्तनपान करणा–या बाळांना श्वासोच्छवासाच्या समस्या कमी निर्माण होतात.
३. आईशी बंध
स्तनपानामुळे आई आणि बाळाचे नाते अधिक घट्ट होते. स्तनपान देताना आई आणि बाळामध्ये जवळीक वाढते. बाळाला आईच्या कुशीत सुरक्षित वाटते.
४. अतिसाराचे प्रमाण कमी होते
बाटलीने फॉर्मुला घेणाऱ्या बाळांच्या तुलनेत स्तनपान घेणाऱ्या बाळांमध्ये अतिसाराचे प्रमाण कमी आढळते. जेव्हा बाळांना बाटलीने पाजले जाते तेव्हा पचनसंस्थेमध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते कारण बाटल्या दूषित असू शकतात. याउलट, स्तनपान अधिक स्वच्छ असते आणि आईचे दूध संक्रमणांशी लढा देण्यास मदत करते.
५. SIDS चा धोका कमी होतो
संशोधनानुसार, स्तनपान करणा–या बाळांच्या बाबतीत ‘सडन इन्फन्ट डेथ सिंड्रोम‘ ची शक्यता कमी होते. स्तनपान करणा–या बाळांमध्ये संसर्गाशी सामना करण्यासाठी उच्च प्रतिकारशक्ती असते आणि त्यामुळे ह्या सिंड्रोमची शक्यता कमी होते.
६. मेंदूचा उत्तम विकास
स्तनपान करणारी मुले अधिक हुशार असतात आणि त्यांचा बुद्ध्यांक जास्त असतो असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यांच्याच वयाच्या फॉर्म्युला घेणाऱ्या बाळांपेक्षा ही बाळे थोडी लवकर विकासात्मक टप्पे गाठतात आणि भाषा शिकू शकतात तसेच कोडी सोडवू शकतात. जसजशी ही बाळे वाढतात तसे वर्तन आणि शिकण्याच्या कमी समस्या येतात. तसेच त्यांना फायदे मिळत राहतात. स्तनपान करणा–या मुलांमध्ये देखील फॉर्म्युला पाजलेल्या मुलांपेक्षा चांगली संज्ञानात्मक कौशल्ये असतात.
७. लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका कमी होतो
बाटलीने दूध पिणारी बाळे जास्त दूध पितात आणि त्यामुळे लठ्ठ होण्याची शक्यता २० ते ३० टक्के जास्त असते. स्तनपान घेणाऱ्या मुलांच्या तुलनेत त्यांना नंतरच्या आयुष्यात लठ्ठपणाचा धोका वाढतो. आईच्या दुधातील संतुलित पोषणामुळे मुलांना मधुमेह होण्याचा धोका ३५ टक्क्यांनी कमी होतो.
८. बालपणात कर्करोगाचा धोका कमी होतो
अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आलेले आहे की स्तनपान करणा–या बाळांना वयाच्या १५ वर्षांपूर्वी होणारा बालपणातील कर्करोगाचा धोका कमी होतो. दुसरीकडे, बाटलीने पिणाऱ्या बाळांना बालपणातील कर्करोगाचा धोका आठपट जास्त असतो.
९. हृदयविकाराचा धोका कमी
स्तनपान करणा–या बाळांना उच्च रक्तदाबाची समस्या होत नाही. पहिल्या सहा महिन्यांत स्तनपान करणा–या बाळांना त्यांच्या नांतरच्या आयुष्यात हृदयविकार होण्याची शक्यता कमी असते
आईसाठी स्तनपानाचे फायदे
मूल आणि आई दोघांच्याही फायद्यासाठी स्तनपानाची शिफारस केली जाते. ह्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे बरेच फायदे होतात
१. भावनिक पूर्तता आणि बंधन
बहुतेक मातांना त्यांच्या बाळाच्या संगोपनातून निर्माण झालेल्या भावनिक बंधनामुळे आनंद आणि समाधानाची भावना असते. बाळाला स्तनपान देताना ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते. ह्या संप्रेरकांमुळे बाळाशी प्रेम आणि आसक्तीच्या भावना वाढवण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, प्रोलॅक्टिन नावाचे संप्रेरक आईपणाची भावना वाढवते आणि बाळाचे पालनपोषण करण्याची गरज निर्माण करते.
२. स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो
अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आलेले आहे कि ज्या स्त्रिया स्तनपान करतात त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका २५ % पर्यंत कमी होतो. हा धोका स्त्रीच्या आयुष्यादरम्यान केलेल्या स्तनपानाच्या एकूण कालावधीच्या प्रमाणात असतो. म्हणजेच, ज्या स्त्रियांनी सर्वाधिक महिने स्तनपान केले आहे, त्यांना हा धोका सर्वात कमी असतो.
३. प्रसूतीनंतरच्या समस्या कमी करते
स्तनपान देणाऱ्या स्त्रिया बाळंतपणानंतर लवकर आणि सहज बऱ्या होतात कारण ऑक्सीटोसिनसारखे हार्मोन्स गर्भाशयाला लवकर सामान्य स्थितीत येण्यास आणि प्रसूतीनंतरचा रक्तस्त्राव कमी करण्यास मदत करतात. प्रसूतीनंतरची उदासीनता कमी करणे आणि गरोदरपणात वाढलेले वजन सहजतेने कमी करणे हे देखील स्तनपानाचे फायदे आहेत.
४. गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो
ओव्हुलेशनला उशीर होत असल्याने, स्तनपान गर्भाशयाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यास मदत करते. संशोधकांच्या मते, जेव्हा ओव्हुलेशन वारंवार होते तेव्हा पेशी उत्परिवर्तनाचा धोका (ज्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो) जास्त असतो.
५. नैसर्गिक आणि सोयीस्कर
स्तनपानामुळे बाळाला नेहमीच ताजे आणि सुरक्षित दूध मिळते आणि ह्या दुधाचे तापमान देखील बाळासाठी योग्य असते. बाटल्या गरम करण्याची, उकळण्याची किंवा निर्जंतुकीकरण करण्याची गरज भासत नाही. बाळाला दूध देण्याच्या ह्या पद्धतीमध्ये कुठलाही त्रास नाही. ही पद्धत दिवसाच्या कोणत्याही वेळी आणि विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त उपयोगी आहे कारण तुम्हाला फॉर्म्युला तयार करण्यासाठी उठावे लागत नाही. स्तनपान देत असल्यास तुम्हाला तुमच्या बाळासोबत बाहेर जाणे सोपे होते कारण सामानाने भरलेली पिशवी घेऊन जाण्याची गरज नाही.
६. खर्च होत नाही
फॉर्म्युला किफायतशीर नाही आणि ब्रँड नुसार फॉर्मुल्याच्या किमती बदलतात. तर स्तनपानादरम्यान, बाळाला दूध पाजण्यासाठी आईला दररोज फक्त ५०० कॅलरीजचा अतिरिक्त वापर करावा लागतो. बाटली आणि फॉर्म्युला फीडिंगमुळे अधिक संसर्ग देखील होतो, त्यामुळे वैद्यकीय बिले वाढतात.
७. नोकरदार महिलांसाठी सोयीस्कर
ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया बाळांना जवळच्या पाळणाघरामध्ये ठेवतात त्यांना ब्रेकच्या वेळात बाळाला स्तनपान करता येते. बाळाला द्यावयाचे दूध काढण्यासाठी आणि साठवण्यासाठी ब्रेस्ट पंप वापरला जाऊ शकतो.
८. पर्यावरणास अनुकूल
बाळाला फॉर्म्युला द्यायचा असल्यास त्यासाठी स्टोरेज कॅन आणि कंटेनर आवश्यक आहे आणि फॉर्म्युला तयार करण्यासाठी ऊर्जा देखील लागते. तसेच टाकून दिलेल्या बाटल्या आणि पॅकेट्स मुळे कचरा देखील निर्माण होतो. स्तनपानामुळे कचरा किंवा प्रदूषण निर्माण होत नाही.
आई आणि बाळ दोघांसाठीही स्तनपानाचे शारीरिक आणि भावनिक फायदे आहेत. आईला काही वैद्यकीय कारणामुळे बाळाला स्तनपान देता आले नाही तरच बाळाला फॉर्मुला द्या अन्यथा बाळाला स्तनपान देणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
आणखी वाचा:
बाळाला स्तनपान कसे कराल?
नवजात बाळाला स्तनपान देण्यासाठी १० टिप्स