Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गुंतागुंत नाळ खाली सरकण्याची (प्लॅसेंटा प्रेव्हिया) कारणे, धोके आणि उपचारपद्धती

नाळ खाली सरकण्याची (प्लॅसेंटा प्रेव्हिया) कारणे, धोके आणि उपचारपद्धती

नाळ खाली सरकण्याची (प्लॅसेंटा प्रेव्हिया) कारणे, धोके आणि उपचारपद्धती

प्लॅसेंटा म्हणजे पॅनकेक च्या आकाराचा एक अवयव असतो आणि जेव्हा स्त्री गरोदर असते तेव्हा तो स्त्रीच्या गर्भाशयाच्या आवरणामध्ये वाढतो. बाळाला ऑक्सिजन आणि पोषणमूल्यांचा पुरवठा नाळ करते तसेच बाळाचे संसर्गापासून संरक्षण करते. नाळ वाढणाऱ्या बाळाला गर्भाशयाशी जोडते.

जर गर्भधारणेची प्रगती सामान्यपणे झाली तर नाळ गर्भाशयाशी उजव्या किंवा डाव्या बाजूला वरती जोडली जाते. गर्भधारणेदरम्यान गर्भाशय ताणले गेल्यावर नाळ वर किंवा बाजूला सरकते. निरोगी प्लॅसेंटा म्हणजे प्लॅसेंटाच्या अंडाकृती चकतीच्या मध्यभागी नाळ जोडलेली असते. नाळ निरोगी असेल तर सुरक्षित गर्भारपणाच्या खात्री असते.

प्लॅसेंटाची काही महत्वाची कार्ये खाली दिली आहेत

 • गर्भाशयामध्ये गर्भाची वाढ होण्यासाठी लागणाऱ्या संप्रेरकांच्या निर्मितीस नाळ मदत करते
 • बाळाच्या रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत करते
 • भ्रूण गर्भाशयाला जोडण्याचे काम करते आणि बाळाला योग्य स्थितीत ठेवते

प्लॅसेंटा प्रेव्हिया म्हणजे काय?

प्लॅसेंटा प्रेव्हिया म्हणजे काय?

गर्भधारणेदरम्यान जर नाळ खाली सरकून गर्भाशयाचे मुख संपूर्णपणे किंवा काही प्रमाणात झाकले गेल्यास त्या स्थितीला प्लॅसेंटा प्रेव्हियाअसे म्हणतात. ह्या स्थितीमुळे प्रसूती दरम्यान बाळाला आणि आईला धोका असतो. कारण जेव्हा गर्भाशयाचे मुख उघडते तेव्हा त्यास हानी पोहोचू शकते. प्लॅसेंटा गर्भाशयापासून लवकर विलग होऊ शकतो आणि त्यामुळे खूप रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. बाळाचा अकाली जन्म होऊन बाळ कमी वजनाचे होऊन बाळामध्ये जन्मतःच व्यंग असण्याची शक्यता असते.

प्लॅसेंटा प्रेव्हिया मुळे वेदना होतात का?

प्लॅसेंटा प्रेव्हिया मुळे गर्भधारणेदरम्यान शक्यतोवर वेदना होत नाहीत. तथापि, जर काही अस्वस्थता जाणवली तर तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधा.

प्लॅसेंटा प्रेव्हिया सामान्यपणे आढळते का?

गर्भवती महिलांमध्ये आढळणारी प्लॅसेंटा प्रेव्हिया ही खूप दुर्मिळ वैद्यकीय अवस्था आहे. २०० पैकी एका गरोदर स्त्रीला प्रत्येक वर्षी असे झाल्याचे आढळून येते.

प्लॅसेंटा प्रेव्हियाचा गर्भधारणेवर कसा परिणाम होतो?

गर्भाशयाचे मुख ह्या स्थितीत झाकले गेले असल्याने प्रसूतीदरम्यान बाळाच्या जन्मास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे प्रसूती आव्हानात्मक होते. ह्यामुळे ओटीपोटाच्या भागातील रक्तवाहिन्या सुद्धा तुटतात आणि काही वेळा प्लॅसेंटा गर्भाशयापासून विलग होऊन आई आणि बाळाला धोका निर्माण होतो.

योनीमार्गातून रक्तस्त्राव हे प्लॅसेंटा प्रेव्हियाचे लक्षण आहे का?

हो, योनीमार्गातून रक्तस्त्राव होणे हे प्लॅसेंटा प्रेव्हियाचे सामान्यपणे आढळणारे लक्षण आहे. किंबहुना प्लॅसेंटा प्रोव्हिया मुळे निर्माण होणारा हा सर्वात मोठा धोका आहे. गर्भधारणेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात असे होऊ शकते जेव्हा गर्भाशयाचे खालच्या बाजूचे आवरण हे प्रसूतीसाठी तयार होत असते आणि नाळेमुळे गर्भाशयाच्या मुखाचा तो भाग झाकला गेल्यास रक्तस्त्राव होऊ शकतो. तथापि , विशेष करून प्लॅसेंटा प्रेव्हिया असेल तरगर्भधारणेच्या २० आठवड्यापर्यंत गर्भवती स्त्रियांना रक्तस्त्राव होताना वेदना होत नाहीत.

प्लॅसेंटा खालच्या बाजूला असणे म्हणजे नक्की काय असते?

ह्यामध्ये प्लॅसेंटा गर्भाशयाच्या खालच्या बाजूस, गर्भाशयाच्या मुखाजवळ असतो. नॉर्मल परिस्थतीत प्लॅसेंटा गर्भाशयाच्या वरच्या भागात किंवा बाजूला असतो. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात प्लॅसेंटा गर्भाशयाच्या खालच्या भागात असतो आणि जसजसे गर्भधारणेचे दिवस पुढे सरकतात तसे प्लॅसेंटा वर सरकून गर्भाशयाच्या वरच्या बाजूस स्थिरावते. तथापि, जर तिसऱ्या तिमाही पर्यंत जर प्लॅसेंटाची हालचाल नीट झाली नाही तर प्लॅसेंटा प्रेव्हिया उद्भवतो.

प्लॅसेंटा प्रेव्हियाचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत?

गर्भाशयाच्या मुखाचा किती भाग झाकला गेला आहे ह्यावर प्लॅसेंटा प्रेव्हियाचे वेगवेगळे प्रकार अवलंबून असतात.

प्लॅसेंटा प्रेव्हियाचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत?

किरकोळ स्वरूपातील प्लॅसेंटा प्रेव्हिया

ह्या प्रकारातील प्लॅसेंटा प्रेव्हिया मध्ये प्लॅसेंटाचा भाग हा गर्भाशयाच्या मुखाच्या अगदी जवळ असतो परंतु गर्भाशयाचे मुख ह्यामध्ये झाकले जात नाही.

अर्धवट स्वरूपातील प्लॅसेंटा प्रेव्हिया

ह्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा काही भाग हा प्लॅसेंटामुळे झाकला जातो. ह्या मध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या उजव्या बाजूला प्लॅसेंटा असतो. जर ह्या स्वरूपाचा प्लॅसेंटा प्रेव्हिया गर्भवती महिलेमध्ये आढळला तर नॉर्मल प्रसूतीची शक्यता असते.

संपूर्ण प्लॅसेंटा प्रेव्हिया

ह्यामध्ये गर्भाशयाचे मुख प्लॅसेंटामुळे संपूर्णपणे झाकले जाते. अशा परिस्थतीत गर्भवती स्त्रीला सिझेरिअन प्रसूतीला सामोरे जावे लागते. ह्यास सेंट्रल प्लॅसेंटा प्रेव्हिया असे सुद्धा म्हणतात आणि त्यामुळे प्रसूतीदरम्यान खूप जास्त प्रमाणात गुंतागुत होते.

प्लॅसेंटा प्रेव्हिया ची लक्षणे

प्लॅसेंटा प्रेव्हियाची वेगवेगळी लक्षणे आहेत त्यापैकी काही खाली दिली आहेत ज्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे

 • दुसऱ्या तिमाहींपासून वेदनाविरहित रक्तस्त्राव. हा रक्तस्त्राव दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यांच्या दरम्यान होऊ शकतो किंवा तो कुठल्याही कारणाशिवाय वारंवार होऊ शकतो.
 • जर बाळाची स्थिती पायाळू असेल तर अकाली कळा सुरु होऊन रक्तस्त्राव होऊ शकतो
 • तीव्र वेदना होऊन पेटके येऊ लागतात.

जर तुम्हाला वरील कुठल्याही लक्षणांचा अनुभव आला तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. तसेच डॉक्टरांनी सांगितलेली काळजी सुद्धा घेतली पाहिजे.

गर्भधारणेदरम्यान प्लॅसेंटा प्रेव्हियाची कारणे

प्लॅसेंटा प्रेव्हियाची नक्की कारणे माहिती नाहीत परंतु स्त्रीची जीवनशैली आणि गर्भधारणा होण्याआधीच्या समस्या ह्यांचा संबंध असण्याची शक्यता आहे. ही स्थिती निर्माण होण्यामागे खालील घटक कारणीभूत आहेत.

 • वय: ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये प्लॅसेंटा प्रेव्हिया झालेले आढळते
 • गर्भधारणेचा इतिहास: जर स्त्रीला आधी खूप वेळा गर्भधारणा झालेली असेल किंवा जुळे किंवा तिळे झालेले असल्यास अशा स्त्रियांना ह्या स्थितीला सामोरे जावे लागते
 • शस्त्रक्रियेचा इतिहास: जर स्त्रीची आधी गर्भाशयाची शस्त्रक्रिया झालेली असेल आणि त्यावेळेला छेद घेतला गेलेला असेल किंवा नसेल तरी सुद्धा अशा स्त्रीला प्लॅसेंटा प्रेव्हियाचा धोका जास्त असतो.
 • गर्भाशयाचा आकार: जर स्त्रीच्या गर्भाशयाचा आकार खूप विचित्र असेल तर अशा स्त्रीला प्लॅसेंटा प्रेव्हियाचा धोका असतो
 • धूम्रपान/अमली पदार्थांचे सेवन: काही तज्ञांच्या मते ज्या स्त्रिया खूप धूम्रपान करतात किंवा अमली पदार्थांचे सेवन करतात त्यांना ह्या स्थितीचा खूप धोका असतो.

धूम्रपान/अमली पदार्थांचे सेवन

 • आधीचा गर्भपात: ज्या स्त्रियांचा आधी गर्भपात झालेला असतो अशा स्त्रियांना प्लॅसेंटा प्रेव्हिया होण्याचा खूप जास्त धोका असतो
 • लोकसंख्या: प्लॅसेंटा प्रेव्हिया होण्याची शक्यता लोकसंख्येनुसार बदलते उदा: आशियातील महिलांना प्लॅसेंटा प्रेव्हिया होण्याची शक्यता जास्त असते.
 • क्यूरेटिन: अशा प्रकारची शस्त्रक्रिया आधी झालेली असल्यास त्यामुळे प्लॅसेंटा प्रेव्हिया होतो
 • प्लॅसेंटाचा आकार: प्लॅसेंटाचा आकार खूप मोठा असल्यास प्लॅसेंटा प्रेव्हिया होऊ शकतो.

गर्भधारणेदरम्यान खालच्या बाजूस असलेल्या प्लॅसेंटासाठी उपचारपद्धती

ह्या स्थितीसाठीची उपचार पद्धती गर्भवती महिलांसाठी वेगळी असते. बाळ आणि आईच्या तब्येतीवर सुद्धा उपचारपद्धती अवलंबून असते. जर गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्लॅसेंटा प्रेव्हियाचे निदान झाले आणि अर्धवट स्थितीतील असेल तर तो आपोआप बरा होतो.

रक्तस्त्राव किती प्रमाणात झाला आहे ह्यावर उपचारपद्धती ठरते. जर हलका रक्तस्त्राव झाला असेल तर डॉक्टर हालचाल कमी करण्यास किंवा बेडरेस्टचा सल्ला देतात. खूप जास्त रक्तस्त्राव झालेला असल्यास रक्त दिले जाते आणि हा उपचारपद्धतीचा अगदी महत्वाचा भाग आहे. अकाली प्रसूती थांबवण्यासाठी औषधे दिली जातात आणि गर्भधारणेचे ३६ आठवडे भरण्यासाठी ह्याची मदत होते.

ज्या रुग्णाचा रक्तगट Rh-negative असतो त्यांना डॉक्टर RhoGAM हे विशेष औषध देतात, गर्भधारणेदरम्यान तसेच प्रसूतीनंतर सुद्धा हे औषध दिले जाते. प्रतिकार प्रणालीला अँटीजेन ओळ्खण्यापासून रोखण्याचे काम हे औषध करते. बऱ्याचशा केसेस मध्ये, गरोदर स्त्रीला गर्भधारणेच्या २८ आठवड्यांनंतर anti-D ची गरज असते म्हणून Rhogam हे प्रामुख्याने गर्भधारणेच्या २८ आठवड्यांनंतर दिले जाते.

बाळाची फुप्फुसे चांगली विकसित होण्यासाठी डॉक्टर्स काही वेळा स्टिरॉइड ची इंजेक्शन्स देतात. जर खूप रक्तस्त्राव होत असेल तर सिझेरिअन करण्याचा शेवटचा उपाय केला जातो.

औषधे प्लॅसेंटा प्रेव्हिया बरा होण्यासाठी असं काही विशेष औषध नसते. डॉक्टर लोहाची पूरक औषधे देतात कारण खूप जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे गर्भवती स्त्री ऍनीमिक होऊ शकते. काही औषधे आणि पूरक गोळ्या डॉक्टर्स देऊ शकतात ती खालीलप्रमाणे

 • टोकोलेटीक्स अकाली प्रसूती लांबवणे
 • मॅग्नेशिअम सल्फेट अकाली प्रसूतीकळा लांबवणे
 • डेक्स्मीथअसोन बाळाच्या फुप्फुसाच्या आरोग्यपूर्ण वाढीसाठी
 • बिटामीठासोन बाळाच्या फुप्फुसांच्या विकासासाठी मदत करण्यासाठी
 • टरब्यूटालीन गर्भाशयाचे संकुचन शिथिल करण्यासाठी

वैद्यकीय हस्तक्षेप जर प्लॅसेंटा प्रेव्हियाचे निदान झाले आणि परिस्थिती गंभीर असेल तर बाळाच्या आणि आईच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय हस्तक्षेप गरजेचा आहे आणि खालील गोष्टी सुचवल्या जातात

 • रक्त भरणे (Intravenous Therapy): रक्तस्त्राव झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त भरण्याची गरज असते.
 • नियमित देखरेखीखाली ठेवणे: योनीमार्गातून तपासणी करणे टाळले जाते कारण त्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो आणि बाळ व आई दोघांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांवर तसेच गर्भाशयाच्या संकुचनावर लक्ष ठेवण्यासाठी बाहेरून साधन वापरतात.
 • शस्त्रक्रिया: बाळाच्या किंवा आईच्या आयुष्याला धोका असेल तर डॉक्टर्स शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. जर नाळेमुळे गर्भाशयाचे मुख ३०% झाकले जात असेल तर बाळ पुढे सरकू शकत नाही आणि सिझेरिअन प्रसूती केली जाते.

प्लॅसेंटा प्रेव्हियाचे निदान

ह्या स्थितीचे अचूक निदान करण्यासाठी अल्ट्रासाऊंड ही सर्वात अचूक पद्धत आहे. प्लॅसेंटा प्रेव्हियाचे निदान करण्यासाठी खालील स्कॅन केले जातात.

. ट्रान्स ऍबडॉमिनल अल्ट्रासाऊंड बाळाची वाढ कशी होते आहे हे तपासण्यासाठी हा स्कॅन केला जातो

. मॅग्नेटिक रोझोनन्स इमेजिन्ग (एम आर आय)नाळेची स्थिती तपासण्यासाठी ही तपासणी केली जाते.

प्लॅसेंटा प्रेव्हिया चे निदान गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये केलेल्या अल्ट्रासाऊंड दरम्यान होते. किरकोळ किंवा थोड्या स्वरूपातील प्लॅसेंटा प्रेव्हियाच्या प्रकरणांमध्ये, काही काळाने परिस्थिती मध्ये सुधारणा होते. परंतु संपूर्ण प्लॅसेंटा प्रेव्हियाच्या बाबतीत आपोआप सुधारणा होत नाही.

अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये नाळ खालच्या बाजूस म्हणजे अगदी गर्भाशयाच्या मुखाजवळ सरकलेली आढळते, परंतु हे काळजीचे कारण नाही. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यावर हे खूप सामान्य आहे, परंतु काही काळानंतर जसजसा गर्भाशयाचा आकार वाढतो तसे प्लॅसेंटा वरच्या बाजूस सरकला पाहिजे. जर २० आठवड्यांनंतर सुद्धा प्लॅसेंटामुळे गर्भाशयाचे मुख झाकले जात असेल तर प्लॅसेंटा प्रेव्हिया असण्याची शक्यता असते. तिसऱ्या तिमाही पर्यंत प्लॅसेंटा वर सरकून गर्भाशयाच्या मुखाजवळील अडथळा दूर झाला पाहिजे.

प्रसूतीच्या वेळेला प्लॅसेंटा प्रेव्हिया असेल तर काय?

प्रसूतीच्या वेळेला जर प्लॅसेंटा प्रेव्हिया असेल तर आई आणि बाळ दोंघांसाठी ते धोक्याचे ठरू शकते. त्यामधून खाली दिलेल्या काही समस्या उद्भवू शकतात

आईवर होणारे परिणाम

 • खूप जास्त रक्तस्त्राव: प्लॅसेंटा प्रेव्हियामुळे प्रसूतीच्या वेळेला खूप जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो आणि त्यामुळे आईच्या तब्येतीला धोका पोहचू शकतो.
 • गर्भाशयाचा अशक्तपणा: ह्यामुळे खूप जास्त रक्तस्त्राव होतो काही वेळा हिस्टेरेक्टोमीची शस्त्रक्रिया करावी लागते.

बाळावर होणारे परिणाम

 • प्लॅसेंटा विलग होणे: ही खूप सामान्यपणे आढळणारी स्थिती आहे जेव्हा प्लॅसेंटा गर्भाशयापासून विलग होतो, आणि त्यामुळे बाळाला पोषणमूल्ये आणि रक्ताचा पुरवठा होत नाही आणि त्यामुळे पोटातील बाळाला धोका निर्माण होतो.
 • बाळाचा अकाली जन्म होणे: जर योनीमार्गातून खूप जास्त रक्तस्त्राव होत असेल तर डॉक्टर लवकर प्रसूती करण्याचा निर्णय घेऊ शकतात. जर बाळाचा जन्म अकाली झाला आणि तर बाळाला तब्येतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात तसेच पुढे जाऊन बाळाच्या विकासदरम्यान समस्या उद्भवू शकतात.

इतर काही सामान्यपणे आढळणारे प्लॅसेंटाचे प्रश्न

नाळेचे खाली सरकणे, ह्या नाळेसंबंधित पप्रश्नाची बरीच चर्चा होते परतून प्लॅसेंटा विषयी इतरही काही समस्या आहेत, त्यापैकी काही पुढीलप्रमाणे:

 • बाळाला पुरेशा प्रमाणात पोषणमूल्यांचा पुरवठा न होणे (Placental insufficiency): ह्या स्थिती मध्ये वाढणाऱ्या बाळाला पुरेशा प्रमाणात पोषणमूल्यांचा पुरवठा होत नाही आणि त्यामुळे कमी वजनाच्या बाळाचा जन्म होतो.
 • मृतपेशी (Infarcts in the placenta): प्लॅसेंटामध्ये काहीभागात मृतपेशी आढळतात त्यामुळे रक्ताचा पुरवठा कमी होतो. गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या उच्चरक्तदाबाच्या त्रासामुळे असे होऊ शकते. ह्याचा धोका काही नसतो परंतु काही वेळा बाळाच्या तब्येतीला धोका पोहोचण्याची शक्यता असते.
 • नाळ तुटणे(Placental abruption): ह्या स्थितीमध्ये प्लॅसेंटाचा काही भाग किंवा संपूर्ण प्लॅसेंटा गर्भाशयापासून तुटून दूर होतो आणि त्यामुळे गर्भालाकमी किंवा अजिबात रक्तपुरवठा होत नाही. अगदी दुर्मिळ प्रकरणांमध्ये जीवास धोका असतो.
 • प्लॅसेंटा गर्भाशयाच्या आवरणांमध्ये घट्ट बसणे(Placenta accreta): ह्या स्थितीमध्ये प्लॅसेंटा गर्भाशयाच्या भित्तिकांमध्ये अगदी घट्ट चिकटलेली असते त्यामुळे प्रसूतीनंतर खूप रक्तस्त्राव होतो. गर्भाशयाला चिकटलेले टिश्यू काढण्यासाठी काही वेळा अशा प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते.

नाळ खाली सरकलेली असताना प्रसूती

बाळाची आणि आईची तब्येत तसेच बाळाची गर्भाशयातील स्थिती ह्यावर प्रसूती नॉर्मल होणार की सिझेरिअन हे अवलंबून असते. जर ही स्थिती गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यावर उद्भवली तर सिझेरिअन प्रसूती होण्याची शक्यता जास्त असते.

जरी प्लॅसेंटा प्रेव्हिया मुळे आई आणि बाळाला धोका असला तरी आशा सोडता कामा नये. सतत तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय, पुरेशी विश्रांती आणि शास्त्रक्रियेनंतरची काळजी घेतल्यास आई आणि बाळ दोघेही सुरक्षित राहतील. जर प्लॅसेंटा प्रेव्हियाचे प्रमाण कमी असेल तर नॉर्मल प्रसूती होण्याची सुद्धा शक्यता असते. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात नाळ खाली सरकणे हे सामान्य आहे आणि ती आपोआप वर सरकते. जर तुम्हाला प्लॅसेंटा प्रेव्हिया असल्याचे निदान झाले तर नियमित तपासणी करा आणि डॉक्टर जे सांगतील तसे करा. तुमचे डॉक्टर तुम्हाला सर्वोत्तम मार्गदर्शन करतील. तुम्हाला सुरक्षित गर्भधारणेसाठी शुभेच्छा!

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article