Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home टॉडलर (१-३ वर्षे) दर-महिन्याला-होणारा-बाळाचा-विकास २२ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

२२ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

२२ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या मुलाच्या आयुष्याची सुरुवातीची काही वर्षे महत्त्वाची असतात, कारण लहान वयात त्यांची होणारी वाढ त्यांच्या पुढील आयुष्याचा पाया असतो. पहिल्या वर्षात विशेष काही नसते कारण तुमचे मूल अजून बोलायला आणि पाऊल टाकायला शिकत असते. परंतु जेव्हा तुमचे मूल आयुष्याच्या २२ व्या महिन्यात प्रवेश करते तेव्हा ते आजूबाजूच्या वातावरणाविषयी सजग होऊ लागते. ह्या काळात तुमचे मूल आजूबाजूचे लोक ओळखू लागते. तसेच काही शब्द बोलायला सुद्धा शिकू लागते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे मूल नेहमीपेक्षा जास्त भावना व्यक्त करण्यास शिकेल.

व्हिडिओ: तुमच्या २२ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

२२ महिन्यांच्या शिशुचा विकास

जेव्हा तुमचे मूल त्याच्या नाजूक हातांनी तुमचे बोट धरते तेव्हा ती जगातील सर्वात सुंदर भावना असते. आणि ते नाजूक हात आता मोठे झालेले पाहणे ही आणखी एक सुंदर भावना आहे. प्रत्येक मूल अद्वितीय आहे. शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर विकसित होण्यासाठी ते स्वतःचा वेळ घेते ही वस्तुस्थिती तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. परंतु सर्वसाधारणपणे सांगायचे तर, तुम्हाला २२ महिन्यांच्या मुलाच्या विकासाच्या टप्प्यांबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे.

२२ महिन्यांपर्यंत, तुमच्या मुलाला झोपेची वेळ झालेली आहेकिंवा आता खेळण्याची वेळ आहेयासारखी साधी वाक्ये समजण्यास सुरुवात होईल. त्याहीपेक्षा, सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की तुमचे मूल आता आत्मविश्वासाने पाऊले टाकू लागेल आणि कोणत्याही मदतीशिवाय घरामध्ये फिरू शकेल. तुमचे मूल आता बोलू सुद्धा लागेल. आधी फक्त एखादा शब्द बोलणारे बाळ आता तुटक वाक्य बोलू लागेल.

तुमच्या २२ महिन्यांच्या मुलाचे विकासाचे इतर टप्पे म्हणजे ते आजूबाजूच्या लोकांच्या वर्तनाचे निरीक्षण करून त्याची नक्कल करू लागते, साधी कोडी सोडवू लागते, शरीराचे वेगवेगळे भाग ओळखू लागते आणि विशेष म्हणजे तो यापुढे बिछाना ओला न करण्याचे शिकेल.

शारीरिक विकास

शारीरिक विकास हा वाढीचा एक प्रमुख भाग आहे. अशा विकासामुळे तुमचे मूल आता आतून तंदुरुस्त आहे आणि त्याचे शरीर सामान्यपणे कार्य करत आहे.

आतापर्यंत, तुमच्या मुलाचा खालीलप्रमाणे शारीरिक विकास झालेला आहे

 • खाणे सुधारते: २२ महिन्याचे मूल चमच्याने खाऊ शकते आणि ग्लासमधून दूध किंवा ज्यूस पिऊ शकते. पिताना ते आजूबाजूला सांडवेल, परंतु त्याला स्वतःहून खाताना बघून तुम्हाला आनंद होईल
 • दातांचा विकास: २२ महिन्यांपर्यंत, तुमच्या लहान मुलाला १६ दात येतील. म्हणजेच तुमच्या मुलाला आता चांगले चावता येईल तसेच अन्न चघळून खाता येईल आणि अशा प्रकारे तो अन्नपदार्थांचे चांगले पचन करू शकेल
 • सुधारित शारीरिक संतुलन: २२महिन्याच्या बाळाचे वजन त्याला सरळ उभे राहण्यास मदत करण्यासाठी पुरेसे असेल. तुमच्या मुलाला धरून ठेवण्याची किंवा त्याला प्रॅममध्ये ठेवण्याची गरज नाही, कारण तो स्वतः फिरू शकेल
 • धावणे सुरू होते: २२ महिन्यांचे तुमचे मूल आता चालण्यास तसेच धावण्यास सक्षम झालेले असेल. तुमचे मूल जेव्हा चालायला लागते तेव्हा त्याला अधिक चालण्याची आणि धावण्याची इच्छा नेहमीपेक्षा जास्त होते. तुमचा मुलगा आनंदी मूडमध्ये इकडेतिकडे धावत असताना सावध रहा!

शारीरिक विकास

सामाजिक आणि भावनिक विकास

जरी तुमच्या मुलाची वेगाने वाढ होत असली तरीसुद्धा तो तुम्हाला चिकटून राहील. आईवडील हे लहान मुलांच्या सर्वात जवळचे आणि परिचित चेहरे असतात. त्यामुळे, त्याच्या आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधण्यात रस दाखवण्यापेक्षा त्याला कदाचित तुम्हाला चिकटून राहणे अधिक आवडेल. तुमचे मूल ओळखीच्या लोकांसोबत आरामदायक असते.

खाली इतर सामाजिक आणि भावनिक विकासाच्या दृष्टीकोनांबद्दल माहिती दिलेली आहे

 • स्वातंत्र्य विकसित होते: तुमचे मूल स्वतंत्र झाले आहे म्हणून तो त्याच्या दैनंदिन दिनचर्येचे पालन करेल असा त्याचा अर्थ होत नाही. पण पुढे काय करायचे आहे आणि काय करायचे राहीले आहे हे तुमच्या मुलाला कळेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, तुम्ही त्याला खेळण्यात गुंतवण्याआधीच तो खेळायला सुरुवात करेल
 • मित्रांसोबत सुधारित संवाद: तुमचा लहान मुलगा त्याच्या आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांशी चांगला संवाद साधतो हे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ, जर तो त्याच्या वयाच्या मुलांना ओळखत असेल तर त्यांच्याशी चांगला संवाद साधेल. आवडत्या माणसांना दुःखात पाहिल्यास त्यांच्याबद्दल तो सहानुभूती देखील दाखवेल. अनोळखी व्यक्तींना बघून तो लाजेल
 • अनुकरण: तुमचे मूल २२ महिन्यांचे होईपर्यंत, तो आजूबाजूच्या लोकांचे अनुकरण करू करेल. अशा प्रकारे, आजूबाजूच्या वातावरणानुसार त्यांना सवयी लागतील. पालकांनी जबाबदारीने आणि काळजीपूर्वक वागणे महत्त्वाचे असते , कारण मुले जे पाहतात त्यावर आधारित त्यांचा विकास होतो
 • आवडी आणि नापसंती व्यक्त करा: आता तुमचे मूल राग दाखवण्याइतके मोठे झाले आहे. तो खात असलेल्या अन्नाची चव असो किंवा एखादी विशिष्ट व्यक्ती असो, तुमचे मूल त्याच्या शब्दांतून किंवा अभिव्यक्तीतून त्याला एखादी गोष्ट कशी आवडते किंवा आवडत नाही हे उघडपणे व्यक्त करू लागतो
 • व्यक्तिमत्वाचा विकास: तुमच्या लहान मुलाला त्याचे नाव आता कळू लागेल. कोणी त्याच्याशी किंवा त्याच्याबद्दल बोलत असेल ते सुद्धा त्याला कळू शकेल. तसेच, तो विशिष्ट गुण विकसित करेल. आनंद, राग आणि दुःख त्याच्या स्वत: च्या मार्गाने व्यक्त करेल. तो त्याच्या स्वतःच्या शैलीने काही गोष्टी करू लागतो ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

सामाजिक आणि भावनिक विकास

संज्ञानात्मक आणि भाषा विकास

बुद्धिमत्ता, निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. तसेच योग्य आणि अयोग्य यातील फरक त्याला कळू लागतो.

त्याच्या संज्ञानात्मक कौशल्यांचे निरीक्षण करण्यास मदत करणारे बदल हे माहिती करून घेण्यासाठी वाचा

 • भाषा आणि उच्चार सुधारणा: २२ महिन्यांपर्यंत, तुमच्या मुलाची उच्चार क्षमता विकसित होते. तो साधे शब्द किंवा अगदी लहान, तुटक वाक्येही बोलू शकतो. शिवाय, तो तुमच्याद्वारे केलेल्या छोट्या विनंत्या किंवा सूचना सहज ओळखू शकतो
 • वाढलेली स्मरणशक्ती: तुमचा लहान मुलगा त्याच्या सभोवतालचे परिचित चेहरे ओळखू लागेल आणि ज्या माणसांना तो नेहमी भेटतो त्यांना ओळखू लागेल. तो घराभोवती दिसणारे रंग आणि पाळीव प्राणी ओळखण्यास सक्षम असेल. तुम्हाला कदाचित ते लक्षात येणार नाही, परंतु तुमचे बाळ संदर्भ लावू शकेल आणि दोन घटनांबद्दल बोलू शकेल, म्हणजे त्याला मागील घटना अधिक स्पष्टपणे आठवतील
 • निरीक्षणात्मक आणि शिकण्याचे कौशल्य सुधारणे: जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाच्या हातात पुस्तक उलटे करून देता, तेव्हा ते चुकीच्या पद्धतीने ठेवले आहे हे त्याला समजेल. जर तुम्ही त्याला दाराचा नॉब कसा उघडायचा आणि तो कोणत्या दिशेने फिरवायचा हे शिकवले तर तो त्याचे योग्य अनुकरण करेल
 • एकाग्रता कौशल्यांचा विकास: जर तुमच्या मुलाला कोडे सोडवायला आवडत असेल, तर जोपर्यंत त्याला उत्तर सापडत नाही तोपर्यंत तो लक्ष दुसरीकडे वळवणार नाही. तो इतर कामांकडे न वळता एकाग्रतेने खेळेल.
 • काय करावे आणि काय करू नये हे समजते: उदाहरणार्थ, जर तुमच्या घरात एखादे गरम भांडे असेल आणि तुम्ही तुमच्या २२ महिन्यांच्या बाळाला त्याला हात लावू नकोस कारण तुला भाजेल असे सांगितले, तर तो सूचनांचे पालन करेल. हेच इतर परिस्थितीत लागू केले जाऊ शकते. म्हणजेच काय योग्य आहे आणि काय नाही हे त्याला समजते.

वागणूक

आपल्या २२ महिन्याच्या मुलाचे वागणे त्याच्याबद्दल बरेच काही सांगू शकते. तो सामान्य वागतो की नाही ह्यावर लक्ष ठेवणे तसेच त्याच्या वागणुकीत अचानक झालेल्या बदलांचा मागोवा घेणे आवश्यक आहे. तुमच्या २२ महिन्याच्या मुलाला कशाचाही राग येऊ शकतो आणि त्याच्या वागणुकीतील अचानक बदल पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मुलाला कुठल्याही छोट्या गोष्टींचा राग येतो आहे . परंतु, याबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही. हा बाळाच्या वाढीच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर विकास होत असताना होणाऱ्या संप्रेरकांमधील बदलांमुळे असे होते.

अन्न आणि पोषण

२२ महिन्यांपर्यंत, तुमच्या बाळाला आवड विकसित होऊ लागते. तुमच्या मुलाचा नाश्ता चुकवू नका. नाश्ता खूप महत्वाचा आहे, कारण त्यामुळे त्याला दिवसभर खेळण्यासाठी ऊर्जा मिळते. थकवा जाणवत नाही.

अन्न आणि पोषण

तुमच्या २२ महिन्यांच्या बाळाच्या आहारात मसूर, दूध, उकडलेली अंडी, भाज्या, ताजी फळे, दही आणि टोस्ट इत्यादींचा समावेश करा. त्यामुळे तुमच्या मुलाच्या आवडी निवडी काय आहेत हे तुम्हाला समजेल. तसेच, त्याला जंक फूड देणे टाळा, कारण त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात आणि त्याच्या एकूण वाढीस अडथळा येऊ शकतो.

झोप

झोपेच्या योग्य सवयी विकसित करणे केवळ प्रौढांसाठीच नाही तर मुलांसाठी देखील आवश्यक आहे. तुमच्या २२ महिन्यांच्या मुलाला वेळेवर झोपवा आणि लवकर उठवा. अगोदर म्हटल्याप्रमाणे, लवकर झोपणे आणि लवकर उठणे माणसाला तंदुरुस्त आणि शहाणे बनवते! याचे अनुसरण करा. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या लहान मुलाला एक चांगली सवय लागते आहे. ही सवय आजच नाही तर पुढेही त्याला उपयोगी होईल.

तुमच्या मुलाला बिछाना ओला न करण्याबद्दल शिकवा. त्याला सूचना द्या, किंवा बाथरूमला जायचे असल्यास ते कसे सांगायचे हे शिकवा. यामुळे चांगल्या सवयी लवकर लागण्यास तसेच घरामध्ये चांगली स्वच्छता राखण्यास मदत होईल.

खेळ आणि उपक्रम

तुमच्या २२ महिन्याच्या बाळाच्या क्रियाकलापांमध्ये घरात आणि बाहेर खेळता येणाऱ्या दोन्ही खेळांचा समावेश असावा. त्याला सोडवायला कोडी द्या, त्यामुळे त्याची बौद्धिक कौशल्ये विकसित होण्यास मदत होईल. शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आणि फ्रेश राहण्यासाठी त्याला शारीरिक हालचाली करू द्या.

शक्य असल्यास, तुमच्या मुलाला वन्यजीव अभयारण्यात घेऊन जा. ह्यामुळे तुमच्या मुलाचे केवळ मनोरंजनच होणार नाही तर त्याला निसर्गाचा आनंद घेण्यास तसेच पृथ्वी आणि जगण्याशी संबंधित तथ्ये जाणून घेण्यास मदत होईल.

पालकांसाठी टिप्स

तुमच्या उत्साही लहान मुलासाठी तुम्हाला मदत करतील अशा खालील टिप्स खाली दिलेल्या आहेत.

 • तोंडी शिकवण्यापेक्षा दृश्य शिक्षणाला प्राधान्य द्या. म्हणजेच, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला यमक किंवा वर्णमाला शिकवता, तेव्हा त्याला शाब्दिक शिकवण्याऐवजी प्रातिनिधिक दृश्ये दाखवा. असे केल्याने जास्त काळ गोष्टी त्याच्या लक्षात राहतील

पालकांसाठी टिप्स

 • जेव्हा जेव्हा तुमचे बाळ एखादी वस्तू पकडते किंवा जवळची एखादी गोष्ट दाखवते, तेव्हा त्याचे नाव सांगून ती वस्तू काय आहे हे त्याला समजावून सांगा. अशा प्रकारे, तो गोष्टी लवकर ओळखण्यास शिकेल
 • खेळताना तुमच्या लहान मुलाशी संवाद साधा. तुम्हाला त्याची काळजी आहे हे त्याला समजेल तसेच तो बोलण्याचे कौशल्य पटकन आत्मसात करेल. २२ व्या महिन्यात सुद्धा बाळ बोलत नसेल तर त्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होईल.
 • तुमच्या २२ महिन्यांच्या मुलाला उद्याने किंवा जवळपासच्या हिरवळीवर घेऊन जा. त्याला मुक्तपणे धावू द्या आणि विशिष्ट प्रकारच्या शारीरिक हालचालींमध्ये गुंतू द्या
 • तुमच्या मुलाला त्याच्या मागण्या शब्दात मांडायला सांगा. तो काय सांगू पाहत आहे हे जरी तुम्हाला समजले तरी तुम्हाला समजत नाही असे वागा. अशा प्रकारे, तो बोलेल आणि स्पष्टपणे व्यक्त होण्याचा प्रयत्न करेल

हा सर्वसमावेशक मार्गदर्शक लेख तुम्हाला तुमच्या २२ महिन्याच्या मुलाबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करेल. तथापि, जर तुमच्या मुलामध्ये चालणे, बोलणे किंवा खाणे यासारख्या कोणत्याही क्षमतेची कमतरता दिसून येत असेल, तर मदतीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मागील आठवडा: २१ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
पुढील आठवडा: २३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article