Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home टॉडलर (१-३ वर्षे) दर-महिन्याला-होणारा-बाळाचा-विकास २३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

२३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

२३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमचे लहान बाळ आता दोन वर्षांचे झाले आहे आणि तुमचे मूल आता प्रत्येक दिवसागणिक अधिकाधिक स्वतंत्र होत आहे. ह्यावर तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण जाईल. तुमच्या २३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास ह्याबद्दल तुम्ही विचार करत आहात का? जर ह्याचे उत्तर होअसेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. तुमच्या २३ महिन्याच्या मुलाच्या वाढीबद्दल आणि विकासाबद्दल तुम्हाला जे काही जाणून घ्यायचे असेल त्याबद्दल आम्ही पुढील लेखात चर्चा करणार आहोत.

व्हिडिओ: तुमच्या २३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

२३ महिन्यांच्या मुलाचा विकास

तुमचे मूल पुढे मोठा टप्पा गाठणार आहे आणि लवकरच त्याचा दुसरा वाढदिवस येणार आहे. तुमच्या लक्षात येईल की तुमचे मूल आता छोट्या छोट्या गोष्टींना विरोध करू लागले आहे आणि थोडे बंडखोर झाले आहे. नक्की काय चुकते आहे ह्या विचारात पालक पडतील. येथे समस्या तुमच्या पालकत्वाची नसून तुमचे बाळ विकासाच्या ज्या टप्प्यात आहे त्याबाबतची आहे. तुमचे मूल कोणत्याही गोष्टीमुळे अस्वस्थ होऊ शकते आणि गडबड करू शकते. काही वेळातच तुमचे मूल शांत होईल. पालक म्हणून शांत राहणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुमचे मूल तुमच्याकडून खूप शिकत आहे. तुम्ही मुलाचा राग आणि स्वभावाच्या समस्यांवर कशी प्रतिक्रिया देता हे देखील महत्वाचे आहे. ह्या टप्प्यावर आपल्या मुलाच्या स्वभावाच्या समस्यांशी सामना करणे पालकांसाठी त्रासदायक असू शकते. तुम्ही शांतता राखणे फार महत्वाचे आहे. येथे २३ महिन्यांच्या मुलाचे विकासाचे काही टप्पे दिलेले आहेत. हे टप्पे तुमचे मूल वेळेत पार करेल.

शारीरिक विकास

तुमच्या मुलाची जन्मानंतरच्या पहिल्या वर्षी खूप वेगाने वाढ होते आणि फक्त पहिल्या वर्षी तुमच्या मुलाचे वजन त्याच्या जन्माच्या वजनाच्या दुप्पट असू शकते. तथापि, तुमच्या २३ महिन्यांच्या मुलाचे वजन केवळ ३ ते ५ पौंडांनी वाढू शकते. येथे तुमच्या मुलाचे इतर काही शारीरिक बदल दिलेले आहेत. ह्या टप्प्यावर तुमच्या मुलाचा शारीरिक विकास कसा होत आहे हे जाणून घ्या:

 • तुमचे मूल पायऱ्या चढून खाली उतरू लागेल तरीही तुम्हाला त्याचा हात धरावा लागेल
 • तुमचे मूल स्वतःचे स्वतः कपडे घालू लागेल
 • तुमच्या मुलाच्या पाठीचे आणि पायाचे स्नायू मजबूत असतात आणि त्यामुळे तो खाली वाकून वस्तू जमिनीवरून उचलू शकतो
 • तुमचे मूल त्याच्या पायाच्या बोटांवर उभे राहू शकते
 • तुमचे मूल स्वतः खाण्यास सक्षम आहे. त्याचे हाताचे स्नायू देखील मजबूत आहेत. त्यामुळे खाताना आणि पिताना कमी सांडते

सामाजिक आणि भावनिक विकास

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळामध्ये अनेक सामाजिक आणि भावनिक कौशल्ये विकसित होत आहेत. तुमच्या मुलाने आत्मसात केलेली काही कौशल्ये येथे दिलेली आहेत.

 • तुमच्या मुलाला इतर मुलांसोबत खेळायचे असते
 • तुमचे मूल इतर मुलांचे अनुकरण करू शकते
 • तुमच्या मुलाला आता सगळ्यांना आपलेसे कसे करून घ्यायचे हे समजू लागते त्यामुळे तो त्याची खेळणी किंवा खाऊ भावंडाना आणि मित्रांना देऊ शकतात
 • तुमचे मूल मजेदार चेहरे करून किंवा मजेदार कृती करून इतर लोकांचे मनोरंजन करू शकते
 • जर तुम्ही त्याच्या आजूबाजूला नसाल तर तुमच्या लहान मुलाला चिंता वाटू शकते. ह्याच काळात त्याची विभक्त होण्याची चिंता वाढू शकते

सामाजिक आणि भावनिक विकास

संज्ञानात्मक आणि भाषा विकास

येथे काही संज्ञानात्मक आणि भाषा कौशल्ये आहेत. ह्या वयापर्यंत ही कौशल्ये तुमच्या मुलामध्ये विकसित होऊ शकतात.

 • ह्या वयात तुमच्या मुलाची स्वतःची चव आणि आवड विकसित झालेली असते
 • तुमचे मूल तुमच्या दोन शब्दांच्या साध्या आज्ञा समजण्यास आणि त्यांचे पालन करण्यास सक्षम आहे उदा: इकडे ये, खाली बैस
 • तुमच्या मुलाला रेखाचित्रे काढणे आणि लिहिणे आवडते. तसेच तो आता सरळ रेषा आणि वर्तुळे देखील काढू शकतो
 • तुमचे मूल पूर्ण वाक्य तयार करून सर्वनामांचा वापर करू लागते
 • तुमच्या मुलाला त्याच्या जवळच्या लोकांची नावे आठवत असतील
 • तुमचे मूल तुमच्या टोनचे आणि बोलण्याच्या पद्धतीचे अनुकरण करू शकते
 • तुमच्या मुलाला भूक लागली आहे, झोप लागली आहे किंवा लघवी करायची आहे हे तो आता सांगू शकतो.

वागणूक

तुमचे मूल सतत सक्रिय असते आणि ते दिवसभर धावत असते. तुमचे मूल जन्मापासून सगळ्या गोष्टींचा सराव करत असते तसेच मोटर कौशल्यांच्या बाबतीत करते. तुम्ही तुमच्या मुलाला शांत बसवू शकत नाही कारण ह्या वयात तो सतत इकडे तिकडे धावत असतो. खरेदी, स्वयंपाक किंवा साफसफाई यासारखी दैनंदिन कामे करणे तुम्हाला अशक्य वाटू शकते. काही महिन्यांपूर्वी तुम्ही हीच कामे तुमच्या बाळासोबत आरामात करू शकत होतात. ह्याचे कारण असे की आता तुम्ही तुमच्या मुलाला एका जागी जास्त वेळ थांबवू शकत नाही. तुमचे लहान मूल इकडे तिकडे पळत राहील. तुमच्या मुलाला त्याच्या नवीन स्वातंत्र्याचा आणि कौशल्यांचा आनंद मिळतो.

काही मुले छोट्या जंपिंगजॅकसारखे वागतात. तर इतर काही मुले तुम्हाला चिकटून राहतील आणि त्यांना सतत तुम्ही हवे असता. ह्या वयातील लहान मुलांना त्यांच्या आजूबाजूला काय चालले आहे हे समजत नाही. साधा व्हॅक्यूम क्लिनर किंवा ग्राइंडरचा आवाज सुद्धा त्यांना घाबरवू शकतो. तुम्हाला ही भीती थोडी अतार्किक वाटू शकते परंतु तुम्ही तुमच्या बाळाबद्दल सहानुभूती दाखवा आणि त्याला शांत करा. तुमच्या २३ महिन्यांच्या मुलाचे बोलणे आणि शब्दसंग्रह मर्यादित आहेत परंतु त्याची कल्पनाशक्ती खूप आहे हे तुम्हाला हे समजले पाहिजे. तुम्ही त्याची भीती समजून घेण्यात त्याला मदत केली पाहिजे. तुमचे २३ महिन्यांचे मूल जास्त बोलत नसेल किंवा पाच शब्दांपेक्षा कमी शब्द बोलत असेल तर त्यासाठी तुम्ही वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.

अन्न आणि पोषण

तुमच्या वाढत्या चिमुकल्यासाठी दररोज पोषक आहाराची आवश्यकता असते. तुमच्या मुलाला खायला घालणे तुम्हाला खूप कठीण वाटत असले तरी सुद्धा ह्या टप्प्यावर तुमच्या मुलाने योग्य प्रकारे खाणे महत्वाचे आहे. तुमच्या मुलाला कुटुंबातील इतर सदस्यांसोबत जेवायला बसवावे. त्याला जेवणाची घाई असू शकते आणि त्याला वाट पाहणे आवडणार नाही. परंतु तरीही, लहान वयातच कुटुंबातील सदस्यांसोबत जेवण्याची सवय लावणे ही चांगली कल्पना आहे. जर तुमचे मूल गडबड करू लागले किंवा त्याला त्याच्या जेवणात स्वारस्य वाटत नसेल, तर तुम्ही त्याला भरवणे थांबवा. त्याला जबरदस्तीने खायला घालणे चांगले नाही कारण त्यामुळे त्याला जेवणाचा कंटाळा येऊ शकतो. तुमच्या मुलाला वेगवेगळे अन्नपदार्थ देऊन पहा कारण त्याला त्याच अन्नपदार्थांचा खूप लवकर कंटाळा येऊ शकतो. त्याला दिवसातून तीनदा जेवण द्या आणि दोन ते तीन वेळा स्नॅक्स खायला देण्याचा प्रयत्न करा. बहुतेक मुलांना दूध प्यायला आवडते. कदाचित त्यांच्या बहुतेक कॅल्शियमच्या गरजा फक्त दुधापासूनच पूर्ण होतात. परंतु, जर तुमच्या मुलाला दूध आवडत नसेल तर तुम्ही त्याला दही, चीज किंवा सोया दूध देण्याचा प्रयत्न करू शकता. कॅल्शियमची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही काटे नसलेले मासे आणि इतर हिरव्या पालेभाज्या त्याला देण्याचा प्रयत्न करू शकता.

झोप

तुमचे मूल सतत इकडे तिकडे धावत असते आणि त्यामुळे त्याला चांगली झोप मिळणे सुद्धा फार महत्वाचे आहे. ह्या वयातील बहुतेक बाळांचे झोपेचे वेळापत्रक नीट सेट झालेले असते आणि बहुतांशी बाळे रात्री आरामात झोपतात. परंतु ह्या वयातील मुलांनी रात्रीचे जागे राहणे सुद्धा खूप सामान्य आहे. जर तो उठून चुळबुळ करू लागला तर काहीही प्रतिक्रिया देऊ नका कारण तो स्वतःचे स्वतः पुन्हा झोपू शकतो परंतु काहीवेळा तुम्हाला तुमच्या मुलाला पुन्हा झोपी जाण्यासाठी मदत करावी लागेल. तुमच्या लहान मुलाचे झोपेचे वेळापत्रक पाळणे फार महत्वाचे आहे. तुमच्या मुलाला रात्री ८ ते १२ पर्यंत उत्तम झोप मिळते, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलाला लवकर झोपण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. तुमच्या बाळासोबत रात्री उशिरा कोणतेही क्रियाकलाप करण्यापासून दूर रहा कारण यामुळे तो अस्वस्थ आणि विक्षिप्त होऊ शकतो. तसेच जिथे कुठलाही व्यत्यय येणार नाही अशी एक छान आणि आरामदायक झोपण्याची जागा तयार करा. परंतु, जर तुमचे मूल गडबड करत असेल आणि झोपत नसेल तर तुम्ही शांत रहा आणि त्याला काय त्रास देत असेल ते समजून घ्या. कुठल्यातरी विशिष्ट आजारामुळे मूल तसे करत असण्याची शक्यता असते किंवा तुमच्या मुलाला सांत्वनाची गरज असल्यामुळे तो तुमचे लक्ष वेधून घेत असतो.

झोप

खेळ आणि उपक्रम

तुमच्या मुलासोबत मजा करण्यासाठी हा सर्वोत्तम टप्पा आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलाला अनेक खेळ आणि क्रियाकलापांमध्ये सहभागी करून घेऊ शकता. येथे आम्ही तुमच्या मुलासाठी काही मजेदार आणि रोमांचक क्रियाकलापांवर चर्चा करणार आहोत. हे खेळ तुम्ही तुमच्या लहान मुलासोबत खेळू शकता:

 • चिखल खेळणे: हा खेळ तुमच्या मुलासाठी उत्तम आहे. हा खेळ तुमच्या मुलाची मोटर कौशल्ये विकसित करण्यास मदत करतो तसेच त्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली होते
 • बुडबुड्यांचा खेळ: तुम्ही साबणाचे पाणी घेऊन बुडबुडे काढू शकता. तुमच्या मुलाला ते बुडबुडे पकडून फोडण्यास सांगा. हा पाण्यात खेळता येण्याजोगा एक मजेदार खेळ आहे. ह्या खेळामुळे तुमच्या मुलाच्या स्नायूंना सुद्धा व्यायाम होतो
 • फळे आणि भाज्या वापरून पेंटिंग: तुमच्या बाळाला मोसंबी आणि भेंडीसारख्या, फळे आणि भाज्यांचे कटआउट द्या. तुमच्या मुलाला कागदावर विविध नमुने आणि आकार रंगवण्यास मदत करा. लहान मुलांना रंगांसोबत खेळायला आवडते आणि कुठलीही रंगीबेरंगी गोष्ट त्यांचे लक्ष वेधून घेते. ही क्रिया तुमच्या बाळाला बराच काळ व्यग्र ठेवण्यास मदत करते
 • रांगण्याची मजा: तुम्ही जमिनीवर विविध अडथळे निर्माण करू शकता आणि तुमच्या बाळाला हे अडथळे रांगत रांगत पार करण्यास सांगू शकता. तुमचे बाळ आता मोठे आहे आणि रांगल्यामुळे त्याच्या हाताच्या आणि पायाच्या स्नायूंवर ताण पडतो. तसेच रांगल्यामुळे त्याच्या पायाचे आणि हाताचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते
 • कणिकेचा गोळा: तुम्ही तुमच्या मुलाला कणकेचा गोळा देऊ शकता आणि त्यातून विविध आकार तयार करण्यासाठी त्याला मदत होऊ शकते. ह्या खेळामुळे आजूबाजूला थोडा पसारा होऊ शकतो परंतु हा खेळ तुमच्या मुलाला आवडेल

पालकांसाठी टिप्स

प्रत्येक पालक आपल्या मुलांची सर्वोत्तम काळजी घेत असतो. पालकांना आणखी मदत व्हावी म्हणून आम्ही येथे काही टिप्स शेअर करणार आहोत. ह्या टिप्समुळे तुमच्या मुलाला विकासाचे टप्पे गाठण्यास मदत होईल.

 • वस्तूंचे गट करणे, त्या एकावर एक रचून ठेवणे किंवा जुळवणे अश्या क्रियाकलापांमध्ये तुमच्या लहान मुलाला सामील करून घ्या
 • तुमच्या मुलासाठी पुस्तके वाचा आणि गाणी गा. तो बोलायला आणि समजून घ्यायला शिकत आहे. ह्या क्रियाकलापांमुळे तुमच्या मुलाचा शब्दसंग्रह वाढवण्यास मदत होईल
 • तुमच्या मुलाचा आहार आणि पोषणाकडे योग्य लक्ष द्या
 • तुमच्या मुलाला सर्वकाही एक्सप्लोर करायला आवडते आणि तो सतत इकडे तिकडे धावत असतो. त्यामुळे तुम्ही तुमचे घर चाइल्डप्रूफ करून घ्या
 • तुमच्या मुलासाठी झोपेचे वेळापत्रक तयार करा आणि ते नियमितपणे पाळा
 • तुमच्या मुलाच्या सर्व मागण्यांकडे लक्ष देऊ नका आणि त्याला वेळोवेळी नाही सांगा
 • जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तुमच्या मुलाचे कौतुक करा
 • तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा तुमच्या मुलाला तुमच्या सोबत घेऊन जा आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकवा. तुमचं म्हणणं त्याला पटत नसले तरी जोपर्यंत त्याला ते समजत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला ते सांगत रहा
 • तुमचे लहान मूल वेगवेगळ्या प्रसंगी मजेदार बोलते. तुमच्या मुलाच्या अशा सर्व आठवणी आणि क्रियाकलापांसाठी एक डायरी करणे ही एक चांगली कल्पना आहे

पालकांसाठी टिप्स

डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्याल?

तुम्ही तुमच्या मुलाच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणे फार महत्वाचे आहे. आपले मूल विकासाचे काही टप्पे गाठण्यात मागे आहे का असा विचार पालकांच्या मनात येऊ शकतो. खालील परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन जाणे आवश्यक आहे

 • आधाराशिवाय त्याला चालत येत नसेल तर
 • तो नियमितपणे भेटत असलेल्या लोकांना ओळखू शकत नसेल तर
 • मदत घेऊनही पायऱ्या चढता येत नसतील तर
 • तो काही मोजकेच शब्द बोलत असेल तर
 • साध्या दोन शब्दांच्या आज्ञा समजण्यास तो सक्षम नसेल तर

वर नमूद केलेल्या गोष्टी तुमच्या लहान मुलामध्ये आढळत असतील तर त्याच्या विकासामध्ये काही समस्या असण्याची शक्यता असते. त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

मागील आठवडा: २२ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
पुढील आठवडा: २४ महिने (२ वर्षे) वयाच्या बाळाची वाढ आणि विकास

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article