दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमच्या ४ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

पालकत्व हा एक आशीर्वाद आहे आणि ही भावना तुम्हाला अधिक स्पष्टपणे जाणवेल जेव्हा तुमचे बाळ वयाच्या ४ थ्या महिन्यात पदार्पण करेल! बाळाचं गोड हसू आणि निरागस बडबड तुमचं सारं जग सुंदर करून टाकेल. तुमच्या ४ महिन्यांच्या बाळाच्या वाढ आणि विकासाविषयीच्या तपशीलवार माहितीसाठी हा लेख वाचा.

बाळाची वाढ

बाळाच्या वाढीच्या पहिल्या वर्षातील प्रत्येक महिना हा बाळाच्या वाढीसाठी महत्वाचा असतो कारण बाळाचा मेंदू आणि शरीर ह्या दोघांचीही वेगाने वाढ होत असते. जर तुमच्या ४ महिन्यांच्या बाळाचे वजन किती असावे ह्याविषयी तुम्ही संभ्रमात असाल तर फक्त बाळाचे जन्माच्या वेळचे वजन दुप्पट करा आणि म्हणजे बाळाचे वजन नक्की किती असेल त्याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. तथापि, तुमच्या बाळाच्या वजनातील वाढ, हा बाळाची वाढ मोजण्याचे एक परिमाण आहे. जर बाळाचा चेहरा, हात किंवा कुल्य्यांवर मांस नसेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

बाळाचा विकास

१६ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमचे बाळ स्वतःचे स्वतः काही आवाज काढू लागेल आणि त्यांना समजू सुद्धा लागेल. तुमचे बाळ मा-मा, दादा असे शब्द बोलू लागेल. ह्या शब्दांचा अर्थ बाळाला समजत नसतो. लक्षात ठेवा बाळाची नक्कल करण्याची क्षमता वाढत आहे आणि बाळ तुमच्या शब्दांची तसेच हालचालींची नक्कल करू लागेल.

१७ आठवड्यांच्या बाळाचा विकास

१७ व्या आठवड्यापर्यंत तुमच्या बाळाचे वजन दुप्पट झालेले असेल आणि बाळाचे पोट सुद्धा मोठे झालेले असेल. तुम्ही बाळाला स्तनपान करीत असाल तर दिवसाला ६-८ वेळा दूध देणें पुरेसे आहे किंवा जर घनपदार्थ देत असाल तर ५-६ वेळा दूध द्या. तथापि, बाळाचे लक्ष वेधून घेणारे आवाज आणि इतर गोष्टी सुद्धा असतील. आता बाळ स्वतःच्या हाताशी आणि पायांशी खेळू लागेल आणि आजूबाजूला असलेल्या गोष्टी घेण्यासाठी त्यांचा वापर करू लागेल. आणि आधीपेक्षा जास्त वेळ एकटेच खेळू लागेल.

१८ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमचे बाळ आता हसू लागेल. परंतु रडणे हे बाळाचे संवादाचे प्राथमिक माध्यम अजूनही असेल. काही मजेशीर चेहरे, आवाज किंवा पिकाबू सारख्या खेळांद्वारे बाळ उत्साही राहील आणि आजूबाजूला सुद्धा हास्य पसरवेल. बाळाला आता वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला आवडू लागेल आणि वेगवेगळ्या गोष्टींशी खेळणे आवडू लागेल. कापडाचा तुकडा किंवा खुळखुळा किंवा पाळण्यावर टांगलेली घंटा अशा गोष्टींशी खेळायला बाळाला आवडू लागेल. बाळाला रंगांमधील फरक समजू लागेल आणि रंगीबेरंगी कपडे, खेळणी आणि पुस्तकांमध्ये बाळाला जास्त रस निर्माण होईल.

१९ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या छोट्या गोंडस बाळाचा पाठीचा मणका आता सरळ होत आहे आणि भोवतालच्या स्नायूंचा त्यास आधार मिळत आहे. त्यामुळे बाळाला आता मान धरता येऊ लागेल आणि जेव्हा तुम्हीं बाळाला घ्याल तेव्हा बाळाला हात उचलता येऊ लागतील. बाळाची शब्दसंपदा सुद्धा आता वाढू लागेल, त्यामुळे तुम्ही बाळाची बडबड ऐकण्यास तयार रहा. तुम्ही बाळाचा दिनक्रम अशा पद्धतीने तयार करा की झोपेसाठी तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे. बाळाला भरवणे, अंघोळ घालणे, बाळासाठी गोष्टीचे पुस्तक वाचणे किंवा बाळासाठी अंगाईगीत गाणे ह्यामुळे बाळाला चांगली झोप लागेल आणि तुम्हाला सुद्धा चांगली झोप मिळेल.

बाळाचे आरोग्य

तुमचे बाळ आता ४ महिन्यांच्या लसीकरणासाठी तयार आहे. तसेच आधीच्या लसीकरणाची काही प्रतिक्रिया आली असेल तर तसेही तुम्ही डॉक्टरांना सांगणे जरुरीचे आहे. बाळाला ऍलर्जी होण्याची खूप शक्यता असते आणि त्यामुळे घनपदार्थ देण्याआधी बाळाला काही ऍलर्जी तर नाही ना ह्याची काळजी घेतली पाहिजे. स्तनपान किंवा फॉर्मुला दूध हे बाळाचे प्राथमिक अन्न आहे आणि हळू हळू बाळाला घनपदार्थांची ओळख होऊ द्या. बाळाची त्वचा जितकी कोरडी ठेवता येईल तितकी ठेऊन बाळाला नॅपी रॅश तर होणार नाही ना ह्याची काळजी घ्या. बाळाची नॅपी बदलताना कोमट पाण्याचा वापर करा.

बाळाच्या विकासाचे टप्पे - ४ महिने

४ थ्या महिन्यात तुमचे बाळ खालील विकासाचे टप्पे पार करेल.

वर्तणूक

४ थ्या महिन्यापर्यंत तुमच्या बाळाचा तुमच्याशी आणि घरातील इतर सदस्यांशी अनुबंध तयार होईल. तुमचे बाळ तुम्हाला जसे प्रतिसाद देते तसे घरातील इतर भावंडाना सुद्धा देऊ लागेल. बाळाला एखादी गोष्ट हवी असेल तर कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही हे बाळाला समजू लागेल. बाळाला टीव्ही आणि इतर माध्यमांपासून दूर ठेवले पाहिजे कारण बाळाला अशा गोष्टींची गरज नसते. तुम्ही आणि कुटुंबातील इतर सदस्य बाळाच्या मेंदूला उत्तेजना पुरवण्यासाठी पुरेसे आहात.

४ महिन्यांच्या बाळाचे क्रियाकलाप

तुमच्या बाळासाठी खालील पैकी कुठल्याही क्रियांची निवड करा जेणेकरून बाळ व्यस्त राहील. ह्या क्रिया बाळाला स्वतःला व्यस्त ठेवण्यास मदत करतील त्यामुळे तुम्हाला सुद्धा थोडा वेळ मिळेल. . बाळाच्या छातीवर एखादे मऊ खेळणे ठेवा आणि बाळ त्यास कसा प्रतिसाद देते ते पहा. हे खेळणे बराच काळ लक्ष वेधून घेईल, काही वेळा ते खेळणे खाली पडेल. तुम्ही बाळाच्या जवळच थांबा आणि खेळणे पुन्हा तसेच ठेवा. . बाळाला रंगीबेरंगी मोजे घाला किंवा खुळखुळा बांधा. बाळाच्या कुल्ल्यांखाली नॅपकिन किंवा टॉवेलची गुंडाळी करून ठेवा त्यामुळे बाळाला स्वतःचे पाय सहजपणे दिसतील. . बाळासाठी वाचण्याने बाळाचे आकलन कौशल्य सुधारते. ज्या पुस्तकांमध्ये खूप चित्रे आहेत अशी पुस्तके बाळासाठी आणा. . जेव्हा तुमचे बाळ जागे असते तेव्हा ते सतत हात पाय हलवत असते. आपण पाठीवर झोपून त्याला उचलून अतिरिक्त कसरत करा. सभोवताली खेळणी असू द्या जेणेकरून तो स्वत: ला वेगवेगळ्या दिशेने वळवू शकेल. . बाळाला चेंडू चे प्रचंड आकर्षण असते आणि बाळ पालथे पडून चेंडूचे निरीक्षण करत बसते. चेंडू थोडा उडवा आणि बाळाभोवती फिरवा. भिंतीवर हळूवारपणे चेंडूचे टप्पे मारा ज्यामुळे आपल्या बाळाला चेंडू काय करू शकते हे समजू शकेल.

४ महिन्यांच्या बाळाची काळजी

तुमचे बाळ आता ४ महिन्यांचे झाले आहे आणि ते आजूबाजूला पाय मारण्यास शिकले आहे. त्यामुळे काही सुरक्षिततेच्या बाबींकडे आता लक्ष दिले पाहिजे. बाळ जिथे असते ती संपूर्ण जागा निर्जंतुक केली आहे ह्याची खात्री करा तसेच काही अडथळे असतील तर ते बाजूला करा. धूळ सगळीकडे असते त्यामुळे तुम्ही बाळाचा बिछाना आणि खेळणी नियमितपणे स्वच्छ करा आणि पुसून घ्या. बाळाच्या झोपेच्या वेळा ठरलेल्या असतील तर बाळाला झोपवण्यासाठी बळेच भरवू नका किंवा पाळण्यात हलवू नका. त्यांना स्वतःचे स्वतः झोपण्यास शिकवा.

बाळाला भरवणे

तुमचे बाळ ४ महिन्यांचे झाल्यावर बाळाला भरवण्याची प्रक्रिया अजून कार्यक्षम होते. तुमच्या बाळाचे दूध पिण्याचे कौशल्य आता जास्त विकसित झाले आहे कारण बाळाच्या स्तनांना तोंड लावून दूध ओढण्याच्या क्रियेबाबत तुम्ही निश्चित असता. दूध पाजण्याच्या प्रक्रियेत येणारे अडथळे आता पूर्णपणे बंद झाले असतील. तुमच्या बाळाचा विकास आणि पोषणाच्या गरज ह्या स्तनपान किंवा बाटलीतील दुधाद्वारे भागवल्या जातील. तुम्ही बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर बाळाला घनपदार्थांची ओळख करून देऊ शकता जेव्हा बाळाची पचनसंस्था मजबूत झालेली असेल आणि ऍलर्जीचा सुद्धा काही धोका नसेल.

बाळाची झोप

तुमच्या बाळाच्या झोपेच्या वेळा आता पर्यंत निश्चित झालेल्या असतील त्यामध्ये बाळ दुपारी थोड्या कालावधीसाठी आणि रात्री सलग काही तास झोपू लागेल. तुम्हाला असे वाटू शकेल की जर बाळ दुपारी झोपले नाही तर पूर्ण रात्रभर ते छान झोपेल. तथापि, दुपारच्या झोपेमुळे रात्रीची सुद्धा झोप छान लागते आणि त्यामुळे बाळाच्या झोपेचे रुटीन छान लागते. ह्या टप्प्यावर तुम्ही बाळाला बळेच झोपवण्याचा प्रयत्न केल्यास बाळ त्यास प्रतिकार करू शकते आणि हे तुमच्यासाठी नवीन असेल. परंतु तुम्ही प्रयत्न करीत रहा आणि बाळाला झोपवण्यासाठी जे काही करत होतात ते करत रहा.

पालकांसाठी काही टिप्स

पालकांच्या काही टिपा येथे आहेत ज्या चार महिन्यांच्या मुलाचे पालनपोषण करण्याचा अनुभव वाढविण्यास मदत करतील: प्रत्येक बाळ हे एकमेवाद्वितीय असते आणि प्रत्येक बाळाच्या शरीराची ठेवण किंवा वाढ वेगवेगळी असते. काळजी करू नका योग्य वेळ आली की बाळ बरोबर योग्य ते टप्पे गाठेल. उदा: अकाली जन्मलेली बाळांना टप्पे गाठण्यासाठी वेळ लागू शकतो. तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि तुमच्या चार महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या दृष्टीने काय आवश्यक आहे हे समजून घ्या.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved