आरोग्य

बाळांना होणारी सर्दी: कारणे, उपचार आणि घरगुती उपाय

मुलांना वारंवार सर्दी होते आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे मुलांची प्रतिकार यंत्रणा तितकीशी परिपक्व झालेली नसते. सर्दीला कारणीभूत असलेल्या २०० विषाणूंपैकी एकाही विषाणूशी बाळाचा संपर्क आला तर बाळाला सर्दी होते. अत्यंत गरज असल्याशिवाय नवजात बाळाला किंवा लहान मुलांना सर्दीसाठी औषध देण्याची शिफारस केली जात नाही. जोपर्यंत डॉक्टर्स औषधे घेण्यास सांगत नाहीत तोपर्यंत ह्या लेखात सांगितलेले घरगुती उपाय तुम्ही बाळाच्या उपचारासाठी वापरू शकता.

बाळांना होणारी सर्दी

सर्दी हा आजार काही विशेष गंभीर समजला जात नाही आणि वाढत्या वयाच्या मुलांमध्ये तो सर्रास दिसून येतो. तज्ञांच्या मते बाळ २ वर्षांचे होईपर्यंत बाळाला ८-१० वेळेला सर्दी होते. सर्दी झाल्यावर मुलांना खाता येत नाही, रात्रीची झोप नीट लागत नाही आणि बाळाला होत असलेला त्रासही आपल्याला बघवत नाही.

सर्दी आणि फ्लू, इतर आजार किंवा ऍलर्जी ह्यामधील फरक कसा ओळखाल?

सर्दी आणि फ्लू मधील फरक ओळखणे थोडं अवघड जाऊ शकते. जर तुमच्या बाळाचे नाक वाहत असेल आणि पुढच्या काही आठवड्यांमध्ये तो स्त्राव घट्ट होत असेल तर तुमच्या बाळाला नुसती साधी सर्दी झालेली असते. जर सर्दी सोबत बाळाला ताप आला तर बाळावर लक्ष ठेवा, जर ताप कमी झाल्यावर बाळ सक्रिय असेल आणि खेळत असेल तर फक्त सर्दी आहे असे समजावे पण ताप कमी झाल्यावर जर बाळ अस्वस्थ आणि अशक्त असेल तर बाळाला फ्लू झाला असल्याची शक्यता असू शकते. परंतु जर बाळाचे नाक वहात असेल आणि बाळाला त्यासोबत ताप येत नसेल तर तुमच्या बाळाला फक्त सर्दी झालेली असते. फ्लू किंवा इतर कुठलाही आजार हा अचानक होतो आणि त्यासोबत उलटया आणि जुलाब सुद्धा होतात. दुसरीकडे अलेर्जीची लक्षणे अशीच असतात परंतु फरक ओळखणे फार सोपे आहे कारण ऍलर्जीमुळे तुमच्या बाळाला ताप येणार नाही. ऍलर्जीची प्रामुख्याने आढळणारी लक्षणे म्हणजे खाज सुटून वाहणारे नाक आणि डोळे होय. ऍलर्जी झाल्यावर बाळाला सतत शिंका येत राहतात आणि त्वचेवर रॅश येते. तसेच, तुम्हाला लक्षात येईल की ऍलर्जीमुळे बाळाच्या नाकातून येणारा स्त्राव हा तसाच राहतो त्याचा रंग बदलत नाही किंवा तो घट्ट सुद्धा होत नाही.

प्रामुख्याने आढळणारी कारणे कोणती?

नवजात बाळांना सर्दी होण्यास २०० विषाणू कारणीभूत असतात परंतु बाळांना सर्दी होण्यास कारणीभूत असलेला विषाणू म्हणजे 'Rhinovirus' होय. सर्दी होताना नाक आणि घशाला संसर्ग होतो. आता आणखी मजेशीर गोष्ट म्हणजे ज्या विषाणूमुळे बाळाला सर्दी होते त्या विषाणूपासून तुमचे बाळ सुरक्षित होते. परंतु सर्दीस कारणीभूत असे अनेक विषाणू असल्यामुळे तुमच्या बाळाला २ वर्षांचे होईपर्यंत खूप वेळा सर्दी होते. सर्दी हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे खालील ३ मार्गानी विषाणू शरीरात प्रवेश करतात. तुमच्या बाळाची प्रतिकार यंत्रणा पुरेशी परिपकव झालेली नसेल तर बाळाला सर्दी होण्याचा जास्त धोका असतो. ज्या मुलांना सर्दी झालेली आहे अशा मुलांच्या संपर्कात आल्यावरसुद्धा बाळाला सर्दी होण्याचा खूप धोका असतो. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे बाळाला सर्दी होण्याची शक्यता असते.

बाळांमधील सर्दीची लक्षणे

जर तुमच्या बाळाला सर्दी झाली तर तुम्हाला खालील लक्षणे दिसतील
तुमचे बाळ अस्वस्थ होईल आणि चोंदलेल्या नाकामुळे रात्रभर जागे राहील. बाळाला भरवणे सुद्धा कठीण होऊन जाईल. बाळाला नाक शिंकरून टाकता येत नसल्यामुळे तुम्हाला बाळाचे नाक साफ करावे लागेल. बाळाला नाकाने श्वास घेणे मुश्किल होईल आणि बाळाची चिडचिड वाढेल.

समस्या

साधी सर्दी जेव्हा वाढते तेव्हा खालील समस्या निर्माण होऊ शकतात

सर्दीवर उपचार

सर्दीवर खूप काही विशेष उपचारपद्धतीची गरज नसते. तुम्ही त्यासाठी सोपे उपाय करू शकता आणि लक्षणांची तीव्रता आणि त्रास कमी करू शकता. जर सर्दी खूप वाढली आणि एक आठवड्यांनंतर सुद्धा गेली नाही तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून काही गंभीर त्रास तर नाही ना ह्याची खात्री करून घ्या.
जर तुमच्या बाळाचे नाक चोंदलेले असेल आणि सर्दीची दुसरी कुठलीही लक्षणे दिसत नसतील तर बाळाच्या नाकात काही अडकलेले तर नाही ना ह्याची खात्री करून घ्या.

बाळांच्या सर्दीवर घरगुती उपाय

लहान बाळांसाठी तसेच मोठ्यांसाठी सर्दी आणि खोकल्यासाठी घरगुती उपचार जादुई काम करतात. इथे काही घरगुती उपचार दिले आहेत ज्याचा तुम्हाला तुमच्या बाळासाठी उपयोग होईल.

१. जास्त द्रवपदार्थ द्या

जर तुमचे बाळ लहान असेल तर बाळाला जास्त दूध द्या आणि जर तुमचे बाळ ६ महिन्यांपेक्षा मोठे असेल तर बाळाला व्हिटॅमिन सी समृद्ध फळे, घरी केलेला फळांचा रस आणि भरपूर पाणी द्या. जी छोटी बाळे फॉर्मुला दूध घेतात त्यांना वेगळ्या बाटलीने पाणी द्या. त्यामुळे बाळाला सजलीत राहण्यास मदत होते.

२. मिठाच्या पाण्याचा स्प्रे आणि नाकातील स्त्राव

बाळाचे डोके थोडे मागे धरून प्रत्येक नाकपुडीत सलाईनचे २-२ थेम्ब घाला, त्यामुळे नाकातील चिकट पदार्थ मऊ होण्यास मदत होईल. बाळाचे डोके तशाच स्थितीमध्ये २० सेकंदांसाठी ठेवा. नंतर सिरींजचा फुगा दाबून त्याचे टोक एका नाकपुडीत घाला, दुसरी नाकपुडी बोटाने दाबून फुगा सोडून द्या आणि चिकट पदार्थ घ्या आणि सिरिंज बाहेर काढा. चिकट पदार्थ बाहेर काढून सिरिंज स्वच्छ करून घ्या आणि असेच दुसऱ्या नाकपुडीसाठी सुद्धा करा.

३. खोलीतील दमटपणा वाढवणाऱ्या मशीनचा वापर करा

घरातील हवा दमट ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बाळाच्या खोलीसाठी ह्युमिडिफायर वापरा. कोरड्या हवामानामुळे बाळांचा सर्दी खोकला वाढतो.

४. आराम

तुमच्या बाळाला जितका जास्त आराम आणि झोप घेता येईल तितकी घेऊ द्या. तसेच काही शांतपणे खेळता येणाऱ्या क्रियांमध्ये बाळाचा सहभाग आहे ह्याची खात्री करा. बाळ अतिउत्साही होणार नाही ह्याची काळजी घ्या. जर तुमचे बाळ थोडे मोठे असेल तर बाळासाठी पुस्तक वाचा किंवा बाळाचा आवडता व्हिडीओ सुरु करा. लक्षात ठेवा की जितका बाळाला जास्त आराम मिळेल तितके लवकर बाळ बरे होईल.

५. धोक्याच्या लक्षणांकडे लक्ष असुद्या

जर काही धोक्याची लक्षणे दिसली तर त्याकडे लक्ष असू द्या. जर घरगुती उपचारांची तुमच्या बाळाला बरे वाटण्यासाठी काही मदत झाली नाही तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घ्या. जर तुमचे बाळ खूप अस्वस्थ असेल तर बाळाला भरवताना ते रडते तसेच सारखा कानाला हात लावत रडते किंवा डोळे सारखे भरून येतात. अशी लक्षणे दिसल्यास बाळाला सर्दीव्यतिरिक्त अजूनही कुठलातरी त्रास आहे असे समजावे.

६. बाळाला खोकून कफ काढून टाकण्यास मदत करा

बाळाच्या घशातून श्लेष्मा बाहेर काढणे अवघड आहे. खोलीत ह्युमिडिफायर, नाकात सलाईनचे थेंब आणि छातीवर हळूहळू चोळत राहून डॉक्टरांनी सांगितलेले व्हेपोरब लावल्यास छातीतील कफ मोकळा होण्यास मदत होते आणि तुमचे बाळ तो थुंकून टाकू शकते. जर गरज असेल तर डॉक्टर नेब्युलायझेशन सुद्धा सांगू शकतात.

सर्दीने आजारी पडण्याची शक्यता कमी करण्यासाठी काही टिप्स

घरी आणि बाहेर असताना खालील टिप्स लक्षात ठेवल्यास तुमचे बाळ सर्दीने आजारी पडण्याची शक्यता कमी होईल. इथे काही प्रतिबंधात्मक उपाय सांगितले आहेत त्यामुळे तुमचे बाळ सर्दीने आजारी पडण्याची शक्यता खूप कमी होईल.

डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधावा?

३ महिन्यांपेक्षा लहान वयाच्या बाळांसाठी सर्दी खोकल्याची लक्षणे दिसताच लगेच संपर्क साधा. -६ महिन्यांच्या बाळांसाठी जर बाळाचा ताप १०२ डिग्री फॅरेनहाईटच्या वरती गेला तर आणि ६ महिन्यांच्या वरील बाळांसाठी डॉक्टरांकडे जाण्याआधी थोडी वाट बघू शकता. जर बाळाचा ताप १०२ डिग्री फॅरेनहाईट च्यावर असेल तर तुम्ही डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा. बाळ कुठल्याही वयाचे असेल तरीसुद्धा खालील स्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधा

औषधांच्या दुकानात मिळणारी सर्दी खोकल्याची औषधे देणे बाळासाठी सुरक्षित आहे का?

६ महिन्याच्या खालील बाळांसाठी ही औषधे टाळली पाहिजेत. किंबहुना असे निदर्शनास आले आहे की त्या औषधांमुळे मुलांमध्ये इतर दुष्परिणाम दिसून येतात. ह्या औषधांमुळे बाळाची सर्दी बरी होत नाही तसेच सर्दीचा काळ सुद्धा कमी होत नाही. ह्या औषधांमुळे बाळाला तात्पुरता आराम पडू शकतो. त्यामुळे जोखीम न घेणे चांगले. सर्दीची समस्या सर्व वयोगटातील मुलांमध्ये आढळते परंतु छोट्या बाळांना झालेली सर्दी आटोक्यात आणणे थोडे कठीण असते कारण बाळांना घशातील कफ बाहेर मदतीशिवाय बाहेर टाकता येत नाही त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे महत्वाचे असते आणि डॉक्टरांकडे उपचारासाठी कधी गेले पाहिजे हे सुद्धा लक्षात येते
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved