In this Article
गरोदरपणाची पहिली तिमाही हा काही तितकासा सौम्य अनुभव नाही. मॉर्निंग सिकनेस किंवा मळमळ ह्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. परंतु जेव्हा तुमची दुसरी तिमाही सुरु होईल तेव्हा परिस्थिती जरा बरी होऊ लागेल. दुसरी तिमाही हाताळणे तितकेसे कठीण नसते. त्यामुळे बऱ्याचश्या स्त्रिया ह्या कालावधीचा उपयोग करून घेतात. त्यांच्या लहान बाळाच्या आगमनाची तयारी करण्यास सुरुवात करतात.
दुसरी तिमाही म्हणजे काय?
गरोदरपणाच्या एकूण नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये, तीन महिन्यांच्या प्रत्येकी तीन तिमाह्या असतात. दुसरी तिमाही गरोदरपणाच्या चौथ्या ते सहाव्या महिन्यात सुरु होते, किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, दुसऱ्या तिमाहीत १३ ते २८ आठवड्यांचा कालावधी समाविष्ट असतो. ह्या काळात बहुतेक स्त्रिया गरोदर असल्याचे समजू लागते कारण त्यांचे पोट मोठे होऊ लागते. ह्याच कालावधीत मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना गरोदरपणाविषयीची गोड बातमी सांगितली जाते.
गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीतील लक्षणे
बहुतेक स्त्रियांना गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत त्रास होत नाही, परंतु पहिल्या तिमाहीतील इतर लक्षणे दुसऱ्या तिमाहीत सुद्धा राहू शकतात. इतकेच नाही तर काही नवीन लक्षणेही असू शकतात. आणि ह्या लक्षणांकडे लक्ष द्यावे लागेल. त्यापैकी काही लक्षणे इथे दिलेली आहेत.
१. श्वास लागणे
स्वयंपाकघरातील कामांमुळे तुमची दमछाक होऊ शकते. गर्भाशयाचा आकार जसजसा वाढत जातो तसे डायफ्रॅम वरती ढकलले जाते आणि त्यामुळे तुमच्या फुप्फुसावर दाब पडतो. त्यामुळे हवा आत घेणे आणि बाहेर ढकलणे कठीण होते. तुम्हाला श्वासोच्छवासास त्रास होत असेल किंवा काही कामांनंतर तुम्हाला अशक्त वाटत असल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
२. पोटदुखी
तुमच्या गर्भाशयाचा आकार जेव्हा वाढतो तेव्हा सभोवतालच्या अस्थिबंधांवर ताण येतो. त्यामुळे तुमच्या दुसऱ्या तिमाहीत तुम्हाला ओटीपोटात अस्वस्थता जाणवू शकते.
३. पोटातील बाळाची नाजूक हालचाल
वीस आठवड्याच्या आसपास, तुम्हाला तुमच्या पोटातील बाळाची नाजूक हालचाल जाणवू शकेल. ह्या हालचालींना इंग्रजीमध्ये ‘क्विकनिंग‘ म्हणून ओळखले जाते आणि तुमच्या बाळाच्या त्या पहिल्या नाजूक हालचाली आहेत. काही स्त्रियांना ह्या हालचाली सहाव्या महिन्यापासून जाणवू लागतात. ही तुमच्या बाळाची पहिली नाजूक हालचाल आहे. काही स्त्रियांना त्यांच्या सहाव्या महिन्यापासूनच ह्याचा अनुभव येतो. तुमच्या दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी तुम्हाला पोटात थोडे वेगळे वाटत असल्यास काळजी करू नका. तुमच्या बाळाला फक्त उचक्या येत आहेत.
४. भावनिक बदल
तुमच्या हॉर्मोन्स मध्ये अजूनही बदल होत आहेत. आता तुम्हाला त्याची सवय होण्याची शक्यता आहे कारण तुम्हाला आधीपासून त्याचा अनुभव आहे. तुमचे भावनांवर आता थोडे अधिक नियंत्रण असल्याचे तुमच्या लक्षात येईल.
५. पाठदुखी
तुमच्या पाठीवर वाढलेल्या वजनाचा दाब जाणवेल. पाठीला चांगला आधार देणाऱ्या खुर्च्या वापरण्याने मदत होते. आरामदायक शूज घाला आणि काहीही जड घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा कुशीवर झोपा आणि पायांमध्ये एक उशी ठेवा.
६. ल्युकोरिया
गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत दुधाळ पांढरा स्त्राव येतो त्यास ल्युकोरिया म्हणतात. गरोदरपणात स्त्रियांना त्याचा अनुभव येतो. स्वच्छता राखण्यासाठी पॅड किंवा पँटी लाइनर वापरा, परंतु टॅम्पॉन वापरू नका कारण त्यामुळे योनीमध्ये जंतू जाऊ शकतात.
७. वारंवार लघवी होणे
पहिल्या तिमाहीमध्ये तुम्हाला अनेक वेळा बाथरूमला जावेसे वाटेल, परंतु दुसऱ्या त्रैमासिकात तुमचे गर्भाशय ओटीपोटाकडील भागापासून थोडे वर सरकेल त्यामुळे दुसऱ्या तिमाहीमध्ये वारंवार बाथरूमला जायची तीव्र भावना होणार नाही. तुम्हाला मिळालेल्या ह्या ब्रेकचा आनंद घ्या कारण तिसऱ्या तिमाहीमध्ये पुन्हा तो त्रास सुरु होईल.
८. हिरड्यांमधून रक्तस्त्राव
हार्मोनल बदलांमुळे कमीत कमी ५०% गरोदर स्त्रियांच्या हिरड्या दुखतात. ह्या भागात रक्तप्रवाह जास्त होत असल्याने हिरड्या संवेदनशील होतात. तुमच्या बाळाच्या जन्मानंतर हा त्रास थांबेल. ह्या काळात मऊ ब्रिस्टल्स असलेल्या टूथब्रशने दात घासा आणि दात घासताना हळुवारपणे घासा. ज्या गरोदर स्त्रियांना हिरड्यांचे आजार आहेत त्यांची मुदतपूर्व प्रसूती होण्याची अधिक शक्यता असते. आणि त्यांना कमी वजनाचे बाळ देखील होऊ शकते.
९. रक्तसंचय आणि नाकातून रक्तस्त्राव
तुमच्या नाकातील श्लेष्मल त्वचेला सूज येणे सुरु होईल आणि त्यामुळे नाक चोंदलेले राहू शकेल. त्यामुळे तुमचे घोरणे सुरु होईल किंवा नाकातून रक्त येऊ शकेल. डिकंजेस्टंट्स वापरण्याऐवजी वाफ घेणे आणि इतर नैसर्गिक पद्धती वापरून पहा. जर तुम्हाला नाकातून रक्तस्त्राव होत असेल तर तुमचे डोके सरळ ठेवा आणि रक्तस्त्राव थांबेपर्यंत नाकपुडीवर थोडासा दाब द्या.
१०. डोकेदुखी
जवळजवळ प्रत्येक गर्भवती स्त्रीला डोकेदुखीचा अनुभव येतो. ही तक्रार सर्वात सामान्य तक्रारींपैकी एक आहे. भरपूर आराम करा. डोकेदुखीसाठी तुम्ही सहसा घेत असलेली ऍस्पिरिन सारखी कोणतीही औषधे घेऊ नयेत. त्याऐवजी, तुमच्या गरोदरपणात तुमच्यासाठी सुरक्षित असलेल्या औषधांबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या.
११. बद्धकोष्ठता आणि छातीत जळजळ
गरोदरपणात, तुमचे शरीर “प्रोजेस्टेरॉन” नावाचे संप्रेरक अधिक प्रमाणात तयार करते आणि हे संप्रेरक पचलेले अन्न आतड्यांमधून पुढे सरकवणाऱ्या स्नायूंना रिलॅक्स करतात. तसेच तुमच्या अन्ननलिकेच्या खालच्या भागातील स्नायू जे अन्न आणि आम्ल पोटाकडच्या खालच्या भागात ठेवतात ते स्नायू सुद्धा रिलॅक्स होतात. दिवसभरात थोडे थोडे खाण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करा.
१२. मूळव्याध
गुदद्वाराभोवती सुजलेल्या निळ्या आणि जांभळ्या नसांना वैरिकास व्हेन्स म्हणतात. तुमच्या गरोदरपणात त्यांची संख्या वाढू शकते कारण तुमच्या सतत वाढणाऱ्या गर्भाशयाचा त्यांच्यावर दाब पडतो. ह्यापासून आराम मिळविण्यासाठी, कोमट पाण्याने आंघोळ करून बसा किंवा तुमच्या डॉक्टरांना काही औषधे लिहून देण्यास सांगा.
गर्भाचा विकास
ह्या तिमाहीमध्ये तुमच्या बाळाची वेगाने वाढ होते आहे. दुसरी तिमाही संपल्यानंतर, तुमच्या पोटात १ किलो वजनाचे बाळ असेल. तुमचे बाळ आता पाय मारू शकते. तुमच्या गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये बाळाची वाढ कशी होते ते खाली दिलेले आहे.
१. केस, त्वचा आणि नखे
बाळाचे पहिले केस साधारण १५ व्या आठवड्यांत वाढू लागतील. २२ व्या आठवड्यात पापण्या आणि भुवया वाढू लागतील. बाळाची त्वचा लॅनुगो नावाच्या आवरणाने झाकली जाईल. १९ व्या आठवड्यापर्यंत बाळ तेलाच्या स्निग्ध थराने झाकले जाईल. त्वचेच्या मृत पेशींना व्हर्निक्स केसोसा म्हणतात. ह्या थरामुळे तुमच्या पोटातील अम्नीओटिक ऍसिडपासून बाळाचे संरक्षण होईल. बाळाच्या जन्मापूर्वी हा थर गळून जाईल.
२. संवेदना
२२ व्या आठवड्यात बाळाला वास येऊ लागेल. त्याचे डोळे आणि कान देखील योग्य पद्धतीने विकसित होऊ लागतील म्हणजेच तो पाहू आणि ऐकू लागेल.
३. मेंदू
बाळाचा मेंदू झपाट्याने विकसित होत आहे, त्यामुळे त्याला विकसित होणाऱ्या सर्व संवेदना वापरता येतात. २३ व्या आठवड्यात त्याचा छोटा मेंदू त्याला डोळे मिचकावण्यास मदत करेल.
४. हृदय
१७ व्या आठवड्यात हृदयाचे ठोके अधिक नियंत्रित होतात. ते आधीसारखे साधे आणि उत्स्फूर्त राहात नाहीत. २० व्या आठवड्यात, स्टेथोस्कोपने तुम्हाला ते ठोके ऐकू येतील . २५ आठवड्यांनी संपूर्ण शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेण्यासाठी केशिका तयार होऊ लागतात.
५. पचन संस्था
दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला तुमच्या बाळाची पचनसंस्था आधीच विकसित होईल. दुस–या तिमाहीत, बाळ चोखणे आणि गिळणे देखील शिकेल. गर्भजलाद्वारे खाल्लेल्या अन्नाची चवही तो घेऊ शकेल. त्याच्या पुढच्या आयुष्यात त्याच्या आवडी निवडी ह्यावर अवलंबून असणार आहेत त्यामुळे भरपूर फळे आणि भाज्या खा. जरी तुमच्या बाळाला मिळणारे सर्व पोषण तुमच्या नाळेद्वारे मिळत असले तरी, बाळाची उत्सर्जन प्रणाली देखील आता चांगली काम करत असेल. बाळ आता दर ४० मिनिटांनी लघवी करत असेल.
शरीरातील बदल
पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीपेक्षा दुसरी तिमाही अधिक आरामदायक असली तरीसुद्धा तुमच्या शरीरात होणाऱ्या काही बदलांची जाणीव तुम्हाला होणे आवश्यक आहे.
१. संप्रेरकांमध्ये होणारे बदल
इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन आणि इतर अनेक संप्रेरकांचे प्रमाण आणि कार्य ह्यामुळे तुमच्या शरीरात विविध बदल होतात. हे बदल केवळ तुमच्या मूडवरच परिणाम करत नाहीत तर तुमच्या गर्भाच्या विकासातही मदत करतात. तुम्ही व्यवस्थापित करू शकणार्या शारीरिक व्यायामावरही परिणाम करतात.
२. संवेदनांमध्ये होणारा बदल
गरोदरपणात तुमची दृष्टी, चव आणि गंध सर्व बदलतात. कॉन्टॅक्ट लेन्स घातल्यावर काही स्त्रियांना दृष्टीदोष, अंधुक दिसणे किंवा चिडचिड होऊ शकते. स्त्रिया देखील त्यांच्या टेस्ट बड्स मध्ये झालेला बदल अनुभवतात कारण त्या अधिक खारट किंवा गोड पदार्थांना प्राधान्य देऊ लागतात. आंबट पदार्थही त्यांना आवडू लागतात. काही स्त्रिया गरोदरपणात वेगवेगळ्या सुगंधांना अधिक संवेदनशील असल्याचे सांगतात.
३. स्तनांमध्ये होणारा बदल
दुसऱ्या तिमाहीत स्तनांमध्ये वेदना कमी होत असल्या तरी सुद्धा त्यांचा आकार खूप मोठा होईल कारण ते तुमच्या बाळाला स्तनपान करण्यासाठी तयार होत असतील. त्यासाठी चांगल्या सपोर्टिव्ह ब्रा घ्या. दुस–या तिमाहीत, बहुतेक स्त्रियांच्या स्तनांमधून कोलोस्ट्रम नावाचा जाड पिवळसर पदार्थ बाहेर पडू लागतो आणि बहुतेक मातांचे ते पहिले दूध असते.
४. गर्भाशयाच्या मुखात होणारा बदल
गरोदरपणात आणि प्रसूतीदरम्यान, गर्भाशय ग्रीवामध्ये (गर्भाशयाचे मुख) काही बदल होतात. गर्भाशयाच्या मुखाची ऊती घट्ट होते. तुमच्या प्रसूती तारखेच्या काही आठवड्यांपूर्वी, गर्भाशयाच्या भित्तिका मऊ होतात आणि उघडू लागतात.
५. त्वचेतील बदल
हार्मोनल बदलांमुळे बहुतेक स्त्रियांना “गरोदरपणाचे तेज” येते. कारण संप्रेरकांच्या पातळीतील बदलामुळे तुमचा चेहरा गुलाबी दिसतो. काही स्त्रियांच्या बाबतीत चेहऱ्याची त्वचा काळी पडू लागते, त्याला “मास्क ऑफ प्रेग्नन्सी” म्हणून ओळखले जाते. ओटीपोटाच्या मध्यभागी एक गडद रेषा तयार होते आणि त्वचेच्या विस्तारामुळे स्ट्रेच मार्क्स तयार होतात. तुमच्या बाळाचा जन्म झाल्यावर ह्या सर्व गोष्टी सामान्य झाल्या पाहिजेत.
६. केस आणि नखांमध्ये होणारा बदल
तुमचे केस आणि नखांमध्ये बदल होऊ लागतात. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणात केस गळतीचा अनुभव येतो. काही जणींना ह्याच्या पूर्ण विरुद्ध अनुभव येतो. त्यांचे केस जास्त दाट होऊ लागतात. कधीकधी अवांछित ठिकाणी देखील केस येऊ लागतात. नखांच्या बाबतीत सुद्धा असे होते. काहींना जलद नखे वाढण्याचा अनुभव येतो, तर काहींना नखे ठिसूळ झाल्याचे आढळून येते.
७. स्पायडर आणि व्हेरिकोज व्हेन्स
बाळाला अतिरिक्त रक्त पुरवठा करण्यासाठी तुमचे शरीर जुळवून घेत असल्याने रक्ताभिसरण वाढेल अशी अपेक्षा करा. त्या सर्व अतिरिक्त रक्तप्रवाहामुळे तुमच्या त्वचेवर लहान लाल नसा किंवा स्पायडर व्हेन्स दिसतात.
तुमच्या गर्भाशयातील वाढत्या बाळाच्या दबावामुळे पायातील नसांना सूज येऊ शकते आणि त्या जांभळ्या किंवा निळ्या दिसू शकतात. त्यांना वैरिकास व्हेन्स म्हणतात. हे थांबवण्यासाठी उपाय नाही, परंतु जास्त फिरणे आणि जास्त वेळ बसणे टाळा, म्हणजे तुम्हाला अधिक आरामदायी वाटेल आणि त्यामुळे ही समस्या आणखी वाढणार नाही. तुमची प्रसूती झाल्यानंतर हा त्रास कमी व्हायला हवा.
वजन वाढणे
मॉर्निंग सिकनेस कमी झाल्याने, तुमची भूक वाढली पाहिजे. तसेच तुमच्या अन्नपदार्थांच्या सर्व लालसा पुरवताना,तुम्ही संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करा. संतुलित आहार घेतल्याने तुमचे वजन जास्त प्रमाणात वाढणार नाही. दुसऱ्या तिमाहीत प्रत्येक आठवड्याला १ पौंड किंवा १/२ पौंड वजन वाढू शकते.
चाचण्या आणि स्कॅन
प्रीक्लॅम्पसिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या गरोदरपणात होणाऱ्या तीन सामान्य समस्या आहेत. प्रीक्लॅम्पसियची शक्यता वगळण्यासाठी, लघवीतील प्रथिनांचे प्रमाण तपासले जाईल. गरोदरपणातील मधुमेह तपासण्यासाठी, ग्लुकोजची तपासणी सामान्यतः गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी केली जाते. तुम्हाला गरोदरपणाच्या १५ आणि २० आठवड्यांदरम्यान दुसऱ्यांदा रक्त तपासणीसाठी जावे लागेल, त्या दरम्यान तुमच्या बाळाची प्रसूतीची तारीख निश्चित करण्यासाठी अल्ट्रासाऊंडची शिफारस केली जाईल.
खाली दिलेले व्यायाम प्रकार तुम्ही करून बघू शकता
गरोदरपणात खूप थकवा येऊ शकतो, परंतु काही व्यायाम प्रकार केल्याने तुम्हाला खूप मदत होऊ शकते. गरोदरपणात व्यायाम करणाऱ्या स्त्रियांना पाठदुखी कमी होते. शरीर चांगले राहते तसेच शरीराची ऊर्जा सुद्धा टिकून राहते. तुम्ही करून पाहावेत असे काही व्यायाम प्रकार इथे दिलेले आहेत.
१. पाईल
ह्या व्यायामप्रकारासाठी तुम्हाला खुर्चीच्या मागच्या बाजूला समांतर उभे राहावे लागेल. खुर्चीच्या मागील भागावर एक हात ठेवा आणि तुमच्या दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून उभे रहा. तुमचे पोट आत ओढा आणि गुडघ्यात वाकून, तुमचे धड न वाकवता तुमचे शरीर खाली घ्या. पाय सरळ करा आणि पुन्हा असेच करत रहा.
२. प्लँक
प्रथम, जमिनीवर पालथे झोपून गुडघ्यातून पाय वर घ्या, आपले मनगट थेट आपल्या खांद्याच्या समांतर ठेवा आणि नंतर आपले पाय सरळ करा. तुमचे पोट लटकू देऊ नका आणि पाठ सरळ ताठ ठेवा.
३. कर्ल आणि लिफ्ट
खुर्चीवर बसा आणि तुमची पाठ सरळ ठेवा. तुमच्यासोबत प्रत्येकी ५ ते ७ पौंडांची दोन वजने असावीत. आपले हात वाकलेले आणि आपल्या मांड्या समांतर ठेवा. वजन खांद्याच्या उंचीवर येईपर्यंत कोपर वाकवून हळू हळू हात वर करा. सरळ करा आणि सुरुवातीच्या स्थितीकडे परत जा.
दुसऱ्या तिमाहीतील आहार
तुमचे बाळ जसजसे वाढत जाईल तसतसे तुम्हाला जास्त भूक लागणे अपेक्षित आहे. संतुलित आहार घेणे खूप खूप महत्वाचे आहे जेणेकरुन तुमच्या बाळाला त्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळतील.
कुठले अन्नपदार्थ खावेत?
- दररोज वेगवेगळ्या भाज्यांची निवड करा . तुमच्या प्लेट मध्ये कायम रंगीबेरंगी पदार्थांचा समावेश करा. दुसऱ्या तिमाहीत, आहारात फळांचा समावेश करणे आवश्यक आहे.
- ब्रेड, तांदूळ, बटाटे, पास्ता आणि तृणधान्ये यासारखे स्टार्चयुक्त संपूर्ण धान्य कार्बोहायड्रेट ह्यांचा आहारात समावेश करा.
- तुम्हाला पुरेसे कॅल्शियम मिळत असल्याची खात्री करण्यासाठी कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.
- मांस, मासे, मसूर आणि अंडी यांसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ खा.
- ओमेगा ३ साठी आठवड्यातून एकदा तेलकट मासे खा. त्यामुळे तुमच्या बाळाच्या मेंदूच्या विकासास मदत होईल.
- चिप्स आणि कुकीज सारखे स्नॅक्स घेण्याऐवजी टोस्ट, फळे, सँडविच इत्यादी हेल्दी स्नॅक्स घेण्याचा प्रयत्न करा.
टाळायचे पदार्थ
- यकृत आणि यकृत उत्पादने टाळा कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ए ची विषारी पातळी असते.
- स्वॉर्डफिश, शार्क आणि मार्लिन सारखे काही मासे.
- कच्चे किंवा कमी शिजलेले मांस, अंडी किंवा मासे.
- पाश्चराईझ न केलेले चीज.
- कॉफी, तुम्हाला कॉफी खूप आवडत असेल तर कॉफी घेणे पूर्णपणे टाळा.
- दारू.
दुसऱ्या तिमाहीमधील कामांची यादी
दोन “टू–डू” याद्या बनवणे केव्हाही चांगले असते. एक वैद्यकीय आणि आरोग्य समस्यांविषयक यादी आणि दुसरी इतर कामांची यादी. गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत कशी काळजी घेतली पाहिजे हे खाली दिलेले आहे.
वैद्यकीय आणि आरोग्य विषयक कामांची यादी
- तुमच्या डॉक्टरांच्या भेटींचे वेळापत्रक करा आणि ते पाळा.
- कोणत्याही अनावश्यक समस्या टाळण्यासाठी दातांचे काम आधी करून घ्या.
- गर्भधारणा व्यायाम वर्गात सामील व्हा किंवा जे तुम्ही घरी करू शकता असे व्यायाम पहा.
- पौष्टिक आहार घ्या.
- प्रसूतीच्या वेळी तुम्हाला मदतनीस स्त्रीची (सुईण) मदत घ्यायची का ते ठरवा.
- गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात मदत मिळवण्यासाठी पॅरेंटक्राफ्ट किंवा क्लास बघून ठेवा.
- तुमच्या वजनाचा मागोवा ठेवा. “दोन जीवांसाठी खायचे” म्हणून खूप जास्त खाऊ नका. लक्षात ठेवा की तुम्ही दररोज फक्त ३०० अतिरिक्त कॅलरी घेतल्या पाहिजेत.
- तुमच्या डाव्या कुशीवर झोपा कारण त्यामुळे नाळेतील रक्तप्रवाह वाढतो.
- फ्लूचा हंगाम असल्यास लसीकरण करा.
इतर कामांची यादी
- गरोदरपणात घालण्यासाठी कपड्यांच्या खरेदी साठी बाहेर पाडा. तुमच्या गरोदरपणाच्या उर्वरित कालावधीत तुम्हाला आरामशीर राहण्याची आवश्यकता असेल. कारण तुमच्या आकारमानात वाढ होणार आहे.
- तुमच्या पतीसोबत बसून बाळाचे नाव ठरवा.
- तुमच्या बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतील म्हणून बजेट बनवा. या गोष्टींसाठी नियोजन करणे चांगले आहे, त्यामुळे तुम्हाला नंतर कोणतीही समस्या येत नाही.
- तुमचे घर बेबी–प्रूफ करा आणि बाळांसाठी अनुकूल नसलेल्या गोष्टी काढून टाका. तुम्ही तुमच्या बाळाची खोली सजवण्यातही आनंद घेऊ शकता.
दुसऱ्या तिमाहीत घ्यावयाची खबरदारी
तुमच्या गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत तुम्हाला काही खबरदारी घेणे आवश्यक आहे:
- तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिलेल्या सप्लिमेंट्स घ्या.
- आपल्या पोटावर कधीही झोपू नका, अन्यथा बाळ गुदमरण्याची शक्यता असते.
- कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे स्वतः औषोधोपचार करणे टाळा. तुम्हाला आजारी वाटत असल्यास नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- जड वस्तू उचलू नका किंवा खूप त्रासदायक काहीही करू नका.
खालील लक्षणे दिसल्यास सावधगिरी बाळगा
खाली काही लक्षणे दिलेली आहेत. ह्या लक्षणांकडे तुम्ही लक्ष द्या.
- रक्तस्त्राव होत असेल तर ते एक्टोपिक गर्भधारणा किंवा गर्भपाताचे लक्षण असू शकते
- चक्कर येणे.
- तीव्र पेटके येऊन ओटीपोटात दुखणे.
- लवकर वजन वाढणे किंवा कमी होणे.
- दुर्गंधीयुक्त स्त्राव, तो हिरवा, पिवळा, स्पष्ट किंवा रक्तरंजित असू शकतो.
- सतत आणि तीव्र डोकेदुखी होणे, ओटीपोटात दुखणे आणि सूज येणे. सामान्यत: जेव्हा आई २० आठवड्यांची गर्भवती असते तेव्हा ही लक्षणे उद्भवतात. ही प्रीक्लॅम्पसियाची लक्षणे आहेत.
- तुम्ही ६ महिन्यांच्या गरोदर असताना बाळ कमी सक्रिय असेल तर.
ही सगळी तयारी करताना तुम्हाला पुढे काय होणार ह्याबद्दल चिंता वाटू शकते. परंतु आराम करणे लक्षात ठेवा. तुमच्या चेकलिस्ट मधील प्रत्येक गोष्टीचे पालन करा. विशेषकरून संतुलित आहार घेणे, भरपूर पाणी पिणे ह्या गोष्टी पाळा. विश्रांती घ्या. व्यायामासाठी थोडा वेळ द्या . तुमचे डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील. तुमचे बाळ जेव्हा तुमच्या हातात असेल तेव्हा तुम्हाला आधी झालेल्या त्रासाचे काहीच वाटणार नाही!
आणखी वाचा:
दुसऱ्या तिमाहीतील आहार व पोषण
गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत करता येतील असे सुरक्षित व्यायामप्रकार