In this Article
मूल जन्माला आल्यापासून त्याच्या वाढीवर आणि विकासावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. ह्यापैकी काही घटकांवर आपले नियंत्रण असते तर काही घटकांवर नसते. हे घटक मुलाच्या शारीरिक, संज्ञानात्मक आणि सामाजिक-भावनिक विकासावर लक्षणीय परिणाम करू शकतात. तसेच आनुवंशिक, पर्यावरणीय आणि सामाजिक घटकांचा सुद्धा मुलांच्या वाढीवर परिणाम होत असतो. मुलांच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करणार्या घटकांची माहिती घेतल्यास मुलांना चांगल्या प्रकारे वाढविण्यास मदत होते. मुलांचे पोषण, शारीरिक क्रियाकलाप, कौटुंबिक पार्श्वभूमी, संस्कृती तसेच शिक्षण आणि आरोग्य सुविधा ह्यासारख्या घटकांचा मुलांच्या वाढीवर आणि विकासावर कसा परिणाम होतो ह्याविषयी माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे.
व्हिडिओ: मुलांच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करणारे घटक
वाढ आणि विकासाची व्याख्या कशी केली जाते?
वाढ आणि विकास हे समानार्थी असले तरी जैविक दृष्ट्या त्यांचे वेगवेगळे अर्थ आहेत. वाढ म्हणजे उंची, वजन, आकार इ. यांसारख्या शारीरिक वैशिष्ट्यांमधील बदल होत. ह्याउलट, विकास म्हणजे सुव्यवस्थित आणि अर्थपूर्ण वाढ होण्यासाठी होणारे गुणात्मक बदल होय. ह्या गुणात्मक बदलांमुळे परिपक्वता वाढते. वाढ आणि विकास हे एकमेकांना हातभार लावतात आणि ते अविभाज्य असतात. वाढ आणि विकास एकत्रच होतात.
उदाहरणार्थ, 8 महिन्यांचे होईपर्यंत, बहुतेक बाळांचे वजन सुमारे 8 ते 10 किलोग्रॅम असू शकते आणि ही बाळे बसू शकतात. वाढ आणि विकासाची व्याख्या तंतोतंत समजून घेणे हे तुमच्या बाळाच्या चांगल्यासाठी आवश्यक आहे.
मुलाचा योग्य विकास का महत्त्वाचा आहे?
मुलाचा योग्य विकास अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हा विकास तुमच्या मुलाच्या यशाचा पाया असतो. मुलाच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात, त्यांच्या मेंदूचा वेगाने विकास होतो. ह्या काळात त्यांचे अनुभव त्यांच्या संज्ञानात्मक, भावनिक आणि सामाजिक विकासाला आकार देतात.
- मुलांचा योग्य विकास होणे आवश्यक आहे कारण त्यामुळे त्यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत होते. ज्या मुलांना पुरेसे पोषण, प्रेम आणि काळजी मिळते, तसेच ज्या मुलांना शिक्षण मिळते आणि सभोवतालचे जग एक्सप्लोर करण्याची संधी दिली जाते,अशी मुले मोठी झाल्यावर त्यांच्यामध्ये आवश्यक कौशल्ये आणि क्षमता विकसित होण्याची शक्यता अधिक असते.
- शिवाय, मुलांचा योग्य विकास होणे हे निरोगी नातेसंबंध आणि सामाजिकसंबंध विकसित करण्यासाठी आवश्यक असतो. वाढीच्या सुरुवातीच्या काळात सकारात्मक अनुभव असलेल्या मुलांमध्ये अधिक महत्त्वाची सामाजिक कौशल्ये, सहानुभूती आणि भावनिक नियमन असण्याची शक्यता असते, त्यामुळे मुळे त्यांना इतरांशी चांगले संबंध निर्माण करता येतात आणि सामाजिक परिस्थिती प्रभावीपणे हाताळता येते.
- याउलट, ज्या मुलांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष, गैरवर्तन किंवा आघाताचा अनुभव येतो त्यांना विकासात्मक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे ह्या मुलाना संज्ञानात्मक आणि भावनिक नियमन करताना संघर्ष करावा लागतो.त्यांना निरोगी नातेसंबंध तयार करण्यात अडचणी येऊ शकतात. चिंता आणि नैराश्य यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना ही मुले अधिक बळी पडू शकतात.
मुलाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करणारे 10 घटक
निसर्ग आणि पालनपोषण या दोन्ही गोष्टी मुलांच्या वाढीस आणि विकासास हातभार लावतात. निसर्गाने जे दिले आहे ते स्थिर असले तरी, पालनपोषणामुळेही मोठा फरक पडतो. मुलांच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करणारे काही घटक येथे आहेत.
1. आनुवंशिकता
आनुवंशिकता म्हणजे पालकांकडून त्यांच्या जनुकांद्वारे मुलांमध्ये आलेली वैशिष्ट्ये होत. उंची, वजन, शरीराची रचना, डोळ्याचा रंग, केसांचा पोत आणि अगदी बुद्धिमत्ता आणि योग्यता यासारख्या शारीरिक स्वरूपाच्या सर्व पैलूंवर त्याचा प्रभाव पडतो. हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी रोग आणि परिस्थिती देखील जनुकांमधून मुलांपर्यंत येऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांच्या वाढीवर आणि विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. परंतु, पर्यावरणीय घटक आणि पालनपोषणामुळे ह्या जनुकांमध्ये आधीच अस्तित्वात असलेल्या गुणांपैकी सर्वोत्तम गुण मिळू शकतात
2. पर्यावरण
मुलांच्या विकासात त्यांचे आजूबाजूचे वातावरण महत्वपूर्ण भूमिका बजावते. ह्या वातावरणामुळे मुलांना शारीरिक आणि मानसिक प्रोत्साहन मिळते. बालपणाच्या सुरुवातीच्या काळात मुलाच्या विकासावर विविध घटक परिणाम करतात. विकासावर परिणाम करणाऱ्या काही पर्यावरणीय घटकांमध्ये मूल राहते त्या ठिकाणचा भौतिक परिसर आणि भौगोलिक परिस्थिती इत्यादींचा समावेश होतो. तसेच सामाजिक वातावरण, कुटुंब आणि समवयस्कांशी असलेले नाते हे घटक सुद्धा असतात. चांगले संगोपन झालेल्या मुलांचा विकास नक्कीच चांगला होतो. एक चांगली शाळा आणि प्रेमळ कुटुंब असलेल्या मुलांमध्ये मजबूत सामाजिक आणि परस्पर संवाद कौशल्ये असतात. ह्यामुळे त्यांना शैक्षणिक आणि इतर क्रियाकलापांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करता येऊ शकते. तणावपूर्ण वातावरणात वाढलेल्या मुलांसाठी हे नक्कीच वेगळे असेल.
3. लिंग
मुलाचे लिंग हा मुलाची शारीरिक वाढ आणि विकासावर परिणाम करणारा आणखी एक प्रमुख घटक आहे. विशेषतः तरुणपणात मुले आणि मुली वेगवेगळ्या प्रकारे वाढतात. मुले मुलींपेक्षा उंच आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत असतात.परंतु, किशोरवयात मुली लवकर परिपक्व होतात, तर मुलांना वेळ लागतो. त्यांच्या शरीराच्या शारिरीक संरचनेतही फरक असतो. त्यामुळे मुले अधिक ऍथलेटिक बनतात आणि शारीरिक कठोरता आवश्यक असलेल्या क्रियाकलापांसाठी योग्य असतात. त्यांचे स्वभावही वेगवेगळे असतात आणि म्हणून ते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस दाखवतात.
4. व्यायाम आणि आरोग्य
मुलांची चांगली वाढ होण्यासाठी एक शिस्त म्हणून शारीरिक व्यायाम करणे किंवा मुलांना जाणूनबुजून शारीरिक क्रियाकलापांमध्ये गुंतवणे असा इथे व्यायामाचा अर्थ होत नाही. येथे व्यायाम म्हणजे सामान्य खेळ आणि क्रियाकलाप होत. ह्यामुळे स्नायूंची ताकद वाढण्यासाठी तसेच हाडांच्या वस्तुमानात वाढ होण्यास मदत होते. योग्य व्यायामामुळे मुलांची चांगली वाढ होते. आणि मूल विकासाचे टप्पे वेळेवर किंवा लवकर टप्पे गाठते. व्यायामामुळे मुले निरोगी राहतात. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि मुले रोगांविरुद्ध लढा देऊ शकतात. विशेषतः जर मुले बाहेर खेळत असतील तर मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे गरजेचे आहे. मैदानी खेळामुळे मुलांना सूक्ष्मजीवाणूंचा सामना करावा लागतो. मुलांची प्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर मुले जास्त चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकतात. त्यामुळे ऍलर्जी टाळण्यास मदत होते.
5. संप्रेरके
संप्रेरके अंतःस्रावी प्रणालीशी संबंधित असतात. आपल्या शरीराच्या विविध कार्यांवर ह्या संप्रेरकांचा परिणाम होत असतो. ही संप्रेरके शरीरात वेगवेगळ्या ग्रंथींद्वारे तयार केली जातात. आणि शरीराच्या कार्यावर नियंत्रण ठेवत असतात. मुलांची शारीरिक वाढ आणि विकास योग्य पद्धतीने होण्यासाठी ह्या संप्रेरकांचे कार्य चांगले होणे आवश्यक आहे. संप्रेरके तयार करणाऱ्या ग्रंथींच्या कार्यामध्ये असंतुलन झाल्यामुळे वाढीमध्ये दोष निर्माण होतात. लठ्ठपणा, वर्तणुकीशी संबंधित समस्या आणि इतर रोग होऊ शकतात. तारुण्यात लैंगिक संप्रेरके तयार होतात. ही लैंगिक संप्रेरके अवयवांच्या विकासावर आणि मुला-मुलींमध्ये दुय्यम लैंगिक वैशिष्ट्यांचे स्वरूप नियंत्रित करतात.
6. पोषण
वाढीसाठी पोषण हा एक महत्त्वाचा घटक आहे. शरीराला स्वतःची निर्मिती आणि दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आपण खातो त्या अन्नातून येते. कुपोषणामुळे आवश्यक पोषणमूल्यांची कमतरता झाल्यामुळे आजार होऊ शकतात. हे आजार मुलांच्या वाढीवर आणि विकासावर विपरित परिणाम करतात. दुसरीकडे, जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा आणि दीर्घकाळापर्यंत मधुमेह आणि हृदयरोग ह्यासारख्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. मेंदू आणि शरीराच्या विकासासाठी जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थांनी युक्त संतुलित आहार आवश्यक आहे.
7. कौटुंबिक प्रभाव
मुलाचे चांगले पोषण होण्यासाठी तसेच ह्या मुलांचा मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या विकास होण्यासाठी कुटुंबांचा सर्वात मोठा वाटा असतो. त्यांचे संगोपन त्यांच्या पालकांनी, आजी-आजोबांनी किंवा केअर टेकर ह्यापैकी कुणीही केलेले असले तरी लहान मुलांना प्रेम, काळजी आणि सौजन्य ह्यांची गरज असते. जेव्हा कुटुंबात लहान मुलांसाठी वेळ, शक्ती आणि पैसा खर्च केला जातो तेव्हा मुलांची सकारात्मक वाढ होते. तुमचे मूल एक चांगली कार्यशील व्यक्ती म्हणून विकसित होण्यासाठी मूलभूत प्रेम, काळजी आणि सौजन्य आवश्यक आहे. कुटुंबात मुलांच्या विकासासाठी वेळ, शक्ती खर्च केल्यास आणि मुलांना प्रेम दिल्यास मुलांची सकारात्मक वाढ झालेली दिसून येते. मुलांच्या विकासासाठी त्यांना गोष्टी वाचून दाखवणे, त्यांच्याशी खेळणे, तसेच त्यांच्याशी खोल अर्थपूर्ण संभाषणे करणे आवश्यक आहे. ज्या कुटुंबांमध्ये मुलांकडे दुर्लक्ष होते तिथे मुलांचा विकास नीट होत नाही. अश्या मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये कमी असतात. आणि प्रौढ म्हणून इतरांशी संबंध जोडण्यामध्ये अडचणी येतात. चुकीच्या पालकत्वामुळे मुलांवर नकारात्मक परिणाम देखील होतात कारण ही लहान मुले मोठी झाल्यावर सुद्धा पालकांवर अवलंबून असतात आणि स्वतःच्या जीवनातील अडचणींना तोंड देऊ शकत नाहीत.
8. भौगोलिक प्रभाव
तुमची मुले कशी होतील यावर तुम्ही कुठे राहता याचाही मोठा प्रभाव पडतो. मुले ज्या शाळांमध्ये शिकतात, ते ज्या परिसरात राहतात, समुदाय आणि त्यांच्या समवयस्क मंडळांनी दिलेल्या संधी इत्यादींचा मुलांच्या विकासावर परिणाम होतो. उद्याने, ग्रंथालये आणि एकत्र खेळण्याची सुविधा असणारी सामुदायिक केंद्रे असलेल्या समृद्ध समुदायात राहिल्याने लहान मुलांची कौशल्ये, प्रतिभा आणि वर्तन विकसित होण्यासाठी मदत होते. जिथे अश्या सुविधा नसतात तिथे मुले बाहेर जाण्याऐवजी घरी व्हिडीओ गेम्स खेळू शकतात. एखाद्या ठिकाणच्या हवामानाचा सुद्धा मुलांच्या शारीरिक विकासावर परिणाम होतो. मुलांना ऍलर्जी होऊ शकतात आणि इतर आरोग्य विषयक समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात.
9. सामाजिक-आर्थिक स्थिती
कुटुंबाची सामाजिक-आर्थिक स्थिती मुलाला मिळणाऱ्या संधीची गुणवत्ता ठरवते. अधिक फी असलेल्या चांगल्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन अभ्यास केल्यास निश्चितच दीर्घकाळात फायदे होतात. चांगली आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबातील मुलांसाठी उत्तम शिक्षण संसाधने उपलब्ध होऊ शकतात आणि मुलांना गरज पडल्यास ते विशेष मदत घेऊ शकतात. गरीब कुटुंबातील मुलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी शैक्षणिक संसाधने आणि चांगले पोषण मिळू शकत नाही. गरीब घरातील मुलांच्या पालकांना खूप काळ काम करावे लागते आणि त्यामुळे ते मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत.
10. शिकणे
शिक्षणामध्ये शालेय शिक्षणव्यक्तिरिक बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. शिक्षण मुलांचा मानसिक, बौद्धिक, भावनिक विकास करण्यास मदत करते तसेच सामाजिकदृष्ट्या मुलाला तयार करते जेणेकरून ते मूल निरोगी, कार्यशील व्यक्ती म्हणून कार्य करू शकेल. शिक्षणामुळे मुलाच्या मनाचा विकास होतो आणि मूल काही प्रमाणात परिपक्व होते. मुलांना शारीरिक दृष्ट्या तयार करण्यासाठी एखादा क्रियाकलाप किंवा व्यायाम सातत्याने केला जातो आणि त्यामुळे शिकलेले धडे मजबूत होण्यास मदत होते. वाद्य वाजवणे हे एक उदाहरण आहे. हे वाद्य वाजवण्याचा सराव केल्यास ते अधिक चांगल्याप्रकारे वाजवले जाते. म्हणून, परिणाम प्राप्त होईपर्यंत कोणत्याही शिकवलेल्या धड्याची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. मुलांच्या विकासावर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक कोणता आहे?
कोणत्याही एका घटकाचा मुलाच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव पडत नाही. त्याऐवजी, अनुवांशिक घटक, पोषण, शारीरिक क्रियाकलाप, पर्यावरणीय घटक, सामाजिक-सांस्कृतिक घटक, शिक्षण आणि आरोग्य सेवा ह्यासारख्या घटकांचा मुलांच्या विकासावर परिणाम होतो. यातील प्रत्येक घटक मुलाची वाढ आणि विकास ह्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो.
2. मुलांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी घटक सुधारले जाऊ शकतात का?
होय, मुलांच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करणारे अनेक घटक मुलांची निरोगी वाढ आणि विकास होण्यासाठी सुधारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, पालक त्यांच्या मुलांना पौष्टिक आहार देऊ शकतात, नियमित व्यायाम करण्यास प्रोत्साहन देऊ शकतात, सुरक्षित आणि योग्य पालनपोषण करणारे वातावरण प्रदान करू शकतात. मुलांचे मुलांचे योग्य पालनपोषण, शिक्षण होणे गरजेचे आहे.
मुलांची वाढ आणि विकास होण्यात निसर्गाचा मोठा वाटा आहे. तरीसुद्धा मुलांचे योग्य पालनपोषण होणे आवश्यक आहे. आधी सांगितल्याप्रमाणे, यापैकी काही घटक तुम्हाला नियंत्रित करता येणार नाहीत. त्यामुळे तुमच्याकडे जे आहे त्याचा उपयोग तुम्हाला करावा लागेल. परंतु काही गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांसाठी निश्चितपणे करू शकता. तुमच्या मुलाला योग्य प्रमाणात विश्रांती मिळते आहे का ते पहा. कारण त्याचा विकास तो किती झोपतो यावर अवलंबून असतो. या व्यतिरिक्त, तुमच्या मुलाचे पोषण आणि व्यायाम ह्यावर बारीक लक्ष ठेवा. कारण हे दोन्ही घटक तुमच्या मुलाची निरोगी वाढ आणि विकास होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात.