Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण लक्षणे पाळी चुकण्याआधीची गर्भारपणाची २१ पूर्व-लक्षणे

पाळी चुकण्याआधीची गर्भारपणाची २१ पूर्व-लक्षणे

पाळी चुकण्याआधीची गर्भारपणाची २१ पूर्व-लक्षणे

चुकलेली पाळी हे अर्थातच गरोदरपणाचे स्पष्ट लक्षण आहे. पण ते एकमेव नाही. पाळी चुकण्याआधी अंडे फलित होऊन ते गर्भाशयाच्या आवरणात रुजते. ज्या क्षणी रोपण होते, त्या क्षणापासून तुम्ही गरोदर असता.जेव्हा गरोदरपणाचे काही दिवस किंवा आठवडे पालटतात, तेव्हा शरीर पाळीच्या तारखेच्या आधी गरोदरपणाचे संकेत देऊ लागते. गर्भधारणेच्या पहिल्या आठवड्यात, गरोदर असल्याची लक्षणे आढळतात. खरंतर आनंदी आणि चिंताग्रस्त माता ही लक्षणं ओळखण्यास असमर्थ ठरतात. तथापि, पाळी चुकण्याच्याही आधी आपण गरोदर आहोत हे समजण्याचा काही मार्ग आहे का? तर हे शोधण्यासाठी हे वाचा.

तुम्ही गरोदर आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी गरोदरपणाची चाचणी करणे हा सर्वात अचूक मार्ग आहे. तथापि, सामान्यतः आढळणाऱ्या काही लक्षणांवरून, पाळी चुकण्याच्या आधी तुम्ही गरोदर आहात की नाही हे समजू शकते. इथे काही पूर्व-लक्षणांची यादी दिली आहे, जी तुम्हाला तुम्ही गरोदर आहेत की नाही हे चाचण्यांची वाट पाहण्याचा त्रास वाचवून ते जाणून घेण्यास मदत करेल.

पाळी चुकण्याआधीची गर्भारपणाची लक्षणे

१. रोपण,रक्तस्त्राव आणि पेटके

मासिक पाळी सारखे पेटके येणे, हलका रक्तस्त्राव आणि डाग, यांना साधारणपणे रोपणादरम्यानचा रक्तस्त्राव असे संबोधले जाते आणि ही गरोदरपणाची स्पष्ट पूर्वलक्षणे आहेत. फलित झालेले अंडे गर्भाशयाच्या आवरणास चिकटते आणि रोपण होते. जर तुमची पाळी नियमित असेल तर ही लक्षणे चुकलेल्या पाळीच्या आधी साधारणतः एक आठवडा दिसतील. तसेच रक्ताचे काही डाग अंतःवस्त्रावर दिसतील किंवा योनी पुसून घेताना आढळतील. ही लक्षणे मासिक पाळी किंवा गर्भपाताची असू शकतील.

२.शरीराच्या पायाभूत तापमानात वाढ

बऱ्याच दुसऱ्या लक्षणांपेक्षा हे अचूक लक्षण आहे. लक्षात घेण्यासारख्या बदलांचा अंदाज घेण्यासाठी, काही महिने शरीराच्या पायाभूत तापमानाचे परीक्षण केले पाहिजे. ओव्यूलेशनच्या आधी शरीराचे तापमान वाढते आणि मासिक पाळी झाल्यानंतर ते सामान्य होते. पण गर्भावस्थेत शरीराचे तापमान वाढलेलेच राहते.गर्भारोपण प्रक्रिया झाल्यावर, शरीर दुसऱ्या एका आयुष्याला सामावून घेण्याची तयारी करत असते, त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. गर्भधारणेच्या काळासाठी रोगप्रतिकारक यंत्रणा सज्ज होत असते. जर तुमच्या शरीराचे तापमान ओव्यूलेशन नंतर २० दिवस वाढलेले रहात असेल तर ते एका नवीन प्रवासाची सुरुवात सूचित करते.

३. दुखरे,हळूवार आणि जड स्तन

दुखरे, हळूवार आणि जड स्तन आणि स्तनाग्रांभोवतीचा वर्तुळाकार भाग गडद होणे, ही ठळक लक्षणे मासिक पाळी च्या आधीच्या आठवड्यात आढळतात. गर्भधारणेनंतर इस्ट्रोजेनच्या वाढलेल्या पातळीमुळे, स्तन भरीव, दुखरे होतात आणि स्त्रीला स्तनांमध्ये तीव्र वेदना होतात. स्तनाग्रे गडद होतात. त्यांना खाज सुटते आणि टोचल्यासारखे वाटते आणि अर्थात ही लक्षणे स्तनांच्या मासिक पाळी पूर्व लक्षणांसारखीच असतात, पण पाळी चुकल्यानंतर पण ती राहतात.

४. अशक्तपणा आणि थकवा

संप्रेरकांमधील बदलामुळे संपूर्ण वेळ तुम्हाला दमल्यासारखे आणि थकल्यासारखे वाटेल. थकवा आणि सतत झोप येणे ही गरोदर असल्याची पूर्व लक्षणे आहेत. छोट्या छोट्या कामांनंतर थकायला होणे हे अगदी स्वाभाविक आहे. प्रोजेस्टेरॉन ची वाढलेली पातळी झोप येण्याच्या प्रवृत्तीला कारणीभूत असते आणि हे संपूर्ण पहिल्या तिमाहीत आढळते. वाढणाऱ्या गर्भासाठी शरीर जास्त रक्ताची निर्मिती करू लागते त्यामुळे थकवा जाणवतो. थकवा घालवण्यासाठी खनिजे, जीवनसत्त्वे, लोह आणि भरपूर द्रवपदार्थ युक्त निरोगी आहार घेतला पाहिजे.

५. मळमळणे

मळमळणे किंवा उलट्या होणे हे सर्रास आढळणारे लक्षण असून “मॉर्निंग सिकनेस”ह्या नावाने ओळखले जाते. आणि तुम्ही गरोदर असल्याचे दर्शवते. गर्भधारणेनंतर काही दिवसातच तुम्हाला अस्वस्थ वाटेल आणि मळमळणे सुरु होईल. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ची पातळी वाढल्यामुळे तुम्हाला प्रत्येक दिवशी उलटी करण्याची इच्छा होऊ शकते. मळमळ सकाळीच होईल असे नाही तर केव्हाही होऊ शकते आणि दिवसभर राहू शकते तसेच पूर्ण तीनही तिमाही राहू शकते. साधारणपणे ८०% स्त्रिया ह्या “मळमळ” ह्या विकाराने, पाळी चुकल्यापासूनच्या पहिल्या काही आठवड्यात पीडित असतात. मळमळीच्या लक्षणांची तीव्रता वेगवेगळ्या महिलांमध्ये बदलते परंतु ५०% गर्भवती महिलांना गर्भधारणेच्या सहा आठवड्यांच्या आत किंवा त्याच्याही आधी लक्षणे जाणवतात.

६. पदार्थांची तल्लफ,अस्वस्थता आणि वेगवेगळ्या वासांविषयी संवेदनशीलता

गरोदरपणातील संप्रेरकांमुळे, एखाद्या विशिष्ठ पदार्थाची लालसा निर्माण होते, आणि एखाद्या वासामुळे अस्वस्थ वाटू लागते. गर्भारपणानंतरच्या पहिल्या काही आठवड्यांनंतर वासांविषयीची संवेदनशीलता अचानक वाढते, चव उग्र लागते आणि अन्नाविषयी तिटकारा वाटतो, आणि ही लक्षणे काही वेळा गर्भधारणेच्या संपूर्ण कालावधी पर्यंत राहतात किंवा राहत नाही. काही जणींची पाळी चुकण्याआधी भूक मंदावते.

७. पोट फुगणे

सर्वसामान्यपणे पाळी चुकण्याआधी पोट फुगणे किंवा पोटाला मुरडा बसणे हे लक्षण सर्रास आढळते. प्रोजेस्टेरॉन च्या पातळीत वाढ झाल्याचा हा परिणाम आहे. संप्रेरकांची वाढलेली पातळी पचन रोखते आणि त्यामुळे आतड्यांमध्ये वायू अडकून राहतो. वाढलेल्या पोटामुळे कमरेभोवती कपडे घट्ट बसतात आणि त्यामुळे अस्वस्थता जाणवते. फुगलेल्या पोटामुळे गॅसेस होतात आणि ढेकर येतात. ही अस्वस्थता घालवण्यासाठी सुयोग्य आहार आणि अन्नाचे संयमित सेवन करणे योग्य ठरते.

८. वारंवार लघवीला जावेसे वाटणे

वारंवार लघवीला जावेसे वाटणे हे ठळक लक्षण आहे. ही प्रवृत्ती गर्भारपणात तशीच राहते कारण जसजशी गर्भाशयाची वाढ होते त्याचा मूत्राशयावर दाब पडतो. संप्रेरकांमधील बदलामुळे आणि रक्तात वाढ होण्याच्या प्रक्रियेमुळे, वारंवार लघवी होणे हे लक्षण, संपूर्ण गर्भावस्थेत आढळते.मूत्रपिंडे रक्तशुद्धी करण्याचे काम अहोरात्र करीत असतात, त्यामुळे वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते. साधारणपणे सगळ्याच गरोदर महिलांना असा अनुभव येतो आणि हे गरोदर पणाच्या पूर्वलक्षणांपैकी एक आहे. जेंव्हा पाळीची तारीख जवळ येते तेंव्हा ह्याची सुरुवात होते.

९. मनःस्थिती मध्ये होणारे बदल

संप्रेरकांमधील बदलांमुळे तुम्हाला कधी खूप आनंदी किंवा कधी खूप उदास वाटू शकते. तुमची पाळी चुकण्याआधीचे हे आणखी एक लक्षण आहे. आणि त्यामुळे तुम्हाला छोट्या आणि क्षुल्लक गोष्टींमुळे सुद्धा रडू कोसळेल. हार्मोन्समधील असंतुलन मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरला प्रभावित करते,ज्यामुळे संताप आणि आकस्मिक भावनिक उद्रेक होतात. जर तुम्हाला बरे वाटत नसेल तर आरामासाठी वेळ काढा आणि विश्रांती घ्या.

१०. चक्कर येणे

चक्कर आणि हलकी डोकेदुखी हे गर्भधारणेपूर्व लक्षण, कित्येक माता होऊ पाहणाऱ्या महिलांमध्ये आढळते.रक्तवाहिन्या रुंदावतात त्यामुळे रक्तदाब कमी होतो, म्हणून चक्कर येते आणि असंतुलन जाणवते. हे लक्षण पहिल्या तिमाहीत जाणवते आणि कालांतराने कमी होते. पण चक्कर येण्यासोबत योनीमार्गातून रक्त येणे किंवा पोटदुखी जाणवत असेल तर ताबडतोब तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

११. बद्धकोष्ठता

प्रोजेस्टेरॉन ह्या संप्रेरकांमुळे मलावरोध होतो आणि तसेच तुम्हाला शौचास त्रास होत असेल तर ते गर्भधारणेचे पूर्व लक्षण असू शकते. संप्रेरकांमधील वाढीमुळे शौचास घट्ट होते, आणि पचनसंस्थेतील अन्न पुढे जाण्याची गती कमी होते जर तुम्हाला पाळी चुकल्यानंर एक आठवडा बद्धकोष्ठता जाणवत राहिली तर गरोदरपणाची चाचणी करून घ्या.

१२. डोकेदुखी

डोकेदुखी हे एक मासिकपाळीपूर्व सर्वसामान्य लक्षण आहे. पण गर्भधारणेनंतर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन संप्रेरके बाळासाठी गर्भाशय तयार करण्यासाठी अहोरात्र काम करीत असतात. ही संप्रेरकांमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते,त्यामुळे मेंदूतल्या पेशींना ह्या कमी झालेल्या साखरेच्या पातळीमुळे संघर्ष करावा लागतो. आणि म्हणून डोकेदुखी उद्भवते.

१३. दुखणे आणि वेदना

संप्रेरके एका नवीन आयुष्याला तुमच्यात जागा करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. आणि त्याचा अस्थिबंधांवर परिणाम होऊन ते ताणण्याची गरज भासू लागते. अस्थिबंध आणि सांध्यांवर ताण आल्यामुळे, पाळी चुकण्यापूर्वी मज्जारज्जू च्या काही भागात वेदना जाणवतात.

१४. तोंडाची चव बदलणे

संप्रेरकांच्या अजब खेळामुळे, तुम्हाला तोंडात विचित्र चव जाणवेल. तुम्हाला असे वाटेल की तुम्ही बेचव धातू गिळला आहे. ही धातूसारखी चव हे तुम्ही आई होण्याच्या मार्गावर आहात, ह्याचे पूर्व लक्षण आहे. पहिल्या तिमाहीनंतर ही लक्षणे सामान्यतः गायब होतात पण काही महिलांमध्ये जास्त काळ राहतात.

१५. खूप तहान लागणे व भूक वाढणे

जर तुम्ही लिटरभर पाणी सहज संपवत असाल तर आश्चर्यचकित होऊ नका. रक्ताच्या वाढलेल्या साठ्यामुळे तुम्हाला खूप तहान लागू शकते. संप्रेरकांच्या उद्रेकामुळे तुमच्या भूक लागण्याच्या प्रवृत्तीमध्ये वाढ होऊन आपण सतत भुकेले आहोत असे वाटेल.

१६. गर्भाशयातील चिकट स्रावामध्ये बदल

गर्भाशयातील चिकट स्त्रावात वाढ होणे हे गर्भधारणा पूर्व लक्षण आहे. गर्भधारणेनंतर हा स्त्राव घट्ट आणि मलईदार होतो.आणि पाळी चुकेपर्यंत तसाच राहतो. लघवी करताना जळजळ जाणवते आणि योनिमार्गाजवळ खाज सुटते.

१७. धाप लागणे

धाप लागणे गरोदरपणाचे पूर्वलक्षण आहे. कारण शरीरातील दोन जीवांना श्वास घेण्यासाठी रक्ताची आणि ऑक्सिजन ची जास्त गरज भासते, वाढणाऱ्या बाळामुळे ही स्थिती तीनही तीम्हयांमध्ये कायम राहते आणि जास्त ऑक्सिजन आणि पोषणाची गरज भासते.

१८. अती लाळ गळणे

जरी हे लक्षण सर्वसामान्य नसले तरी काही महिलांमध्ये पाळी चुकण्याआधी जास्त प्रमाणात लाळ निर्माण होते. ही स्थिती प्रामुख्याने ptyalis gradidarum म्हणून ओळखली जाते आणि मॉर्निंग सिकनेस आणि जळजळीशी निगडीत आहे.मळमळ होत असल्याने तोंडात जास्त द्रव साठवला जातो आणि त्यामुळे लाळ गळते.

१९. गरम वाफा : (हॉट फ्लशेस)

मासिक पाळी दरम्यान किंवा रजोनिवृत्तीच्या सुरुवातीला सामान्यतः हे लक्षण आढळते. गरम वाफ़ा हे गर्भधारणा पण सूचित करते. जर उष्णतेच्या लाटांनी तुमचे अवयव घट्ट धरून ठेवले आहेत असे तुम्हाला वाटले तर तुम्ही गरोदर असण्याची शक्यता जास्त आहे.

२०. डाग,तारुण्यपिटिका आणि फोड

मासिक पाळी च्या आधी मुरुमं आणि पुरळ येणे हे खूप सामान्य आहे. अचानक खूप उद्रेक होणे, हे गर्भधारणे नंतर अचानक वाढलेल्या पातळीमुळे होते. हे कधी कधी उलट सुद्धा होऊ शकते, गर्भधारणेमुळे तुम्हाला पाळीच्या आधी मुरुमे येणे बंद होते, हे सुद्धा बाळाची चाहूल लागण्याचे लक्षण आहे.

२१. विचित्र स्वप्ने

गर्भधारणेच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये, किंबहुना पाळी चुकण्याच्या आधी अगदी ठळक स्वप्ने पडणे प्रचलित आहे. ठळक स्वप्ने पडणे हे अगदी विशेष लक्षण असून, खूप महिलांना गर्भधारणेच्या आधी एक किंवा दोन आठवडे हा विचित्र अनुभव येतो. गरोदरपणातील संप्रेरके गोंधळ उडवून टाकतात आणि गर्भवती आई मध्ये अतुलनीय स्वप्ने आणि भ्रम निर्माण होतात.

पाळी चुकण्याच्या आधी आपण गर्भधारणा लक्षणे किती लवकर अनुभवू शकता ?

लक्षणांची तीव्रता प्रत्येक स्त्री मध्ये वेगवेगळी असते. घट्ट स्तन, मळमळ, थकवा, झोप येणे, वासाची वाढलेली संवेदनशीलता ही सामान्यतः आढळणारी लक्षणे पाळीच्या तारखेआधी एक आठवडा किंवा दहा दिवस सुरु होतात. वारंवार लघवीला जाण्याची प्रवृत्ती पाळीच्या तारखेच्या काही दिवस आधी सुरु होते. इतर लक्षणे, जसे की योनीमार्गातील स्त्राव, गर्भाशयातील चिकट पदार्थ, स्तनाग्रांभोवतीचा गडद होणारा भाग ह्यांना दिसण्यास वेळ लागतो आणि ह्या लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे.

पाळी लांबण्याची कारणे

पाळी लांबण्याची खूप कारणं असू शकतात. तुम्ही गरोदर असण्याची शक्यता असू शकते, पण संप्रेरकांमधील बदल,वजन वाढणे,वजन कमी होणे,औषधांचा परिणाम, ताणामुळे अतिखाणे, थायरॉईड, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम, गर्भनिरोधक गोळ्या आणि औषधे ह्यामुळे सुद्धा उशिरा पाळी येऊ शकते.

PMS सिन्ड्रोम आणि गरोदरपणातील लक्षणांमध्ये काय फरक आहे?

गरोदरपणाची लक्षणे आणि PMS चे परिणाम हे खूप सारखे असतात त्यामुळे तुम्ही नक्की गरोदर आहेत की नाही हे समजण्यासाठी थोडी जास्त वाट पाहावी लागेल. वाढलेले शरीराचे तापमान, योनीमार्गातील स्त्राव मलाईदार होणे,स्तनाग्रांभोवतीचा भाग गडद होणे, ही गर्भधारणेची काही सातत्यपूर्ण लक्षणे आहेत. तरीपण ह्यातील कुठलेही लक्षण पूर्ण पुरावा नाही. त्यामुळे गरोदरपणाची पूर्वचिन्हे नक्की गर्भारपणामुळे आहेत की PMS मुळे हे निश्चित करण्यासाठी गरोदरपणाची चाचणी करून घेणे उत्तम.

पाळी चुकली पण गरोदर नाही अशी शक्यता असते का?

पाळी चुकली म्हणजे तुम्ही गरोदर आहातच असे नाही. पाळी चुकण्याची खूप कारणे असू शकतात. संप्रेरकांमधील बदल, ताण वगैरे. आणि जो पर्यंत गरोदरपणाची चाचणी तुम्ही गरोदर आहेत हे निश्चित करत नाही तो पर्यंत चुकलेली पाळी हे गरोदरपणाचे लक्षण मानणे चुकीचे ठरेल.

तुम्ही गरोदर असताना पाळी येण्याची शक्यता असते का?

बाळाची चाहूल लागलेल्या मातांसाठी, गर्भारपणातील पहिल्या काही दिवसांमध्ये रक्तस्त्राव होणे हे काही असामान्य नाही .रोपण रक्तस्त्राव साधारणपणे, गर्भधारणेच्या ६ ते १२ दिवसानंतर आढळतो. फिकट डाग, मध्यम गुलाबी, हलक्या चॉकलेटी रंगाचा स्त्राव काही तासांसाठी किंवा काही दिवसांसाठी होण्याची शक्यता असते, पण जर तुमची पाळी नियमित नसेल तर, हे पाळीच्या चक्राच्या मध्यावर झालेला दोष असू शकतो. तुम्ही गरोदर आहात किंवा नाही हे नक्की जाणून घेण्यासाठी जवळच्या औषधांच्या दुकानातून गरोदर चाचणी किट आणा किंवा डॉक्टरना भेटून नक्की उत्तर जाणून घ्या.

घरी गरोदरपणाची चाचणी तुम्ही केव्हा घेऊ शकता?

गरोदरपूर्व लक्षणे पाळीच्या काही आठवडे दिसतात. पण सरासरी ओव्यूलेशन नंतर दोन आठवड्यांनी घरी गरोदर चाचणी करावी. Human Chorionic Gonadotropin (HCG) हे संप्रेरक नाळेमध्ये निर्माण केले जाते. आणि जेव्हा गर्भाशयात भ्रुण रोपण होते तेव्हा ते लघवीमध्ये जाते. गर्भाधान प्रक्रियेनंतर हे ६-१२ दिवसांनंतर होते. पाळीच्या तारखेच्या जवळ HCG ची पातळी वाढते. तुमच्या पाळीच्या तारखेचा एक आठवड्यानंतर घरी गरोदरपणाची चाचणी घेण्यासाठी अगदी योग्य वेळ आहे. जर तुम्ही, ही चाचणी पाळीच्या तारखेनंतर घेतलीत तर चाचणी चा निकाल बरोबर असण्याची शक्यता ९०% जास्त असते.

गर्भारपणाची लक्षणे अनुभवण्यास केव्हा सुरुवात होते?

गर्भधारणेनंतर ६-१४ दिवसांनी गरोदर पूर्व लक्षणे दिसून येतात. जर तुम्ही ओव्यूलेशन च्या काळात संभोग केला असेल तर तुमचे शरीर, अर्भकाला वाढवण्याची तयारी करू लागते. अंड्याचे फलन होऊन ते स्वतःचे, भ्रूणभिंती मध्ये रोपण करते. तुम्ही तुमच्या पाळीच्या तारखेच्या १० दिवस आधी गरोदर असता. आणि तेंव्हा तुम्ही थकवा मळमळ यासारखी गरोदरपणाची पूर्वलक्षणे अनुभवू लागता. परंतु गर्भधारणा चाचणी ही पाळीच्या एक किंवा दोन आठवड्यानंतरच सर्वोत्तम परिणाम देते कारण लघवीमध्ये गर्भधारणा हार्मोनचा स्तर वाजवी पातळीवर असणे आवश्यक आहे.

सर्व स्त्रियांमध्ये गर्भधारणेची लक्षणे आणि अवस्था सारख्या नसतात. काही लक्षणे हे काही वैद्यकीय कारणांमुळे असू शकतात, जी कारणे तुम्हाला माहित नसतील. जी लक्षणे वरती दिली आहेत, ती आढळली तरी तुम्ही गरोदर असालच ह्याची खात्री नाही. जर तुम्ही कुटुंबाची सुरुवात करू इच्छित असाल तर वर दिलेल्या सूचना ह्या फक्त दिशादर्शक म्हणून वापराव्यात. असेही होऊ शकते की वरीलपैकी कुठलेही लक्षण तुम्हाला आढळणार नाही पण तुम्ही गरोदर असू शकता. आणि तुम्हाला सुदृढ बाळ होऊ शकते.

गर्भधारणाला केवळ तेव्हाच पुष्टी केली जाऊ शकते जेव्हा आपली पाळी चुकली असेल किंवा गर्भधारणा चाचणी किट आणि सर्व प्रकरणांमध्ये आरोग्य व्यावसायिक, रक्त चाचणीद्वारे प्रमाणीत करतात तेव्हाच!

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article