बाळ

डायपर रॅश – ओळख, कारणे आणि उपाय

बाळाची त्वचा खूप संवेदनशील असते. जर तुमच्या लक्षात की बाळाची त्वचा लाल झाली आहे आणि डायपर लावतो त्या भागात पुरळ उठले आहेत तर आपल्या बाळाला डायपर रॅश झाल्याची शक्यता आहे. बाळांमध्ये डायपर रॅश खूप सामान्य आहे, आणि बऱयाच पालकांना बाळाच्या वाढीच्या पहिल्या वर्षापर्यंत ह्याचा अनुभव येतो. डायपर रॅश झालेल्या त्वचेला थोडी सूज येते आणि त्वचेवर काही पुरळ येतात.

डायपर रॅश काय आहे?

बाळ जेव्हा डायपर घालू लागते तेव्हा बाळाला डायपर रॅश होण्यास सुरुवात होते. डायपर खालच्या त्वचेवर ह्याचा परिणाम होतो. बाळाला डायपर रॅश किंवा डायपर डरमॅटिटिस होणे हे खूप सामान्य असून, ह्यामध्ये बाळाची त्वचा लाल होते आणि थोडी सूज येते. साधारणपणे २ वर्षांपर्यंच्या बाळांना आणि लहान मुलांना डायपर रॅश होते. जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या कुल्ल्यांवर पुरळ आढळले तर तुमच्या बाळाला यीस्ट डायपर रॅश झाली असण्याची शक्यता असते. यीस्टच्या संसर्गामुळे डायपर रॅश होते. यीस्ट डायपर रॅश झालेली त्वचा हात लावल्यावर थोडी गरम लागते.

डायपर रॅशचे प्रकार

डायपर रॅश वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यापैकी काही खालीलप्रमाणे.

१. ओल्या डायपरमुळे होणारे रॅशेस

बाळाचा ओला डायपर  खूप वेळ तसाच ठेवल्यामुळे अशा प्रकारचे रॅशेस होतात. तसेच हे रॅशेस खूप गंभीर नसतात.

२. यीस्ट रॅशेस

बाळाच्या त्वचेच्या खाचांमध्ये यीस्ट रॅश झालेली आढळते.

३. ऍलर्जी

ऍलर्जीमुळे सुद्धा डायपर लावतो त्या भागात रॅशेस येऊ शकतात.

४. ऍसिडिटी

जर बाळाची शी खूप ऍसिडिक असेल तरी सुद्धा बाळाला रॅशेस येऊ शकतात.

डायपर रॅश झाल्याची लक्षणे

डायपर रॅश वेगवेगळ्या कारणांमुळे होते. हे कारण बाळाच्या शू पासून नवीन अन्नपदार्थांची ओळख ह्यापैकी काहीही असू शकते. ही स्थिति फार काळ टिकणारी नसली तरी सुद्धा, त्वचेच्या जळजळीमुळे थोड्या दिवसांसाठी बाळ अस्वस्थ होते. डायपर रॅश ओळखून, त्यावर प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाय केल्यास बाळाला दीर्घकाळासाठी आराम मिळू शकतो. जी  बाळे डायपर घालतात अशा बाळांमध्ये खालील लक्षणे आढळ्यास बाळाला डायपर रॅश झाली असण्याची शक्यता आहे.

१. बाळाच्या कुल्ल्यांवर पुरळ

जर तुम्हाला बाळाच्या कुल्ल्यांवर पुरळ किंवा लाल पट्टे आढळल्यास ते डायपर रॅशचे लक्षण असू शकते.

२. बाळाच्या कुल्ल्यांवर आणि मांड्यांवर फोड

बाळाच्या कुल्ल्यांवर आणि मांड्यांवर फोड आल्यास, ती डायपर रॅश असू शकते. हे फोड लाल आणि पाण्याने भरलेले असू शकतात.

३. त्वचेचे खवले

बाळाच्या डायपर च्या भागातील त्वचेचे खवले निघत असतील तर ते डायपर रॅशचे लक्षण असू शकते.

४. रक्तस्त्राव

जर बाळाला खूप जास्त प्रमाणात डायपर रॅश झाली असेल तर त्वचेतून रक्त सुद्धा येऊ शकते.

५. कोरडेपणा

बाळाची नॅपीच्या भागातील त्वचा कोरडी झाली असल्यास ते डायपर रॅश चे लक्षण असू शकते.

६. तापमानात वाढ

डायपरने  आच्छादित त्वचा जर शरीराच्या इतर भागापेक्षा गरम वाटत असेल तर ते डायपर रॅश चे लक्षण असू शकते.

७. चिडचिडे बाळ

जर तुम्ही बाळाचा डायपरचा भाग स्वच्छ करीत असताना बाळ रडत असेल तर त्याचे कारण डायपर रॅश असू शकते. जर डायपर रॅशवर लागलीच इलाज केला नाही तर बाळाला ताप येऊ शकतो आणि ते पुरळ शरीराच्या इतर भागावर सुद्धा पसरू शकते.

बाळाला डायपर रॅश कशामुळे होते?

बाळाला डायपर रॅश होण्यामागे बाळाची शू ते संसर्ग अशी खूप कारणे आहेत.

१. ओलेपणा

सर्वात चांगल्या प्रतीच्या डायपरमुळे सुद्धा त्वचेवर ओलेपणा राहतो. ह्या ओलाव्यामुळे बाळाच्या शौचामधील मधील जिवाणू वाढतात आणि अमोनिया तयार करतात. अमोनिया हा बाळाला येणाऱ्या रॅशेसचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे ज्या बाळांना जुलाब होतात अश्या बाळांना डायपर रॅश होण्याची जास्त शक्यता असते. तसेच ओला डायपर जास्त वेळ असणाऱ्या बाळांना सुद्धा रॅशेस होण्याची शक्यता जास्त असते.

२. घट्ट डायपर

घट्ट डायपर मुळे बाळाला घाम येतो आणि बाळाच्या अंगातील उष्णता वाढते. त्यामुळे बाळाच्या त्वचेची pH पातळी वाढते. आणि त्यामुळे रॅश होण्याची शक्यता वाढते. घट्ट डायपर मुळे  घर्षण वाढते आणि परिस्थिती आणखी चिघळते.

३. रसायनांविषयी संवेदना आणि त्वचाक्षोभ

बाळाची नाजूक त्वचा डायपरवर घासली गेल्यामुळे रॅशेस होतात. तसेच तुमच्या बाळाची त्वचा डायपरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सुवासिक रसायनांना संवेदनशील असेल तर रॅशेस होण्याची शक्यता खूप जास्त असते. बाळाचे  कपडे धुताना त्यावर राहणारा साबण सुद्धा रॅश येण्याचे कारण आहे. बाळासाठी वापरले जाणारे वाईप्स, पावडर तसेच इतर उत्पादनामधील रसायने सुद्धा रॅशेस साठी कारणीभूत असतात.

४. नवीन अन्नपदार्थ

जर तुम्ही बाळाला नवीन अन्नपदार्थाची ओळख करून दिली असेल किंवा घनपदार्थला सुरवात केली असेल तर बाळाला डायपर रॅश होऊ शकते. आहारमधील बदलामुळे बाळाच्या शी ची रचना बदलते. काही फळांमधील आम्लामुळे  बाळाला रॅशेस होतात, बाळाच्या आहारात बदल केल्यास बाळाला जास्त वेळा शौचास होऊ शकते आणि त्यामुळे रॅशेस होऊ शकतात. जर तुम्ही बाळाला अंगावरचे दूध देत असाल तर, तुम्ही जे अन्नपदार्थ खाल्ले आहेत त्याची प्रतिक्रिया म्हणून बाळाला रॅशेस येऊ शकतात.

५. यीस्ट किंवा जिवाणूंचा संसर्ग

डायपरखालची त्वचा हे उबदार आणि थोडी ओलसर असते. जिवाणूंची वाढ होण्यासाठी हे अगदी योग्य वातावरण असते. ह्या वातावरणात जिवाणू आणि यीस्ट ह्यांची वाढ अगदी जोमाने होत असते. बाळाच्या त्वचेच्या घड्यांमध्ये ही वाढ जास्त प्रमाणात होते.

६. प्रतिजैविके

तुम्ही बाळाला प्रतिजैविके देत आहेत का? किंवा तुम्ही प्रतिजैविके घेत आहात आणि स्तनपान देत आहेत का? काही वेळा ही प्रतिजैविके हानिकारक जिवाणूंच्या ऐवजी चांगल्या जिवाणूंचा नाश करतात आणि त्यामुळे यीस्ट इन्फेकशन होते.

वैद्यकीय चाचण्या

डायपर रॅशचे निदान बाळाच्या तपासणीनंतर आणि वैदकीय इतिहासावर अवलंबून असते. बहुतांशी प्रकरणांमध्ये प्रयोगशाळेतील चाचण्यांची आवशक्यता नसते. तथापि जर डॉक्टरांना असे वाटले की बाळाला अलेर्जीन ऍलर्जी आहे तर डॉक्टर त्वचेची चाचणी करण्यास सांगू शकतात.

बाळांच्या डायपर रॅशसाठी उपचारपद्धती आणि औषधे

बाळाला रॅश किती प्रमाणात झाली काही ह्यावर उपचारपद्धती अवलंबून असते. जर रॅशेस सौम्य असतील तर त्यावर तुम्ही तुमचे उपाय करू शकता. त्यासाठी तुम्ही पुरळ असलेला भाग स्वच्छ आणि कोरडा ठेऊ शकता. त्वचा कोरडी करताना फक्त टिपून घ्या, घासून पुसल्यास प्रश्न जास्त वाढेल. खूप गंभीर प्रकरणांमध्ये, डॉक्टर तुम्हाला डायपर रॅश क्रीम वापरण्यास सांगू शकतात. डायपर रॅश साठी, मेडिकल च्या दुकानात खूप क्रीम्स उपलब्ध असतात, संसर्ग बरा करण्यासाठी ही क्रीम्स खूप परिणामकारक ठरतात. परंतु ही क्रीम्स तुमच्या डॉक्टरांच्या लिहून दिलेलीच वापरा. ऍलर्जिक प्रतिक्रियेमुळे रॅश आली असेल तर, त्वचेच्या चाचणीनंतर तुमचे डॉक्टर तुम्हाला अँटीऍलर्जीक औषधे लिहून देऊ शकतात.

डायपर रॅश कशी टाळाल?

डायपर रॅश टाळण्यासाठी खाली काही उपाय आहेत.

१. कोरडेपणा टिकवा

रॅशेस टाळण्यासाठी बाळाच्या नॅपीचा भाग कोरडा ठेवा.

२. स्वच्छता राखा

बाळाला शी किंवा शू झाल्यास, तुम्ही लगेच स्वच्छ करत आहात ह्याची खात्री करा. बाळाला  डायपरची  जेव्हा गरज असेल तेव्हा वारंवार बदला. डायपर ओला झाला नाही ना हे वारंवार तपासून पहा. तुम्हाला रॅश टाळण्यासाठी कदाचित रात्री नॅपी बदलण्यासाठी रात्री उठावे लागेल. बाळाचा डायपर दिवसातून किमान ८ वेळा बदलली गेली पाहिजे.

३. योग्य प्रकारे बाळाला स्वच्छ करा

बाळाच्या डायपरचा भाग कोरडा करण्यासाठी कोमट पाणी वापरा, स्वच्छ करून झाल्यावर मऊ कापडाने पुसून घ्या. बाळाने शी केली असल्यास, सौम्य साबण वापरून बाळाला धुवून घ्या. बाळाला रॅश असेल तर, वाईप्स वापरण्याचे टाळा. काही वाईप्स मध्ये प्रोपायलीन ग्लायकोल असते, त्यामध्ये अल्कोहोल असते त्यामुळे बाळाच्या त्वचेला दाह होतो आणि संसर्ग पसरण्याची शक्यता वाढते.

४. बाळाला कमीत कमी वेळ नॅपी घाला

बाळाला लंगोट किंवा डायपर न लावता तसेच ठेवा.

५. नॅपीची योग्य निवड करा

जास्तीत जास्त शोषणक्षमता असलेला डायपर निवडा.

६. बाळाला घनपदार्थांची ओळख हळूहळू करून द्या

एका वेळेला एकाच घनपदार्थाची ओळख बाळाला करून द्या आणि काही दिवसांसाठी थांबून दुसरा पदार्थ देण्याआधी वाट पहा.

७. लंगोट नीट धुवा

जर तुम्ही बाळासाठी कापडी लंगोट वापरत असाल तर, तुम्ही ते नीट स्वच्छ करत आहेत ना ह्याची खात्री करा. हे धुण्यासाठी सौम्य आणि बाळासाठीचा साबण वापरा.

डायपर रॅश बद्दल काळजी करण्याजोगी परिस्थिती केव्हा निर्माण होते?

वरील उपचार पद्धती आणि औषधे डायपर रॅश बरे करण्यासाठी पुरेसे आहेत. ३-४ दिवसात रॅशेस बरे होतात. तथापि जर रॅश बरोबर संसर्ग सुद्धा असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेट दिली पाहिजे. खालील काही गोष्टींबाबत तुम्ही सावधानता बाळगली पाहिजे जर पुरळ सौम्य प्रमाणात असतील तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. फक्त बाळाची डायपरची  जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवा.

डायपर रॅश साठी घरगुती उपचार

काही परिणामकारक नैसर्गिक उपचार वापरल्यास बाळाची डायपर रॅशची लक्षणे कमी होतील. सहज उपलब्ध होतील अशा नैसर्गिक गोष्टींचा ह्यात समावेश होतो.

१. नारळाचे तेल

डायपर रॅश साठी ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रॅश पासून सुटका मिळवण्यासाठी नॅपी चा भागाला नारळाच्या तेलाने हलकेच मालिश करा.

२. शिया बटर

जर तुमचे बाळाची त्वचा संवेदनशील असेल तर शिया बटर लावा, त्यामुळे बाळाची त्वचा मऊ राहील आणि यीस्ट संसर्गाशी सामना करता येईल

३. कोमट पाण्याने अंघोळ

कोमट पाण्याने अंघोळ घातल्याने जळजळ आणि खाज कमी होते. एका टब मध्ये कोमट पाणी घेऊन त्यामध्ये १ टेबलस्पून बेकिंग सोडा घालून त्यामध्ये बाळाचा रॅश झालेला भाग बुडवून ठेवा. असे दिवसातून तीनदा करा. ज्या बाळांची नाळ पडली आहे अशा बाळांसाठी तसेच  १-२ आठवड्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळांसाठी ही कृती करावी निष्कर्ष: डायपर रॅश होणे बाळांमध्ये खूप सामान्य असून, पालकांसाठी मात्र ते एक आव्हान असते. स्वच्छता राखा, वरचेवर डायपर बदला आणि रॅशेस टाळण्यासाठी पुरळ असलेल्या भागाला मोकळे ठेवा, थोडी हवा लागू द्या त्यामुळे रॅशेस ला आळा बसण्यास मदत होईल.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved