In this Article
- प्रीएक्लॅम्पसिया म्हणजे काय?
- प्रीएक्लॅम्पसिया कारणे
- प्रीएक्लॅम्पसियाची चिन्हे आणि लक्षणे
- प्रीएक्लॅम्पसिया होण्याचा धोका कोणाला आहे?
- प्रीएक्लॅम्पसियाचे निदान
- प्रीएक्लॅम्पसियाची गुंतागुंत
- हेल्प (एचईएलएलपी) सिंड्रोम म्हणजे काय?
- गर्भवती असताना प्रीएक्लॅम्पसियासाठी उपचार
- प्रीएक्लॅम्पसिया प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर विकसित झाल्यास काय?
- भविष्यातील गरोदरपणावर प्रीएक्लॅम्पसियाचे होणारे परिणाम
- प्रीएक्लॅम्पसियाची समस्या कशी टाळावी?
प्रीएक्लॅम्पसिया हा गर्भवती स्त्रियांना होणारा एक आजार आहे. हा आजार झाल्यास यकृताचे कार्य नीट न होणे आणि फुफ्फुसात द्रव निर्माण होणे ह्यासारख्या समस्या उद्भवतात. आईवर तर परिणाम होतोच पण त्यासोबत बाळामध्ये सुद्धा सेरेब्रल पाल्सी, अकाली जन्म झाल्यामुळे अंधत्व आणि बहिरेपणा यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
प्रीएक्लॅम्पसिया म्हणजे काय?
आधी ह्या समस्येस इंग्रजीमध्ये ‘टॉक्सिमिया प्रेग्नन्सी’ असे म्हणत असत. प्रीएक्लॅम्पसिया ही गरोदरपणातील एक आरोग्यविषयक समस्या आहे. गरोदरपणाच्या २० व्या आठवड्यांपासून ते गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत किंवा प्रसूतीनंतरच्या सहा आठवड्यांपर्यंत ही समस्या कधीही निर्माण होऊ शकते. ह्या समस्येमुळे मूत्रपिंडाचे नुकसान होणे आणि उच्च रक्तदाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. प्रीएक्लॅम्पसियाने ग्रस्त असल्यास गरोदर स्त्रियांमध्ये कोणतीही लक्षणे दिसू शकत नाहीत, म्हणूनच बहुतेक डॉक्टर त्यांच्या प्रत्येक भेटीदरम्यान तुमचा रक्तदाब तपासण्याचा आग्रह धरतात. जर रक्तदाब जास्त असेल तर त्यातील प्रथिनांचे प्रमाण तपासण्यासाठी डॉक्टर तुम्हाला लघवीची चाचणी सुचवतील.
एकदा ही समस्या आढळल्यानंतर, त्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे कारण त्यामुळे एक्लॅम्पसिया आणि एचईएलएलपी सिंड्रोम सारख्या इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. एचईएलएलपी म्हणजे हेमोलिसिस, एलिव्हेटेड लिव्हर एन्झाईम्स आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होणे होय.
प्रीएक्लॅम्पसिया कारणे
प्लेसेंटाकडे कमी झालेला रक्त प्रवाह हे प्रीएक्लॅम्पसिया होणामागच्या प्राथमिक कारणांपैकी एक कारण आहे. दृश्य स्वरूपात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. प्लेसेंटा गर्भाशयाच्या अस्तरात योग्य रित्या बसलेला नसतो आणि त्या भागातील रक्तवाहिन्यांचे विस्तार पुरेसा झालेला नसतो तेव्हा असे होते. गर्भधारणेपूर्वी मधुमेह आणि तीव्र उच्च रक्तदाब हे देखील प्लॅसेंटाकडे होणाऱ्या कमी रक्त प्रवाहाचे कारण असू शकते.
वारेकडे होणाऱ्या रक्तप्रवाहातील बदलामुळे काही विशिष्ट प्रकारची प्रथिने नाळेकडून मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाहात सोडली जातात. यामुळे, तुमच्या शरीरात खालीलप्रमाणे प्रतिक्रिया सुरू होतात:
- रक्तवाहिन्यांच्या भित्तिका खराब होतात, आणि त्यामुळे शरीरावर सूज येते आणि लघवीतील प्रथिनांची पातळी वाढते.
- रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे उच्च रक्तदाब होतो.
प्रीएक्लॅम्पसिया इतर कारणांमुळे देखील होऊ शकते. उदा: स्वयं-प्रतिकार विकार, अनुवांशिक घटक, आहार आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या इत्यादी. तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि गरोदरपणावर रोगप्रतिकारक शक्तीची प्रतिक्रिया हे देखील प्रीएक्लॅम्पसियाचे एक कारण मानले जाते.
प्रीएक्लॅम्पसियाची चिन्हे आणि लक्षणे
प्रीएक्लॅम्पसियाची लक्षणे काही वेळा दिसून येतात तर काही वेळा दिसत नाहीत. दृश्य स्वरूपातील लक्षणे प्रत्येक स्त्रीसाठी वेगवेगळी असू शकतात. मळमळ होणे, वजन वाढणे आणि सूज येणे यासारख्या गरोदरपणाच्या सामान्य लक्षणांप्रमाणेच प्रीएक्लॅम्पसियाची लक्षणे असल्याने लोक सहसा गोंधळून जातात. प्रीएक्लॅम्पसियाचे सुरुवातीचे टप्पे सहसा लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे डॉक्टरांकडून काळजीपूर्वक तपासणी करून घेतली पाहिजे.
तुम्हाला तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागात असामान्य सूज दिसल्यास तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या. कारण ती सूज प्रीएक्लॅम्पसियामुळे येऊ शकते. खालील गोष्टींकडे लक्ष द्या:
- हात आणि बोटांना सूज येणे.
- पाय आणि घोट्याला जास्त सूज येणे.
- चेहरा आणि मानेवर सूज येणे किंवा डोळ्यांभोवती सूज येणे.
- एका आठवड्यात किंवा पंधरा दिवसात वजन झपाट्याने वाढणे.
जर गर्भवती महिलेचे वजन वाढून सूज येत असेल तर तिला प्रीएक्लॅम्पसिया आहे असा त्याचा अर्थ होत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामागे वेगळे कारण असू शकते.
प्रीएक्लॅम्पसियाची समस्या असलेल्या अनेक गरोदर महिलांना कमी न होणारी डोकेदुखी आणि दृष्टी बदलणे यासारखी लक्षणे असू शकतात. तुमचे डॉक्टर लघवीतील प्रथिने पातळी, प्लेटलेटची पातळी आणि यकृताच्या एन्झाइमची कोणतीही असामान्यता तपासण्यासाठी मूत्र आणि रक्त चाचण्यांचा सल्ला देखील देऊ शकतात.
ओटीपोटात दुखणे, लघवी कमी प्रमाणात किंवा अजिबात न होणे, मळमळ आणि उलट्या आणि चक्कर येणे ही प्रीएक्लॅम्पसियाशी संबंधित सामान्य लक्षणे आहेत. तुमचा रक्तदाब १४०/९० च्या मर्यादेत राहील ह्यावर लक्ष ठेवा आणि या पातळीत कोणतीही वाढ किंवा घट झाल्यास डॉक्टरांना त्वरित भेटणे आवश्यक हे. रक्त आणि लघवीची नियमित तपासणी केल्याने तुम्ही याबाबत अपडेट रहाल.
खालील लक्षणे धोकादायक आहेत आणि ही लक्षणे प्रीक्लेम्पसियाची असू शकतात.
- श्वास घेण्यात अडचण
- उलट्या किंवा मळमळ (विशेषत: जेव्हा ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत होते)
- तात्पुरती दृष्टी कमी होणे, प्रकाशाविषयीची संवेदनशीलता, दुहेरी दृष्टी किंवा अंधुकपणा
- ओटीपोटाच्या वरील भागात वेदना
प्रीएक्लॅम्पसिया होण्याचा धोका कोणाला आहे?
ज्यांना पहिल्या गरोदरपणात प्रीएक्लॅम्पसिया झालेला असेल त्यांना नंतरच्या गरोदरपणात हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. प्रीएक्लॅम्पसिया होण्याचा धोका स्थितीच्या तीव्रतेवर आणि गरोदरपणात ही समस्या केव्हा दिसून येते यावर अवलंबून असतो. म्हणजेच जर तुमच्या गरोदरपणाच्या २९ आठवड्यांपूर्वी तुम्हाला प्रीएक्लॅम्पसिया झाला असेल, तर पुढच्या गरोदरपणात पुन्हा तो होण्याची शक्यता ४०% जास्त असते.
वैज्ञानिक पुरावे नसले तरी, गर्भवती किशोरवयीन मुलांमध्ये प्रीएक्लॅम्पसियाचे प्रमाण जास्त आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की नको असलेल्या गरोदरपणात नीट काळजी घेतली जात नाही तेव्हा हा धोका जास्त असतो.
४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गर्भवती महिलांमध्ये प्रीएक्लॅम्पसियाचे प्रमाण जास्त आहे कारण त्यामुळे त्यांच्या शरीरावर जास्त ताण पडतो आणि वैद्यकीय समस्या सुरु होतात.
साधारणपणे, ३० पेक्षा जास्त बॉडी मास इंडेक्स (BMI) असलेल्या लठ्ठ महिलांना प्रीएक्लॅम्पसियाचा धोका जास्त असतो. कारण लठ्ठपणामुळे रक्तदाब वाढतो.
प्रीएक्लॅम्पसियाचे निदान
डॉक्टरांच्या भेटीदरम्यान तुमचा रक्तदाब आणि लघवी तपासली जाईल. रक्तदाब आणि लघवीतील प्रथिनांची वाढलेली पातळी प्रीएक्लॅम्पसिया दर्शवू शकते. प्रीएक्लॅम्पसियाचे निदान करण्यासाठी, खालील लक्षणे लक्षात घेतली जातात.
- बीपी 140/90पेक्षा जास्त किंवा डायस्टोलिक 90पेक्षा जास्त.
- प्रोटीन्युरिया
गर्भवती महिलांना प्रीएक्लॅम्पसियाची समस्या असल्यास रक्तदाब वाढलेला असतो ह्याची आता डॉक्टरांना जाणीव झालेली आहे.
तुमच्या डॉक्टरांना प्रीएक्लॅम्पसियाचा संशय असल्यास, खालील चाचण्या आवश्यक असू शकतात:
१. लघवीमध्ये प्रथिने
तुमचे डॉक्टर, लघवीमध्ये प्रथिने आहेत का हे जाणून घेण्यासाठी लघवी चाचणी करण्यास सांगतील. ही प्रारंभिक चाचणी सकारात्मक असल्यास, तुम्हाला 24 तासांनंतर लघवीचा नमुना गोळा करण्यास सांगितला जाईल आणि चाचणीसाठी पाठवला जाईल. ही चाचणी प्रीएक्लॅम्पसियासाठी सर्वात विश्वासार्ह आणि अचूक चाचणी म्हणून ओळखली जाते. लघवीमध्ये 300 मिग्रॅ आणि त्याहून अधिक प्रथिने असणे हे प्रीएक्लॅम्पसियाचे निश्चित लक्षण आहे.
२. रक्तदाबाचे निरीक्षण
जर तुमचे सिस्टोलिक रीडिंग 140 पेक्षा जास्त असेल किंवा डायस्टोलिक रीडिंग 90 पेक्षा जास्त असेल तर तुमचे रक्तदाब सामान्यपेक्षा जास्त आहे. दिवसाच्या वेळेनुसार रक्तदाब चढ-उतार होत असल्याने, तो उच्च असल्याची पुष्टी करण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला वेगवेगळ्या वेळी तपासण्यास सांगतील. गर्भवती महिलेसाठी प्रीएक्लॅम्पसियाचे निदान करण्यासाठी देखील हे एक सूचक आहे.
३. प्रथिने-क्रिएटिनाइन गुणोत्तर
क्रिएटिनिन हा शरीरातील एक टाकाऊ पदार्थ आहे आणि तो किडनीद्वारे इतर टाकाऊ पदार्थांसह फिल्टर केला जातो. प्रथिने-क्रिएटिनिन गुणोत्तर ही एक लघवीची चाचणी आहे. ह्या चाचणीदरम्यान हे टाकाऊ पदार्थ तपासले जातात आणि म्हणूनच मूत्रपिंडाचे कार्य सामान्य आहे की नाही हे डॉक्टरांना समजू शकते. या चाचणीसाठी दिवसातून कधीही एक लघवीचा नमुना घेतला जातो. २४ तासानंतर लघवीचा नमुना घेण्यापेक्षा हे चांगले आहे. जर तुमच्या चाचणीत 0.3 mg/dl क्रिएटिनिन आढळाळते, तर तुम्हाला प्रीएक्लॅम्पसियाचा त्रास आहे असा निष्कर्ष काढला जाईल.
४. अल्ट्रासाऊंड
अल्ट्रासाऊंड पद्धतीचा वापर करून तुमच्या बाळाच्या वाढीचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी ह्या चाचणीची शिफारस केली जाते. अशा प्रकारे, डॉक्टर गर्भाच्या वजनाचा अंदाज लावू शकतात आणि गर्भाशयात अम्नीओटिक द्रवपदार्थाची पातळी मोजू शकतात.
५. नॉन स्ट्रेस चाचणी
या चाचणीमध्ये एक सोपी प्रक्रिया असते. ह्या प्रक्रियेदरम्यान बाळाच्या हृदयाचे ठोके आणि हालचालींवरील प्रतिक्रिया तपासण्यात मदत होते.
६. बायोफिजिकल प्रोफाइल
या चाचणीमध्ये, बाळाचा श्वास, हालचाल, स्नायूंचा टोन आणि आईच्या गर्भाशयातील गर्भजल मोजण्यासाठी अल्ट्रासाऊंड केले जाते.
प्रीएक्लॅम्पसियाची गुंतागुंत
प्रीएक्लॅम्पसियामुळे निर्माण होणारी गुंतागुंत दुर्मिळ आहे, परंतु त्यामुळे जीवघेण्या समस्या निर्माण होऊ शकतात. उदा: प्लेटलेटची कमी संख्या आणि लाल रक्तपेशींचे विघटन इत्यादी. नियमित निरीक्षण आणि त्वरीत निदान केल्याने गुंतागुंत वाढत नाही आणि स्थिती वेळेवर आटोक्यात येते.
उपचार न केल्यास या वैद्यकीय स्थितीमुळे आई आणि मुलामध्ये कोणत्या प्रकारची समस्या निर्माण होते यावर एक नजर टाकूया.
१. आईमध्ये निर्माण होणारी गुंतागुंत
प्रीएक्लॅम्पसियाचे निदान झाल्यास खालील समस्यांचा आईवर परिणाम होऊ शकतो.
- एक्लॅम्पसिया: यामध्ये स्नायूंचे अनैच्छिक आकुंचन होते. ह्यालाच फिट येणे असेही म्हणतात. असे 20 व्या आठवड्यानंतर किंवा प्रसूतीनंतर लगेच होऊ शकते. फिट आल्यास एका मिनिटापेक्षा कमी काळासाठी टिकते, फिट आल्यानंतर गरोदर स्त्रीला हात, पाय किंवा मानेच्या वारंवार हालचालींचा अनुभव येऊ शकतो आणि ती चेतना देखील गमावू शकते.
- स्ट्रोक: जेव्हा उच्च रक्तदाबामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होतो, तेव्हा त्यामुळे सेरेब्रल हॅमरेज होऊ शकते, आणि त्यास सामान्यतः स्ट्रोक म्हणतात. असे झाल्यास मेंदूला रक्तातून आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे पेशी मरतात, मेंदूचे नुकसान होते किंवा मृत्यू होतो.
- रक्त गोठणे: ह्यास मेडिकल भाषेत डिससेमिनेटेड इंट्राव्हास्कुलर कोग्युलेशन म्हणून ओळखले जाते. या स्थितीत आईच्या रक्त गोठण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम होतो. रक्तातील प्रथिनांची पातळी कमालीची घसरल्याने किंवा प्रथिने जास्त प्रमाणात सक्रिय झाल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.
२. बाळामध्ये निर्माण होणारी गुंतागुंत
आईला प्रीएक्लॅम्पसियाचे निदान झाल्यास, बाळाला खालील आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागू शकतो:
- बाळाचा आकार लहान: प्रीएक्लॅम्पसिया दरम्यान बाळाला ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा कमी असल्याने, अशी बाळे आकाराने लहान असतात. जर प्रीएक्लॅम्पसिया गर्भधारणेच्या ३७ आठवड्यांपूर्वी झाल्यास असे होण्याची शक्यता असते.
- बाळाला श्वास घेण्यात अडचण: प्रीएक्लॅम्पसिया गंभीर असल्याचे निदान झाल्यास, डॉक्टर लवकर प्रसूती करण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे फुफ्फुसे पूर्ण विकसित न झाल्याने बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
- मृतावस्थेत जन्माला आलेले बाळ: काही प्रकरणांमध्ये, लवकर प्रसूतीमुळे बाळ मृत जन्माला येऊ शकते.
या लेखाच्या सुरुवातीला, आम्ही हेल्प सिंड्रोमबद्दल थोडेसे बोललो; त्यावरही एक नजर टाकूया.
हेल्प (एचईएलएलपी) सिंड्रोम म्हणजे काय?
हेल्प सिंड्रोम हा एक दुर्मिळ विकार आहे. हा यकृताचा विकार आहे. आणि तो गरोदरपणातील एक्लेम्पसियाची गंभीर आवृत्ती आहे. हा विकार प्रसूतीनंतर होण्याची शक्यता असते, परंतु काही वेळा २० आठवड्यांनंतर तर कधी कधी, २० आठवड्यांपूर्वी देखील अश्या समस्या उद्भवलेल्या दिसतात.
एचइएलएलपी हा शॉर्टफॉर्म प्रत्येक स्थितीसाठी आहे:
- एच हे हेमोलिसिससाठी आहे ह्या दरम्यान रक्तप्रवाहातील लाल रक्तपेशी तुटतात.
- एल म्हणजे एलिव्हेटेड लिव्हर एन्झाईम्स आणि ते यकृताच्या नुकसानीचे लक्षण आहे.
- एलपी कमी प्लेटलेट काउंटसाठी आहे आणि ते रक्त गोठण्यास जबाबदार असतात.
एकदा निदान झाल्यानंतर, प्रीक्लेम्पसियासाठी त्वरित उपचार दिले पाहिजेत. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.
गर्भवती असताना प्रीएक्लॅम्पसियासाठी उपचार
जर तुम्ही ३७ आठवडे किंवा त्याहून अधिक काळ गरोदर असाल, तर तुमहाला प्रसूतीस प्रवृत्त केले जाईल, विशेषत: जेव्हा गर्भाशयाचे मुख जेव्हा उघडलेले असते तेव्हा असे करतात. तुम्ही किंवा तुमचे बाळ सामान्य प्रसूतीचा त्रास सहन करू शकणार नाही असे वाटत असल्यास डॉक्टर सी-सेक्शनची निवड देखील करू शकतात.
गंभीर प्रीएक्लॅम्पसियाच्या उपचारांसाठी, तुम्हाला रुग्णालयात ठेवून तुमच्यावर लक्ष ठेवले जाऊ शकते. तुमची विशेष काळजी घेण्यासाठी आणि स्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी तुमच्यासाठी विशेष तज्ञ नियुक्त केले जाऊ शकतात. रक्तदाब कमी करण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट सलाईन द्वारे दिले जाते. तसेच फेफरे टाळण्यासाठी औषध दिले जाईल.
प्रीएक्लॅम्पसिया प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर विकसित झाल्यास काय?
प्रसूतीदरम्यान किंवा नंतर प्रीएक्लॅम्पसियाचे निदान झाल्यास, तुमच्या वर लक्ष ठेवणे महत्वाचे असेल. तुमचा रक्तदाब वाढल्यास किंवा फिट आल्यास पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी तुम्हाला आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल. फिट येणे टाळण्यासाठी तुम्हाला प्रसूतीनंतर २४ तासांपर्यंत मॅग्नेशियम सल्फेट दिले जाईल. तुम्ही घरी गेल्यास, तुम्हाला किमान आठवडाभर रक्तदाब तपासणी करून परत कळवावे लागेल.
भविष्यातील गरोदरपणावर प्रीएक्लॅम्पसियाचे होणारे परिणाम
गरोदरपणातील प्रीएक्लॅम्पसिया किंवा टॉक्सेमिया ही एक गंभीर स्थिती आहे. परंतु, आई त्याचे परिणाम सहन करत राहते आणि त्याचा धोका कायम राहतो. प्रीएक्लॅम्पसिया चे तुमच्या अवयवांवर होणारे परिणाम प्रसूतीनंतर दूर होण्यासाठी किमान सहा आठवडे लागू शकतात. उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका देखील वाढतो असे अभ्यासातून दिसून आले आहे. गरोदरपणातील टॉक्सेमिया मुळे बाळाला पोषक तत्वांचा पुरवठा मर्यादित प्रमाणात होतो, आणि त्यामुळे बाळाचे चयापचय बिघडते. तसेच त्यामुळे हृदयरोग आणि मधुमेह, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब यासह संबंधित विकार होऊ शकतात.
प्रीएक्लॅम्पसियाची समस्या कशी टाळावी?
प्रसूतीपूर्व काळजी घेणे आणि डॉक्टरांची कोणतीही भेट न चुकवणे महत्वाचे आहे. प्रीएक्लॅम्पसिया टाळण्याची ही गुरुकिल्ली आहे. संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लड प्रेशरवर आणि तुमच्या लघवीतील प्रथिनांवर नीट लक्ष ठेवावे लागेल. प्रीएक्लॅम्पसियाची पहिली चिन्हे दिसताच, तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा जेणेकरून कोणताही विलंब न करता उपचार सुरू करता येतील. स्थितीची तीव्रता, आठवड्यांची संख्या आणि बाळाची परिस्थिती ह्यानुसार, तुमचे डॉक्टर उपचार पद्धती ठरवतील. ह्यामध्ये लघवीच्या चाचण्या आणि रक्तदाबाचे निरीक्षण इत्यादींचा समावेश असेल.
प्रीएक्लॅम्पसिया हे मातामृत्यूचे प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे बाळाचाही मृत्यू होतो. परंतु, उच्च रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाचा इतिहास असलेल्या महिलांच्या आरोग्य स्थितीचे बारकाईने निरीक्षण करणे हे प्रीएक्लॅम्पसियाचे व्यवस्थापन करण्यास उपयुक्त ठरू शकते.
आणखी वाचा: