जेव्हा तुम्ही बाळाचा निर्णय घेता तेव्हा गरोदरपणाची चिन्हे आणि लक्षणे ह्यांची वाट पहिली जाते. चुकलेली पाळी, मॉर्निंग सिकनेस, स्तनांना सूज येणे ही गर्भधारणेची काही सामान्य लक्षणे आहेत. परंतु गर्भधारणा झाल्याची काही असामान्य लक्षणे देखील आहेत. ही लक्षणे तुम्ही गर्भवती असल्याचे दर्शवितात. गर्भधारणेच्या ह्या असामान्य लक्षणांबद्दल अधिक जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असल्यास तुम्ही हा लेख वाचावा.
गर्भधारणेची १० असामान्य चिन्हे आणि लक्षणे
मानवी शरीर एक जटिल प्रणाली आहे आणि गर्भधारणा त्यात बरेच बदल घडवून आणते. अशा प्रकारे, तुम्ही गर्भवती होताच, तुमच्या शरीरात विशिष्ट लक्षणे दर्शविण्यास सुरुवात होते. कधीकधी गरोदर स्त्रिया गरोदरपणाची विचित्र चिन्हे दर्शवितात. म्हणूनच, जर आपणास यापैकी कुठलेही लक्षण आढळले तर तुमच्या उदरात बाळाची वाढ होत असल्याचे कदाचित ते लक्षण असू शकते.
१. निद्रानाश किंवा कमी झोप
जर तुम्हाला झोपयेणे कठीण झाले असेल किंवा रात्रीची मध्येच जाग येत असेल तर तुम्ही कदाचित तुम्ही गर्भवती असल्याचे ते लक्षण असू शकेल. अशावेळी तुम्ही शांत आणि निश्चित राहणे गरजेचे आहे. तसेच व्यायाम करा आणि चांगली झोप होण्यासाठी कॅफेनचे सेवन कमी करा.
२. नाक चोंदणे किंवा नाकातून रक्तस्त्राव
हे आश्चर्य वाटण्याजोगे आहे परंतु, काही गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या सुरुवातीस नाक चोंदणे किंवा नाकातून रक्तस्त्राव होण्याचा त्रास होतो. हा त्रास शरीरात ओलावा नसल्यामुळे उद्भवू शकतो. एकतर आपण नैसर्गिक उपायांचा वापर ओलावा प्रदान करण्यासाठी करू शकता किंवा त्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोलू शकता.
३. गॅस होणे
जर तुम्हाला पोट फुगणे किंवा पोटात वायू होण्याचा त्रास होत असेल तर ते गर्भधारणेचे लक्षण असू शकते. होय, हे शक्य आहे! गर्भधारणेमुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि त्यामुळे पोटात गॅसेस होतात. जर नेहमीपेक्षा जास्त त्रास होत असेल आणि हे आपण खाल्लेल्या गोष्टीमुळे नसेल तर आपण गर्भधारणा किट घ्यावी आणि स्वतःची चाचणी करून घ्यावी. आपल्या पोटाला जास्त त्रास होऊ नये म्हणून वातयुक्त अन्नपदार्थांपासून दूर रहा.
४. योनीतून वाढलेला स्त्राव
गर्भधारणेदरम्यान योनीतून स्त्राव होणे सामान्य आहे आणि जर आपल्याला हे लक्षात आले की त्यामध्ये वाढ झालेली आहे तर ते तुम्ही गर्भवती असल्याचे सूचित करते. तथापि, जर आपल्या योनीतून येणारा स्त्राव दुर्गंधीयुक्त असेल किंवा त्याचा रंग बदलला असेल तर आपल्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घेणे चांगले.
५. शौचास साफ न होणे
गर्भधारणेच्या संप्रेरकांमुळे अवयव मंद आणि सुस्त होतात. तर, आतड्यांसंबंधी हालचालींमध्ये बदल देखील होतात. हे गर्भधारणेचे असामान्य लक्षण आहे. हळू काम करणाऱ्या आतड्यांमुळे शौचास साफ होत नाही आणि अशा प्रकारे बद्धकोष्ठता होते. आम्ही शिफारस करतो की आपण आपल्या आहारात भरपूर तंतुमय पदार्थांचा समावेश करा आणि आतड्यांच्या हालचाली सुरळीत ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.
६. तोंडात धातूची चव
काही गर्भवती महिलांना असे वाटते की त्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चघळत आहेत. शरीरातील एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या वाढीमुळे असे होते आणि त्याला डायजेसिया म्हणतात. ह्यामुळे चवीची संवेदना बदलते. तुम्ही थोडे थोडे कोल्ड ड्रिंक घेऊन घेऊन किंवा साखर विरहीत च्युईंगम खाऊन ह्यावर उपाय करू शकता. काही वेळा मसालेदार अन्नपदार्थ सुद्धा खाऊन बघू शकता.
७. छातीत जळजळ
गरोदरपणातील संप्रेरके अन्ननलिका आणि पोट यांच्यातील झडपांवर परिणाम करतात. त्यामुळे अन्ननलिकेत पोटातील आम्ल गळती होते आणि यामुळे छातीत जळजळ होते. तुम्ही थोड्या प्रमाणात आणि नियमित जेवण घेतल्यास ह्याची तीव्रता कमी होऊ शकते. जड, मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थ आणि कॅफिनेटेड पेय तसेच सॉफ़्टड्रिन्क्स टाळा.
८. चुकीची मासिक पाळी
मासिक पाळीची तारीख नसली तरीही रक्तस्त्राव अनुभवणे हे गर्भधारणेचे आणखी एक लक्षण असू शकते. जेव्हा रोपण प्रक्रिया होते तेव्हा रक्तस्त्राव होतो. रोपणप्रक्रियेमध्ये गर्भाशयाच्या अस्तरांशी गर्भाला स्वतःला जोडले जाते. तथापि, काही वेळेला होणारा रक्तस्त्राव हे एक्टोपिक गर्भधारणा, ग्रीवाला सूज येणे किंवा गर्भधारणा–संबंधित इतर गुंतागुंत यांचे लक्षण असू शकते.
९. स्तनांमध्ये बदल
जर तुमच्या स्तनांचा आकार वाढलेला असेल आणि तुमचे स्तन नाजूक आणि हळुवार झालेले असतील तर ते कदाचित चांगल्या बातमीचे लक्षण आहे. स्तनाग्रांभोवतीचा गडद भाग काही गरोदर स्त्रियांच्या बाबतीत आणखी गडद होतो. शरीर स्तनपानासाठी स्वतःला तयार करीत असल्याने असे घडते.
१०. कामेच्छा बदल
गरोदरपणात आपल्या शरीरात विचित्र बदल होत असतात त्यामुळे कामेच्छेमध्ये सुद्धा बदल होतात. गरोदरपणात काही स्त्रियांमध्ये लैंगिक संबंध ठेवण्याची तीव्र भावना दिसून येते तर काही स्त्रियांमध्ये त्यामध्ये लक्षणीय घट झालेली आढळून येते. परंतु हे सामान्य आहे आणि त्याची चिंता करू नये.
मानवी शरीर खूप गुंतागुंतीचे आहे आणि जेव्हा त्यामध्ये कुठलाही बदल होतो तेव्हा लक्षणे सहज लक्षात येतात. तुम्ही गर्भवती होताच, तुमचे शरीर सर्व प्रकारची लक्षणे दर्शविण्यास सुरुवात करते आणि ते संकेत म्हणून कार्य करतात. गर्भधारणेची कोणतीही सामान्य किंवा असामान्य लक्षणे दिसतात गर्भधारणा चाचणी करून घ्या. ह्या गोड बातमीला पुष्टी देण्यासाठी डॉक्टरांची भेट घ्या. तुम्हाला निरोगी गरोदरपण आणि प्रसूतीसाठी शुभेच्छा.
तुम्हाला खूप जास्त रक्तस्त्राव होत असेल, किंवा पाठीत दुखत असेल किंवा पेटके येत असतील किंवा इतर काही असामान्य लक्षणे तुम्ही अनुभवत असाल तर तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.
आणखी वाचा:
गर्भधारणा चाचणी सकारात्मक असूनही लक्षणे जाणवत नाहीत – हे शक्य आहे का?
पाळी चुकण्याआधीची गर्भारपणाची २१ पूर्व-लक्षणे