गर्भधारणा होताना

वयाच्या विशीमध्ये गरोदर राहणे: तुम्हाला माहिती असाव्यात अश्या काही गोष्टी

वयाच्या विशीतला काळ हा गरोदरपणासाठी सर्वात उत्तम काळ मानला जातो. निरोगी गरोदरपणासाठी वयाव्यतिरिक्त इतर अनेक घटक कारणीभूत असतात. म्हणूनच वयाच्या विशीमध्ये आई होण्याचा विचार करीत असाल तर तुम्ही इतरही घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. कुठल्याही वयात गरोदर राहिले तरीसुद्धा तुमच्या शरीरात आणि आयुष्यात अनेक बदल होत असतात. काही शारिरीक बदल कायमस्वरूपी राहतील. हे बदल प्रत्येक स्त्रीसाठी वेगळे असतील. म्हणूनच वयाच्या विशीमध्ये गरोदरपणाचा विचार करण्याआधी वेगवेगळ्या घटकांचा आणि गरोदरपणाशी संबंधित तथ्यांचा विचार करणे आवश्यक आहे.

तुमच्या वयाच्या विशीत गर्भधारणा होणे

गर्भधारणेसाठी कुठले वय योग्य आहे असा प्रश्न अनेक स्त्रियांच्या मनात असतो. गरोदरपणासाठी वयाच्या विशीतला काळ हा सर्वोत्तम मानला जातो कारण ह्या वयात आरोग्यविषयक गुंतागुंत किंवा समस्या कमी असतात. त्यामुळे सुलभ प्रसूती होते तसेच पुनर्प्राप्ती सुद्धा लवकर होते. शरीर तरुण असल्याने शरीर लवकर पूर्ववत होते तसेच शरीराचा आकार सुद्धा लगेच आधीसारखा होतो. शारीरिक प्रणाली उत्तमरीत्या काम करू लागते. तरुण स्त्रियांच्या बाबतीत शरीर लवकर पूर्ववत होते. वय जास्त असल्यास वयासोबत येणाऱ्या शारीरिक समस्या सुद्धा असतात त्यामुळे गरोदरपणामुळे येणाऱ्या समस्यांमधून शरीर पूर्ववत होण्यास वेळ लागू शकतो.

ह्या वयात गर्भधारणा सुद्धा पटकन होते. आरोग्यविषयक कुठल्याही समस्या नसल्यास विशीतील तरुणीला साधारणपणे दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर लगेच दिवस राहतात.

विशीत गर्भपाताची शक्यता तुलनेने कमी असते. वय जास्त असलेल्या मातांच्या बाळांना क्रोमोसोमल विकृती असण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच विशीतील मातांच्या पोटी जन्मलेली बाळे निरोगी असतात आणि त्यांच्यामध्ये जन्मजात दोषांचा धोका कमी असतो.

तसेच, परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतात. विशीतल्या स्त्रियांना प्रीक्लॅम्पसियाचा त्रास झाल्याची प्रकरणे आहेत. ह्यामुळे स्त्रियांमध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास दिसून होतो. काही वेळा आईच्या खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते.

या वयात आई होऊ इच्छिणाऱ्या सर्व महिलांनी गर्भवती होण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. ह्या सर्व स्त्रियांनी निरोगी जीवन जगले पाहिजे, त्यांनी चांगला आहार घेणे आहे तसेच त्यांच्या गरोदरपणाच्या काळात सुद्धा निरोगी राहिले पाहिजे. चांगला आहार घेऊन स्त्रीरोगतज्ञांच्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे.

तुमच्या वयाच्या विशीमध्ये गर्भवती होण्याचे फायदे

जैविक दृष्टिकोनातून, वयाची विशी हे गर्भवती होण्यासाठी आदर्श वय आहे. कारण ह्या वयामध्ये स्त्रीची प्रजनन क्षमता खूप जास्त असते. शरीर निरोगी असते. स्त्रीचे गर्भाशय आणि स्त्रीबीजे अधिक निरोगी असतात. शारीरिक प्रणाली खूप चांगले काम करीत असते. ह्याच कालावधीत खूप जास्त स्त्रीबीजे तयार होत असतात. ओव्हुलेशन दरम्यान जितकी जास्त स्त्रीबीजे सोडली जातात तितकी गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून वयाच्या विशीला इंग्रजीमध्ये "गोल्डन प्रेग्नन्सी एज" असे म्हणतात.

जसजसे वय वाढत जाते तसतसे स्त्रीबीजांमधील गुणसूत्र दोषांचे प्रमाण वाढते आणि यामुळेच वय जास्त असलेल्या स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या मुलांमध्ये अनुवांशिक विसंगती असण्याची शक्यता असते.

तरुण स्त्रियांचा सहसा गर्भपात होत नाही. वृद्ध स्त्रियांमध्ये गर्भपाताचा धोका जास्त असतो कारण वृद्ध स्त्रियांमध्ये तरुण स्त्रीच्या तुलनेत आरोग्याच्या समस्या जास्त असतात.

बाळाची दिनचर्या सांभाळण्यासाठी लवकर मातृत्व आल्यास सोपे जाते. कारण आईचे शरीर तरुण असल्यामुळे मातृत्वासोबत येणारा ताण आणि जबाबदाऱ्या, तरुण स्त्री अधिक प्रभावीपणे सांभाळू शकते.

अर्थात, जितक्या लवकर तुम्ही आई व्हाल तितक्याच लवकर तुम्ही आजी सुद्धा व्हाल. तुमच्यासारख्या नातवंडांसोबत खेळणाऱ्या आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करणार्‍या आजीआजोबांसारखी नातवंडांना दुसरी चांगली भेट नाही.

तुमच्या विशीमध्ये गर्भवती होण्याचे तोटे

तुमच्या विशीमध्ये आई होण्याचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. वयाची विशी म्हणजे वैयक्तिक जीवनाच्या दृष्टीने आपली क्षमता ओळखून त्यावर काम करण्यासाठी सर्वोत्तम वर्षे आहेत. ह्या वर्षांमध्ये तुम्ही तुमच्या करिअरचा मार्ग निवडू शकता. काही स्त्रिया त्यांचे वैयक्तिक आणि व्यायवसायीक आयुष्याचा चांगला समतोल राखतात. तरीही काही प्रकारच्या नोकऱ्या करणे खूप आव्हानात्मक असते आणि अशा वेळी स्त्रीने तिच्या ध्येयांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. म्हणजेच गरोदरपणामुळे त्यांना करियर मधून ब्रेक घेण्यास भाग पडले जाऊ शकते आणि त्यांच्या जागेवर दुसऱ्या कुणाचीतरी नियुक्ती केली जाण्याची शक्यता असते.

बाळाचा विचार जेव्हा सुरु होतो तेव्हा आर्थिक नियोजन सुद्धा गरजेचे आहे. गर्भश्रीमंत घरात जन्म झालेला असल्यास तो अपवाद वगळता,वयाच्या विशीमध्ये आपण नुकतीच कमावण्यास सुरुवात केलेली असते. त्यामुळे काही जोडप्याना प्रचंड आर्थिक ताण वाटू शकतो.

लहान असताना बाळाची जबाबदारी घेताना नातेसंबंधांबाबत समस्या देखील उद्भवू शकतात. तसेच, इतक्या लहान वयात आई होण्याची भावनिक परिपक्वता फारशा स्त्रियांमध्ये नसते.

वयाच्या विशीमध्ये गर्भधारणा झाल्यास शारीरिक त्रास कमी होत असले तरी, प्रत्येक गर्भारपण वेगळे असते. अगदी विसाव्या वर्षीही, निरोगी मूल जन्माला घालण्यासाठी आईची तब्येत चांगली असली पाहिजे

तुमच्या वयाच्या विशीत गरोदर राहण्याची शक्यता

वयाच्या विशीमध्ये गर्भाशय निरोगी असते आणि भरपूर प्रमाणात स्त्रीबीजे तयार होत असतात. म्हणूनच विशीतील स्त्रीने बाळासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्यास लगेच यश येण्याची शक्यता असते. ओव्हुलेशनच्या काही दिवस आधी शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भवती होण्याची शक्यता ३३ टक्के असते. म्हणजेच इतर कोणत्याही वयाच्या तुलनेत विशीमध्ये गर्भवती होण्याची शक्यता जास्त असते. तसेच विशीत गरोदर राहिल्यास निरोगी बाळ जन्माला येण्याची शक्यता सुद्धा जास्त असते.

तुम्ही गर्भवती होऊ इच्छित असल्यास काय केले पाहिजे?

ह्या टप्प्यावर ज्यांना बाळ हवे आहे त्यांनी गर्भधारणेसाठी प्रथम त्यांचे शरीर तयार केले पाहिजे. निरोगी आणि सक्रिय जीवन जगून सुरुवात करा. नियमित व्यायाम करा, अतिरिक्त चरबी कमी करा आणि तुमचे वजन योग्य बॉडी मास इंडेक्स किंवा बीएमआय वर आणण्याचा प्रयत्न करा. आपल्या आहारात अधिक भाज्या आणि फळांचा समावेश करा आणि मांसाचे सेवन वाढवा. मद्यपान आणि धूम्रपान टाळा. पाणी जास्त प्या. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि तणावाच्या सर्व गोष्टी टाळा.

कमीतकमी तीन मासिकपाळी चक्रे पूर्ण होईपर्यंत नैसर्गिक गर्भधारणेसाठी प्रयत्न करा. तुम्ही ओव्हुलेशन प्रेडिक्टर किट किंवा इतर पद्धती वापरू शकता. ह्या पद्धतीमध्ये गर्भाशयाच्या श्लेष्माचा मागोवा घेतला जातो तसेच शरीराच्या सामान्य तापमानाची नोंद ठेवली जाते. त्यामुळे तुम्हाला ओव्यूलेशन केव्हा होते हे समजेल. ओव्हीव्यूलेशनच्या दिवसांमध्ये तुम्ही शारीरिक संबंध ठेवू शकता.

प्रयत्न करूनही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तुम्ही स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा. तुमचे स्त्रीरोगतज्ञ तुमच्या मासिक पाळी चक्राचा अभ्यास करतील आणि गर्भधारणा रोखणाऱ्या काही समस्या आहेत का ते शोधून काढतील. स्त्रीरोगतज्ञांच्या सल्ल्याचे अनुसरण करा आणि तुम्हाला लवकरच परिणाम दिसेल.

आपल्या वयाच्या विशीमध्ये गरोदर राहणे कसे टाळाल?

जर तुम्हाला तुमच्या वयाच्या विशीमध्ये गरोदर राहायचे नसेल, तर तुम्ही त्यासाठी अनेक गर्भनिरोधक उपाय करून पाहू शकता. लक्षात ठेवा, गर्भधारणा रोखण्याचे नैसर्गिक मार्ग देखील आहेत, परंतु त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. तुम्ही २० वर्षांच्या असताना तुमची स्त्रीबीजे गोठवून ठेवू शकता जेणेकरून तुम्ही जेव्हा मातृत्वासाठी तयार असाल तेव्हा त्यांचा वापर करू शकता. गर्भवती होण्यासाठी लागणारी भावनिक, आर्थिक आणि मानसिक परिपक्वता मिळवण्यासाठी स्त्रिया ३० वर्षांच्या होईपर्यंत वाट पाहू शकतात. त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही प्रजनन तंत्रज्ञाचा वापर करून तुम्हाला हवे तेव्हा गरोदर राहू शकता.

जैविक दृष्ट्या, वयाची विशी ही स्त्रीसाठी गर्भधारणा होण्याचा आदर्श काळ असतो कारण या वयात स्त्रीचे आरोग्य उत्तम असते. परंतु, ह्या कालावधीत गरोदर राहिल्यास धोके आणि गुंतागुंत सुद्धा आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि तरुण वय असण्याने गुंतागुंत कमी होते पण समस्या अगदीच उद्भवत नाहीत असे होत नाही.

विशीत गरोदर राहून सुरक्षित गर्भारपण हवंय की थोडे स्थिरस्थावर होण्याची वाट बघून तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्यावर जोखीम घेऊन गरोदर राहण्याचा विचार करायचा आहे? शेवटी हा प्रत्येकाचा चॉईस आहे. डॉक्टरांशी नीट चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणे योग्य आहे.

आणखी वाचा:

स्त्रीच्या वयाचा तिच्या प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो? चाळीशीत गर्भवती होताना तुम्हाला माहित असाव्यात अशा गोष्टी

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved