गर्भारपण

गरोदरपणात वारेच्या (प्लेसेंटा) वेगवेगळ्या सामान्य स्थिती

वार (प्लेसेंटा) हा गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयातील एक महत्त्वाचा अवयव आहे. हा अवयव गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात बाळाला ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी असतो. तसेच  बाळाच्या रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यासाठी सुद्धा वारेचा वापर होतो. वार ही गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयाच्या भित्तिकांशी जोडलेली असते आणि नाळेद्वारे बाळाशी जोडलेली असते. गरोदरपणात प्लेसेंटा गर्भाशयाच्या वरच्या बाजूला, समोर किंवा मागे जोडलेली असू शकते. क्वचित प्रसंगी, प्लेसेंटा गर्भाशयाच्या खालच्या भागात सरकते आणि गर्भाशयाचे मुख अवरोधित होते. ह्या लेखात, आम्ही गर्भारपणातील प्लेसेंटाची सामान्य स्थिती आणि त्याचा गरोदरपणावर कसा परिणाम होतो ह्याबद्दल चर्चा करणार आहोत. प्रसूतीनंतर, सहसा गर्भवती स्त्रीच्या शरीरातून वार बाहेर टाकली जाते, परंतु ते नेहमी आपोआप होत नाही. जेव्हा प्लेसेंटा गर्भाशयात राहते तेव्हा त्याला इंग्रजीत 'रिटेन्ड प्लेसेंटा' असे म्हणतात.

वार (प्लेसेंटा) च्या वेगवेगळ्या जागा कोणत्या आहेत?

प्लेसेंटा म्हणजेच वार हा एक मोठा पॅनकेकच्या आकाराचा अवयव आहे. हा अवयव गरोदरपणात  विकसित होतो आणि गर्भाशयाच्या भित्तिकांशी जोडलेला असतो. वार भित्तिकांशी वेगवेगळ्या स्थितीमध्ये जोडलेली असते. वेगवेगळ्या संभाव्य स्थानांचा खाली उल्लेख केला आहे: १.पोस्टरियर प्लेसेंटा: सहसा, गर्भाशयाच्या भित्तिकांच्या मागील बाजूस फलित अंड्याचे रोपण केले जाते. अशा वेळी, प्लेसेंटा देखील गर्भाशयाच्या मागील भित्तिकांवर विकसित होतो किंवा वाढतो. जेव्हा प्लेसेंटा या स्थितीत असतो तेव्हा त्याला पोस्टरियर प्लेसेंटा म्हणतात. २. अँटेरिअर प्लेसेंटा: जेव्हा फलित अंड्याचे गर्भाशयाच्या पुढील बाजूस रोपण होते तेव्हा गर्भाच्या पुढील भित्तिकांवर प्लेसेंटा विकसित होते आणि त्याची वाढ होते. जेव्हा गर्भाशयाच्या पुढच्या बाजूला असतो तेव्हा त्याला अँटेरिअर प्लेसेंटा म्हणून ओळखले जाते. ३. फंडल प्लेसेंटा: जेव्हा प्लेसेंटा गर्भाशयाच्या वर जोडला जातो तेव्हा त्याला फंडल प्लेसेंटा म्हणतात. काहीवेळा, प्लेसेंटा हा फंडल अँटेरिअर पोझिशन मध्ये किंवा फंडल-पोस्टरियर पोझिशन मध्ये  असतो. फण्डल-एंटीरियर प्लेसेंटा सामान्यत: गर्भाशयाच्या वरच्या बाजूस असतो आणि गर्भाच्या पुढच्या बाजूस किंचित पसरलेला असतो. फंडल-पोस्टेरियर प्लेसेंटा देखील गर्भाशयाच्या शीर्षस्थानी असतो, परंतु तो गर्भाशयाच्या मागील बाजूस पसरलेला असतो. ४. लॅटरल प्लेसेंटा: जेव्हा प्लेसेंटा गर्भाशयाच्या पार्श्व भित्तिकेवर, एकतर गर्भाशयाच्या उजव्या बाजूला किंवा गर्भाशयाच्या डाव्या बाजूला रोवलेला असतो, तेव्हा त्याला लॅटरल प्लेसेंटा म्हणतात. ५.प्लेसेंटा प्रेव्हिया (वार खाली सरकणे): जेव्हा प्लेसेंटा गर्भाशयाच्या खालच्या दिशेला किंवा गर्भाशयाच्या मुखाच्या दिशेने वाढतो, तेव्हा त्याला वार खाली सरकणे किंवा लो लायिंग प्लॅसेंटा असे म्हणतात. जर प्लेसेंटा गर्भाशयाच्या मुखाच्या उघड्या भागापर्यंत पोहोचत असेल किंवा त्यामुळे गर्भाशयाचे मुख पूर्णपणे झाकून जात असेल, तर या स्थितीला 'प्लेसेंटा प्रेव्हिया' असे म्हणतात आणि त्यामुळे गरोदरपणात अनेक गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

प्लेसेंटाचे स्थान कसे निश्चित केले जाते?

अल्ट्रासाऊंड चाचणी करून प्लेसेंटाचे स्थान निश्चित केले जाते. अल्ट्रासाऊंड करणे सुरक्षित आणि सोपे आहे. जर तुम्ही गर्भवती असाल आणि प्लेसेंटाची स्थिती सामान्य आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घेऊ शकता. कदाचित, तुमचे डॉक्टर देखील तुम्हाला स्कॅन करून घेण्यास  सांगतील. प्लेसेंटाची स्थिती निश्चित करण्यासाठी, नर्स तुमच्या ओटीपोटावर आणि ओटीपोटाच्या जवळील भागावर जेल लावेल. मग ती तुमच्या पोटावर ट्रान्सड्यूसर ठेवेल. उच्च-फ्रिक्वेंसी अल्ट्रासाऊंड लहरींच्या मदतीने, ट्रान्सड्यूसर तुमच्या गर्भाशयाची आणि प्लेसेंटाची प्रतिमा स्क्रीनवर दाखवेल. हे स्कॅन करून, तुमची प्लेसेंटा सामान्य स्थितीत आहे किंवा नाही हे तुमचे डॉक्टर सांगू शकतील.

गरोदरपणात प्लेसेंटाची स्थिती बदलते का?

गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात गर्भाशयात प्लेसेंटा एक मोठा पृष्ठभाग व्यापतो. गरोदरपणात प्लेसेंटाची स्थिती बदलू शकते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, प्लेसेंटा खाली सरकलेला दिसू शकतो परंतु गरोदरपणाचे दिवस जसजसे पुढे सरकतात तसतसे प्लेसेंटा गर्भाशयाच्या वरच्या भागात सरकू शकतो. ह्यालाच ‘प्लेसेंटल मायग्रेशन’ म्हणतात. प्लेसेंटा प्रेव्हियाच्या बाबतीत, हे प्लेसेंटल स्थलांतर होण्याची शक्यता नाही.

गरोदरपणात प्लेसेंटाची सामान्य स्थिती काय असते?

बीजवाहिनीतून फलित अंड्याचे कुठे रोपण होते त्यानुसार, प्लेसेंटा गर्भाशयाच्या पुढच्या बाजूला किंवा गर्भाशयाच्या मागील बाजूस स्थित असू शकते. प्लेसेंटाची सामान्य स्थिती गर्भाशयाच्या शीर्षस्थानी अथवा गर्भाशयाच्या पुढच्या किंवा मागच्या बाजूस असू शकते.

आपण काळजी कधी करावी?

जर प्लेसेंटा पोस्टरियरीअर, अँटिरियर, फंडल किंवा लॅटरल स्थितीत असेल तर ही समस्या नाही. प्लेसेंटा जोडण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी या सर्व स्थिती सामान्य आहेत. परंतु, जर प्लेसेंटा गर्भाशयाच्या खालच्या बाजूस किंवा स्त्रीच्या गर्भाशयाच्या मुखाच्या दिशेने वाढला तर ते चिंतेचे कारण असू शकते. वर सांगितल्याप्रमाणे ह्या अवस्थेला, प्लेसेंटा प्रेव्हिया म्हणतात, आणि   वार निसटल्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो. प्लेसेंटा प्रेव्हिया ह्या स्थितीमुळे सामान्य प्रसूती प्रतिबंधित होऊ शकते कारण त्यामुळे गर्भाशयाचे मुख झाकले जाते. गरोदरपणात प्लेसेंटाची स्थिती निश्चित करण्यासाठी नियमित अल्ट्रासाऊंड चाचणी केली जाते जेणेकरुन डॉक्टरांना प्लेसेंटाच्या स्थितीमुळे उद्भवू शकणार्‍या कोणत्याही संभाव्य गुंतागुंतांची माहिती मिळेल.

प्लेसेंटा प्रेव्हियाची चिन्हे

प्लेसेंटा प्रेव्हियाच्या लक्षणांपैकी एक म्हणजे अचानक, वेदनारहित योनीतून रक्तस्त्राव होऊ शकतो. प्लेसेंटा प्रिव्हियाच्या इतर चिन्हे आणि लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश होतो. जर तुम्ही गरोदर असाल आणि तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसली, तर ते वार खाली सरकल्याचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वार खाली सरकलेली असल्यास (लो लायिंग प्लॅसेंटा) त्यामागची कारणे काय आहेत?

प्लॅसेंटा खाली सरकल्याचे नेमके कारण माहित नसले तरी, ज्यांचे वय जास्त आहे अश्या स्त्रियांमध्ये ही समस्या  दिसून येते. तसेच ज्यांची प्रसूती आधी सी-सेक्शन झाली आहे, ज्यांना धूम्रपान करण्याचे व्यसन आहे किंवा गर्भाशयात चट्टे आहेत अश्या स्त्रियांमध्ये सुद्धा वार खाली सरकण्याची समस्या दिसून येते. ज्या स्त्रियांना आधीच्या प्रसूतीदरम्यान प्लेसेंटा प्रेव्हियाचा त्रास झाला असेल त्यांना देखील वार खाली सरकण्याचा धोका असतो. जर तुमच्या आधीच्या प्रसूतीमध्ये तुम्हाला ही समस्या आलेली असेल तर तुमच्या डॉक्टरांना आधीच कळवावे.

वार किती खाली सरकलेली असल्यास ते धोकादायक असते?

सामान्य परिस्थितीत, गर्भधारणेच्या १८-२०  व्या आठवड्यात प्लेसेंटा आणि गर्भाशय ग्रीवामधील अंतर २ सेंटीमीटरपेक्षा जास्त असल्यास प्रसूतीदरम्यान वार खाली सरकणार नाही. १८-२० व्या आठवड्यात हे अंतर २ सेंटीमीटर पेक्षा कमी असल्यास, जन्माच्या वेळी ते कमी राहू शकते.  तुमचे डॉक्टर प्रसूतीपूर्वी तिसर्‍या तिमाहीत प्लेसेंटाची स्थिती पुन्हा तपासून घेण्यास सांगू शकतील.

प्लेसेंटा गर्भाशयाच्या  मुखाच्या अगदी जवळ असल्यास काय होते?

जर प्लेसेंटा गर्भाशयाच्या मुखाच्या अगदी जवळ असेल, तर आईला प्लेसेंटा प्रेव्हिया असल्याचे निदान केले जाईल. ही स्थिती असल्यास अकाली प्रसूतीचा धोका असतो. जर प्लेसेंटा वेळेपूर्वी विलग झाला तर रक्तस्त्राव होऊ शकतो. प्लेसेंटा प्रेव्हिया असल्यास सामान्य प्रसूती कठीण होऊ शकते. प्रसूती सुरक्षित होण्यासाठी प्लेसेंटाची स्थिती महत्त्वाची भूमिका बजावते. सखल प्लेसेंटा किंवा प्लेसेंटा प्रेव्हिया ह्या समस्या असल्यास प्रसूतीच्या वेळी त्रास होऊ शकतो. वार खाली सरकण्याची कारण माहित नसल्यामुळे, ते रोखणे कठीण आहे. परंतु, सोनोग्राफी आणि अल्ट्रासाऊंडच्या मदतीने, डॉक्टर प्लेसेंटाची स्थिती आधीच ओळखू शकतात आणि सुरक्षित प्रसूतीसाठी आवश्यक सावधगिरीची पावले सुचवू शकतात. आणखी वाचा: गरोदरपणातील मधुमेह गर्भाचे निरीक्षण (फिटल मॉनिटरिंग)
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved