आहार आणि पोषण

गरोदरपणात केशर सेवन: फायदे, उपयोग, दुष्परिणाम आणि बरंच काही

गरोदरपणात आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतात. गरोदरपणात केशर सेवन करणे चांगले असते, कारण केशर सकारात्मक भावनांना उत्तेजन देते आणि त्यामध्ये असलेले काही औषधी गुणधर्म गरोदरपणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी मदत करतात. केशर चिंता, तणाव आणि पोटदुखीच्या भावनांना तोंड देण्यास मदत करते. केशरामधील अशा बर्‍याच गुणांमुळे गर्भवती महिलांना त्याचे सेवन करण्यास सांगितले जाते. तथापि, इतर बऱ्याच गोष्टींप्रमाणे, केशराचे सेवन मध्यम प्रमाणात केले पाहिजे अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. गरोदरपणात केशराचे फायदे, उपयोग आणि दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

केशर म्हणजे काय?

केशर म्हणजे क्रोकस सॅटिव्हस ह्या फुलाचे वाळलेले पराग असतात. केशराची रचना एखाद्या धाग्यासारखी असते आणि त्यामध्ये परागकण असतात आणि ते फुलांच्या मध्यभागी आढळतात. केशर वनस्पतीमध्ये चार फुले असतात, ज्यामधून कुक्षी आणि किरमिजी रंगाचे कुक्षीवंत गोळा केले जातात आणि वाळवले जातात. एका फुलामधून फक्त ३ केशराच्या काड्या मिळतात आणि एक पौंड केशर तयार करण्यासाठी सुमारे १४,००० केशराच्या काड्या लागतात. केशर काढण्यासाठी खूप प्रयत्न आणि श्रम केले जातात, त्यामुळे हा जगातील सर्वात महागडा मसाल्याचा पदार्थ आहे. मुख्यतः मध्य पूर्व आणि भूमध्य प्रदेशात याची लागवड केली जाते. भारतात ह्या फुलांची लागवड फक्त जम्मू आणि काश्मीरमध्येच केली जाते. हा विदेशी मसाला केशर, केसर, कौंग, जाफ्रान किंवा कुमकुमापुसारख्या वेगवेगळ्या नावांनी भारतात ओळखला जातो.
केशरला गोल्डन स्पाइसम्हणून ओळखले जाते कारण त्यामुळे अन्नाला एक अनोखा सुगंध आणि चव तर येतेच परंतु केशरामुळे पचनसंस्थेवर एक संरक्षक लेप तयार होतो. त्यामुळे पचनाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. केशरामुळे अन्नपदार्थांवर पिवळसर नारिंगी रंग येतो. हा रंग केशरामध्ये असलेले कॅरोटीनोईड रंगद्रव्य म्हणजेच क्रोसेटिनचा परिणाम आहे. केशरामध्ये त्वचेसाठी काही औषधी गुणधर्म आणि सुखदायक प्रभाव असल्यामुळे ह्याचा वापर ब्युटी ट्रीटमेंट क्रीम्समध्ये केला जातो. केशर त्वचेला चमक आणण्यासाठी आणि त्वचेचा पोत एकसारखा राहण्यासाठी मदत करते. तसेच, केशरमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे, वृद्धत्वाच्या प्रक्रियेचा दर कमी होतो. गरोदरपणात केशराचे सेवन केल्यास बाळाचा रंग उजळण्यास त्यामुळे मदत होते असा एक समज आहे.

गरोदरपणात केशर सेवन करणे सुरक्षित आहे का?

होय, गरोदरपणात केशरचे सेवन करणे सुरक्षित आहे कारण त्यात असंख्य औषधी गुणधर्म आहेत. केशरामुळे तणाव, वेदना, मूड स्विंग्स आणि गरोदरपणातील अस्वस्थतेपासून मुक्तता मिळण्यास मदत होते. तथापि, मोठ्या प्रमाणात केशर सेवन केल्यास काही विशिष्ट दुष्परिणाम देखील होऊ शकतात. केशर गर्भाशयाच्या आकुंचनास कारणीभूत ठरू शकते आणि त्यामुळे अकाली प्रसूती होऊ शकते. आपल्या आहारात केशराचा समावेश करण्याआधी काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

गर्भवती महिलांसाठी केशरचे फायदे

औषधी गुणधर्मामुळे गरोदरपणात केशराचे सेवन करणे आवश्यक आहे आणि त्याची शिफारस केली जाते. केशराचा सर्वात मुख्य फायदा म्हणजे ते पचन संस्थेत एक संरक्षक लेप तयार करून पचनास मदत करते. जेव्हा मध्यम प्रमाणात केशर सेवन केले जाते तेव्हा गरोदरपणात केशराचे खालीलप्रमाणे फायदे होतात.

. मनःस्थितीत होणारे बदल कमी करते

गरोदरपणामुळे तुमच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये बदल होत असतात आणि त्याचा तुमच्या भावनांवर खोल परिणाम होतो. आपण एका क्षणी आनंदी तर दुसर्‍या क्षणी भावनात्मक होऊ शकता. अशा वेळी केशर तुमच्या मदतीला येऊ शकते. ते एक औदासिन्यविरोधी म्हणून कार्य करते आणि आपल्या मेंदूत रक्त प्रवाह वाढवते. केशरचे सेवन केल्याने आपला मूड चांगला करणारे सेरोटोनिन संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक, कोर्टिसोल देखील कमी करते.

. रक्तदाब नियमित करते

गरोदरपणात एखाद्या स्त्रीच्या हृदयाचा वेग २५% नि जास्त वाढू शकतो, त्यामुळे रक्तदाब कमी जास्त होतो. केशरामध्ये पोटॅशियम आणि क्रोसेटिन असते त्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. आणि ते गरोदरपणात फायदेशीर ठरू शकते.

. मॉर्निंग सिकनेस कमी करते

मॉर्निंग सिकनेसमुळे बर्‍याचदा गर्भवती स्त्रीला कंटाळवाणे व सुस्त वाटते. केशर घातलेला चहा घेतल्यास बहुतेक वेळा मळमळ आणि चक्कर येणे कमी करण्यास मदत होते.

. पचनास मदत करते

बहुतेक महिलांना गरोदरपणात पोटदुखीचा त्रास होतो. गरोदरपणात पचन कमी होते आणि गर्भवती आईला पचन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काही उत्तेजक घटकांची आवश्यकता असू शकते. केशरामुळे पाचन प्रणालीला चालना मिळते हे सर्वज्ञात आहे आणि त्यामुळे चयापचय क्रियेत वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे पचन चांगले होते. केशरामुळे पचन संस्थेत संरक्षणात्मक थर तयार होतो. हा अतिरिक्त थर ऍसिडिटी आणि सूज कमी करण्यास देखील मदत करतो.

. पेटक्यांपासून मुक्तता

प्रसुतीपूर्वी गर्भवती महिलेस सौम्य ते गंभीर प्रमाणात वेदना होत असतात. संपूर्ण गरोदरपणात, वाढत्या बाळाला सामावून घेण्यासाठी हाडे आणि स्नायू ताणले जातात. त्यामुळे पोट आणि ओटीपोटाकडील भागात वेदना होतात. केशर एक नैसर्गिक वेदनाशामक आहे. केशर स्नायूंना आराम देते, तसेच पोटदुखीपासून मुक्त होण्यास आणि पेटके कमी करण्यास मदत करते.

. हृदयरोगापासून संरक्षण करते

केशरामध्ये हृदयरोगांपासून संरक्षण करण्याचा जादुई गुण आहे. गरोदरपणात, स्त्रिया त्यांची वाढलेली भूक भागवण्यासाठी आवश्यक प्रमाणात चरबीयुक्त पदार्थांचे जास्त सेवन करतात. त्यामुळे त्यांच्या हृदय व रक्तवाहिन्यांवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. केशरामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट्स, क्रोसेटिन आणि पोटॅशियम आपल्या शरीरातील ट्रायग्लिसराईड्स आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

. श्वसनाचे आजार बरे करते

केशरामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत त्यामुळे अनुनासिक वायुमार्ग विस्तारित होण्यास मदत होते. तसेच फुफ्फुसातील सूज आणि दाह कमी करते. परिणामी, तुम्ही सुरळीतपणे श्वास घेऊ शकता. दम्याने ग्रस्त गर्भवती महिलांना त्यांच्या फुफ्फुसात आणि श्वासनलिकेत येणारी कोणतीही अडचण दूर करण्यास केशरामुळे मदत होते.

. केस गळणे कमी करते

गरोदरपणात संप्रेरकांमधील चढउतारांमुळे बहुतेकदा केस गळतात. बर्‍याच गर्भवती महिलांमध्ये केस गळणे कमी करण्यासाठी दूध, केशर आणि मद्यापासून तयार केलेली पेस्ट वापरणे सर्वत्र प्रचलित आहे. केशरामधील अँटीऑक्सिडेंट्स केसांना पोषण देतात आणि केस मजबूत बनवतात.

. चांगल्या झोपेसाठी मदत करते

जसजशी गरोदरपणात प्रगती होते तसतशी झोप येणे हे एक आव्हान बनते. पोटाच्या वाढत्या आकारामुळे आई रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर करत असते. संप्रेरकांच्या पातळीमध्ये वाढ होत असल्याने त्याचे परिणाम, तसेच हाडे आणि स्नायू ताणले जात असल्याने येणारी अस्वस्थता, ह्या सगळ्या घटकांमुळे आईला पेटके येणे, वेदना होणे आणि अस्वस्थता येणे हे परिणाम जाणवतात. ह्या कालावधीत तुम्ही केशर घालून दूध घेऊ शकता.

१०. त्वचेच्या समस्या बरे करते

केशराचे सेवन केल्यामुळे त्वचेच्या सामान्य समस्या दूर होण्यास मदत होते असे बऱ्याच स्त्रियांचे म्हणणे आहे. यामध्ये गरोदरपणात उद्भवणाऱ्या मुरुमांचा समावेश आहे. केशर रक्त शुद्ध करते आणि रक्तातील अशुद्धतेमुळे होणार्‍या त्वचेच्या समस्येवर तो एक प्रभावी उपाय आहे.

११. ऍलर्जीमुळे होणारा कफ दूर करते

बहुतेक वेळा गरोदरपणात रोगप्रतिकारक यंत्रणा कमकुवत होते. त्यामुळे तुम्हाला संसर्ग आणि ऍलर्जी लवकर होऊ शकते. केशरामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. खोकला, दमा, ऍलर्जी आणि नाकातील श्लेष्मा केशरामुळे कमी होतो. याशिवाय केशर आणि चंदनची पेस्ट लावल्यास ताप कमी होण्यास मदत होते.

१२. बाळाच्या हालचालचा अनुभव घेण्यास मदत होते

आयुर्वेदिक शास्त्रानुसार, केशरामुळे आपल्या शरीराची उष्णता वाढते आणि त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे, गर्भाशयात बाळाची हालचाल सुरु होऊ शकते. आपल्या गर्भाशयात आपल्या बाळाच्या हालचालीचा अनुभव घेतल्याने तुम्हाला आनंद वाटतो.

गरोदरपणात केशराचे सेवन कधी करावे?

केशरामुळे भूक वाढते आणि पचनास मदत होते. तरीही, गरोदरपणात केशर घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञांचा आणि आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा. दुसऱ्या तिमाहीपासून विशेषतः पाचव्या महिन्यापासून केशराचे सेवन करणे चांगले आणि सुरक्षित मानले जाते. डॉक्टरांनी गर्भवती मातांना गरोदरपणात केशराचे सेवन कधी आणि किती प्रमाणात करावे ह्याविषयी मार्गदर्शन करावे. गरोदरपणात केशराच्या सेवनाने शरीराची उष्णता वाढते, त्यामुळे गर्भाशयाच्या आकुंचनाची वारंवारता वाढते, म्हणून रात्रीच्या वेळी केशर सेवन करण्याचा सल्ला दिला जातो कारण या काळात आपल्या शरीरात बऱ्याच प्रक्रिया होत असतात. केशर कळा प्रवृत्त करते आणि काही वेळा त्यामुळे अकाली गर्भपात सुद्धा होऊ शकतो. दररोज फक्त एका केशराच्या काडीचे सेवन करावे अशी शिफारस डॉक्टर करतात. कारण ह्यापेक्षा जास्त प्रमाणात केशराचे सेवन केल्यास ते धोकादायक असते. त्यामुळे अकाली प्रसूती आणि गर्भपात सुद्धा होऊ शकतो. जरी केशराचे पौष्टिक मूल्य जास्त असले तरीसुद्धा त्याची प्रतिकूल प्रतिक्रिया होऊ नये किंवा त्यामुळे कुठलेही नुकसान होऊ नये म्हणून केशराचे सेवन कधी करावे ह्याची जाणीव ठेवणे महत्वाचे आहे.

गरोदरपणात केशराचे सेवन कसे करावे?

आपल्याला आता माहित आहे की केशर गरोदरपणामध्ये सुरक्षित आहे परंतु त्याचे सेवन प्रमाणात करणे जरुरीचे आहे. गरोदरपणात केशराचे सेवन कसे करावे याबद्दल गर्भवती मातांना चांगली माहिती असणे महत्वाचे आहे. केशर प्रामुख्याने दोन प्रकारे खाल्ले जाते.

. भिजवलेले केशर

घरी किंवा व्यावसायिक स्वयंपाकी अशा पद्धतीने केशर भिजवून वापरतात. केशराचे धागे हळूवारपणे कुस्करून पाणी, दूध किंवा सूप मध्ये घातले जातात आणि विरघळण्यासाठी १० ते १५ मिनिटे तसेच ठेवले जातात.

. केशराचा चुरा

पौष्टिक सूप आणि कोशिंबीरीच्या ड्रेसिंगसाठी केशर घालण्याचा प्रकार सर्वोत्तम आहे. तुम्ही तुमच्या बोटानी केशराचा चुरा करू शकता आणि थेट वेगवेगळ्या डिशेश मध्ये घालू शकता. एकदा तुम्ही केशर तयार केलेत की पुढची स्टेप म्हणजे वेगवेगळ्या डिशमध्ये त्याचा वापर करणे. तुम्ही गरोदरपणात केशर कसे खावे याबद्दल विचार करत असल्यास काळजी करू नका कारण त्याचे सेवन करण्याचे बरेच मार्ग आहेत. केशर भारतीय पाककृतीचा एक महत्वाचा भाग आहे कारण याचा उपयोग खीर, लस्सी, बिर्याणी आणि इतर पारंपारिक मिठाईसारख्या पदार्थांमध्ये केला जातो. गरोदरपणात केशर कसे वापरावे ते येथे दिलेले आहे.

. दुधासोबत केशर

आपल्या बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी कॅल्शियम हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण खनिज आहे. गरोदरपणाचा पाचवा महिना सुरु झाल्यानंतर तुम्ही तुमच्या दुधात केशर घालू शकता किंवा तुम्ही बदाम, पिस्ता आणि केशर इत्यादींची पेस्ट करून दुधातून घेऊ शकता. तुम्ही सकाळी केशर दूध घेऊ शकता.

. भात आणि सूप मध्ये केशर

चव वाढविण्यासाठी तुम्ही सूप आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भातामध्ये केशर घालू शकता. रंग आणि चवीसाठी केशराच्या १-२ काड्या पुरेशा आहेत.

. पाणी आणि केशर

तुम्ही एक ग्लास पाण्यात केशरची फक्त एक काडी घालू शकता आणि पिऊ शकता. पचनास त्यामुळे तुम्हाला मदत होईल.

केशरचे दुष्परिणाम

केशराचे गर्भवती स्त्रियांसाठी मोठ्या प्रमाणात फायदे आहेत, परंतु त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. गर्भवती मातांनी जास्त प्रमाणात केशरचे सेवन केल्यास ते धोकादायक ठरू शकते, कारण त्यामुळे गर्भाशय आकुंचन पावते आणि पुढील समस्या उद्भवू शकतात:

. गर्भपात

केशरामुळे शरीराची उष्णता आणि तापमान वाढते. गर्भाशय आकुंचन पावण्यास सुरुवात होते. यामुळे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या आठवड्यात गर्भपात होऊ शकतो. म्हणून तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत केशराचे सेवन सुरू करावे.

. अतिसंवेदनशीलता

बर्‍याच वेळा, गरोदर स्त्रिया केशर सेवन केल्यानंतर चिंता, तोंड कोरडे पडणे, मळमळ आणि डोकेदुखी इत्यादी समस्यांची तक्रार करतात. जर तुम्हाला अशा समस्या येत असतील तर तुम्ही केशर सेवन टाळावे.

. उलट्या होणे

केशरामुळे काही स्त्रियांना उलट्या देखील होऊ शकतात. उलट्यांमुळे तुम्हाला त्रास तर होतोच परंतु तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या शरीरात पोषणमूल्यांची कमतरता जाणवते. त्यामुळे तुम्हाला केशराची काही प्रतिक्रिया येत नाही ना हे आधी तपासून पहा. तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर केशर सेवन टाळा.

. केशरामुळे विषबाधा

जेव्हा एखादी व्यक्ती १२ ग्रॅमपेक्षा जास्त प्रमाणात केशर घेते तेव्हा केशरामुळे विषबाधा होऊ शकते. केशरामुळे विषबाधा झाल्यास त्वचा, डोळे आणि श्लेष्मल आवरण पिवळे पडते. बधिरपणा, रक्तरंजित अतिसार, नाकातून आणि ओठातून रक्तस्त्राव अशी बरीच लक्षणे दिसून येतात.

. कळा

केशराचे जास्त सेवन केल्यास ते गर्भाशयाला उत्तेजित करते, गर्भाशयाचे आकुंचन वाढते आणि त्यामुळे अकाली प्रसूती होऊ शकते.

. चक्कर येणे

केशराच्या शामक गुणधर्मामुळे ते अधिक प्रमाणात घेतल्यास चक्कर आल्याची भावना येते.

. ऍलर्जी

ज्या स्त्रिया काही विशिष्ट खाद्यपदार्थांबद्दल संवेदनशील असतात आणि ओलेआ, लोलियम, ससोला वनस्पतींच्या ऍलर्जीचा ज्यांना इतिहास असतो अशा स्त्रियांनी केशर सेवन केल्यास पुढील ऍलर्जीचा धोका असतो.

. पापण्या, नाक किंवा ओठांमधून रक्तस्त्राव

तुमचा गर्भारपणाचा टप्पा आणि तुम्हाला कुठल्या प्रकारच्या ऍलर्जी आहेत त्यानुसार केशराचे सेवन केल्यानंतर नाकातून, ओठांमधून रक्तस्त्राव होऊ शकतो.

. बधिरपणा

केशरचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास काही स्त्रियांचे हात पाय तसेच ओठांना मुंग्या येऊ शकतात.

१०. कावीळ / अतिसार / रक्तस्त्राव

केशर जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात विषारी प्रतिक्रिया वारंवार उद्भवतात, परिणामी कावीळ, रक्तस्राव आणि अतिसार ह्यासारखी परिस्थती उद्भवते.

११. मूत्र किंवा शौचातून रक्त

मूत्र किंवा शौचातून रक्तस्त्राव हे गर्भवती महिलेसाठी एक भयानक दृश्य असू शकते. तथापि, जास्त प्रमाणात केशराचे सेवन केल्यामुळे हा दुष्परिणाम होऊ शकतो.

लक्षात ठेवण्याच्या इतर गोष्टी

बऱ्याचदा भेसळयुक्त केशर विकले जाते आणि गर्भवती महिला व त्यांच्या बाळांना ते हानिकारक ठरू शकते. विश्वासार्ह स्रोतांकडून शुद्ध केशर मिळविणे महत्वाचे आहे. गरोदरपणात सुरक्षितपणे केशरचे सेवन करण्यासाठी काही खबरदारी आणि लक्षात ठेवण्याच्या गोष्टी खालीलप्रमाणे:-

. पॅक केलेले केशर खरेदी करा

स्थानिक दुकानदार सुटे केशर विकू शकतात. परंतु गरोदरपणात सावधगिरी म्हणून केवळ पॅक केलेले केशर खरेदी करणे चांगले.

. लेबल वाचा

केशर खरेदी करण्यापूर्वी, समाप्ती तारीख तपासून पहा आणि ते प्रमाणित ब्रँड असल्याची खात्री करा.

. शुद्धता तपासा

आपण रंगानेच शुद्ध आणि भेसळयुक्त केशरमधला फरक ओळखू शकता. शुद्ध केशर लाल रंगाचे असते आणि त्याचे टोक मऊ असते व रंग केशरी लाल असतो. तथापि, जर केशर पूर्णपणे किरमिजी रंगाचे असेल तर ते बहुधा बनावट किंवा भेसळयुक्त असते.

. केशराची श्रेणी

केशराची श्रेणी त्याच्या रंगावरून ठरवली जाते. सर्वात वरच्या श्रेणीच्या केशराचा पोत आणि सुवास चांगला असतो आणि ते सर्वात महाग असते. सर्वोत्कृष्ट केशर निवडण्यासाठी तुम्ही त्याच्या श्रेणीविषयी विचारू शकता.

. कृत्रिम रंग

तुम्ही खरेदी केलेल्या केशरामध्ये कोणताही पिवळा किंवा पांढरा धागा नसल्याचे सुनिश्चित करा. जर तसे असेल तर ती भेसळ आहे आणि फुलांचे दुसरे भाग मिसळून ते तयार केले गेले आहे असे समजावे.

. केशराच्या पावडर ऐवजी केशराच्या काड्यांची निवड करा

केशराच्या पावडर ऐवजी काड्यांची निवड करा कारण पावडर करताना केशराचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म काही प्रमाणात कमी होतात. तसेच त्याचा शुद्धपणा तपासणे सोपे जाते. तुम्ही केशराच्या काही काड्या कोमट पाण्यात बुडवून ठेवू शकता जेणेकरून तुम्ही त्याची सत्यता तपासून पाहू शकता. केशर शुद्ध असल्यास त्याचा रंग पाण्यात मिसळण्यास १० ते १५ मिनिटे लागू शकतात. परंतु जर ते बनावट असेल तर पाण्यात घातल्यावर त्याच क्षणी पाण्याचा रंग बदलतो. जास्त काळ पौष्टिक गुणधर्म राखण्यासाठी केशर व्यवस्थित साठवणे आवश्यक आहे. त्याचे गुणधर्म टिकून राहतील अशा पद्धतीने तुम्ही केशर नीट साठवले पाहिजे कारण ते खूप महाग असते. केशर सूर्यप्रकाशापासून दूर हवाबंद डब्यात ठेवावे. असे केल्यास कमीत कमी ६ महिने केशराची चव टिकून राहण्यास मदत होते. तुम्ही ते फॉईल मध्ये गुंडाळून सुद्धा ठेवू शकता. केशर ठेवलेला हवाबंद डबा फ्रिज मध्ये ठेवणे चांगले. असे हे अनेक फायदे असलेल्या केशराचा तुमच्या आहारामध्ये समावेश केल्यास ते फायदेशीर ठरेल. आहारतज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते योग्य प्रमाणात घेतल्यास त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून संरक्षण मिळण्यास मदत होईल. योग्य प्रमाणात केशराचे सेवन करा आणि त्याच्या असंख्य गुणधर्मांचा फायदा घ्या! आणखी वाचा: गरोदर असताना पपई खाणे किती सुरक्षित आहे? गरोदरपणात सुकामेवा खाणे – फायदे आणि जोखीम
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved