प्रीस्कूलर (३-५ वर्षे)

होळीचा सण साजरा करताना तुमच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी टिप्स

रंगांचा उत्सव म्हणजेच होळी आता अगदी दाराशी येऊन ठेपली आहे आणि हा सण साजरा करण्यासाठी प्रत्येकजण विशेषतः लहान मुले उत्सुकतेने वाट पहात आहेत. परंतु ह्या उत्सवाची तयारी करत असताना प्रत्येक वर्षी त्यादरम्यान होणाऱ्या अपघातांची संख्या खूप जास्त असते आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे मुलांचा निष्काळजीपणा आणि ज्ञानाची कमतरता होय. ह्या सणाच्या उत्साहावर पाणी पडू नये म्हणून अचानक होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी आपल्या मुलांची सुरक्षा सुनिश्चित करणे सर्वात महत्वाचे आहे. होळी हा एकमेव सण आहे जेव्हा संपूर्ण देशभर लोक एकमेकांवर रंग आणि पाणी टाकतात. परंतु रंगांचा वापर करताना ते रंग रसायनविरहित असणे आवश्यक आहे जेणेकरून त्वचेच्या ऍलर्जी, रॅशेस किंवा केसांचे नुकसान होणार नाही. रंगामध्ये असणाऱ्या रसायनांचा त्रास मोठ्या माणसांच्या त्वचेला सुद्धा होतो तर लहान मुलांच्या नाजूक त्वचेला त्याचा किती त्रास होत असेल ह्याचा विचार करणे जरुरीचे आहे. तथापि तुम्ही मोठ्या माणसांसोबत होळी साजरी करीत असताना मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये तसेच ही होळी सुरक्षित जाण्यासाठी काही टिप्स आम्ही इथे देत आहोत.

आपल्या मुलांबरोबर सुरक्षित होळी साजरी करण्यासाठी काही टिप्स

. आपल्या मुलावर लक्ष ठेवा

तुमचे मूल रंग किंवा पाण्याशी खेळत असताना तुम्ही किंवा एखादे मोठे माणूस त्यांच्यासोबत असेल ह्याची खात्री करा. विशेषत: जेव्हा पाणी पुरवण्यासाठी मोठा ड्रम किंवा टब वापरला जातो तेव्हा हे प्रकर्षाने पाळले पाहिजे कारण पिचकारीमध्ये पाणी भरण्यासाठी वाकल्यावर मूल त्या ड्रम मध्ये पडण्याची शक्यता असते त्यामुळे सतत त्याच्यासोबत रहा. असे केल्याने अपघात रोखण्यास मदत होईल.

. इको-फ्रेंडली रंग वापरा

नैसर्गिक रंग निवडण्याचा प्रयत्न करा. आपण हळद, चंदन, मेंदी इत्यादींचा वापर करून हर्बल आणि त्वचेसाठी अनुकूल रंग बनवू शकता. विषारी रंगांचा वापर करणे टाळा कारण त्यामध्ये हानिकारक रसायने असल्याने तुमच्या लहान मुलाला त्याची ऍलर्जी होऊ शकते किंवा त्वचेवर पुरळ येऊ शकतात. पर्यावरणास अनुकूल रंग धुण्यास सोपे असतात आणि त्यामुळे त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. याव्यतिरिक्त, पर्यावरणपूरक मार्गाने होळी साजरी करण्याचा आपला हेतू देखील पूर्ण होईल.

. पिचकारी सुरक्षितपणे वापरा

पिचकारीचा वापर करताना दुसऱ्यांना इजा होणार नाही ह्याची काळजी घेण्यास तुमच्या मुलांना सांगा. इतर मुलांच्या डोळ्यात किंवा कानात, तोंडावर पाण्याची फवारणी करू नका असे तुमच्या मुलांना सांगा.

. पाण्याने भरलेले फुगे टाळा

पाण्याचे फुगे खेळायला मजा येते, परंतु ज्यांना फुगा मारतो त्यांना दुखापत होऊ शकते. त्यांच्या त्वचेवर, डोळ्यांवर किंवा कानांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

. रंग तोंडात जाऊ नये म्हणून काळजी घ्या

मुलांना तोंडात रंग जाऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ह्याची शिकवण द्या. या रंगांमध्ये हानिकारक रसायने असतात, जर ते सेवन केले तर उलट्या होऊन विषबाधा होऊ शकते.

. योग्य कपडे घाला

मुलांची त्वचा पूर्णपणे झाकली जाईल ह्याची काळजी घ्या. मुलींसाठी आणि मुलांसाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे सर्वात उत्तम. त्यामुळे रंगांचा संपर्क थेट त्वचेशी येत नाही.

. आदर द्या आणि घ्या

होळीच्या दिवशी इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करण्यासाठी आपल्या मुलास प्रशिक्षण द्या. तुमच्या मुलांना त्यांच्या मित्रांशी उद्धट होऊ देऊ नका आणि त्यांना असभ्य वर्तन करू देऊ नका. कोणतीही आक्रमकता रोखली पाहिजे. त्यांना सांगा की कुणाला रंग खेळाचा नसेल तर त्यांना जबरदस्ती करू नका. याव्यतिरिक्त, आपल्या मुलांना होळी खेळण्यासाठी अंडी किंवा चिखलाचा वापर करू देऊ देऊ नका. अस्वच्छ वर्तन स्वीकारू नका.

. आपत्कालीन क्रमांक जवळ ठेवा

आपत्कालीन संपर्कांची यादी आपल्याकडे ठेवा. ह्या यादीमध्ये आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा संपर्क, रुग्णवाहिका, जवळपासची इस्पितळं इत्यादींचा समावेश असावा. तुमचे मूल ज्या मुलांशी होळी खेळत असेल त्यांच्या पालकांचे फोन नंबर तुमच्याकडे असू द्या

होळी खेळताना त्वचा आणि केसांच्या सुरक्षिततेसाठी टिप्स

होळी खेळत असताना आपल्या मुलाची त्वचा आणि केसांच्या सुरक्षिततेसाठी खालील टिप्सचा वापर करा.

. त्वचा

होळी खेळण्यापूर्वी तुमच्या मुलाच्या शरीरावर तेल किंवा क्रीम लावा. त्वचा मऊ राहण्यासाठी त्वचेसाठी नारळ किंवा ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. आवश्यक असल्यास, सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी तसेच त्याच्या त्वचेचा ओलावा राखण्यासाठी तुम्ही त्याला सनस्क्रीन लोशन देखील लावू शकता. होळीदरम्यान त्वचेची काळजी घेण्याच्या या सूचना म्हणजे त्वचा आणि केस रंगांमधील रसायनांपासून सुरक्षित राहतील ह्याची खात्री तुम्ही बाळगू शकता.

. केस

होळीच्या आदल्या रात्री तुमच्या मुलाच्या केसांना तेल लावा. सकाळीही पुन्हा याची पुनरावृत्ती करा. लांब केस असलेल्या मुलांनी, विशेषत: मुलींनी होळी खेळण्यापूर्वी केस बांधले पाहिजेत. केसांच्या सुरक्षिततेसाठी स्कार्फ वापरावा. रंगाचा उत्सव होळी हा नात्यांमधील बंध घट्ट होण्यासाठी असतो. ह्या सणामुळे आनंद आणि उत्साहात वाढ होते परंतु अचानक अपघात सुद्धा होऊ शकतात . वर दिलेल्या टिप्स लक्षात ठेवा आणि हा सण साजरा करण्यासाठी आपल्या मुलाला तयार करा. आपले मूल सुरक्षित आहे ह्या भावनेने तुमचे मन शांत राहील आणि तुम्हीसुद्धा मनापासून ह्या उत्सवाचा आनंद घेऊ शकाल.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved